
विध्यार्थी असा असावा.राष्ट्रप्रेमी,प्रामाणिक,शिस्तप्रिय,सदाचारी,कल्पक, आज्ञाधारक,अभ्यासू ,वक्तशीर,नम्र,आणि खिलाडू पुढे हाच विध्यार्थी देशाचा प्रथम नागरिक बनतो. नंतर कामगार,कर्मचारी अधिकारी बनतो. तो हे शिक्षणतील पदव्या मिळवून त्या प्रमाण पत्राचा वापर करून योग्य या शासकीय प्रशासकीय पदावर विराजमान होऊन देश सेवा करतो. माणसांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घेतो. तेव्हा शाळा कॉलेज मध्ये शिकलेले सर्व गुण त्यांच्या आचरणात दिसले तर नागरिकांना समान न्याय हक्क अधिकार देऊ शकतो. तो सर्व प्रकारच्या समस्या सोडू शकतो. त्यात मोठी असते पोटाची आग भूक मिटविण्यासाठी रोजगार आणि रोजगारातून मिळणारे वेतन,त्यातून मिळणारे मानसिक शारीरिक आणि आर्थिक समाधान. ते मिळाले नाही तर तो बंड करून उठतो. आणि संघर्ष करतो.
जगात सध्या अमेरिका इराण,इस्रायल युद्धाचा भडका उडतांना दिसत आहे त्यात कामगार,कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळेच अमेरिकेतील गोदामाला आग लावल्याची घडलेली ती घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही, तर ती आजच्या जागतिक भांडवलशाही व्यवस्थेवर आणि मानवी हतबलतेवर पडलेला एक जळजळीत प्रकाश आहे.त्यावर शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार आणि विचारवंतांनी निरीक्षण करून अत्यंत अचूक आणि वैचारिक दुष्टिने विचार करायला लावणारे मत माडून सर्व प्रकारच्या कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाला दिशा दाखवण्याचे काम केले पाहिजे ही अपेक्षा असते. नव्हे आहे.
पोटाची आग: जगातली सर्वात मोठी आणि भयंकर आग असते.माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शोधून काढली, पण आजतागायत माणसाला ‘पोटाची भूक’ या आदिम सत्य आणि समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.भूक ही माणसाची विचार करण्याची क्षमता संपवते. जेव्हा एखाद्याला स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असते, तेव्हा त्याला नीतिमत्ता, कायदे किंवा तत्वज्ञान या गोष्टी अर्थहीन वाटू लागतात.ज्या कामगाराने १६०० कोटींचे गोदाम जाळले, त्याने ती आग गोदामाला लावण्यापूर्वी ती आग त्याच्या पोटात आणि डोक्यात अनेक दिवस धुमसत होती. त्याला न्याय मिळत नव्हता. “मी इतके कष्ट करूनही जर मला साधे जगण्यापुरते पैसे मिळत नसतील, तर या श्रीमंतीचा मला काय उपयोग?” ही ती अत्यंत टोकाची आणि विनाशी भावना त्या कामगार कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण करत होती.
‘जगण्यापुरता पगार’ (Living Wage) ही चैनीची नव्हे, तर मूलभूत गरज असते. अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार मिळवण्यासाठी जीवनभर संघर्ष करतो.माणूस नोकरी का करतो? तर त्याला ‘माणूस’ म्हणून जगता यावे यासाठी.जेव्हा मालक कोट्यवधींची नफेखोरी करत असतो आणि दुसरीकडे कामगाराला आजारी पडल्यावर उपचार करण्यासाठी औषध घेण्यासाठी किंवा पोरांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ नसते तेव्हा तो उसनवारी करावी म्हणतो,तर त्याची नोकरी त्याला आर्थिक पाठबळ देण्याची हमी देत नाही.सनदशिर मार्गाने संघर्ष करून न्याय मिळत नाही. मग तेव्हा तिथे ‘आर्थिक हिंसा’ जन्म घेते.भांडवलशाही व्यवस्थेने माणसांच्या कामगारांच्या श्रमाचे अवमूल्यन केले आहे. कामगाराला केवळ एक ‘यंत्राचा भाग’ समजले जाते.पण यंत्राला भूक लागत नाही, माणसाला लागते. जेव्हा ही साधी अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा नैराश्याचे रूपांतर विध्वंसात होते.आणि तो प्रचंड बंड करून उठतो. कारण त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नसते.तेव्हा त्यांच्यातील असंतोष क्रांती करून जातो.
भारतीय कामगारांचा संयम: जमेची बाजू की व्यवस्थेचे अपयश?.देशात आज बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन महासंघ आहेत. ते कामगारांना न्याय मिळवून देण्यास असमर्थ ठरले म्हणून कायम स्वरूपी ३६५ दिवस चालते. ते कंत्राटी पद्धतीने झालेच नसते.सेवा निवृतीनंतरच्या जागा भरल्या जात नव्हत्या तेव्हा ट्रेड युनियन ने कोणती ही ठोस भूमिका घेतल्या नसल्यामुळे आज सर्व कायमस्वरूपी कामावर कंत्राटी कामगार काम करत आहेत. त्यांना समान न्याय समान वेतन आणि समान अधिकार मिळत नाही. त्याची दखल न घेतल्यामुळे देशात किमान वेतनाच्या नियमांचे तीनतेरा वाजलेले आहेत.तरीही आपल्या देशातील असंघटित कष्टकरी कामगार सहसा असे टोकाचे पाऊल उचलत नाही. तो स्वताला प्रथम हिंदू समजतो,त्यांचा ट्रेड युनियन चे नेतृत्व करणारे सुद्धा स्वताला प्रथम मनुवादी विचाराचे समर्थक समजतात यामागे काही प्रमुख कारणे आहेत.राज्यात केंद्रात मनुवादी विचारांचे सरकार असल्यामुळे देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती पदी असलेल्या व्यक्तीच्या अधिकाराची दखल घेतली जात नाही. पण जातीची दखल घेऊन त्याला तशी वागणूक दिली जाते. आणि दुर्दव्य तो ते मुक पणे सहन करतो तो बंड करत नाही.कारण त्यावरचे संस्कार त्याला बंड न करण्यास भाग पडतात. तिथे शिक्षण हे वाघिणीचे दूध दिसणे अपेक्षित असते. पण ....
कुटुंबव्यवस्थेची बेडी आणि जबाबदारी: भारतीय कामगार स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त जगतो. “माझ्या नोकरीला काही झाले तर माझ्या पोराबाळांचे कुटुंबाचे काय होईल?” ही भीती त्याला बंड करण्यापासून रोखते. दुसरीकडे त्याला नशिबावर विश्वास ठेवण्यास भाग पडल्या जाते.आपल्या नशिबातच हे भोग आहेत, “मागच्या जन्माचे पाप आहे,पुढच्या जन्मी चांगले होईल” या आध्यात्मिक आणि पारंपरिक विचारसरणीमुळे इथला कामगार अनेकदा व्यवस्थेविरुद्ध लढण्याऐवजी स्वतःच्या परिस्थितीशी तडजोड करतो.हे सत्य नाकारता येत नाही.संयम आणि सहिष्णुता: भारतीय मानसिकतेत मुळातच संयम आहे.इथला माणूस चटणी-भाकरीवर समाधान मानतो,पण दुसऱ्याचे नुकसान करायला धजत नाही.पण एक इशारा: इथला कामगार आग लावत नाही,ही चांगली गोष्ट असली तरी,त्याच्या या संयमाला आणि असहाय्यतेला व्यवस्थेने ‘दुबळेपणा’ समजण्याची चूक करू नये.
भूक माणसाला कामगारांना कोणत्या थराला नेऊ शकते?.इतिहासाची पाने उलटून पाहिली तर लक्षात येते की, जगातल्या मोठ्या क्रांत्या या कामगारांनी ‘भुकेतून’ जन्मल्या आहेत.फ्रेंच राज्यक्रांतीची ठिणगी तेव्हाच पडली होती, जेव्हा सामान्य जनतेला खाण्यासाठी पाव मिळत नव्हता आणि राणी म्हणाली होती, “पाव मिळत नाही तर केक खा.” भूक माणसाला चोरी करायला लावते, गुन्हेगार बनवते, प्रसंगी स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी म्हटलंय, “ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकवर नसून दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.” या कष्टकऱ्यांचे हात जेव्हा काम करणे थांबवतात किंवा विध्वंसासाठी उठतात, तेव्हा मोठी मोठी साम्राज्ये कोसळतात.हा कामगार चळवळीचा इतिहास आहे.
माणूस हा पैशाने नाही,तर माणुसकीने जिंकता येतो.अमेरिकेतली घटना जगातील सर्व उद्योजकांसाठी,मालकांसाठी आणि सरकारांसाठी एक धोक्याचा इशारा आहे.संपत्तीचे केंद्रीकरण (काही मोजक्या लोकांच्या हाती पैसा असणे) समाजाला विनाशाकडे घेऊन जाते.प्रत्येक कामगाराच्या घामाचा योग्य दाम मिळायलाच हवा. जर कामगाराला त्याच्या श्रमातून ‘सन्मानाने’ जगता येत नसेल, तर तो समाज प्रगत म्हणवण्याच्या लायकीचा नाही.आपल्या देशातील कामगार आग लावत नाही, यावर समाधान मानण्यापेक्षा, “त्याला कधीही आग लावण्याची वेळ येऊ नये आणि त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा” यासाठी समाजाने आणि व्यवस्थेने प्रयत्न करणे, हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची प्रगल्भता ठरेल.
कामगारांची भूक (Stomach Hunger) ही पोटाची गरज आणि जगण्यासाठीचा संघर्ष आहे, जी त्यांना तीव्र उष्णता किंवा कठीण परिस्थितीतही काम करण्यास भाग पाडते. रोजंदारीवर जगणारे असंघटित कष्टकरी मजूर, विशेषतः स्थलांतरित,परप्रांतीय मजूर कामाच्या आणि अन्नाच्या शोधात ग्रामीण भागातील खेड्या पाड्यातून शहरांकडे धाव घेतात, जिथे बेरोजगारी आणि उपासमारीचे मोठे संकट त्यांच्यावर असते,म्हणूनच ते शहराकडे जातात.जगण्यासाठी संघर्ष: कामगाराची भूक त्याला काम करण्यास उद्युक्त करते; पोटाची खळगी भरण्यासाठी ते वाटेल ते कष्टकरून थकवणारे कामही ते निमूटपणे करतात

असंघटित कष्टकरी कामगारांची नोंद घेतल्या जात नाही.लॉकडाऊन जाहीर झाल्या नंतर शहरातून गावा कडे जाणाऱ्या माणसांची कामगारांची संख्या दिसली पण उपाय झाले नाहीत.कोरोना काळात लॉकडाऊनमुळे किती कामगारांच्या नोकऱ्या गेल्याने लाखो कामगारांवर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती, हे आपण विसरलो नाही पाहिजे. माणसांवर कामगारांवर आर्थिक संकट कधी येते?. काम न मिळणे किंवा काम करून ही मजुरीची अपुरी रक्कम मिळणे.यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या मजूर कुटुंबांना सतत भुकेचा सामना करावा लागतो.कामगारांसाठी भूक ही केवळ अन्नाची गरज नसून ती त्यांच्या अस्तित्वासाठीची सर्वात मोठी लढाई आहे.म्हणूनचशासकीय प्रशासकीय पदावर विराजमान होऊन देश सेवा करणाऱ्या माणसांनी माणसांना योग्य न्याय देण्याचा निर्णय घ्यावा.तेव्हा शाळा कॉलेज मध्ये शिकलेले सर्व गुण त्यांच्या आचरणात दिसले तर तो नागरिकांना माणसांना कामगारांना समान न्याय, हक्क,अधिकार देऊ शकतो. तो सर्व प्रकारच्या समस्या सोडू शकतो.कामगारांच्या पोटाची आग: जगातली सर्वात मोठी आणि भयंकर आग असते.ती घराला,लागे पर्यन्त थांबू नका.
सागर रामभाऊ तायडे -९९२००३८५९,भांडुप,मुंबई.
अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती.
