अंतिम श्वास 

बातमी शेअर करा.

वडिलांच्या स्मृतीदिना निमित्त मुलाने लिहिलेली हृदयस्पर्शी सत्यकथा 

 एका खेड्यातील बापाचा पोरगा घाई गडबडीत घरी पोहोचला. मोटरसायकल साईड स्टॅन्डला लावली घरात शेजारी-पाजारी, गावकरी तथा नातेवाईकांची बरीच गर्दी जमलेली होती. ती नेहमीच असायची आज मात्र थोडी जास्तच होती. तो दिसताच त्यांचा जीव भांड्यात पडला. जणू काही ते त्याचीच वाट पाहत होते. काहींनी त्याच्याकडे कटाक्ष टाकला पोराने स्मितहास्य केलं. परंतु नेहमीसारखा प्रतिसाद मिळाला नाही. कटाक्ष टाकणाऱ्यांपैकी एकानेही साधे चेहऱ्यावरचे हवाभाव सुद्धा बदलले नाही. समाजशील पोराला हे विसंगत वागणं कळणार नाही एवढाही तो दूधखुळा नव्हता. त्यामुळे त्याच्या काळजात चर्रर्र झालं. त्याचं अवसान गळालं, त्याच्यावर जणू आभाळ  कोसळलं. पन्नास फुटाचं अंतरही त्याला कित्येक किलोमीटर भासू लागलं. तो प्राण एकवटून  घरात धावतच गेला. तेथे त्याला पूर्ण शांतता दिसली.कोणीही एकमेकांशी शब्दही बोलत नव्हतं. फक्त एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून नजरा-नजर चोरच होते. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत होती.  मायनं स्वतःचं मन घट्ट करून हंबरडा कंठाशी  थांबवून ठेवला होता. चेहऱ्यावर दुःखाचे सावट आणि भविष्याचे संकट यामुळे भावाचे बोध हरपले होते. बहिणीला तर आपले सर्वस्व हरवल्यागत होऊन ती वेडी-पीसी भासत होती. पोरानं सगळीकडे नजर टाकली गर्दीच्या मध्ये बाप शेवटच्या घटका मोजत निपचीत पडला होता. ते बघून त्याचे हातपाय गळाले. असं नाही होऊ शकत? असे शब्द त्याच्या तोंडून अचानक निघाले. तो क्षणार्धात त्यांच्याजवळ पोहोचला. बापाने डोळे उघडून त्याला पाहिलं. पुन्हा डोळे मिटून घेतले. कदाचित त्याला पाहण्यासाठीच बापाने जीव डोळ्यात थांबवलेला असावा. कारण त्यानंतर त्यांनी अंतिम श्वास घेतला. डोळे मिटले ते कायमचेच. घरात एकच हंबरडा फुटला, सगळीकडे आक्रोश पसरला. पोरांनी  घरदार डोक्यावर घेतलं. मायलेकरांचा हुंदका थांबेना. ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले, प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फुटला. तरीही ते मायलेकरांना धीर देत होते.”बाप काही जन्माला पुरत नसते, जो जन्माला येते तो एक दिवस मरतेच. मरण कोणालाच सुटलं नाही, एकना एक दिवस प्रत्येकाला जावंच लागते” अशा शब्दात ते त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. धाकटा पोरगा थोडासा सावरला त्याने बुद्धाचा  प्रतित्यसमुद्पाद तथा आणि अनित्यवादाचा सिद्धांत कुठेतरी वाचला असावा.
         तेवढ्यात त्याला कामावरून घरी येताना मोठ्या भावाचे आलेले फोन आठवले, त्यावरचं बोलणं आठवलं. भाऊ
म्हणाला, “आज तू घरी येण्यासाठी लवकर निघ. जास्त वेळ घालवू नको, बाबा तुझी आठवण काढत आहेत” पोराचाही नाईलाज होता, बापाच्या आजाराच्या निमित्ताने नेहमी सुट्टी घेणारा पोरगा आज पुन्हा सुट्टी साठी आर्जव करत म्हणाला, “घरी जायचं होतं, भावाचा फोन आला.” त्यावर प्रत्युत्तर मिळालं, “बरं ठीक आहे, जाताना हे दोन कागद कार्यालयात दे आणि निघून जा.”  
         मोटरसायकलचा वीस-पंचवीस किलोमीटरचा प्रवास मध्येच भ्रमणध्वनी खणाणला. भाऊ म्हणाला, “कुठे आहेस.”  “रस्त्यात आहे, कार्यालयात दोन कागद दिले की पोहोचतोच” त्याने उत्तर दिलं. “लवकर ये” भाऊ म्हणाला. पुन्हा पाच मिनिटांनी भाऊ, अरे पोहोचला नाही? बर ठीक आहे वाटेत बहिणीकडे जाऊ नको ती इथेच आहे. तो स्पष्ट काहीच सांगत नव्हता. कदाचित त्याला काळजी वाटत असावी आपण जर बापाबद्दल बोललो तर हा घाईघाईत वेगाने येईल. बाबांचं व्हायचं ते होईलच. परंतु भाऊ मात्र सुरक्षित पोहोचला पाहिजे, असा त्याचा प्रामाणिक उद्देश असावा. भाऊ एवढे फोन का करत असावा? काही कळतच नव्हतं. कारण त्याची स्वतःची आणि बापाच्या तब्येतीची काळजी तोच घेत असल्यामुळे चर्चा, संवाद हा नेहमीचाच  होता. त्यामुळे शंका घेण्याचं कारण नव्हतं.
        मृत्यू हे शाश्वत सत्य आहे, जो जन्माला येतो तो मृत्यूला भेटतोच. ज्या ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्या लयाला जातात, हे निसर्गाचं अंतिम सत्य आहे. त्याला अपवाद सुद्धा नाही. फक्त फरक असतो आयुमर्यादेचा, ते कोणाला कमी तर, कोणाला जास्त एवढंच!
          तथागत गौतम बुद्धाचे हे तत्वज्ञान लिखाणाच्या, व्याख्यानाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून जगाला सांगणारा पोरगा दुःखातून थोडासा सावरत विचार करू लागला की,  तत्त्वज्ञान सांगणं  सोपं असते. परंतु ते स्वीकारणं आणि त्याप्रमाणे जगणं किती कठीण असते? हे त्याला त्या दिवशी कळलं. दुसऱ्याच्या घराला आग लागल्यावर पाणी टाकण्याचा सल्ला सर्वच देतात. परंतु जीवाची खरी घालमेल तेव्हाच होते जेव्हा स्वतःच्या घराला आग लागते.
          त्याने स्वतःला जरी सावरलं असलं तरी तो शून्यात नजर टाकून एकटक पाहत होता. ज्याने जन्म दिला, पालन पोषण केलं, संस्कार दिले, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शिक्षणाचा गंधही नसताना उच्च शिक्षण देऊन समाजात लायकी निर्माण केली आणि सक्षमपणे पायावर उभं केलं. ताठ मानेनं जगायला शिकवलं. त्यांनी एकदम नजरेआड व्हावं, तेही कायमचं! यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. बापाचा त्याग, कष्ट, समर्पण, हाल-अपेष्टा पोराच्या डोळ्यासमोरून इतिहासाची पानं पलटावी त्याप्रमाणे पटापट पलटत होती.
          त्याला खूप जुना एक प्रसंग आठवला. गावात सामाजिक सलोखा बिघडला त्यामुळे हाताला काम  नाही. म्हणून बापाने नातेवाईकांच्या गावात आश्रय घेतला. तेथे मोलमजुरीसह शिक्षणाची  उत्तम व्यवस्था होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या प्रस्थापनेसाठी एके ठिकाणी आपल्या अनुयायांना असा संदेश दिलेला आहे की, ‘खेडे सोडा आणि शहराकडे चला’ कारण शहरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पुढार्‍यांमुळे  शोषणास वाव नसते. विषमता कमी असते. जातीयतेची  दाहकता कमी जाणवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून सर्वांगीण विकासासाठी वाव असतो.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा तो संदेश अनेकांनी शिरसावंध्य मानल्यामुळे त्यांचे जीवन आरपार बदलून  गेल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.
         अक्षरशत्रू बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तो क्रांतिकारी संदेश माहीत होता की नाही? हे अजूनही अनुत्तरीतच आहे. परंतु परिस्थितीने त्याला गाव सोडायला भाग पाडलं. बापाला  केळीच्या बागेत काम मिळालं. स्वतःचं घर नसल्यामुळे कुळाची झोपडी बांधून बाप दोन मुलांसह शेतातच राहू लागला. कुटुंबाची ताटातून झाली. तरीही हे अग्नी दिव्य त्यानं स्वीकारलं होतं. सकाळी उठून जंगलात उघड्यावर स्वयंपाक करणे प्रशिक्षित तथा तरबेज महिलेलाही कधी कधी शक्य होत नाही. बाप मात्र सकाळ संध्याकाळ आपलं कौशल्य पणाला लावत होता. त्याला कामाचा क्षीण येताना कधीच दिसत नव्हता. कष्ट जणू त्याच्या पाचवीला पुजलेले होते. विसावा त्याच्या नसीबी नव्हताच.  अगदी कष्टाळू बळकट आणि कणखर व्यक्तिमत्वाचा धनी असलेला बाप स्वभावाने मात्र दयाळू, शीलवान, कनवाळू आणि मवाळ होता. तो कधीच भांडताना  दिसला नाही. आईच्या धाकात राहून प्रसंगी मार खाणाऱ्या अल्लड लेकरांवरही तो कधी रागवताना दिसला नाही. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सन्मानाने आणि अदबिनं बोलणं हे त्याच्या स्वभावाचं गुणवैशिष्ट्य होतं. दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणारा हळव्या मनाचा बाप रडताना अनेक वेळा दिसला. परंतु तेवढाच तो स्वाभिमानीही होता.  त्याने कामाची कधीच लाज बाळगली नाही. हाताला मिळेल ते कबाडकष्ट करून संसार चालवणे  हेच त्यानं त्याचं कर्तव्य मानलेलं होतं.
          आयुष्यभर कष्टाने क्षीणलेल्या बापाला शेवटी-शेवटी सुखाचे दिवस दिसले. परंतु शरीर साथ देईनासं झालं. त्याला अनेक आजारांनी घेरलं. एक दिवस त्याला दम्याचा मेजर अटॅक आला. लेकरं एकदम घाबरले, काय कराव सुचत नव्हतं. बापाच्या प्रेमापोटी व कर्तव्याचा भाग म्हणून  शहरात उच्च दर्जाचा औषधोपचार केला. कित्येक महिने घरी ऑक्सिजनवर ठेवलं. वाटेल त्या इच्छेची परिपूर्ती करत शर्थीचे प्रयत्न केले. परंतु  नाईलाज! सर्वांचे हात टेकले. कदाचित निसर्गालाही तेच मान्य असावं. त्यानेही माघार घेतली. शेवटी बापाला आपल्या कवेत सामावून  घेतलं.

        भिमराव परघरमोल-मो. ९६०४०५६१०४, तेल्हारा जि. अकोला
           लेखक व्याख्याता तथा अभ्यास फुले शाहू आंबेडकरी विचारधारा

                 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *