
कला,संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो,असे कवी, गायक तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणजे प्रकाश आजविलकर.संघर्षातुन घडलेला सुरेल जीवनप्रवास,समाजभान जपणारा कलावंत आणि माणूसकीचा वारसा पुढे नेणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.त्यांच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
प्रकाश आजविलकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकगायक दिवंगत यशवंत तानू कांबळे (आजविलकर) यांचे सुपुत्र. आपल्या सुरेल गायनाने आणि सामाजिक जाणिवेने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी छाप पाडणारे यशवंत आजविलकर यांचे १९८८ साली अकाली निधन झाले.वडिलांच्या निधनामुळे प्रकाश आजविलकर अत्यंत लहान वयात पोरके झाले.आयुष्याच्या सुरुवातीलाच आधारवड हरपल्यामुळे पुढील वाटचाल कशी, कोणत्या दिशेने करावी,याचे भानही त्यांना राहिले नव्हते. काही वर्षे आयुष्य दिशाहीन अवस्थेत गेले.परंतु परिस्थिती हाच माणसाचा खरा गुरु असतो.जीवनातील अनेक चढ उतार अनुभवत असताना त्यांच्यात हळूहळू सकारात्मक बदल घडत गेले. वडिलांकडून मिळालेला कला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा त्यांनी निश्चय केला. गाण्याची आवड तर रक्तातच होती.त्यामुळे त्यांनी गायन क्षेत्रात स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली.
सुरुवातीचा काळ मात्र अत्यंत खडतर होता. सुरांची शिस्त नव्हती, आवाज पूर्णपणे तयार नव्हता आणि औपचारिक शिक्षणही कमी असल्याने गाताना शब्दोच्चारही चुका होत असत. मात्र त्यांच्याकडे होती ती प्रचंड जिद्द,शिकण्याची तळमळ आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती.अनेक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःला घडविण्याची मेहनत घेतली आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गायन क्षेत्रात आपली वाट निर्माण केली. अथक मेहनत,सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी गायनातील पैलू आत्मसात करुन गायन क्षेत्रात दमदार वाटचाल सुरु केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील आजवली गावात त्यांचा ४ जून १९६४ रोजी जन्म झाला आणि बालपणही तिथेच गेले. त्यामुळे गावातील सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मातोश्री मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात नोकरीला लागल्या. याच काळात प्रकाश आजविलकर यांचे मुंबईत येणे जाणे वाढले आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.मुंबईत त्यांची सर्वप्रथम भेट कवी सतीशकुमार साळुंखे यांच्याशी झाली. त्यानंतर कवी नाथा जाधव,कवी शंकर कांबळे,कवी विनोद धोत्रे आणि फोंडाघाटचे सुप्रसिद्ध कवी गायक जनीकुमार कांबळे यांच्यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिक आणि कलावंतांचा सहवास त्यांना लाभला.या सर्वांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले.त्यांच्या मार्गदर्शन,प्रेरणेमुळे प्रकाश आजविलकर अधिक आत्मविश्वासाने गाऊ लागले.त्या काळात त्यांना कोणताही औपचारिक गुरु लाभलेला नव्हता. त्यामुळे विविध कवी गायकांची गाणी ऐकून,गाऊन आणि अभ्यास करुन त्यांनी स्वतःला घडविण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर त्यांनी गायनातील अनेक पैलू आत्मसात केले.
कव्वाली क्षेत्रात त्यांची वाटचाल सुरु असतानाच त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा आला.सुप्रसिद्ध कवी गायक जनीकुमार कांबळे यांनी त्यांना पहिला मोठा कार्यक्रम दिला.या कार्यक्रमाला अनुभवी शशी साळुंखे समोर होते. तसेच मुंबईहून आलेले वादक आणि जाणकार कलावंत उपस्थित होती. त्यांच्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी प्रकाश आजविलकर त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेची दखल घेतली.याच माध्यमातून त्यांची ओळख महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी,गायक समाजभूषण विष्णू शिंदे यांच्याशी झाली.विष्णू शिंदे यांच्या रुपाने त्यांना खऱ्या अर्थाने गुरु लाभले आणि त्यांच्या कलाजीवनाला नवी दिशा,नवे आयाम मिळाले. गायनातील बारकावे, सुरांची शिस्त, सादरीकरणाची शैली,शब्दांची जाण,मंचावरील वावर आणि एक जबाबदार कलावंत म्हणून घडण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार विष्णू शिंदे यांनी त्यांच्यावर केले.गुरुंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या गायनाला अधिक परिपक्व केले. त्यांच्या आवाजातली ताकद, भावनांची अभिव्यक्ती आणि सामाजिक आशय असलेली गीते यांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले.
प्रकाश आजविलकर यांची ओळख केवळ गायक म्हणूनच मर्यादित नाही.ते एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्तेही आहेत.समाजातील वंचित,उपेक्षित घटकांच्या प्रश्नांविषयी,सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना विशेष आस्था आहे.सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी चळवळींमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या कलेचा आणि कार्याचा सुवास असाच दरवळत राहो. संघर्षाला संधीमध्ये रुपांतरीत करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी कलावंताच्या जन्म दिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय तसेच प्रेरणादायी प्रवासाला सलाम करावासा वाटतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अनेक तरुणांसमोर जिद्द, चिकाटी आणि कलेप्रती निष्ठेचा आदर्श ठेवला आहे.चळवळीत काम करतांना त्यांनी जोपासलेली अढळ सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना त्यांच्या शब्दांतून व्यक्त होते. अशा या गुणी कलावंताचा समृद्ध विचारांचा वैचारिक वणवा चळवळीत सदैव प्रज्वलीत,उज्वल होवो. त्यांना उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य,अखंड सर्जनशीलता आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यासाठी अधिकाधिक यश लाभो, हीच जन्म दिवसानिमित्त मंगलमय सदिच्छा !
मिलिंद कांबळे चिंचवलकर- ९८९२४८५३४९

