एकाच घरातील ६ जीवांचा बळी गेला, तरीही कामगार मंडळ व कामगार मंत्री सुस्तच! 

बातमी शेअर करा.

माळशिरस अपघातावरून ‘जिद्द संघटने’चे अध्यक्ष मोनेश्वर सुतारांचा जळजळीत सवाल;

दोन्ही मजूर भावांना तात्काळ विशेष आर्थिक मदत द्या!

पंढरपूर / सोलापूर:माळशिरस येथे सिद्धनाथ दर्शन करून परतत असताना भाविकांची पिकअप गाडी रस्त्याशेजारील धोकादायक विहिरीत कोसळून झालेल्या अत्यंत भीषण अपघाताने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील एकूण ६ (सहा) निष्पाप जीवांचा अंत झाला आहे. या अपघातात दोन कष्टकरी आणि ‘इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे’ नोंदणीकृत असलेले सक्रिय कामगार भाऊ सुदैवाने जिवंत वाचले आहेत, परंतु काळाने त्यांच्या संपूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत केला आहे.
या अपघाताच्या अंत्यविधीला सर्व कामगार वर्ग, इंजिनिअर्स,कंत्राटदार,पाहुणे आणि प्रशांत परिचारक मालकांचे भाऊ प्रणव परिचारक यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. ग्रामविकास मंत्री माननीय गोरे साहेबांनी दोषी रोड कंत्राटदार आणि निष्काळजी शासकीय अधिकाऱ्यांवर थेट “सदोष मनुष्यवधाचा गुन्हा” दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘जिद्द बांधकाम कामगार संघटने’चे अध्यक्ष मोनेश्वर अप्पासाहेब सुतार यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कामगार मंत्रालय आणि सोलापूर जिल्हा कामगार कार्यालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
एकाच घरातील ६ जणांचा बळी, संसाराची राखरांगोळी: या भीषण अपघातात मोठ्या भावाच्या (श्री. संदीप दशरथ बवचे) पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि दोन्ही भावांची सख्खी आई देवाघरी गेली आहे. तर लहान भावाच्या (श्री.बालाजी बवचे) पत्नी सौ.पूजा बालाजी बवचे आणि त्यांचे अवघ्या ६ महिन्यांचे चिमुरडे बाळ समर्थ बालाजी बवचे यांचा करूण अंत झाला आहे. साक्षात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लहान भावाची ४ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांचा लड़का सुखरूप वाचले आहेत. या वाचलेल्या लहान लेकरांना आणि दोन्ही मजूर भावांना आता जगण्यासाठी मोठ्या शासकीय आधाराची गरज आहे.
रस्त्याचे काम बांधकाम क्षेत्रातच, मग कामगार मंडळ झोपले आहे का?: मंडळाच्या नियमांनुसार रस्ते, महामार्ग आणि पुलांचे काम हे शंभर टक्के ‘बांधकाम क्षेत्रातच’ येते. मग या रस्त्याची आणि धोकादायक विहिरीची पहिली कायदेशीर पाहणी करण्याची मुख्य जबाबदारी बांधकाम कामगार मंडळाची नव्हती का? इतर सर्व शासकीय यंत्रणा हलल्या, मग मूळ कामगार मंडळ अजूनही सुस्त का बसले आहे? कामगार मंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी (Safety Officers) कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या कंत्राटदारावर अजून स्वतःहून गुन्हे का दाखल केले नाहीत?
कामगार मंत्र्यांनी व सोलापूर कार्यालयाने मजुरांच्या दारात यावे: संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असतानाही कामगार मंत्र्यांनी किंवा कामगार आयुक्त कार्यालयाने अद्याप स्वतःहून ‘विशेष चौकशी’ (Suo Moto) का लावली नाही? सोलापूरच्या कामगार अधिकाऱ्यांनी एसी केबिनमध्ये बसून फाईल्सवर सह्या करण्यापेक्षा स्वतः या पीडित कामगार भावांच्या घरी तात्काळ भेट दिली पाहिजे आणि त्यांना प्रशासकीय व आर्थिक आधार दिला पाहिजे, ही संघटनेची कडक मागणी आहे.
ऑनलाईन तारखांचे रडगाणे बाजूला ठेवून तत्परता दाखवा: सध्या बांधकाम मंडळाच्या ऑनलाईन पोर्टलवर पडताळणीसाठी मार्च २०२७ पर्यंतच्या लांबच्या तारखा (स्लॉट्स) मिळत आहेत. परंतु, हे प्रकरण अत्यंत आणीबाणीचे आणि विशेष आपत्तीचे असल्यामुळे नियमित तांत्रिक कारणांचे निमित्त न लावता, प्रशासनाने ‘विशेष बाब’ (Special Case) म्हणून तातडीने विशेष आपत्कालीन निधीमधून सर्वोच्च आर्थिक मदत थेट दोन्ही कामगार भावांच्या बँक खात्यावर जमा करावी, हीच एक संवेदनशील समाज म्हणून कामगार मंडळाकडून अपेक्षा आहे.
मोनेश्वर सुतार ९३०९७१२८९६, गोपाळपूर,पंढरपूर.
(अध्यक्ष – जिद्द बांधकाम कामगार संघटना, सोलापूर जिल्हा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *