फटाक्यांच्या धुराऐवजी दिव्याचा प्रकाश पसरवा!

बातमी शेअर करा.

फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे समाजसेवक गजानन हरणे यांचे जिल्हावासीयांना आवाहन

अकोला  :- दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा सोहळा आणि नात्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ करणारा सण! मात्र, अलीकडच्या काळात दिवाळीच्या आनंदाला फटाक्यांच्या आतषबाजीचे आणि ध्वनिप्रदूषणाचे गालबोट लागले आहे. फटाक्यांच्या वाढत्या वापरामुळे हवेचे प्रदूषण,ध्वनिप्रदूषण,अपघात,आगीच्या घटना तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसनविकारग्रस्त रुग्ण आणि पशुपक्ष्यांना होणारा त्रास या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे कळकळीचे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून फटाक्यांच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी दिसून येत आहे. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत फटाके फोडण्याचा उत्साह असला, तरी या क्षणिक आनंदाची किंमत निसर्गाला आणि समाजातील असंख्य निरपराध नागरिकांना मोजावी लागते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. फटाक्यांमध्ये बाहेर पडणारा विषारी धूर वातावरणातील हवेची गुणवत्ता खालावली, तर कर्णकर्कश आवाजामुळे शांतता भंग होऊन अनेकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा निष्काळजीपणामुळे भाजणे, डोळ्यांना इजा होणे, आगी लागणे अशा दुर्घटना ही घडतात.


यासंदर्भात गजानन हरणे म्हणाले की, “दिवाळी ही अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा आणि द्वेषावर प्रेमाचा विजय साजरा करणारी आहे. मग या आनंदोत्सवात धूर, आवाज, अपघात आणि प्रदूषण कशासाठी? आपल्या आनंदामुळे दुसऱ्यांच्या आरोग्याला, जीवाला किंवा शांततेला बाधा पोहोचत असेल, तर त्या आनंदाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. फटाक्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा गरजू कुटुंबांना, गरीब विद्यार्थ्यांना, अनाथ व वंचित मुलांना मदत करण्यासाठी वापरला, तर दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित होईल.”
ते पुढे म्हणाले की, फटाकेमुक्त दिवाळीची सुरुवात प्रत्येक घरातून झाली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने ‘फटाकेमुक्त परिवार’ ही संकल्पना स्वीकारावी. पालकांनी मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध मंडळांनी जनजागृती मोहिमा राबवाव्यात. केवळ उपदेश करून नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करणे ही काळाची गरज आहे.दिवे लावून, रांगोळ्या काढून, निसर्गपूरक सजावट करून, आप्तस्वकीयांना शुभेच्छा देऊन, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून आणि सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी करता येते. आनंद साजरा करण्यासाठी फटाके आवश्यक नाहीत; तर त्यासाठी संवेदनशील मन, माणुसकीची भावना आणि सामाजिक जाणीव आवश्यक आहे.


समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक आणि राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे अकोला जिल्हाध्यक्ष गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तरुणाईसह जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “चला, यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या धुराऐवजी दिव्याचा प्रकाश पसरवूया, कर्णकर्कश आवाजा ऐवजी हास्याचा गजर करूया, पैशांच्या अपव्ययाऐवजी माणुसकीची श्रीमंती जपूया आणि प्रदूषणाऐवजी स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरणाचा वारसा पुढील पिढीला देऊया! कारण खरी दिवाळी आकाशात फटाके फोडण्यात नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे.”

गजानन हरणे- ९८२२९४२६२३ अकोला
,समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *