सहवास

बातमी शेअर करा.

भगवान बुद्धांकडे दोन शिष्य होते.
एक शिष्य नेहमी बुद्धांजवळच असायचा. बुद्ध जिथे जातील तिथे तो सोबत. “मी बुद्धांचा सगळ्यात जवळचा शिष्य” असा त्याला अभिमान होता. पण तो बुद्धांचे विचार कधी आचरणात आणायचा नाही. फक्त जवळ राहण्यातच त्याला धन्यता वाटायची.
दुसरा शिष्य मात्र गावापासून दूर एका छोट्या झोपडीत राहायचा. तो बुद्धांना महिन्यातून एकदाच भेटायचा. पण तो रोज बुद्धांनी सांगितलेलं मनापासून पाळायचा. शांत राहायचा, कोणाचा द्वेष करायचा नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करायचा.
एकदा पहिला शिष्य बुद्धांना म्हणाला, “भगवान, मी दिवस-रात्र तुमच्या सोबत असतो,मग तुम्ही त्या दूर राहणाऱ्या शिष्याचं एवढं कौतुक का करता?”
बुद्ध हसले आणि म्हणाले,
“बघ, एक माणूस रोज गंगेत आंघोळ करतो, पण त्याचं मन मात्र घाणच राहतं. आणि दुसरा माणूस गंगेपासून दूर राहतो, पण रोज आपलं मन स्वच्छ ठेवतो. सांग, खरा पवित्र कोण?”
पहिला शिष्य मान खाली घालून शांत झाला.
बुद्ध म्हणाले, “माझ्या जवळ असणं महत्त्वाचं नाही, माझ्या विचारांच्या जवळ असणं महत्त्वाचं आहे. चमचा खिरीत राहूनही चव ओळखत नाही, पण जीभ क्षणात चव ओळखते. तसंच आहे.”
 बोध:-ऑफिसमध्ये, घरात, नात्यात – नुसतं वर्षानुवर्ष जवळ राहून काहीच होत नाही.
जो काम मनापासून करतो, विचार आचरणात आणतो, तोच खरा जवळचा असतो.पद,ओळख,जवळीक यापेक्षा कार्य मोठं असतं.
नमो बुद्धाय!
   संकलन – धम्म उपासिका वंदना भगत सूनगाव,ता-जळगाव जामोद,जिल्हा -बुलढाणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *