
तारीख 16 एप्रिल 2026 रोजी दशरथ शंकरराव गायकवाड यांनी शेवटचा श्वास घेतला आणि एक वादळी व्यक्तीमत्व चिरःशांत झाले ! अंगावर खादी कुर्ता पायजमा, खांद्यावर झोळी आणि एक लुना अशा पेहरावात जुन्या औरंगाबाद व नवीन संभाजीनगर शहरात ते सर्वांना परिचित होते.मागील अखंड 60 – 65 वर्षे ते समाजात कार्यरत होते. विद्यापीठ परिसर,शहर,तद्वतच संपूर्ण मराठवाड्यात ते ‘डी.एस.’ किंवा ‘दादा या नावाने सर्वांना माहीत होते.
कालवश दादा यांचा जन्म 24 डिसेंबर 1942 रोजी झाला.अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या गायकवाड कुटुंबात शंकरराव व यशोदाबाई या दांपत्याच्या पोटी ते जन्माला आले.त्यांनी स्वातंत्र्यपूर्व व धर्मांतरपूर्व असे दोन्ही कालखंड पाहिले.अस्पृश्यतेचा तो भयानक काळ,त्यात दुहेरी तिहेरी गुलामी असणाऱ्या मराठवाड्यात (आजच्या छत्रपती संभाजीनगर) पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यातील किल्लेअर्क याठिकाणी त्यांचा जन्म झाला.आठ भावंडे,त्यात सहाव्या क्रमांकाचे डी एस,जन्मतःच एक पायाला पोलिओ ! तरीही लहानपणापासून प्रचंड जिद्दी व निर्भीड ! विशेष म्हणजे गोरगरिबांबद्दल दया, कणव असलेले संवेदनशील मन त्यांना लाभले होते.आई वडील आमखास मैदान पलीकडील डोंगरातून लाकुड तोडून,तसेच जनावरांसाठी लागणारे गवत आणून विकायचे.वडील लोकांच्या घरावरील गवती छप्पर शाकारून द्यायचे,पडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.अशा बिकट परिस्थितीत आपल्या मुलांना पायावर उभे करण्यासाठी हे दाम्पत्य धडपड करत असे.कालांतराने यशोदाबाईंना खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बेगमपुरा येथील शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वसतिगृहात स्वयंपाकीण म्हणून नोकरी लागली तर शंकरराव तिथेच शिपाई (वॉचमन) म्हणून काम पाहू लागले.तिथे गोरगरीब दलित मुलांना शिकताना पाहून शंकररावांना सुद्धा मुलांना शिकवण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी मुलांना शाळेत टाकले.
शंकरराव कडक शिस्तीचे होते.मुले देखील त्यांच्या धाकामुळे शिकली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा उरलेला स्वयंपाक यशोदाबाई घरी घेऊन जात.त्यात त्यांची सगळी मुले मध्यरात्री उठून जेवण करीत.थोडी पोटाची भ्रांत मिटली होती,पण सुट्टीमध्ये पुन्हा भाकरीचा प्रश्न निर्माण व्हायचा. त्याकरिता काही शिळ्या भाकरींचे तुकडे यशोदाबाई उन्हात वाळवायच्या व मडक्यांमध्ये जमा करून ठेवायच्या. त्या वाळलेल्या भाकरींचे कुटके बनवून त्या मुलांना खाऊ घालत. हा काळ आंबेडकरी चळवळीच्या वातावरणाने भारलेला होता.डी.एस.लहान असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊस येथे आले होते.त्यावेळी किल्ले अर्क येथील एक मुस्लिम पोलीस तिथे ड्यूटीवर होता.तो घरी आल्यावर आपल्या लोकांना म्हणाला , ‘गेस्ट हाऊस पर धेडो का राजा आया हैं।’ त्यावेळी डी एस 10-12 वर्षांचे होते. त्या मुस्लीम शिपायाचे हे बोलणे ऐकताच ते आणि त्यांची समवयस्क मुले डॉ.बाबासाहेबांना पाहण्यासाठी गेस्ट हाऊसला धावत गेली. लहानग्या डी एस ने जावून डॉ. बाबासाहेबांच्या पायावर डोके टेकवले आणि त्यांचे पाय ते सोडतच नव्हते. मग डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या पाठीवर मारले आणि म्हटले, ‘अभ्यास करा,मोठे व्हा,पाया पडून माझा देव करू नका….!’ हा धडा घेऊन डी एस व भावंडे यांनी शिक्षणाची कास धरली. त्यानंतर मिलिंद महाविद्यालयाचे काम चालू असताना डॉ.बाबासाहेब अनेकदा औरंगाबाद येथे येत असत.त्या वेळी देखील डी एस यांना डॉ.बाबासाहेबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.वस्तुतः ज्यांना डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा परिस स्पर्श झाला त्यांच्या जीवनाचे सोने झाले.इथे तर आपल्या मुक्तीदात्याचा सोनेरी हात पाठीवरून फिरला होता ! असा स्पर्श झालेल्या त्या पिढीतील हल्ली शिल्लक असणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी डी एस हे एक होते.
पुढे 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर झाले. लाखो लोकांनी डॉ.बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.धम्मदीक्षेनंतर बौद्ध धम्माचे विवाह संस्कार,जन्म संस्कार,मृत्यु संस्कार यांपैकी काहीच नव दीक्षितांना माहीत नव्हते. किंबहुना भारतीय बौद्ध महासभेचा प्रसार होणे बाकी होते.अशा पोकळीत त्यावेळी भंते उपाली थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली डी एस यांनी औरंगाबाद तसेच मराठवाड्यात खेडोपाडी जाऊन बौद्ध पद्धतीने विवाह संस्कार, जन्म दिवस संस्कार,धम्म संस्कार घ्यायला सुरुवात केली.त्यावेळी ते अवघे 14 वर्षांचे होते व इयत्ता नववी मध्ये शिकत होते.पुढे आपल्या 84 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 1500 विवाह संस्कार,व साक्षगंध इत्यादी पार पाडले.त्या बदल्यात त्यांनी कधीही एक रुपया देखील दान स्वीकारले नाही. कुणी फारच आग्रह केला तर जवळच्या विहारास ते दान देऊन टाकत असत. पोलिओमुळे त्यांना एका पायाने चालायला थोडा त्रास होत असे,पण धम्म प्रसाराची जिद्द एवढी होती कि,ते सायकल वरून शेकडो खेड्यांमध्ये त्या काळी फिरले. रखरखत्या उन्हात,मुसळधार पावसात हजारो किलोमीटर सायकलवर प्रवास करून त्यांनी हे कार्य अविरतपणे चालू ठेवले.हे चालू असताना पदवीपर्यंतचे शिक्षण मिलिंद महाविद्यालयातून घेतले.शिक्षक म्हणून त्यांना देवगाव रंगारी येथे नोकरी मिळाली,पण ‘महाराचा मास्तर’ म्हणून राहायला कुणी घर देत नव्हतं.त्यामुळे नाईलाजाने ती नोकरी सोडून पुन्हा त्यांना औरंगाबाद येथे परत यावे लागले.ते उत्कृष्ट बासरी वादक होते म्हणून काही काळ त्यांनी बँड पथकात काम केले. त्यांना चांगला स्वयंपाक करता येत होता, म्हणून मिलिंद वसतिगृहाची मेस त्यांनी चालवली. त्याच दरम्यान ‘दख्खन के आंबेडकर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदरणीय भाऊसाहेब मोरे यांच्या ते संपर्कात आले व आंबेडकरी चळवळीत सक्रिय झाले.नंतर विद्यापीठात त्यांना नोकरी मिळाली.
जन्मतःच संघर्षमय जीवन,अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा निर्भीड स्वभाव यामुळे त्यांनी विद्यापीठात कर्मचाऱ्यांची संघटना उभी केली,तिचे ते पस्तीस वर्ष अध्यक्ष राहिले. कुणाही कर्मचाऱ्यावर काहीही अन्याय झाला तरी डी एस धावून जात व वेळप्रसंगी प्रशासनाशी दोन हात करायलाही मागे पुढे पाहत नसत.एक आठवण सांगत. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या गाडीसमोर झोपून त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळी 200 मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कामावर घेण्यात आले. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या भाषेत प्रसादही दिला. त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याकरिता अनेक यशस्वी आंदोलने केली. शेकडो गरजू लोकांना विद्यापीठात नोकरीला लावले. सर्व जाती धर्माच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 35 वर्षे आपले नेते म्हणून त्या पदावर कायम ठेवले.कारण संघटनेचे काम करताना त्यांनी कधीही जात धर्म पाहिला नाही.सर्वांना समान न्याय या तत्त्वाने काम केले. विद्यापीठातील अनेक कर्मचारी सावकारी पाशात अडकले होते. त्यामुळे त्यांनी मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची स्थापना केली. शून्यापासून सुरुवात करून 18 करोड पर्यंत ‘टर्न ओव्हर’ (उलाढाल) नेला. त्या पतसंस्थेचे देखील ते संस्थापक व चेअरमन म्हणून 30 वर्ष राहिले.अनेक कर्मचाऱ्यांना त्यामुळे आकस्मिक पैशांची गरज निर्माण झाली कि,आर्थिक मदत उपलब्ध होऊ लागली.दर वर्षी दिवाळीत कर्मचाऱ्यांना वेगवेगळे संसारोपयोगी भांडी, मिठाई,फटाके यांचे वाटप होऊ लागले. शाळा सुरू होताच वह्या वाटप,थंडीत ब्लँकेट वाटप,उन्हाळ्यात धान्य वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी सोसायटीच्या नफ्यातून राबवले.कर्मचाऱ्यांचे संसार भरून गेले कुणा कर्मचाऱ्याचे आजारपण,मृत्यु किंवा लग्न,दुःखद प्रसंगी तत्काळ आर्थिक मदत यामुळे ही पतसंस्था मराठवाड्यातील एक अग्रणी पतसंस्था म्हणून ओळखू जाऊ लागली.घाटी रुग्णालय,महानगरपालिका,आझाद कॉलेज येथील पतसंस्था उभारताना डी एस यांचं मोलाचं मार्गदर्शन होतं.त्यामुळेच सेवा निवृत्तीनंतर देखील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश दादा पाटील यांनी त्यांना 17 वर्षे (3 टर्म्स) जिल्हा बँकेच्या संचालक पदी नेमणूक केली.ही दादांच्या निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल.ही कामे करत असताना सामाजिक,धार्मिक कार्यात, फूले शाहू आंबेडकरी चळवळीत कुठेही खंड नव्हता.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांचा हिरीरीचा सहभाग होता.1970-72 ला दुष्काळात अनेक लोक पोटापाण्यासाठी खेड्यातून शहरात आले.त्यांना राहण्याकरिता जयभीमनगर,भीमनगर भावसिंगपुरा झोपडपट्टी, हर्षनगया वसाहती त्यांनी वसविल्या.औरंगाबाद मधील सर्वात जुन्या पंचशील बुद्धविहाराची किल्लेअर्क येथे स्थापना, तिथे प्रौढांसाठी चालू केलेली रात्रीची शाळा (यामुळेच त्यांना मास्तर म्हणून देखील संबोधले जात असे !) मराठवाडा विभागातींल जिल्ह्यात तयार झालेल्या अनेक बुद्धविहारांच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामुळे त्यांची ‘भारतीय बौद्ध महासभा’ या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे देखील ते 10 वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्यामुळेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू झाली. हे सर्व करत असताना त्यांना दोनदा नोकरीतून निलंबित करण्यात आले. तसेच जनतेसाठी लढताना दोन वेळा हरसूल येथील कारागृहात तुरुंगवास देखील त्यांनी भोगला. आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ खाली त्यांना अटक करण्याचे आदेश आले होते.त्यावेळी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना दिल्ली येथे बोलावून घेतले होते.एवढा त्रास होऊनही त्यांनी धम्म कार्य, सामाजिक चळवळ,कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणे चालूच ठेवले.
आज पैसे घेऊन समाजकार्य करणाऱ्या आणि पोस्टरबाजी करून स्वतःला नेते म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या स्वार्थी, भ्रष्टाचारी,सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या पुढाऱ्यांपेक्षा निःस्वार्थी,तळमळीने काम करणारे,निष्काम कर्मयोगी, सेवाव्रती, निडर,संघर्षयोद्धा दादा हे केव्हाही हजारो पटीने श्रेष्ठच ठरतात.त्यांच्या जीवनकार्याचा हा आदर्श सध्याच्या तसेच येणाऱ्या पिढ्यांनी घ्यावा,हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल !
डॉ.सतीश गायकवाड-98501 08339),संभाजी नगर.
कालकथित डी.एस.गायकवाड चिरंजीव

