
अवंतीने आई-वडिलांना दाखवले आकाश. युगेश्वरी व गजानन हरणे यांचा भावविश्वात उमटलेला अविस्मरणीय प्रवास कष्ट,संस्कार आणि कृतज्ञतेच्या पायावर उभे राहिलेले आयुष्य जेव्हा प्रेमाच्या उंचीवर पोहोचते,तेव्हा त्या यशाचे खरे दर्शन घडते.अशाच एका भावूक आणि प्रेरणादायी घटनेने अलीकडे अनेकांच्या मनाला स्पर्श केला.नोकरी लागल्या नंतर आपल्या पहिल्या पगारातून आई-वडिलांसाठी स्वप्नवत प्रवास घडवून आणणाऱ्या अवंती हरणे या कर्तृत्ववान मुलीने ‘मुलगी म्हणजे ओझे’ या संकुचित मानसिकतेला पुन्हा एकदा ठोस प्रत्युत्तर दिले आहे.आई युगेश्वरी हरणे आणि वडील गजानन हरणे हे दोघेही सामान्य कुटुंबातून आलेले,परंतु असामान्य संस्कार जपणारे व्यक्तिमत्त्व.आयुष्यभर कष्ट, जबाबदाऱ्या आणि संसाराच्या ओझ्यात अडकलेले स्वप्नांचे धागे अवंतीने आपल्या प्रेमाने एकत्र गुंफले आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवले.पहिल्या पगारातून कृतज्ञतेचा प्रवास .नोकरी लागल्यानंतर मिळालेल्या पहिल्या पगारातून बहुतेक जण स्वतःसाठी काहीतरी खरेदी करतात.मात्र अवंतीने त्या पगाराला वेगळाच अर्थ दिला.स्वतःच्या सुखापेक्षा आई-वडिलांचा आनंद महत्त्वाचा मानत, तिने आपल्या खर्चाने त्यांना विमानप्रवास घडवून आणला.आम्ही कधीच “आपण विमानात बसू” असे स्वप्नातही न पाहिलेले ते स्वप्न तिने हळुवारपणे सत्यात उतरवले.घराच्या छतावरून जाणाऱ्या विमानाकडे थांबून पाहणारी आई आज प्रत्यक्ष विमानात बसून आकाशातून खाली दिसणाऱ्या पृथ्वीचा अनुभव घेत होती.हा केवळ प्रवास नव्हता,तर आयुष्यभर साठलेल्या इच्छा,कष्ट आणि त्यागाला मिळालेली एक सुंदर दाद होती. दक्षिण भारताचा आठ दिवसांचा अविस्मरणीय फेरफटका अवंतीने आई-वडिलांना दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांचा सविस्तर फेरफटका घडवून आणला. नागपूर ते बेंगळुरू विमान प्रवास व येथून खास वाहनाची व्यवस्था करून तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य परिसर सर्व काही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दाखविले.उत्तम हॉटेल मध्ये निवास,वेळेवर जेवणाची व्यवस्था,प्रवासात कुठलाही त्रास होऊ नये याची सतत काळजी प्रत्येक गोष्टीत तिची आपुलकी जाणवत होती.
आमच्यासाठी अनेक ठिकाणी खरेदी करताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद शब्दांत मांडता येणारा नव्हता. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान,डोळ्यांत साठलेला आनंद आणि ओठांवर कायमचे हसू हेच तिच्या कष्टांचे खरे फळ होते.सरप्राईज ज्याने आयुष्यभरासाठी स्मृती दिल्या या संपूर्ण प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व आम्हाला आधी न सांगता अवंतीने नियोजित केले होते. विमानाची तिकिटे, हॉटेल बुकिंग,रेल्वे आरक्षण,वाहन व्यवस्था सर्व काही तिने आधीच करून ठेवले होते.आम्ही “नको, खर्च करू नकोस” असे म्हणत असतानाही, तिने आमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत,आमच्या मनातील अपूर्ण स्वप्नांना प्राधान्य दिले.एकुलती एक मुलगी असूनही, तिने कधीच आम्हाला कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक इच्छा ज्या कधी पूर्ण होतील की नाही, याची कल्पनाही आम्ही केली नव्हती त्या तिने या आठ दिवसांच्या प्रवासात पूर्ण करून दिल्या.

मुलीच्या कष्टांचा आई-वडिलांचा अभिमान
या प्रवासात अवंती व तिची मावशी राजश्री व मावसे शैलेश कदम आमच्या सोबतच होती. आमचा आनंद पाहून तिच्याही डोळ्यांत समाधान होते. आमच्यासाठी काहीतरी करू शकल्याचा अभिमान तिच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता. हा प्रवास केवळ आमच्यासाठी नव्हता, तर तिच्यासाठीही आत्मिक समाधान देणारा ठरला.आईच्या आणि वडिलांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून अनेकांच्या मनाला स्पर्श करणारे हे क्षण ठरले. साधा, शांत, पण अर्थपूर्ण असा हा प्रवास कुटुंब, संस्कार आणि कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.आजच्या धकाधकीच्या जगात, जिथे नाती वेळेअभावी कोमेजत चालली आहेत, तिथे अवंती हरणे सारख्या मुली समाजाला एक आशादायी दिशा दाखवतात. आई-वडिलांच्या त्यागाचे ऋण फेडता येत नसले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हेच खरे यश आहे, याची जाणीव हा प्रसंग करून देतो.अवंती,तू आम्हाला आमची स्वप्ने दाखवलीस,आणि त्या स्वप्नांना आकाश दिलेस.मनःपूर्वक धन्यवाद आणि आशीर्वाद.
आई-वडिलांच्या डोळ्यांतून उतरलेले आकाश!!
विमान आकाशात दिसते तेव्हा आपण थांबून पाहतो. क्षणभर मनात येते “आपण कधी बसू यात?” आणि पुढच्याच क्षणी वास्तवाची चौकट मनाला परत जमिनीवर आणते. संसार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, अपूर्ण राहिलेली स्वप्ने…आयुष्य असेच पुढे सरकत राहते. पण कधीकधी एखादी व्यक्ती, एखादं नातं, त्या अपूर्ण स्वप्नांना हात लावून दाखवतं आणि तेव्हा आयुष्याचाच अर्थ बदलतो.माझ्या आणि माझ्या पत्नी युगेश्वरी यांच्या आयुष्यात असा अर्थ बदलणारा क्षण आमच्या मुलीने अवंतीने घडवून आणला.अवंती पुण्याला नोकरीला लागली. त्या बातमीने आम्हाला आनंद झाला,समाधान मिळाले. पण त्या आनंदावर कळस चढवणारी गोष्ट पुढे घडणार आहे, याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती .पहिल्या पगारातून स्वतःसाठी काही घ्यावे, हे स्वाभाविक असते. मात्र अवंतीने त्या पगाराला वेगळाच अर्थ दिला. तिने ठरवले “आई-वडिलांना, मावशी मावसाना आयुष्यात कधीही न अनुभवलेला आनंद द्यायचा.”पहिला पगार आणि पहिली उंच भरारी घराच्या गच्चीवरून जाणाऱ्या विमानाकडे पाहत, “किती मोठं असतं विमान” असे सहज म्हणून जाणारी आई आज प्रत्यक्ष विमानात बसून आकाशातून खाली पाहत होती. हा क्षण केवळ प्रवासाचा नव्हता, तो आयुष्यभराच्या कष्टांचा, संयमाचा आणि त्यागाचा सन्मान होता.अवंतीने आमच्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली, तेही आम्हाला न सांगता. आम्ही “नको, खर्च करू नकोस” म्हणत असतानाही, तिने आपल्या निर्णयावर ठाम राहून आमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.विमान उड्डाण घेत असताना, युगेश्वरीच्या डोळ्यांत उत्सुकता होती, थोडी भीती होती, पण त्याहून अधिक आनंद होता. माझ्या मनात मात्र शब्द नसलेले समाधान होते“आपण काहीतरी बरोबर केलंय” याची शांत जाणीव.
दक्षिण भारताचा आठ दिवसांचा भावप्रवास
हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता; तो भावनिक होता,मानसिक होता,आणि आयुष्याला नवी उंची देणारा होता.दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक,ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा फेरफटका अवंतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणला. नागपूर ते बेंगळुरू हा विमान प्रवास व येथून खास वाहनाची व्यवस्था, स्वच्छ व आरामदायी हॉटेल्स,वेळेवर जेवण,आणि प्रवासात कुठलाही त्रास होऊ नये याची सतत काळजी प्रत्येक गोष्टीत तिची जबाबदारी आणि प्रेम दिसत होते. आम्ही कुठेही “कसं होईल?” असा विचार करण्याआधीच, ती सगळं आधीच ठरवून ठेवत होती.तीर्थक्षेत्रांमध्ये हात जोडून उभे राहिलेले आम्ही त्या क्षणी देवापेक्षा मुलीचेच जास्त आभार मानत होतो. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवंती आमच्यासाठी खरेदी करताना, “आईला हे आवडेल,बाबांना ते बरे वाटेल” असे म्हणत होती.त्या छोट्या-छोट्या वाक्यांत तिच्या मनातील प्रेम ओसंडून वाहत होते.आमच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू पाहून तिच्या डोळ्यांतही समाधान दिसत होते.आईच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद, तिच्या बोलण्यात आलेली हलकेपणा, आणि वडिलांच्या मनात दाटून आलेला अभिमान हे क्षण शब्दांत मांडणे अवघड आहे. हा आठ दिवसांचा प्रवास कसा गेला, हे कळलेच नाही. प्रत्येक दिवस नव्या अनुभवांनी भरलेला होता.सरप्राईज,जे आयुष्यभर पुरेल या संपूर्ण प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व आम्हाला आधी सांगितलेच नव्हते. विमान, हॉटेल, रेल्वे, वाहन सर्व काही आधीच ठरलेले.आम्ही नाही म्हणत असतानाही, अवंतीने आमच्या मनातील स्वप्नांना प्राधान्य दिले.एकुलती एक मुलगी असूनही, तिने कधीच आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.समाजात अजूनही मुलींबाबत असलेली साशंकता, भीती आणि पूर्वग्रह अवंतीने आपल्या कृतीतून ते सगळे दूर केले.मुलगी म्हणजे संस्कारांची शिदोरी आजच्या काळात यशाची व्याख्या पगार, पद, प्रतिष्ठा इतक्यापुरती मर्यादित होत चालली आहे. पण माझ्या दृष्टीने यशाची खरी ओळख म्हणजे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याची क्षमता.ती क्षमता अवंतीकडे आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.या प्रवासात अवंती आमच्यासोबतच होती. आमचा आनंद पाहून तिलाही आनंद मिळत होता.आमच्यासाठी काहीतरी करू शकल्याची तृप्ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
हा लेख मी केवळ एक अनुभव म्हणून लिहित नाही.हा लेख समाजासाठी एक संदेश आहे.मुलगी म्हणजे भार नाही, ती घराचा कणा असते. तिला योग्य संस्कार, शिक्षण आणि स्वातंत्र्य दिले, तर ती आई-वडिलांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवते.
अवंती,
तू आम्हाला फक्त दक्षिण भारत दाखवून आणले नाहीस,
तू आम्हाला आमची अपूर्ण स्वप्ने दाखवलीस,
आणि त्या स्वप्नांना आकाश दिलेस.थँक्स !धन्यवाद!!
……. तुझेच वडील…….
गजानन कुसुम ओंकार हरणे.
जिल्हा परिषद नगर,खडकी ,अकोला .
संवाद…9822942623.
