
विशेष प्रतिनिधी (दि. नोव्हेंबर २०२६) जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु। येथील शिक्षक भिमराव परघरमोल यांची राज्यस्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नवनियुक्त केंद्रप्रमुख कुलदीप बुंदे यांच्याकडून शाल (महावस्त्र) व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) या संस्थेकडून भिमराव परघरमोल यांची आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरावर निवड करण्यात आली. त्यानिमित्त त्यांचा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला.
भिमराव परघरमोल हे एक उपक्रमशील शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात. विविध प्रकारच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेणे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी वर्तमानपत्रांमध्ये लेखनही करतात. दर आठवड्याला ते आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांच्या शारीरिक कसरती, कवायत, विविध खेळ घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष घालतात. या सर्व बाबींची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या संस्थेने त्यांची राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक म्हणून निवड केली.
या प्रसंगी मुख्याध्यापक के. एम. डाबेराव शिक्षक शंकर बगाडे, कोकीळा बोपटे, गजेंद्र सुलतान, प्रवीण कुमार लिंगोट, हरिओम काकडे, दिव्यांनी तायडे (स्वयंसेवा शिक्षिका) इत्यादींची उपस्थिती होती.


