समाज शास्त्राचे अभ्यासक व मुक्त पत्रकार सुधीर जाधव- सांगत आहेत की….

वृतपत्रात व सोशल मीडियावर पसरवली जात असलेली भरमसाठ माहिती अलिकडे सरसकटपणे विचार न करता, खातरजमा न करता सर्रास पुढे ढकलली जाते.हे टाळले पाहिजे.मग इथे शरद पवारांचा विजय आसो! झिंदाबाद अशा घोषणा करण्याचा आग्रह आहे का तर तो बिलकुल नाही. किंवा कोणी सतत त्यांच्या सोबत रहा असेही म्हणायचे नाही. आपापली राजकीय विचारसरणी ज्याने त्याने निश्चित जोपासावी पण ज्या नेतृत्वामुळे,पुढाकाराने महाराष्ट्र राज्य या जगात प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाते त्या नेतृत्वावर अपूर्ण व अर्धवट माहितीवरून मत बनवणे रास्त नव्हे.– म्हणे बारामतीच्या पलीकडे शरदचंद्र पवारांनी कधी पाहिलं नाही!!.इथल्या मातीचे दुर्दैव असेल की कायकोण जाणे पण हेच शरदचंद्र पवार दुसऱ्या राज्यात जन्माला आले असते तर कितीतरी उदोउदो झाला असता.
महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काय योगदान दिलं पवार साहेबांनी…….ते पुढील प्रमाणे पाहू.
१) ● दिल्लीतील एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते –की…भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्य निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्षे काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले.खास बाब अशी की सामान्यपणे कोण घेत नाही असे शेती खाते/ शेती मंत्रालय मागून घेतले शरद पवारांनी.एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिक स्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले.
२) ● याच कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत ५० वर्षे वावर असणारे पवार देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे.पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौर्यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपसासोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना मोदीजिंनी उजाळा दिला.
३) ● युनेस्कोच्या फूड फॉर हंगर ऐवजी कामाच्या मोबदल्यात राशन देण्याचे श्रेय पवार साहेबांचे.त्यातून रोजगार हमी उभी राहिली.
४) ● ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली १९७१ साली त्यांनी बारामती कृषि प्रतिष्ठानची स्थापना केली. पथदर्शी प्रयोग राबवले.आज देशातील ही एक शेती संशोधन करणारी नामवंत संस्था आहे. सन २०२६ मधे बारामती येथे आदाणी कंपनी बरोबर समन्वय साधून राज्यातील अत्याधुनिक असे पहिले ए. आय. प्रशिक्षण केंद्र सुरू केले.
५) ● ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ या सूत्राने बारामती तालुक्यात व नंतर हे मॉडेल राज्यभर नेऊन दूग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.सुमार पाऊसमान असूनही महाराष्ट्र आज दूध उत्पादनात प्रमुख राज्य ठरले आहे.
६) ● यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व इतर ठिकाणच्या उपकेंद्राच्या माध्यमातून शेती, सहकार,युवक शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात उपयुक्त कार्य सुरू आहे.
७) ● दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन एग्रीकल्चर एन्ड एग्रो बेस्ड इंडस्ट्रीज (सीटा) संस्थेच्या उभारणीत पुढाकार.
८) ● शरदचंद्र पवार अध्यक्ष झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,हाॅस्टेल,ग्रंथालये,महाविद्यालये,आश्रमशाळा उभारण्यात मोठी भर.मुंबई,पुणे, शिवाजी युनिव्हर्सिटी मिळून जितका व्याप आहे त्याहून मोठा पसारा व बजेट आज रयत शिक्षण संस्थेचा आहे.
९) ● विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी, संशोधक तयार व्हावेत, यासाठी रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.
१०) ● १९९३ पासून शरद पवार वरळी मुंबईतील सुविख्यात नेहरु सायंस सेंटरचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कतृत्व ओळखून व संस्थेच्या विकासासाठी सुयोग्य अशी व्यक्ती म्हणून दर 3 वर्षांनी या संस्थेचे सदस्य त्यांनाच एकमताने अध्यक्ष करतात.
११) ● याच नेहरु तारांगणमधील यंत्रणा आधुनिक करण्यात पवारांचा दृष्टीकोण असल्याने आशियातल्या पहिला विशेष प्रोजेक्टरचा येथे वापर सुरू झाला. खास करून महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालकांना येथील अत्याधुनिक तारांगणामुळे बृह्मांडची साक्षात प्रचिती अनुभवायला मिळते. मुंबईतील हे एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
१ २) ● केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील तफावत दूर करण्याचं श्रेय पवारांचेच. शिवाय दर १० वर्षाने जो वेतन आयोग नेमून केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांना सुधारित वेतन आयोग लागू करते तो जसाच्या तसा महाराष्ट्र राज्यातील कर्मचार्यांना लागू करण्यात पवारांनी धोरणात्मक निर्णय घेतला. नंतर इतर काही (सर्व नाही) राज्ये असे करु लागली.
पण राज्यातील काही कर्मच्यारी आज शरद पवारांवर आरोप करण्यात पुढे असतात.
१३) ● आणिबाणीत ५० ते ५५ वयाच्यांना सक्तीने निवृत्त केलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पवारांनीच पुन्हा कामावर घेतलं.
१४) ● राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनिसांना पवारांनी वेतनवाढ केली.
१ ५) ● मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात पुढाकार व मोठं योगदान.यामुळे मराठवाड्यातील बहुतांश मराठी नेते,पुढारी यांची पवारांनी नाहक नाराजी पत्करली. कालांतराने या नाराज लोकांना नामांतराबाबत आपली भूमिका चुकल्याने उमजले.
१६) ● मराठवाड्यात आणखी एक विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे नांदेड येथे स्थापन करण्यात पुढाकार.
१७) ● महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी बेळगावात मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडला,मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
१८) ● मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वलय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान.सध्या हे संकुल मुंबईचा कार्पोरेट कणा ठरला आहे.
१९) ● १९८० च्या दशकात मुंबईच्या समुद्रात नैसर्गिक तेलाचे साठे आढळले. त्यावर आधारित तेल शुद्धिकरण उद्योग – ONGC ऑइल एन्ड नॅचरल गॅस लिमिटेड महाराष्ट्रात ठेवण्यात यश.
(आज सर्व गुजरातेत पळवले जाते आहे.!)
२०) ● राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत विदर्भातील बुटीबोरी उभारली गेली त्याचं श्रेय शरद पवार यांचे आहे असे खुद्द माननीय नितीन गडकरी जाहीरपणे सांगतात. या महाकाय प्रकल्पात गडकरींनीही मोलाची भूमिका निभावली आहे.
२१) ● पुण्याच्या आसपास पिंपरी चिंचवड,चाकण,लोणी इ. परिसरात ऑटोमोबाईल व तत्सम कंपन्यांच्या उभारणीला शरद पवार यांनीच हात दिला. हा भाग भारताचं प्रमुख ऑटोमोबाईल झोन म्हणून ओळखल्या जाते.
२२) ● महाराष्ट्र राज्यात अनेक शहरात डोक्यावर व खांद्यावर ओझी वाहणाऱ्या मराठी माथाडी कामगारांसाठी माथाडी मंडळांच्या स्थापनेत शरद पवारांचा सिंहाचा वाटा.या कामी दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना बलीदान द्यावे लागले..नव्या मुंबईत सिडको निर्मित ५ हजार घरं केवळ ३५ हजारात माथाडिंना दिली.आज २०२६ मधे या घरांची किंमत घराच्या साईझनुसार नुसार ३५ ,६०,९८ लाख आहे.परिणामी राजधानी मुंबईत गावा – खेड्यातील मराठी लोक काहीप्रमाणात तरी झोपडी ऐवजी अधिकृत इमारतीत मालकी हक्काने रहात आहेत.
२३) ● शिवाय माथाडी कामगारांच्या घरांसाठी शरद पवारांनी वडाळा-चेंबूरमध्ये ४२ एकर जमीन दिली.परंतु जमिनीच्या काही वादामुळे १८ एकरच मिळाली.यावर बहुमजली घर बांधली गेली व माथाडी कामगार सहकुटुंब तिथे राहतात.
२४) ● केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी या माथाडी मंडळावरचा २४८ कोटींचा आयकर माफ करून घेतला.
२५) ● माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना १९९९ पासून शरद पवार यांनी जावळीतून वेळोवेळी उमेदवारी दिली व निवडून आणले.
२६) ● पंजाब शांत करणारा ‘राजीव-लोंगोवाल करार’ प्रत्यक्षात आणण्यामागे शरद पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पण दुर्दैवाने आथ पंजाबात पाकिस्तान सीमेपलीकडून भरमसाठ नशेचे ड्रग्ज येते. परिणामी पंजाब खिळखिळा होत आहे.अलिकडे तर महाराष्टातील अनेक ठिकाणी ड्रग्ज निर्मितीचे कारखाने सापडतात.
२७)● १९८९ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना.नोकरदार, गृहिणी,कामगार इ. लाखों मंडळींना कॉलेजात रोज जाता न आल्याने खंडित झालेले शिक्षण जे पुन्हा घेऊ इच्छितात त्यांना उच्च शिक्षणासाठी ठिकाण तयार झाले.केवळ टपालाने पुस्तके व अभ्यास साहित्य घरपोच मिळवून व मोबाईल वरून पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण येथे मिळते. शिवाय येथील पदवी कोणत्याही युनिव्हर्सिटी ईतकी समकक्ष राहील- ग्राह्य धरावी असा कायदा विधिमंडळात मंजूर केला गेला.आता ही पदवी कोहिनूर क्लास, कोकाटे इंग्लिश क्लास सारखी नाही.
२८) ● शरदचंद्र पवार यांची खेळाशी नाळ कधीही तुटली नाही. कुशल क्रीडा संघटक अशी त्यांची आजही ओळख आहे. जागतिक पातळीवर क्रिकेट व क्रिकेटपटू यांची ओळख करून दिली. आज क्रिकेट व क्रिकेट खेळाडू यांना प्रतिष्ठा व पैसा मुबलक मिळत आहे.
२९) ● राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष असताना लाल मातीसोबतच गादीवरील कुस्तीला शरद पवार यांनी सुरुवात केली.
३०) ● देशातील सर्वश्रेष्ठ अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली.
३१) ● खो-खो खेळासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शरद पवार यांचा १२ डिसेंबर हा वाढदिवस खो-खो दिवस म्हणून साजरा केला जातो.
३२) ● १९९० साली बिजिंगमधील एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला तो शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे.
३३) ● १९९३ साली पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्र राज्याने केले होते त्यावेळी ११ महिन्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीचीपुण्याजवळ बालेवाडी येथे उभारणी केली.आता हे महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ झाले आहे.
३४) ● संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ” शाहीर अमर शेख ” यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्याची कल्पना शरद पवारांनीच उचलून धरली.
३५) ● साहित्यिक आणि कलावंतांमध्ये रमणारा राजकारणी अशी शरद पवार यांची खरी ओळख आहे.मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेचे ते गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहेत कारण या मंडळाच्या मुंबई व उपनगरात मोक्याच्या ठिकाणी वाचनालय व शाखा आहेत.या मोक्याच्या जागेवर अनेकांचा डोळा होता.या जागा बळकावल्या जाऊ नये म्हणून इथल्या सभासद व डॉ मुणगेकर व अन्य कार्यकर्त्यांनी अध्यक्ष पदाची माळ पवारांच्या गळ्यात घातली.परिणामी या समाजोपयोगी संस्थेच्या मुंबई व उपनगरातील हेतुपुरस्सर वादग्रस्त ठरविलेल्या जागा संस्थेच्या नावे राहिल्या.
३६) ● सहित्य अकादमी पुरस्कार मिळविलेल्या मराठी कलाकारांना राज्याकडून १ लाख रुपये देण्याचा निर्णय शरद पवार यांचाच.
३७) ● कवी ना.धों. महानोर,लक्ष्मण माने,,लक्ष्मन ढोबळे यासारख्या साहित्यिकांचा / चळवळीतील मंडळींचा महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून प्रवेश शरद पवार यांच्यामुळेच झाला.
३८) ● अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अनेक अडचणींतून सोडवलं, यशवंत नाट्यगृह माटुंगा मुंबई येथे उभारण्यात मोलाची मदत.
३९ ) ● घाशीराम कोतवाल नाटकाच्या बंदीविरोधात शरद पवार ठाम उभे राहिले. सतीश आळेकरांनी याविषयी भरभरुन लिहिलंय.कालांतराने या मराठी नाटकाचे जगभर यशस्वी प्रयोग झाले.
४०) ● १९९० मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रात फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा यशस्वी कार्यक्रम केंद्र सरकारनेही स्वीकारला. कमी पाऊसमान असलेल्या महाराष्ट्र आज फळं, भाजीपाला व फुलं उत्पादनात व निर्यातीत भारतात वरच्या स्थानावर आहे.महाराष्ट्रातील हा शेतमाल विमानाद्वारे निर्यातीसाठी मुंबईत आणल्या शिवाय पर्याय नाव्हता. पुण्यातून ही निर्यात करायची तर पुण्यात आतरराष्ट्रीय विमानतळ नाही.ही अडचण लक्षात घेऊन पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री झाले तेव्हा सैन्यासाठी असलेल्या पुण्यालगतच्या विमानतळावरून शेतमाल निर्यातीला मंजुरी मिळवून दिली.
४१) ● प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांचा गौरव शरद पवार “फलोत्पादन क्रांतीचे जनक” असा करतात.शिवाय स्वामिनाथन यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या अनेक संस्थांना पवार यांनी भरघोस सहाय्य केले.
४२) ● पवार साहेब मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेचे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक ही राज्ये लाभार्थी आहेत. या चॅलेंजिंग रेल्वे प्रकल्पासाठी गोवा व कर्नाटक राज्यांनी आपापल्या हिश्याचा निधी देण्यात असमर्थता / चालढकल दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने हात पुढे करुन , महाराष्ट्र राज्याने पदरचे पैसे भरून प्रकल्प साकार केला. कारण दिल्ली च्या भारतीय रेल्वेने स्पष्ट केले होते की कोकण रेल्वे हा जिकिरीचा व खर्चिक प्रकल्प असल्याने केंद्रीय रेल्वेतर्फे बजेट मिळणे शक्य नाही. म्हणून कोकण रेल्वे करता महाराष्ट्र राज्याने भरभरून रक्कम दिली.कोकण रेल्वे हे वेगळ महामंडळ स्थापन केल.पण आज तिथुन दक्षिणेस जाणार्या कित्येक गाड्या कोकणात थांबविल्या जात नाहीत. आता ते काम सुद्धा शरद पवारांनी करायलाच हवे की.काय.कळेना.
४३) ● शरद पवार यांनी पैठणला संतपीठाची घोषणा केली, १७ एकर जमीनही मंजूर केली. हे संतपीठ सुरू झाले असून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविले आहे.इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार हे हिंदू हिताला प्राधान्य देत नाहीत अशी ओरड काही आधुनिक मंबाजी अधूनमधून करतात.
४४) ● शरद पवार यांनी शाहू-फुले-आंबेडकरांचं लिखाण प्रकाशित करण्यासाठी समित्या स्थापन केल्या, संकलित साहित्य प्रकाशित केलं. पुण्यातील फुले वाडा हे घर स्मारकात रुपांतरित व्हावे यासाठी माननीय छगनराव भुजबळ यांना सहाय्य केले.
४५) ● महाराष्ट्रातील मागास अशा विदर्भ,मराठवाडा व कोकण भागासाठी भारतीय राज्य घटनेच्या तरतूदीनुसार 3 वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णयही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाला. केंद्रात मंत्री पदावर असताना व नसताना स्व. शंकरराव चव्हाण यांनी अशी वैधानिक मंडळे स्थापन करण्याला शेवटपर्यंत धोरणात्मक विरोध होता.
४६) ● राजकीय आकसापोटी पवारांच्या संकल्पनेतील एन्रॉन प्रकल्पाला विरोधकांनी विरोध केला. याची किंमत महाराष्ट्रातील ग्रामीण भाग व शेतकरीआजही लोडशेडिंग व महागडी वीज या स्वरूपात चुकवत आहे. विहिरीत पाणी आहे, हिरवीगार पिके शेतात पाण्याअभावी सुकत आहेत. पण वीज नाही म्हणून पंप चालवू शकत नाही असे संकट उभे आहे.
४७) ● महिलांना भारतीय सैन्यदलात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय १९९२ मध्ये ते सरंक्षणमंत्री शरद पवार यांनी घेतला. लष्करात महिलांना ११ टक्के आरक्षण दिलं. यात कालांतराने कोर्टाने ही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पुरुष सैनिकांप्रमाणे महिलांना सुद्धा महत्त्वाच्या पदांवर नेमावे व त्यांना सन्मान देऊन पूर्ण वेतन, पेन्शन, भत्ते, सवलती देण्याचे आदेश सरकारला दिले.परिणामी पाकिस्तान विरुद्ध लढ्यात ऑपरेशन सिंदूर च्या वेळी ( मे २०२५) कर्नल सोफिया कुरेशी- भारतीय लष्कर व विंग कमांडर व्योमिका सिंग – भारतीय हवाई दल यांना जगाने अधिकृत प्रेस ब्रिफिंगच्या पाहिले आहे.
४८ ) ● लातूरच्या धाराशीव – किल्लारी भूकंपावेळी (३० सप्टेंबर- १९९३) तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी खासकरून कित्येक गावांचे नवीन जागेवर पुनर्वसन केले.या कामाची जगाने नोंद घेतली. यासाठी ते मराठवाड्यातील या भागात 3 महिने तळ ठोकून होते. त्यामुळेच गुजरात येथील भूज- गुजरात भूकंपात ( २६ जानेवारी-२००१ ) तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी यांनी शरद पवार यांचा भुकंप सहाय्य व पुनर्वसनाचा अनुभव लक्षात घेऊन केंद्राच्या आपत्कालीन मदत व्यवस्थेचे प्रमुख म्हणून नेमणूक केली. यावेळी गुजरातचे नरेंद्र मोदी तिथे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र असा देशाच्या कोणत्याही भागातील आपत्ती च्या वेळी धाऊन जातो. आता काही लोक महाराष्ट्राने अस अनेक बाके प्रसंग उत्तम प्रकारे हाताळले हे विसरतात.
४९ ) ● ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद , महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण लागू केले शिवाय राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य आहे. इथे पुन्हा शरदचंद्र पवार यांची व्हिजनरी दृष्टी अधोरेखित होते.
५०) ● कृषी क्षेत्रातील शरद पवार यांच्या कामगिरीबद्दल केंद्रसरकारने (संयुक्त पुरोगामी सरकारने) बैठकीत अभिनंदन प्रस्ताव मांडला जो एकमताने मंजूर झाला.
५१ ) ● कृषिमंत्री झाल्याबरोबर शरद पवार यांनी २००८ मधे शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपयांच कर्ज माफ केलं. यावेळी साधा रूपयाचा फॉर्म भरला नाही किंवा कोणाकडून आधार कार्ड काय कोणतेही इतर कागदपत्रे देखील मागितले नाहीत .परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाचे पैसे जमा झाले.याचा देशातील 3 कोटी शेतकर्यांना दिलासा मिळाला.
५२) ● शेती कर्जावरचा व्याजदर शरद पवार यांनीच टप्प्याटप्प्याने कमी करत आणला.असे कित्येक असामान्य कार्ये शरद पवार यांनी केली आहेत ज्याची नोंद इतिहासात होईलच. आजही ते ८१ वर्षे वयातही १८ तास विकास कामात व्यग्र असतात. He is just great
____________________________________
संकल्पना, मांडणी व संकलन: श्री सुधीर जाधव. 9869415533 / ssjvjti@rahulbansode2409gmail-com व्हीजेटीआय,मुंबई येथून सेवानिवृत्त.नेरूळ- नवी मुंबई.

