चला सत्यशोधक विवाह विधीकडे.! … राजाराम सूर्यवंशी.

बातमी शेअर करा.

महाराष्ट्रातील हुंडाबळीचे सर्वात ताजे आणि धक्कादायक प्रकरण पुण्यातील मुकुंदनगर भागातून समोर आले आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार,सासरच्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित आयटी (IT) इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) आणि विविध अहवालांनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी २०० हून अधिक हुंडाबळी (Dowry Deaths) होतात. प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ही आकडेवारी चिंताजनक आहे.
हुंडाबळी का होतात?:—” शूद्र, पशु, गवार, नारी यह सब ताडनके अधिकारी!’ भारतातील सामाजिक वास्तवावर नेमकं बोट ठेवणार्‍या संत कबिरांच्या या दोहामध्ये स्त्री- पिडण व हुंडाबळीचे सार दडले आहे.हुंडा हा दोन अक्षरी शब्द आहे व बळी हा सुध्दा दोन अक्षरी शब्द आहे. या दोन अधिक दोन चार अक्षरांनी मात्र नवविवाहित स्त्रीयांचे जीवन उध्वस्त केले आहे. हुंड्यासारख्या पुरुषसत्ताक सामंती रुढीने भारतातील सर्व जाती धर्मातील युवतींच्या स्वप्नांची राख रोंगोळी केलेली आहे.तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असतांना लग्नाच्या सुंदर स्वप्नांची होळी हुंडा अनेक वर्षांपासून कित्येक तरुण महिलांचा बळी घेत आला आहे. नव विवाहितांचे जीवन नरकमय बनवत आला आहे. तरीही या अमानुष प्रथेला समाजात प्रतिष्ठा आहे. वारकरी,सत्यशोधकीय, गांधीवादी व आंबेडकरी नवप्रबोधन कुठे तरी कमी पडल्याची ही परिणिती असावी का?.जितका जास्त हुंडा तितकी समाजात प्रतिष्ठा मोठी! या खोट्या व भ्रामक मानसिकतेने पछाडलेल्या आई- वडिल व वर मुलांचा हा सामाजिक द्रोह आहे.ऐखाद्या प्रबोधित,नव विचिरवादी,समतावादी मुलाने व त्याच्या आई- वडिलांनी हुंडा मागितला नाही वा घेतला नाही, तर त्या तरुणात काही तरी कमी आहे. तो मुर्ख आहे असा अपप्रचार केला जातो.मोठे घराणे,शेतीवाडी, बंगलागाडी, मोठं गाव, उच्च शिक्षण असलं की मुलाचे आई- वडिल हवेत तरंगू लागतात.अनेक पैसेवाले वधु पिता घिरट्या घालू लागतात.
समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत की, हु़ंड्याच्या प्रथेपायी अनेक विवाहित स्त्रीयांनी आत्महत्या केल्या आहेत. 

   गरीब व मध्यमवर्गीय आईवडीलांनाही या प्रथेपायी मुलींचा जन्म नकोसा वाटतो आहे. काही ठिकाणी मुलगी जन्माला येण्यापुर्वीच गर्भजल परीक्षा करुन तिची हत्या करण्यात आली आहे.हुंडा हा विषमतावादी पुरुषसत्ताक समाज पद्धतीचा सामंतशाही अवशेष असून, तो स्त्रींयांना समाजात दिल्या जाणार्‍या विषमतापुर्ण वागणुकीचे प्रतिक ही आहे.मुलगी डॉक्टर असो, इंजिनिअर असो, वकील असो वा आयटीत मोठ्या पगारावर,असो विषमतावादी समाजाच्या लग्नाच्या बाजारात तिची किंमत शुन्य असते.अनेक पुरुषसत्ताक रुढी परंपरेमध्ये ” कन्यादान ” ही आणखी एक शोषणाची विषमतावादी रीत आहे. त्यासाठी वधुला “सालंकृत” केली जाते. व वधुच्या बापाचा खिसा रिकामा केला जातो.कन्यादान म्हणजे मुलीचे माहेर सुटले व ती परक्याची झाली.”सासर हाच तीचा स्वर्ग ” असं तिने मानायची विधी असतो.हुंड्याची रक्कम दिवसेंदिवस चढत्या भाजणीने वाढत चालली आहे. मुलगा शेतमजूर असो वा प्रोफेसर ; त्यांचे भाव ठरलेले असतात.या बाजारभावामुळे दोन जीव व दोन घराणे एकजीव होतच नाहीत. त्यांच्यात माणुसकी व आपुलकीचा सेतू बांधलाच जात नाही.
हुंडा प्रतिबंधक कायदा :- १९६१ साली महाराष्ट्रात शासनाने हुंडा विरोधी कायदा बनवला. परंतु १९६१ ते १९७५ पर्यंत फक्त एकच केस कोर्टात गेली. व हा कायदा निष्रभ ठरला होता.नवविवाहितांचे बळी जाण्यात खंड पडत नव्हता.तशात १९७५ साल उजाडले. संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. देशात आणि महाराष्ट्रातही महिलांचे प्रश्न ऐरणीवर यायला लागलेत.पुण्यात नोव्हेंबर १९७५ मध्ये औपचारिकरित्या “स्त्रीमुक्ती संघटनेची ” स्थापना झाली. व महिलांच्या प्रश्नांना अधिकृतपणे वाचा फोडण्यासाठी पुण्यातून ” बायजा” हे महिलांच्या प्रश्नांना वाहिलेले मासिक सुरु झाले.
    महाराष्ट्रातील सर्व संसदबाह्य लोकशाहीवादी संघटना कार्यरत झाल्या.महिलांच्या विविध संघटनांनी हु़ंडाबळीच्या प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.समाजवादी महिला सभा,दक्षता समिती,अत्याचार विरोधी म़च, हुंडा निर्मुलन समिती, नारी समता मंच आदि विविध महिला संघटनांनी संघर्ष बुलंद केला होता. धुळ्यातून श्रीमती विजयाताई चौक यांनी पिडित महिलांचे मजबूत संघटन उभारले होते. तत्कालीन खासदार प्रमिला दंडवते यांनी संसदेत हुंडा व स्त्री अत्याचारविरोधात आवाज उठवला होता.व एक खाजगी विधेयक लोकसभेत मांडले होते. त्यानंतर महिला प्रश्नांची पाहणी करण्यासाठी एक कमिशन नेमले गेले होते. १९८४ साली पुन्हा एक विधेयक मांडले गेले. व २ आक्टोबर १९८५ रोजी नवा हुंडाविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यात आला. हुंडाबळींना आळा घालण्यासाठी, सुनेचे शाररिक व मानसिक छळ करणार्‍या सासरच्या मंडळींना शासन करण्यासाठी फौजदारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.
  फक्त तरुण स्त्रीयाच का जळतात? हा यक्षप्रश्न महाराष्ट्रात विचारला जाऊ लागला होता.त्याशिवाय बाकी अजून बरेच प्रश्न या हुंडाबळी संदर्भात विचारण्यात येऊ लागले होते.

१) साधारणत: २० ते  २२ वर्षे वयाच्या तरुण विवाहिताच का जळतात

२) या सगळ्या स्त्रीया सासरीच का जळतात?

३) त्या माहेरी का जळत नाहीत?

४)सून जळते, सासू का जळत नाही?

५)भावजय जळते नणंद का जळत नाही?

६) देराणी जळते, जेठाणी का जळत नाही? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रभर चर्चेत येऊ लागले होते.
त्याशिवाय,

७)त्याकाळी ग्रामीण भागात सार्वजनिक विहिरी होत्या. त्या विहिरींवर पाणी भरायला गेलेली नवविवाहिता त्याच विहिरीत का पडत होती?

८) घरामध्ये विषारी औषधे का असायची? असली तरी ती औषधे नेमकी सूनच का पित असे?

९) त्याकाळी घरोघर स्टोव्ह होता. एलपीजी गॅस तोपर्यंत आला नव्हता. तर, स्टोव्हवर पदर पडून सून ९० ते १०० टक्के कशी काय जळायची?

१०) स्वत:ला पेटवून घ्यायला या सर्व स्त्रीया वेड्या होत्या का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असत.
    हुंड्याचा प्रश्न अशा प्रकारे दाहक बनत चालल्यामुळे महाराष्ट्रात व खानदेशात हुंडा विरोधी चळवळ जोमात सुरु झाली होती. या प्रश्नावर रान उठविण्यासाठी सर्व स्त्री संघटनांनी कंबर कसली होती. समाजातील जागृत नागरिकांचाही या लढ्यातला सहभाग वाढू लागला होता. अगदी स्मशानभूमी मध्येही जाहिर निषेध मोर्चे,सभा होऊ लागल्या होत्या.महाराष्ट्र विधान सभेतही हुंडाबळीचा प्रश्न वारंवार पटलावर येऊ लागला होता. या प्रश्नांना तत्कालीन नामदार शंकरराव चव्हाण हे सर्व माहिती जमा करुन सविस्तर उत्तरे देत असत.कायदे झाले होते, पण कायदा म्हणजे सर्वकाही नव्हते. कायद्याने कठोर शासन मिळेलच असं नव्हते. ऐवढ्या वर्षांचा संघर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही, हुंडाबळीच्या केसेस बंद झाल्या नाहीत.तात्पर्य काय की, हुंडापध्दत आणि हुंडाबळी केवळ कायद्याने नष्ट होणार नाहीत. त्यासाठी लोकशिक्षण व प्रबोधन करुन समाजात व समाजातील सर्व घटकांमध्ये सामाजिक व वैचारिक परिवर्तन घडवावे लागेल.
    हुंडाबळीचा कायदा होऊनही हुंडाबळींची संख्या आटोक्यात आली नाही. उलट या आ त्या स्वरुपात ती आजही जीवंत आहे.स्त्री- पुरुष समानतेची कल्पना जोपर्यंत समाजात रुजत नाही, तोपर्यंत ही पाशवी रुढी बंद होणार नाही.या पार्श्वभुमीवर  हुंडाबळी व  सुनांवरचे अत्याचार रोखण्यासाठी सत्यशोधक प्रबोधन व सत्यशोधक विवाह विधी काळाची गरज आहे.सत्यशोधक विवाह पद्धत आणि सत्यशोधक पद्धतीने अंत्यसंस्कार किंवा मृत्यू संस्कार ही आजच्या काळाची नितांत गरज मानली जाते, कारण ही पद्धत आर्थिक बचत,सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाला प्रोत्साहन देणारी आहे.
सत्यशोधक विधीचे वैशिष्ट्ये म्हणजे :– १)खर्च व वेळेची बचत: पारंपारिक धार्मिक विधींमध्ये होणारा अवाढव्य खर्च, भट-पुरोहितांचे दक्षिणेचे शुक्ल आणि कर्जाचा बोजा टाळून ही पद्धत अत्यंत कमी खर्चात पार पडते.२)पुरोहितशाही व कर्मकांडाला विरोध: यात कोणत्याही मध्यस्थ किंवा भटजींची आवश्यकता नसते. वधू-वर स्वतः किंवा समाजातील कोणतीही विवेकवादी व्यक्ती साध्या भाषेत विधी पार पाडू शकतात. ३) सामाजिक समता आणि मातृभाषा: यात संस्कृतऐवजी मराठी भाषेत मानवी मूल्यांची आणि समतेची शपथ वा मंगलाष्टके म्हटली जातात. ४) हुंडा पद्धतीला पूर्णपणे फाटा दिला जातो. त्यामुळे हुंडाबळीचे प्रकार घडत नाही. नवविवाहित तरुण स्त्रीचे जीवन फुलते, बहरते. तीला सामाजिक मान- सन्मान मिळतो. सासर माहेरची, अशी दोन्ही घराणी आनंदाने एकमेकांच्या जवळ येतात. आत्मीयता वाढते. दोन्ही कुटुंबाची प्रगती होते.५) मृत्यू संस्कारांमध्येही सुसंगतता: मृत्यू पश्चात होणारे अनावश्‍यक सोहळे, भोजावळी (तेरवी/बारवीचा अवास्तव खर्च) आणि ढोंग बंद करून सन्मानपूर्वक, साध्या व वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंत्यसंस्कार करणे हे कुटुंबाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास मदत करते. वैज्ञानिक दृष्टीकोनाची वाढ होते. घरातील लहान मुले अंधश्रध्देपिसून ला़ब राहतात.
६) महात्मा जोतीराव व सावित्रीबाई   फुले यांची प्रेरणा: — मानव व ईश्वरामध्ये आडवा पडलेला पुरोहित फुले दाम्पंत्याला मान्य नव्हता. हा दलाल भिक्षूकाच्या रुपाने अनितीयुक्त, असत्य पोथ्यापुराणे व लबाड धर्मपुस्तका़ची निर्मिती करून मूर्तीपुजेत समाजाला अडकवून स्वत: आचार्य, बौध्दाचार्य, शंकराचार्य,धर्मगुरु, पुजारी, पाद्री, इमाम, खलिफा बनून धर्माचा दलाल व रखवलदार बनला होता.यांनी समाजाला ईश्वराची खरी ओळख होऊ दिली नव्हती. समाजाला दगडधोंड्यात व उपास- तापासात अडकवून ठेवले होते.या व अशाप्रकारच्या सर्व तर्‍हेच्या मध्यस्थ दलालांना धार्मिक विधीच्या सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी व समाजाला अंधश्रध्देतून मुक्ती मिळवून देण्यासाठी फुले दाम्पत्यांने २४ सप्टेंबर १८७३ या दिवशी सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली होती ; व ही समतावादी चळवळ सुरु केली होती.
त्या अंतर्गतच ब्राम्हण पुरोहिताशिवाय लग्नविधी पार पाडण्यासाठी सत्यशोधक मंगलाष्टके रचून सत्यशोधक विवाह विधी बनवून आचरणात आणला होता.
  आजच्या महागाईच्या आणि वैज्ञानिक युगात अशा साध्या पद्धतीच्या विवाहविधीमुळे सामान्य जनता धार्मिक,आर्थिक व मानसिक शोषणामधून मुक्त होऊ शकते.
तुम्हाला सत्यशोधक विवाह विधी व सत्यशोधक पध्दतीने अंत्यसंस्कार विधी करावयाचे असल्यात धुळ्यातील परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते व सत्यशोधक विधी कर्ते मान. राजकिशोर तायडे व चाळीसगावचे सत्यशोधक कार्यकर्ते ह. भ. प भगवान रोकडे यांच्याशी संपर्क साधावा.तसेच महाराष्ट्रात पुढीलप्रकारे अनेक सत्यशोधक कार्यकर्ते व विधीकर्ते कार्यरत आहेत, जे सत्यशोधक विधीप्रमाणे लग्न लावून रयतेचे जीवनमान सूखी आणि आनंदी करण्यासाठी झटत आहेत. त्यांना अनुसरून तुम्हीही ही सामाजिक समतेची चळवळ पुढे नेऊन महाराष्ट्राला हु़ंडाबळी मुक्त करण्यात खारीचा वाटा उचलू शकता व महाराष्ट्राला पुन्हा देशातील प्रगतीशील व अग्रेसर राज्य बनवू शकता.
चला तर मग, त्या सेवाभावी सत्यशोधक विधी कर्ते व कृतीशील कार्यकर्ते कोण आहेत, त्या़ची ओळख करु या!
• सर्वस्वी सत्यशोधक अहिल्यानगर, श्रीगोंद्याचे उत्तरेश्वर मोहोळकर, भिमराव कोथंबिरे, कर्जतचे संभाजी गदादे, संतोष बनकर व दिलीप खराडे.चाळीसगावचे विलास माळी,भगवान बोरसे.एरंडोलचे शिवदास महाजन.नासिकचे भगवान सोनवणे, भालचंद्र महाराज.जामनेरचे रमेश वडाले.सिंदखेडराजाचे आकाश मेहेत्रे यासर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर मोठ्या प्रमाणात सत्यशोधक पध्दतीने विवाह लावून,आणि अशा विवाह विधींने ज्यांनी ज्यांनी सत्यशोधक विवाह केलेत, तेही हुंडाप्रथेला बाजूला सारुन, ते ते सर्व दाम्पंत्य आज सुखाने व आनंदाने संसार करत आहेत.खरे पाहू जाता, या सत्यशोधक पद्धतीच्या विवाहांकडे तरुणांचे आकर्षण वाढले असून त्याचे सामाजिक मुल्यही त्यांच्या लक्षात आले आहे.मात्र ती आचरणात आणण्यासाठी त्यांना घरातून पाठिंबा हवा आहे. तो पाठिंबा त्यांना अजून घरातून मिळत नाही, हि वस्तुस्थिती आहे.या पध्दतीने विवाह केल्यास तरुणांना घरातील वरिष्ठांचा विरोध होतो.प्रत्येक घरातील वरिष्ठांची समजूत काढणे हा त्यावर एक उपाय आहे.
   आताच्या महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने तरुणांनी ” घरोघर व गावोगाव सत्यशोधक विधी ” हा प्रबोधनाचा कार्यक्रम राबवला पाहिजे.
त्या निमित्ताने महात्मा फुलेंचे सर्वांगीण शोषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.व महाराष्ट्रही हुंडामुक्त होण्यास मदत होणार आहे.
लक्षात घ्या, हे राष्ट्र निर्माण कार्य आहे. त्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही ही पुढे या!
    देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा जोतीराव फुले यांनी घडवून आणला होता.पुरोहितांशिवाय झालेल्या या विवाहात वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधूचं नाव राधा असं होते. त्यानंतर संपुर्ण पुणे व सातारा जिल्हा हा सत्यशोधकमय झाला होता.तीच परंपरा आज खानदेशातून राजकिशोरजी तायडे चालवत आहेत.
महात्मा जोतीराव फुले ते राजकिशोर तायडे, या कडीमध्ये  असंख्य नामी – बेनामी सत्यशोधक नेते, कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक आहेत. त्यांनी आतापर्यंत व्यक्तीश: व सार्वजनिकरित्या अनेक सत्यशोधक विवाह लावले आहेत, स्वत: केले आहेत.अशाप्रकारे  महाराष्ट्रात आज तागातक या  विधीनुसार शेकडो सत्यशोधक लग्ने लावण्यात आली आहेत. आणि समाजाकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद लाभतो आहे.त्यांचा हा समतेचा कांरवा असाच पुढे जावा हि सदिच्छा.
जय ज्योती! जय सत्यशोधक!!…….
 सत्यशोधक वारकरी राजाराम सूर्यवंशी.9503867602,पालघर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *