
कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते; तर ती काळजाच्या गाभाऱ्यातून उमटलेली जीवंत भावना,प्रतिभा, समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब असते.प्रतिभावंत कवी संजय एकनाथ गायकवाड यांचा ‘अंधारावर सुर्य गोंदला’ हा काव्यसंग्रह अशाच संवेदनशील,सामाजिक आणि वैचारिक जाणीवांनी समृद्ध झालेला प्रभावी दस्तऐवज आहे.त्यांच्या पहिल्या ‘सुर्यांधकारात माणूस’ या काव्यसंग्रहानंतर आलेला हा संग्रह अधिक परिपक्व,अधिक व्यापक आणि अधिक अंतर्मुख करणारा वाटतो.मानवी साद प्रतिसादाचे अनंत पैलू जिथे सतत दिसून येतात,त्या बृहन्मुंबई महानगरपालिके सारख्या ठिकाणी कार्यकारी अभियंता पदावर सेवेत नित्यनेमाने व्यस्त असतांनाही काव्य लेखनाची आवड असणे व प्राप्त परिस्थितीत ती जोपासणे हे निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.त्यांनी अनेक कवितेतून वेगळेपणा, आत्मियता,बांधिलकी, प्रेम, दुःख,त्याग असे विविध पैलू उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ‘सुर्यांधकारात माणूस’ काव्यसंग्रहाची २६ ऑगस्ट २००९ रोजी दैनिक विश्व सम्राट मध्ये समीक्षा लिहिली त्यावेळी जसं दडपण होतं,तसंच यावेळी जाणवलं.सामाजिक भान, संवेदनशीलता आणि काव्यात्मकता जपत ही समीक्षा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सारे जीवन हे केवळ वैयक्तिक संघर्षाचे नव्हे,तर सामाजिक परिवर्तनाच्या अखंड लढ्याचे प्रतीक आहे.त्यांच्या दृष्टीने शिक्षण हे नोकरीचे साधन नसून,ते मुक्तीचे प्रभावी साधन होते.म्हणूनच त्यांनी ‘पेन आणि ब्रेन’ या शस्त्राच्या आधारे अज्ञान,अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध यशस्वी लढा उभारला.हीच वैचारिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रतिभावंत कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सुर्य गोंदला’ या काव्यसंग्रहाचे आशयसूत्र शीर्षकातून अधिक स्पष्ट होते. ‘अंधार’ म्हणजे अज्ञान,अन्याय,दडपशाही आणि ऐतिहासिक शोषणाचे प्रतिक म्हणून उभा राहतो. तर ‘सूर्य’ म्हणजे ज्ञान,जागृती, स्वातंत्र्य आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबोधनकारी,परिवर्तनवादी अनमोल विचार.मात्र सुर्य ही केवळ प्रकाशाची प्रतिमा नसून ती ऊर्जा,सातत्य आणि बंडखोरीचेही प्रतिक आहे.अंधार आणि सुर्य या प्रतिमा केवळ नैसर्गिक नसून त्या सामाजिक वास्तवाचे प्रतिक आहे. कवी अंधार नाकारत नाही; तर उलट त्यावर ‘सुर्य गोंदण्याचा’ म्हणजे परिवर्तन घडवण्याचा, अंधारावर प्रकाश टाकणारा,संघर्षातून उभा राहणारा आशावाद दाखवतो.अज्ञान दूर करणारी ज्ञानशक्ती हीच खरी क्रांती आहे.हीच या संग्रहाची केंद्रस्थानी असलेली भूमिका आहे. या शिर्षकातूनच काव्यसंग्रहाचा आशयगर्भ केंद्रबिंदू स्पष्ट होतो.तर मुखपृष्ठावर दिसणारी अंधारातून प्रकाशाकडे झेप घेणारी मानवी आकृती ही केवळ एका व्यक्तीची प्रतिमा नसून,शतकानुशतकांच्या अन्याय,दडपशाही आणि गुलामीच्या साखळदंडातून मुक्त होण्यासाठी झगडणाऱ्या समस्त वंचित समाजाचे प्रतिक वाटते. शरीराभोवती असलेला ज्वालामय प्रकाश संघर्ष,वेदना,विद्रोह आणि नवचैतन्य यांचे प्रभावी दर्शन घडवतो.नव्या उष:कालाची चाहूल देतो.तेजस्वी प्रकाशासह दर्शविलेला ‘पेन’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पेन आणि ब्रेन’ या विचारांची आठवण करुन देतात.
‘अंधारावर सुर्य गोंदला’ हा काव्यसंग्रह समकालीन सामाजिक वास्तवाशी निगडित आहे.विषमता,दुःख, संघर्ष,मातृत्व, मानवी मूल्ये आणि परिवर्तनाची आशा यांचे प्रभावी चित्रण यात आढळते. विशेषतः दलित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या अनुभव विश्वाला गायकवाड यांनी प्रामाणिकपणे अभिव्यक्त केले आहे.विषमता,अन्याय, दुःख, संघर्ष, संताप आणि स्वाभिमान यांचे जिवंत दर्शन या कवितांमधून घडते.कवीची दृष्टी ही वास्तववादी असून,ती कल्पनारंजनापेक्षा अनुभवाधिष्ठित आहे. ते वास्तवाशी थेट भिडतात आणि हीच त्यांची खरी ताकद ठरते.‘दीपस्तंभ’ आणि ‘प्रज्ञासूर्य’ या कवितांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रकाशस्तंभासारखा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.’लढलास हक्काच्या ओंजळभर पाण्यासाठी,वंचितांचा स्वाभिमान जागविलास माणूस होण्यासाठी’ या ओळी केवळ स्तुती नाही तर, इतिहासाची जाणीव करुन देतात. ‘थँक्यू माझ्या बापा’ या कवितेत आदर, वैचारिक निष्ठा, कृतज्ञतेचा संगम दिसून येतो. या कवितांमधून आंबेडकरी विचारांचे प्रेरणादायी रुप प्रभावीपणे उलगडते.
मातृत्वाचे चित्रण हा या काव्य संग्रहाचा आणखी एक हृदयस्पर्शी पैलू आहे. ‘आई’, ‘माझी माय’, ‘आई-बाप’ या कवितांमधून आईचे त्यागमय, कष्टमय आणि करुण रुप प्रभावीपणे, अत्यंत संवेदनशीलपणे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. येथे आईचं देवत्वीकरण न करता तिच्या मानवी संवेदना आणि संघर्ष अधोरेखित केले आहेत ही बाब विशेष लक्षणीय ठरते. ‘करार’ ही कविता मानवी मूल्यांचा जाहीरनामा वाटते. जात,धर्म,भेदभाव नाकारुन ‘माणूस’ म्हणून जगण्याचा ती आग्रह धरतात. ‘सुगंध ही कविता राष्ट्राची एकता दाखवते. विविध जाती,धर्म, संस्कृती असूनही भारत एकच आहे हा संदेश प्रतिकात्मक पध्दतीने दिला आहे. आईच्या त्यागाचे अत्यंत ह्रदयद्रावक, प्रभावी चित्रण ‘क्षण’ या कवितेत केलं आहे. स्त्री जीवनातील वेदना, तिचे मौन, त्याग, समाजातील दुटप्पीपणा आणि दुर्लक्षित भावविश्व ‘कधी पाहतो का तिच्या ह्रदयावरचे ओरखडे ?’, ‘अमरत्व’ यांसारख्या कवितांतून तिक्ष्ण भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे ‘माझ्या कवितेचं बीज’ या कवितेत कवीच्या सर्जनशीलतेचे सामाजिक स्रोत उलगडतात.’स्पर्श’ ही कविता केवळ स्त्रीच्या अनुभवांची नोंद नाही तर, समाजातील विकृत नजरेने आणि असभ्य वर्तनाने जखमी झालेल्या ‘स्त्री’ मनाचा अंतःस्वर आहे.कवीने ‘स्पर्श’ या साध्या वाटणाऱ्या शब्दाला अत्यंत व्यापक सामाजिक अर्थ दिला आहे. सामान्यतः ‘स्पर्श’ म्हणजे माया,आपुलकी,आधार,प्रेम यांचे प्रतिक मानले जाते; परंतु या कवितेत तो भिती, असुरक्षितता,घृणा आणि मानसिक जखमांचे प्रतिक बनतो.तर ‘पहाटेचा आशावादी’ ही कविता समाजाच्या मुख्य प्रवाहातून फेकल्या गेलेल्या,तिरस्कार सहन करणाऱ्या तृतीयपंथी यांचे वास्तव मांडते.कविता ही केवळ कलात्मक सौंदर्यनिर्मिती नसून वास्तवातून उगवणारी प्रक्रिया आहे,हे यातून अधोरेखित होते.या काव्यसंग्रहाची भाषा साधी,सरळ आणि प्रभावी आहे.प्रतिमा आणि रुपकांचा वापर आशयसुसंगत आहे. कवी अलंकारिकतेपेक्षा आशयप्रधानता जपतो.त्यांच्या कविता सामाजिक विसंवादावर आघात करणाऱ्या असून,मनाला हेलावून,अस्वस्थ करुन सोडतात, काळजाचा ठाव घेतात. तर, पत्नीवर असणारं प्रेम व्यक्त करतांना सुखावून जाणारा प्रियकर त्यांच्या कवितांमध्ये दिसून येतो.
एकूणच ‘अंधारावर सुर्य गोंदला’ हा काव्यसंग्रह मराठी दलित साहित्य परंपरेत महत्त्वाचे स्थान मिळवू शकतो. कारण, तो केवळ वेदनांचे चित्रण करत नाही, तर प्रबोधन, स्वाभिमान आणि परिवर्तनाची दिशा दाखवतो. एकूणच, ‘अंधारावर सुर्य गोंदला’ हा काव्यसंग्रह सामाजिक जाणीव, मानवी संवेदना, संघर्ष आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रभावी संगम आहे. तो वाचकांना केवळ भावनिक पातळीवर स्पर्श करत नाही, तर अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त करायला भाग पाडतो, संवेदनशील बनवतो आणि परिवर्तनाच्या दिशेने प्रेरित करतो. हा संग्रह म्हणजे संघर्षातून उगवलेल्या आशेचा किरण आणि परिवर्तनाच्या आकांक्षेचा सशक्त असा दस्तऐवज आहे. त्यांनी आपल्या अनुभवविश्वातून आणि सामाजिक जाणीवेच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या विचारांतून या कवितांची निर्मिती केली आहे. अशा या अर्थपूर्ण, जीवंत, सामाजिक भान व मानवी संवेदना असलेल्या काव्यसंग्रहाला आणि कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या कवितेची वाटचाल शब्दांच्या समृद्ध प्रदेशांतून होऊन, त्यांच्याकडून सर्वोत्तम, दर्जेदार अशा अनमोल साहित्याची निर्मिती होवो ह्याच त्यांच्या उज्वल भावी वाटचालीस आणि त्यांच्या साहित्य विश्वाला मंगलमय सदिच्छा !
काव्यसंग्रह : अंधारावर सुर्य गोंदला
कवी : संजय एकनाथ गायकवाड
रजत प्रकाशन संभाजीनगर
किंमत : ₹ १८०/
मिलिंद कांबळे चिंचवलकर- ९८९२४८५३४९
