माणसाची अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह चौथी गरज…भ्रमणध्वनी.!.

बातमी शेअर करा.

माणसाची अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह चौथी गरज…भ्रमणध्वनी.!.गेल्या काही दशकांपासून जगात झपाट्याने बदल घडून येत आहेत. सनातन काळापासून रुढ असलेल्या प्रथा,परंपरा,समाजव्यवस्था,कुटुंबपद्धती,दिनचर्या,मुलांचे संगोपन, नातेसंबंध हे कालातीत होऊ लागले आहेत.आता हेच पहा ना! पूर्वीपासून आपण ऐकत,वाचत आलो आहोत की, माणसाच्या अन्न,वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत.आणि ते खरं ही आहे. परंतु आधुनिक काळात त्यात भ्रमणध्वनीची (मोबाईल) भर पडल्याचे सर्वत्र दिसून येते. इतका तो लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत,अगदी स्त्रियांच्या देखील  सवयीचा झाला आहे.तो जवळपास नसेल तर,माणूस बेचैन होतो असे जर मी म्हंटले तर,ती अतिशयोक्ती होणार नाही.म्हणुनच मला असे वाटते की, ह्या आधुनिक काळात अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन मूलभूत गरजांमध्ये भ्रमणध्वनी ने चौथी जागा घेतली आहे.
     भ्रमणध्वनीच्या अति वापरामुळे सर्वांत जास्त नुकसान जर,कोणाचे होत आहे तर ते मुलांचे होते. त्याच्या अतिवापरामुळे पालक रागावले असता,मुलांनी टोकाची भूमिका घेतल्याच्या घटना वारंवार दिसून येतात.अशाच प्रकारची घटना एक दोन वर्षांपूर्वी नागपूर शहरात उमरेड परिसरातील हर्ष महेंद्र म्हैसकर या अकरावीच्या वर्गात शिकणार्‍या हुशार विद्यार्थ्याला, त्याने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवले म्हणुन,पालकांनी मोबाईल घेऊन दिला. त्याला काही दिवसातच मोबाईल वापराचे व्यसन लागले. तो दिवस रात्र गेम खेळू लागला. त्यामुळे त्याचे अभ्यासात दुर्लक्ष झाले. त्यामुळे वडील रागावले म्हणुन त्याने हे टोकाचे पाउल उचलले. अशा प्रकारे एका होतकरू विद्यार्थ्याचा अंत झाला. ही अत्यंत दुःखाची आणि विचार करायला लावणारी घटना आहे.ह्याच संदर्भात गतकाळात “युनेस्को या जागतिक संघटनेने मुलांना शाळेमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी घालावी ” अशी सूचना केली . त्याला जगभरातून पाठींबा व्यक्त करण्यात येऊन काही देशांमध्ये त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसते. परंतु ते प्रमाण अत्यंत अल्प  आहे. अद्यापही जगभरातील बहुतांश देशांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही.मग प्रश्न असा पडतो की, युनेस्को सारख्या जागतिक संघटनेला त्याची दखल का घ्यावीशी वाटली?


     गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागले असून त्यात मोबाईलने सगळ्यांचा ताबा घेतल्याचे दिसते.एरवी मोठ्या माणसांच्या हातात दिसणारा मोबाईल, करोना काळात शाळा बंद असल्यामुळे,  विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ऑन लाइन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे मुलांच्या हातात फोन आले. तेव्हा त्याचा शिक्षणासाठी उपयोग ही झाला. परंतु करोना आटोक्यात आल्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या. परंतु तोपर्यंत मुलांना त्याची गोडी लागल्यामुळे त्याचा सातत्याने वापर सुरूच राहिला. त्याचा अतिवापर पालकांच्या लक्षात आल्यामुळे  काही पालकांनी त्यांचे  फोन काढून घेतले. त्यामुळे मुलांनी घरात थयथयाट केला तर काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.  वरील नमूद केलेली घटना त्याचे बोलके उदाहरण आहे.
     माणसाने बुद्धीच्या जोरावर आयुष्यात उपयोगात येणारे अनेक शोध लावले आहेत. त्यातील एक आहे मोबाईल अथवा भ्रमणध्वनी. त्याने जग मुठीत सामावून घेतले आहे. त्यामुळे जगात कुठूनही, कुठेही संपर्कात राहण्याची सोय झाली असून व्हिडिओ कॉलमुळे प्रत्यक्ष संवाद करण्याची सोय झाली आहे. तसेच त्यात एखाद्या घटनेचे  प्रत्यक्ष चित्रण करता येते. हे यंत्र अत्यंत  लाभदायक असून, त्याचा किती आणि कसा योग्य वापर करायचा हे सर्वस्वी वापरकर्त्यावर अवलंबून आहे.त्यात खूप चांगल्या गोष्टी अंतर्भूत आहेत. एखादी माहिती हवी असेल तर गूगल वर शोध घेतला असता, ती ताबडतोबीने उपलब्ध होते. मनातील विचार प्रकट करायचे असतील तर, फेसबुकचा वापर करता येतो. त्यात बुद्धिला चालना देणारे विविध मनोरंजनात्मक खेळ आहेत. त्यात जुने चित्रपट,गाणी पाहण्या, ऐकण्याची सोय आहे. ह्याच्यामुळे ऐतिहासिक संदर्भ मिळविण्यासाठी, संदर्भित साहित्य चाळण्याची गरज उरली नाही. एका क्लिक वर ते उपलब्ध होते. या आणि इतर कितीतरी उपयोगी गोष्टींचा इथे उल्लेख करता येईल.

This image has an empty alt attribute; its file name is 1792489602352-3-683x1024.jpg


      आपण जर 40/50 वर्षांपूर्वीची परिस्थिती विचारात घेतली तर असे दिसून येते की, त्या काळात पोस्टाचे पत्र हे एकमेव संपर्काचे साधन होते. घरात दूरध्वनी असणे ही फक्त  श्रीमंतांची मक्तेदारी होती. एखादा नातेवाईक,मित्र,किंवा इतर कुणाशी, कोणत्याही कारणामुळे  संपर्क करण्याची गरज भासल्यास,प्रत्यक्ष भेटण्याला पर्याय नव्हता. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या काळात जर,एखाद्याच्या घरी पोस्टाची तार आली तर,त्यातील मजकूर वाचण्याअगोदरच घरात रडारड सुरू होई. कारण वाईट बातमीशिवाय कुणी,कुणाला तार करीत नव्हते. भारतात साधारण 80/90 च्या दशकात “वायरलेस दूरसंचार यंत्र” अर्थात पेजर विकसित होऊन, त्यामार्फत संदेश पाठविण्याची सोय झाली. त्याचं इतके कौतुक होते की, पेजर वापरणारा ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने दर्शनी भागावर लावत असे. नंतरच्या काळात मोबाईल विकसित होऊन त्याने पेजरची जागा घेतली. त्यात सुरुवातीच्या काळात फक्त संभाषण करण्याची सोय होती. तो खूप महाग असल्यामुळे  त्याचा वापर श्रीमंत लोक, उच्च सरकारी अधिकारी व मंत्री असे ठराविक लोक करीत. त्याचा आकार ही तळहात पेक्षा मोठा होता. त्याचे मिनिटाला सोळा रुपये शुल्क आकारले जात असे. ते फोन करणे किंवा फोन आलेला फोन घेणे या दोन्हीसाठी आकारले जात असे. नंतरच्या काळात त्यात अनेक सुधारणा झाल्या. तसेच त्याचा आकार दिवसेंदिवस छोटा व सुटसुटीत,आकर्षक होत गेला. त्यात अनेक सोयी उपलब्ध  झाल्या. त्यामुळे त्याचा वापर खुप वाढला. सध्याचा विचार केला तर, ह्या यंत्राने गरीबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वांचा ताबा घेतला आहे. त्याचे माणसाला इतके व्यसन लागले आहे की,लोक त्याचा वापर भान हरपुन करतांना दिसतात.त्या नादात लोक रस्त्याने चालतांना  हातवारे करीत  बोलताना दिसतात. तसेच रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे क्रॉस करतांना कितीतरी अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. कुणी गटारात पडतो तर कुठे मोबाईल चार्ज करतांना त्याचा स्फोट होऊन दुर्घटना घडते. कुणी रस्ता चुकतो तर कुणी चुकीच्या बसमध्ये चढतो. हल्ली अशा घटना नित्य घडताना दिसतात.


   आपण जर ह्याच्या वापराचा विचार केला तर असे दिसून येते की, विकसित देशांमध्ये दर शंभर व्यक्तींमध्ये सत्यान्नव व्यक्ति ह्याचा वापर करतांना दिसतात. भारतातील  शहरांमध्ये जवळपास तितकाच वापर होत असल्याचे चित्र  दिसते. कदाचित ग्रामीण भागात त्याचे प्रमाण कमी असेल.मी वर म्हणल्याप्रमाणे ह्याचा अति वापर मुलांकडून होत असल्यामुळे, त्यांचे खूप नुकसान होत आहे.परिस्थिती अशी आहे की,मुलं मित्रांशीच काय पण घरातल्यांशी  देखील जास्त बोलत नाहीत. त्यांचा बहुतांश वेळ मोबाईल मधील गेम खेळण्यात जातो. त्याचा अभ्यासावर परिणाम झालाच आहे परंतु त्या नादात मैदानी खेळ विसरून गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिक, शारीरिक वाढ खुंटली आहे.  स्थूलपणा खूप वाढल्याचे दिसते. त्यांच्यात लक्षणीय प्रमाणात दृष्टीदोष उद्भवल्यामुळे कमी वयात चष्मा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्याचाच परिणाम म्हणुन मुलांमध्ये चिडचिडेपणा, अभ्यासात दुर्लक्ष, एकलकोंडेपणा, अनावश्यक ज्ञान मिळणे  ह्यात खूप वाढ झाली आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की, पुढील काळात कान आणि डोळ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार  आहेत.
     ह्या छोट्याशा यंत्राने माणसाची अवस्था ” जिथे जाई, तिथे तु माझा सांगाती.”  अशी केली आहे. तो  दिवसभर जवळ बाळगला जातोच परंतु रात्री देखील उशिरापर्यंत तो झोपमोड करून सोबत करतो. एव्हढेच काय स्वच्छतागृहात देखील तो पिच्छा सोडत नाही. इतका त्याचा लळा लागला आहे.आजची पिढी उद्याच्या देशाचे भविष्य असून आधारस्तंभ आहे. तेच जर मानसिक, शारीरिक दृष्ट्या कमकुवत होणार असतिल तर ह्या देशाचे भविष्य काय असेल? ह्याचा विचार संबंधितांनी भविष्यवेधी दृष्टीकोनातून आताच करणे गरजेचे आहे. असे मला वाटते.
     ह्या माध्यामातून मोठ मोठ्या कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होतो. तसेच सरकारच्या तिजोरीत कर रूपाने भरपूर निधी जमा होतो. परंतु त्यासाठी लोकांचे आणि विशेषकरून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचे नुकसान करायचे का? हा प्रश्न आहे.तसे  पाहिले तर हा प्रश्न देशापुरता मर्यादित नसून ही जागतिक समस्या आहे. म्हणुनच युनेस्कोने अशा प्रकारची सूचना केली आहे. त्यामुळे मला असे वाटते की, एकूणच ह्या क्षेत्राने घेतलेली उंच भरारी लक्षात घेता,ह्याच्या वापरावर कुठे तरी मर्यादा घालणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने वयाच्या अठरा वर्षांच्या आतील मुलांसाठी वेगळ्या फोनची निर्मिती करून त्यातील ज्ञान व करमणुकीच्या गोष्टी तसेच वापरण्याचा कालावधी ह्यावर  मर्यादा आणणे आवश्यक आहे. सर्वांसाठी रात्रीचे प्रक्षेपण संपुर्णपणे बंद ठेवण्यात यावे. ह्यामध्ये असे ही करता येईल की, प्रत्त्येक मोबाईलच्या वापरासाठी दिवसभरातील किमान तासाची मर्यादा ठेवल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल.
अरुण निकम.9323249487.मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *