प्रज्ञासूर्याची किरणे पुस्तकाची समीक्षा

जातीयता,वर्णभेद,काळा-गोरा या मनुष्यत्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम जगभरातील असंख्य समाज सुधारकांनी केलेलं आहे.शोषण, अन्याय-अत्याचाराची भूमी ही केवळ भारत नाही, ती जगभरातही अस्तित्वात होतीच.फरक इतकाच की,भारतातील व्यवस्थेने कहर करीत अन्याय अत्याचाराला ऊत आला होता.यात शिकार होणरा वर्ग दलित,आदिवासी,भटके,वंचित,उपेक्षित, मजूर,कष्टकरी, शेतकरी,भूमिहीन हा होता.अन्याय अत्याचाराला कुठेतरी रोखलं पाहिजे,हा रोष समग्र दलित उपेक्षितांच्या मनात निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर स्वार्थी नेत्यांच्या कंपूने राजकीय हातमिळवणी करून राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यानंतर व्यक्तिगत स्वार्थापायी समाजाला कुणाच्यातरी दावणीला बांधण्याचं काम सुरू होतं.याची प्रचंड चीड, राग,द्वेष सर्वांच्या मनात खदखदत होता.त्याचा उद्रेक होऊन नक्कीच ज्वालामुखी होईल हे सत्य असतानाच,समाजाला योग्य दिशा देऊन सामाजिक न्याय भूमिका मांडणारा अराजकीय नेता पुढे येईल,त्याच्या मागे सर्व जनता एकसंघ उभी राहील अशी अवस्था होती.नेमक्या याच वेळेस १९७२ साली दलित पॅंथर उदयास आली. अवघ्या दोन अडीच वर्षांमध्ये दलित पँथरने संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आपली व्याप्ती वाढवली. सर्वसामान्यांना हीच आपली हक्काची संघटना जी आपल्याला स्वाभिमान प्राप्त करून देईल अशी आपुलकीची,चैतन्याची भावना निर्माण झाली आणि कशाचीही पर्वा न करता सामाजिक परिवर्तनासाठी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची लाटच आली. असंख्य तरुण पँथरमध्ये सामील झाले.खेडोपाडी गावोगावी दलित पँथर पोहचली.
अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या एच.पी.न्यूटन आणि बॉबी सील या अमेरिकेतील तरुणांनी १५ ऑक्टोबर १९६६ रोजी ‘ब्लॅक पॅंथर पार्टी फॉर सेल्फ डिफेन्स’ ही संघटना स्थापन केली व पुढे ‘ब्लॅक पँथर पार्टी’ या राजकीय पक्षाच्या रूपाने कार्यरत राहिली.जागतिक पातळीवरील वेगवेळ्या देशांमध्ये वंश,वर्ण,जात,धर्म,तसेच साम्राज्यवादी वसाहत अशा अनेक आधारांवर जनसमुदायाचे शोषण हे पँथर्सच्या निर्मितीचे प्रमुख कारण होते. ब्लॅक पॅंथर या संघटनेची प्रेरणा घेऊन जगभरातील देशांमध्ये ‘पॅंथर’ हे नाव कायम ठेवून लढाऊ संघटना निर्माण झाल्या. इंग्लंडमध्ये १९६८ साली ब्लॅक पॅंथर मूव्हमेंट,बर्म्युडामध्ये १९६९ साली ब्लॅक बेरेट काडर,१९७० इंग्लंडमध्ये व्हाईट पॅंथर पार्टी, इस्रायलमध्ये १९७१ साली पँथर पार्टी ऑफ इस्रायल,१९७२ साली ऑस्ट्रेलियामध्ये ब्लॅक पँथर पार्टी ऑफ ऑस्ट्रेलिया तर भारतामध्ये २९ मे १९७२ साली दलित पँथर. भारतातील दलित पॅंथरची प्रेरणा “ब्लॅक पॅंथर” असली तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच संघटनेच्या स्थापनेमागील प्रेरणास्त्रोत होते. पूर्वीच्या ‘अस्पृश्य’ तळागाळातील समाजामधील जातीय शोषणाविरुद्ध लढण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशानुसार संघर्षशील दलित पँथरची स्थापना झाली.
जागतिक स्तरावर सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, राजकीय,क्रांतीचा इतिहास लिहिला गेला आहे.तो लिहितांना काहींनी प्रत्यक्ष अनुभवून, काहीनी ऐकून,वाचून लिहला.ज्या घटना जो स्वतः डोळ्यांनी बघतो आणि जेव्हा लिहितो त्या वाचतांना डोळ्यासमोर तरंगतात,ते प्रसंग जिवंत उभे करतांना आपल्याला गतकाळात घेऊन जात असतात. कारण लिहिणारा प्रत्यक्ष घटनेचा साक्षीदार असतो.हे प्रसंग आणि घटना काही रोमांचकारी तर काही क्रांतिकारी असल्याने अनुभवणारा, बघणारा आयुष्यभर जखमा घेऊन जगत असतो शेवटच्या श्वासापर्यंत.त्यांचा इतिहास जो लिहतो, त्यांच्या लेखणीला सत्याची धार असते.साखर खाल्ल्याशिवाय गोड अथवा कडू कळत नाही. त्याप्रमाणे चळवळ रस्त्यावर उतरल्याशिवाय, जगल्याशिवाय,अभ्यासल्याशिवाय,चळवळीचा इतिहास लिहिता येत नाही.आज असेही बहाद्दर आहेत की,चळवळ कशाशी खातात याचा गंध नसणाऱ्यांनी चार भिंतीच्या आत बसून चळवळीवर पीएचडीचे प्रबंधही लिहलेले आहेत.
ॲड.के.डी.अर्थात धम्मकिरण चन्ने असाच एक आंबेडकरी विचारांनी झपाटलेला,तळमळीचा प्रामाणिक तरुण याच ध्येयाने चळवळीत सामील झाला.त्यांनी ठाणे जिल्ह्यातील दुर्लक्षित कार्यकर्त्यांच्या त्यागाचा जीवनपट ‘प्रज्ञासूर्याची किरणे ‘या पुस्तकातून मांडला आहे.यापूर्वी ज.वि.पवार,अर्जुन डांगळे, प्रा.विठ्ठल शिंदे,जयदेव गायकवाड यांच्या सारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांनी दलित पॅंथरचा लेखाजोखा मांडला असून प्राचार्य रमेश जाधव यांनी ‘पँथर हा दरारा आमुचा’ या पुस्तकातून दुर्लक्षित ठाणे जिल्ह्यातील दलित पँथर आणि लढाऊ कर्कर्त्यांचा इतिहास सांगितला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “तुमचा उध्दार करण्यास कोणीही येणार नाही. तुम्ही मनात आणले तर तुमचा उध्दार तुम्हीच करण्यास सक्षम व्हाल.” ही समर्थकता दलित पँथरच्या कार्यकत्यांमध्ये होती आणि म्हणूनच तो धगधगता इतिहास यापुढेही लिहिला जाईल आणि वाचला जाईल.
‘प्रज्ञासूर्याची किरणे’या पुस्तकात लेखक ॲड.चन्ने यांनी ठाणे जिल्ह्यातील उपेक्षित पॅंथरच्या कार्यकर्त्यांबरोबरच सुरेश सावंत आणि अन्य नेत्यांच्या समवेत स्थापन केलेला युवक रिपब्लिकन,कामगार संघटना,कामगार चळवळ, केलेले सत्याग्रह लढे या पुस्तकातील १७ प्रकरणात मांडलेले आहेत.हे चित्तथरारक क्रांतीकारी अनुभव वाचताना अंगावर शहारे येतात.पॅंथर आणि अन्य चळवळीमध्ये काम करीत असताना अनेक तरुणांचे बळी गेले, अनेकांना नोकरीला मुकावे लागले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तो इतिहास पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरावा हाच दृष्टिकोन ॲड.के.डी.अर्थात धम्मकिरण चन्ने यांनी लिहिला आहे.ॲड चन्ने अनेक वर्तमानपत्रात स्तंभलेखन करत असतात.त्यांचे ‘फुले आंबेडकर चळवळ विचार आणि दिशा’ हे पुस्तक खूप गाजले.ते चळवळीचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते,बौध्द साहित्य प्रसार संस्थेचे केंद्रिय उपाध्यक्ष,अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रिय सदस्य,समता केंद्रचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी,देना बँक मागासवर्गीय संघटनेचे माजी संघटन सचिव, रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,युवक रिपब्लिकन अध्यक्षीय मंडळाचे संस्थापकीय सदस्य होते.
आपल्या मनोगतात ॲड.चन्ने लिहितात,मी ठाणे जिल्ह्यातील छोटासा कार्यकर्ता.माझा प्रवास दलित पँथर चळवळीतून,भारिप बहुजन महासंघ ते सेक्युलर मुव्हमेंट, वंचित आघाडी पर्यंत कसा झाला हे सामान्य जनतेसमोर यावे, सुशिक्षित तरुणांनी नोकरी करून चळवळीत तन मन धनाने स्वतःला कसे झोकून दिले होते हे आजच्या तरुणांसमोर मांडावे व त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीत काम करण्याची प्रेरणा मिळावी.ठाणे जिल्ह्यातील नोकरी करून शिक्षण घेणारे व चळवळीत आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी सामाजिक काम केलेल्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे योगदान समाजासमोर मांडवा यासाठी मी हा एक अल्पसा प्रयोग केला आहे.ते परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी सांगताना ते लिहितात, सुरेश सावंत यांचे वडील मालोजी रामजी सावंत हे पँथरच्या चळवळीने भारावले होते.राजा ढाले कसाऱ्याला १९७४ ला वरळीच्या दंगलीनंतर दुसऱ्यांदा आले होते. तेव्हा ते ढालेना म्हणाले की, मी सुरेश सावंतला चळवळीसाठी दान केले,पूर्ण वेळ सोडले आहे.त्याने समाजाची सेवा करावी.
पुरोगामी लोकशाही दलाचे महाराष्ट्रात सरकार असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार शहापूर येथे आले होते,त्यांना आम्ही भेटून अन्याय अत्याचार संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे विचारणा केली तेव्हा त्यांचे कार्यकर्ते म्हणाले की,तुम्ही अपॉईंटमेंट घेऊन आले आहात का? तेव्हा सुरेश सावंत मोठ्या आवाजात म्हणाले की,हे अन्याय तुम्ही अपॉईंटमेंट घेवून केले आहेत का? तो आवाज शरद पवारांच्या कानावर गेला आणि त्यांनी ताबडतोब आमच्या शिष्टमंडळाला चर्चेस बोलावून चर्चा केली आणि लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. ही समय सुचकता, तत्परता आणि हजरजबाबीपणा सुरेश सावंत यांच्यात होता म्हणूनच त्यांचे नेतृत्व स्वीकारले होते.शहापूर तालुक्यातील खर्डी गावातील बी.जी.तथा अण्णासाहेब धनगर हे शिक्षक असतानासुद्धा सर्व कार्यालयात टोपी घालूनच चळवळीचे काम करायचे त्यांच्याविषयी ‘निळी टोपी घालणारा पॅंथर शिक्षक’ या लेखात लिहितात,बी.जी.तथा अण्णासाहेब धनगर जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेवून शिक्षकांचे प्रश्न सोडवित.सर्वांना स्वाभिमानाने ठणकावून जय भीम करीत असत त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बी.जी.धनगरांना दलित पँथरपासून अलिप्त करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनंदा धनगर यांच्या बदलीचा कट रचला आणि पत्नीची बदली उल्हासनगरला करुन त्यांची ताटातुट केली.अन्यायकारक बदली रद्द करुन दोघांना एकत्र ठेवावे या करिता दलित पँथरने शहापुर तहसिल कचेरीवर व तालुका पंचायत समितीवर १६ जुलै १९७४ रोजी भव्य मोर्चात काढला.या मोर्चाने मागासवर्गीय शिक्षक आणि शिक्षकेतरात स्वाभिमान जागृत झाला होता.या मोर्चाने त्यांना लढावू बाणा दिला. अन्यायाविरुध्द लढण्यास तयार केले.बी.जी. धनगरांची बदली पत्नी असलेल्या उल्हासनगर परिषदेच्या शाळेवर करुन दोघा पती-पत्नीला एकत्र आणले.
ॲड.चन्ने लिहतात,रिपब्लिकन पक्ष अनेक गटा-तटात विखुरला होता तसेच युवकांचे आशास्थान असलेली दलित पँथर देखील छकले होण्याच्या उंबरठ्यावर होती.नुकताच रिपब्लिकन पक्षाची मान्यता जाऊन हत्ती निशाणी देखील गेली होती.त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा जोरात होता.तेच निमित्त धरून दलितांवर अत्याचार होत होते.अशा परिस्थितीत विस्कळीत झालेल्या चळवळीला सावरण्याकरीता ती जीवंत ठेवण्याकरता आम्ही दि.१४ एप्रिल १९७७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी युवक रिपब्लिकनची स्थापना केली. युवक रिपब्लिकनच्या अध्यक्षीय मंडळात १) सुरेश सावंत २) के. डी. तथा किरण चन्ने ३) अरविंद निकाळजे, ४) टि. श्रीकांत तळवटकर५) अर्जुन कांबळे ६) मधुकर गायकवाड ७) दिलिप कासारे ८) संजय कांबळे ९) सुरेश भोसले हे नऊ जण अध्यक्षीय मंडळाचे संस्थापकिय सदस्य होते.
ॲड.संजय कांबळे चित्तधारक अंगावर शहारे आणणारे क्रांतिकारी अनुभव सांगताना लिहितात,
पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बौद्धांच्या सवलतीबाबत ‘तुम्हाला बौद्ध धर्म घ्यायला कोणी सांगितल होत’ असे तुच्छतापूर्ण उद्गार काढले होते.पंतप्रधान झाल्यावर ते प्रथमच मुंबईस आकाशवाणी केंद्र येथे भाषण देण्यास येणार होते.त्यावेळेस त्यांच्यासमोर उग्र निदर्शन करण्याचे युवक रिपब्लिकनतर्फे ठरविले.मोरारजी देसाई जेव्हा आकाशवाणी केंद्राच्या अगोदरच्या चौकात पोहोचेले तेव्हा पोलीसांनी कडे करुन रस्ता बंद केला होता.घोषणा सुरू होत्या.रस्त्याच्या पलीकडील फूटपाथवर युवक रिपब्लिकनचे सर्व नेते आणि कार्यकर्ते घोषणा देत होते.त्याचबरोबर भाई संगारे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह निदर्शन करीत होते.आम्ही जेव्हा पोलिसांच्या जवळ पोहचलो तेव्हा भाई संगारेंनी मला ओळखून जोराने हाक मारली तेव्हा पोलिसांना कळले वॉन्टेड संजय हाच आहे व पोलीसांनी घेरले.त्याचवेळेस मोरारजी देसाई यांची गाडी दाखल झाली.जरी मी बारीक होतो तरी तब्येत व्यायामाची होती त्यामुळे दोन पोलिसांच्या खांद्यावर हात ठेऊन,उडी मारून समोरच्या इन्स्पेक्टरच्या छातीत लाथ मारून मोरारजी देसाईंच्या गाडीवर मी स्वतः झेप घेतली. माझ्यासोबत दुसऱ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा उडी मारली. त्यांच्या हातात दंडुका होता तो त्याने गाडीवर आपटला.मी गाडीच्या बोनेटवर पडलो. बाकीचे कार्यकर्ते गाडीसमोर झोपले.गाडी क्षण दोन क्षण थांबली.सर्व कार्यकर्त्यांना पोलीसांनी फरफटत बाजूला केले व लाठीमार सुरू केला.
ॲड.चन्ने लिहतात,डिसेंबर १९७७ च्या हिवाळी अधिवेशनात जावून बौध्दांच्या सवलतीच्या प्रश्नावर संसदेत पत्रके फेकण्याची योजना आखली.पाच भीमसैनिक युवकांचे नेतृत्व सुरेश सावंत यांनी केले. कांचन उबाळे,श्रीकांत तळवटकर, बन्सीलाल गरुड आणि मधूकर गायकवाड या पाच जणांचे शिष्ट मंडळ दिल्लीला रवाना झाले.संसद १० वाजता सुरु झाली. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत जाणाऱ्यांची कसून तपासणी झाली.संसदेत चर्चा सुरु झाली.भाषणे रंगात आली.वातावरणाचा आणि सिक्युरिटीचा वेध घेवून चर्चेचे गंभीर वातावरण पाहून, अंदाज घेवून सुरेश सांवत आणि कांचन उबाळे या युवा भीम सैनिकांनी संसदेत पत्रके फेकली आणि एकच गदारोळ झाला.सिक्युरिटीची पळापळ सुरु झाली. खासदारांच्या हाती पत्रके लागल्यावर प्रधानमंत्री आणि लोकसभा अध्यक्षाकडे पत्रके पोहचली.पत्रके वाचून त्याच्यावर चर्चा सुरु झाली.युवक रिपब्लिकनची मोहिम यशस्वी झाली.
ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराच्या सत्याग्रह भूमीतून डॉ.बाबासाहेबांच्या मार्गाने केली.सम्यक समाज आंदोलन ही संघटना स्थापन करुन २ मार्च ते ८ मार्च १९८३ पर्यंत समाज जागृती करुन नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढून गटबाजीने वैफल्यग्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करुन इशारा मोर्चा काढला होता.त्यामुळे कार्यकर्त्यांमधे एक नवी उर्जा निर्माण झाली होती.याविषयी ॲड चन्ने लिहितात, आम्ही ठाणे जिल्हयातील सर्व गावात बैठका घेवून जागृती केली व जनतेला सम्यक मोर्चात सामावून घेतले.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यावेळेच्या समाजवादी कार्यकर्त्या डॉ.निलम गो-हे,अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर आणि नाशिकचे बरेचसे कार्यकर्ते होते.खर्डी येथे लाँगमार्चंचे भव्य स्वागत केले.ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली.
रिपब्लिकन जनरल कामगार युनियन, इंडियन सोशियल मुव्हमेंट,सेक्युलर मुव्हमेंट,समता एज्युकेशन सोसायटीची स्थापना,डॉ.माईसाहेब आंबेडकर यांच्या सहवासात या नोंदी वाचताना एखाद्या चित्रपटासारख्या आपल्या डोळ्यासमोर तरंगतात.प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांची अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना आणि प्रा.डॉ. विजय मोहिते यांचा मलपृष्ठावरील अभिप्राय पुस्तकाची उंची वाढवतो.
प्रज्ञासूर्याची किरणे लेखक:ॲड. के.डी.चन्ने (९८२००१६६१२) पृष्ठे : १२५,मूल्य :२००/- रुपये ही समीक्षा वाचणाऱ्या क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा न्यूज पोर्टल च्या जागरूक वाचकासाठी विशेष सवलत 200 रुपयांचे पुस्तकं 100 रुपयात मिळेल.अधिक माहिती करीता संपर्क करावा.

प्रदीप जाधव मोबा.९८६९१०२२२६, टेंभवली,ता.भिवंडी,जिल्हा.ठाणे Email:ld pradeep.jadhav2012.pj@gmail.co
