कामगार चळवळ आणि मानसशास्त्र

बातमी शेअर करा.

आज कामगार चळवळ एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. “कामगार संघटित का होत नाही?” हा प्रश्न अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. या प्रश्नाची अनेक उत्तरे दिली जातात. काहींच्या मते कामगारांच्या आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे ते पूर्वीसारखे संघर्षात सहभागी होत नाहीत. या मतामध्ये काही अंशी तथ्य असू शकते. मात्र, माझ्या मते हा संपूर्ण चित्राचा केवळ एक भाग आहे.माझा प्रश्न थोडा वेगळा आहे.आजच्या कामगाराच्या मनात नेमके काय चालले आहे?
  आजचा कामगार संघटित का होत नाही? तो संघर्षापासून दूर का राहतो? त्याला नेमकी कोणती भीती वाटते? तो स्वतःच्या हक्कासाठी पुढे का येत नाही? या प्रश्नांची उत्तरे केवळ अर्थशास्त्र, कामगार कायदे किंवा संघटनात्मक रचनेत शोधून पूर्ण मिळतील असे मला वाटत नाही. त्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोन ही तितकाच आवश्यक आहे.कामगार संघटित होत नाही, याचे स्पष्टीकरण केवळ “कामगार स्वार्थी झाला” इतक्यावर करता येणार नाही. अनेकदा त्यामागे भीती, असुरक्षितता, आर्थिक ताण, कुटुंबाची जबाबदारी, नोकरी जाण्याची चिंता, ठेकेदारी पद्धत, सतत बदलणारे कामाचे ठिकाण, व्यवस्थापनाचा दबाव आणि “माझ्यामुळे काही बदलणार नाही” अशी मानसिकता असते. या सर्व बाबी त्याच्या निर्णयांवर आणि वर्तनावर परिणाम करत असतात.
आजचा कामगार अनेकदा स्वतःला असे प्रश्न विचारत असतो.
> मी पुढे आलो तर माझी नोकरी जाईल का?
> इतर कोणी पुढे येत नाही, मग मीच का?
> आजचा पगार मिळतोय, तेवढेच पुरे.
> संघटना माझ्यासाठी नेमके काय करणार?
> माझ्याकडे संघर्ष किंवा आंदोलनासाठी वेळ आहे का?

जर नेता या भावना समजून घेत नसेल, तर कितीही प्रभावी भाषणे केली तरी कामगाराशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होणार नाही. नेता आधी कामगाराचा विश्वास जिंकतो, त्यानंतर कामगार संघटनेवर विश्वास ठेवतो आणि मगच संघर्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतो.या विषयाचा विचार करताना मला आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते. अनेक कामगारांना आपण कामगार आहोत, आपल्यालाही कायदेशीर हक्क आहेत आणि आपल्या संरक्षणासाठी कामगार कायदे अस्तित्वात आहेत, याची पुरेशी जाणीव नसते. उदाहरणार्थ, दुकानातील कर्मचारी, खासगी आस्थापनांमधील कर्मचारी, सुरक्षा रक्षक किंवा इतर असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार स्वतःकडेच “कामगार” म्हणून पाहत नाहीत. त्यामुळे कामगार संघटना, कामगार कायदे आणि सामूहिक संघर्ष यांच्याशी त्यांचा मानसिक संबंध निर्माण होत नाही. माझ्या मते, ही केवळ माहितीची कमतरता नसून कामगारांच्या मानसिक ओळखीशी संबंधित एक गंभीर बाब आहे.
   सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्याचा आणि त्यानंतर पूर्णवेळ कामगार चळवळीत कार्यरत राहण्याचा अनुभव मला या प्रश्नांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडतो. विविध क्षेत्रांतील कामगारांशी सातत्याने झालेल्या संवादातून मला जाणवले की कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केवळ कायदे, वेतन किंवा संघटनात्मक रचनेपुरता मर्यादित राहू शकत नाही. त्यांच्या निर्णयांमागील मानसिकता, भीती, आशा, अपेक्षा आणि असुरक्षितता समजून घेतल्याशिवाय त्यांचे वास्तव पूर्णपणे समजणे शक्य नाही.


आज भारतात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या प्रचंड आहे. ग्रामीण असो किंवा शहरी भाग, ठेकेदारी व्यवस्था असो किंवा इतर असंघटित रोजगार—कामगारांचे वास्तव झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कामगार चळवळीच्या अभ्यासाची चौकटही बदलण्याची गरज आहे.
माझ्या वाचनात आणि निरीक्षणात कामगारांच्या मानसशास्त्रावर तुलनेने कमी चर्चा दिसली आहे. अर्थात, याचा अर्थ असा नाही की या विषयावर कोणीच काम केलेले नाही. कदाचित माझ्या वाचनात ते आले नसेल. मी स्वतःला या विषयाचा विद्यार्थी समजून हा प्रश्न मांडत आहे. जर या विषयावर संशोधन, पुस्तके किंवा अभ्यास उपलब्ध असतील, तर त्यांचा अभ्यास करण्यास आणि त्यातून शिकण्यास मला निश्चितच आनंद होईल.
माझ्या मते, आजच्या काळातील कामगार नेत्यांनी केवळ कामगार कायदे, वेतन करार किंवा आंदोलनाच्या तंत्रांचा अभ्यास करून थांबू नये. त्याचबरोबर मानसशास्त्र, संवादकौशल्य, विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया, मानवी वर्तन आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचाही गंभीरपणे अभ्यास करणे आवश्यक आहे.
कदाचित आज कामगार चळवळीला नव्या घोषणांची नव्हे, तर नव्या समजुतीची गरज आहे. कामगार चळवळीसमोरचा सर्वात मोठा प्रश्न संघटनात्मक नसून मानसशास्त्रीय असू शकतो. या विषयावर व्यापक चर्चा, अभ्यास आणि संशोधन होणे ही काळाची गरज आहे.
  मी हा लेख अंतिम निष्कर्ष म्हणून नव्हे, तर एका चर्चेची सुरुवात म्हणून मांडत आहे. या विषयावर अभ्यासक, कामगार, ट्रेड युनियन कार्यकर्ते आणि सर्व संबंधितांनी आपली निरीक्षणे, अनुभव, टीका आणि संदर्भ मांडावेत. त्यातून आपण सर्वजण एकमेकांकडून शिकू शकू आणि कदाचित कामगार चळवळीसाठी एक नवी विचारदिशा निर्माण होऊ शकेल.कामगार चळवळीचे भविष्य केवळ घोषणांमध्ये नाही; ते कामगारांच्या मनाचा अभ्यास करण्यात आहे. जो नेता कामगाराचे मानसशास्त्र समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने मजबूत संघटना उभी करू शकतो.
संदीप तुकाराम पवार-९९३०१०४१०३,चिपळूण.
सरचिटणीस, रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियन  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *