रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे : एक समर्पित सत्यशोधक.

बातमी शेअर करा.

रविवारी दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची १२८ वी पुण्यतिथी येत आहे. त्यानिमित्ताने त्यांना त्यांच्या १२८ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली! )

सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासातीलच नाही तर भारताच्या व्यापक पटलावरील एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे,ही गोष्ट आता अख्ख्या देशाने मान्य केली आहे.भारताच्या ट्रेड युनियन चळवळीची मुहुर्तमेढ रोवता रोवता त्यांनी कामगार चळवळ व सामाजिक सुधारणा चळवळ एकाच वेळी हातात हात घालून लढवता येतात याचे कम्युनिस्ट, समाजवादी व दलितचळवळीपुर्व एक उदाहरण भारताच्या सामाजिक व कामगार चळवळीच्या इतिहासात ; वासाहातिक कालखंडात घालुन असा एक नविन वस्तुपाठ घालून दिला आहे,की ज्याची उजळणी अजून वरीलपैकी एकाही चळवळीला करता आलेली नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे !

      भारतीय औद्योगीकरणाला नुकतीच कुठे सुरवात झाली होती,असा तो १८५०-५५ चा कालखंड होता.कापड उद्योग मुंबईत मोठ्या तेजीत येऊ लागला होता.ठिक – ठिकाणी कापड गिरण्या उभ्या राहत होत्या.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पोटापाण्यासाठी आलेले हजारो पारिव्राजक अतिशय तुटपुंज्या पगारात व अत्यंत निष्कृट दर्जाच्या कामाच्या जागेत रात्रंदिवस काम करीत होते व खुराड्यांसारख्या चाळींतून राहत होते.कामाचे तास ठरलेले नव्हते.गिरणी व्यवस्थापण मनमानेल त्याप्रमाणे पगार कापत असत.कामगारांना साप्ताहिक सुटी नव्हती.अशा विपरित परिस्थितीत कष्ट करणाऱ्या कामगारांना त्यांच्या रास्त मागण्या मान्य करुन द्याव्यात व मानवी हक्काच्या सोयी सुविधा प्राप्त करुन द्याव्यात तसेच कामगारांवर होणाऱ्या विविध अन्यायांना वाचा फोडावी व मिल मालकांना कामगार नियमाच्या कक्षेत आणावे यासाठी “बाँम्बे मिल हँण्डस् असोशिऐशन” नावाची भारतातील पहिली कामगार ट्रेड युनियन नारायण मेघाजी लोखंडेंनी स्थापण केली होती.या युनियन मार्फत लोखंडेंनी कामगारांचे विविध लढे लढवले व त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला.अगदी फॕक्ट्री अॕक्ट कायदा लागू व्हावा म्हणून गिरणी मालकांबरोबर तत्कालिन राष्ट्रिय सभेच्या नेत्यांशी सुध्दा त्यांना भांडावे लागले होते.

      त्या काळी कामगारांना त्यांची हक्काची आठवड्याची सुटी अर्थात साप्ताहिक सुटी मिळावी यासाठी त्यांनी जो ऐतिहासिक लढा दिला,त्याला कामगार चळवळीच्या इतिहासात तोड नाही.सतत दहा वर्ष लढा देऊन कामगारांना तिचा लाभ मिळवून दिला होता.पुढे ही सुटी इतर सर्वांना लागू झाली होती.आज आपण सर्वचजण जी रविवारची सुटी उपभोगतो,तीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे हे होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.त्याकाळी अस्पृश्यांप्रमाणे स्त्रियांनाही गिरणीतील विव्हिंग खात्यात काम करण्यास मनाई होती.कामगार कामगारांमध्येही अस्पृश्यता पाळली जात होती.यासाठी ही रावबहादूर नारायण मेघाजी  लोखंडेंनी कामगारांचे प्रबोधन करुन व मालकांशी संघर्ष करुन हा सामाजिक भेद मिटवुन विव्हिंग खात्यात अस्पृश्य व शुद्र स्त्रियांना काम करण्याची परवाणगी मिळवून दिली होती.नारायण मेघाजी लोखंडे हे आजच्या नेत्यांसारखे पोटार्थी नेते नव्हते तर ते कामगारांच्या हितासाठी गिरणीगेटच्या आतही व गेटच्या बाहेरही दक्ष राहत असत. याचे सर्वात मोठे व ऐतिहासिक उदाहरण म्हणजे १८९२ साली मुंबईत उद्भवलेल्ला दंगा हे होय.हा दंगा शमवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ऐकमेवाद्वितीय व महान असे आहे. 

        एकीकडे बाळ गंगाधर टिळकांसारखी मंडळी या दंग्याला प्रोत्साहन देत होती, तर ना.मे.लोखंडे व त्यांचे सहकारी हा दंगा शमवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होती.या दंग्यात होरपळलेल्या दोन्ही धर्माच्या सर्वसामान्य जनतेला धीर देण्यासाठी सर्व मोहल्ले,चाळी पिंजून फिरत होते.त्यांना कामावर जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते.दोन्ही समाजाच्या मनातील भिती काढून त्यांच्यात पुर्वीसारखाच बंधुभाव वृध्दींगत व्हावा यासाठी त्यांनी मुंबई प्रांताचे तत्कालिन कलैक्टर मि.व्हिसेंट यांच्यामदतीने व आपल्या सत्यशोधक सहकाऱ्यांच्या सहाय्याने राणीच्या बागेत एक ऐतिहासिक असा ऐकोपा मेळावा घडवून आणला होता.   

     असा हिंदू-मुस्लिम ऐकोपा मेळावा ज्याने जगाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे.तसेच मोहल्ला कमिटी स्थापण करण्याची कल्पनाही त्यांचीच होती.त्या मोहल्ला कमिट्यांने १८९२-९३ चा दंगा शांत करण्यात महत्वाची भुमिका निभावली होती. अशी ही मोहल्ला कमिटी पुढील प्रत्येक दंग्यांच्यावेळी रोड मोडल म्हणून वापरली गेली आहे. या मोहल्ला कमिट्यांचे श्रेयही रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेंच्या नावावर जमा होते.तर सांगायचा मुद्दा हा की दंगा होऊ न देणाऱ्या कारगर कल्पनेचे जनकही लोखंडे हेच आहेत.मोहल्ला कमिट्यांनी दंगा होत नाही किंवा त्यांची मुळं खोडून काढता येतात,या सुत्रांनुसार रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेयांनी त्या काळी काम करुन एक आदर्श नियमाचा वस्तुपाठ घालून दिला होता.आजही त्यांनी घालून दिलेल्या आदर्श व उपायांवर वेळोवेळी उद्भवले दंगे शांत करण्यात नंतरच्या प्रशासनास मदत झाली आहे.ऐवढी काळाच्यापुढे पहाण्याची दूरदृष्टी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेंकडे होती.

     बाळ गंगाधर टिळक व आगरकर हे हिंदुकट्टरपंथी व मुस्लिमांचे कट्टर विरोधक आहेत हे माहित असूनही,ते जेव्हा कोल्हापूच्या राजकिय खटल्यात अडकले होते,तेव्हा दहा हजारांचा जामिन महात्मा.फुलेंनी दिला होता.व या जामीनावर ते जेव्हा डोंगरीच्या तुरुंगातुन सुटून बाहेर आले तेव्हा एक आदर्श मानवधर्माच्या नात्याने त्यांचा जाहिर सत्कार भायखळ्याला रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडेंनी केला होता.कारण रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे हे माणसाचे विरोधक नव्हते.वाईट,कालबाह्य व समाजहिताच्या आड येणाऱ्या विचारांचे विरोधक होते.वैचारिक शत्रुतही आपलाच आत्मा पाहणारी बुध्दांची करुणा त्यांच्या ठायी होती का?.कामगारांसाठी फॕक्ट्री अॕक्ट चा जसा त्यांनी आग्रह धरला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवता सोडावता डेक्कन अॕग्रीक्लचर रिलिफ अॕक्ट चा ही त्यांनी पाठपुरावा केला होता.यासोबत महिलांचे केशवपना विरोधात जसे त्यांनी सावित्रीबाई फुले व न्हावी बांधवांबरोबार सत्याग्रह केला होता त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये (अबकारी खात्यात) शुद्रातिशुद्र जनतेला आरक्षण मिळावे यासाठी प्रशासनाविरोधात “दीनबंधु” तून आवाज उठवून चळवळही केल्या होत्या.

     रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे भाऊ भाऊराव लोखंडे यांचे पणतू श्री वसंत किसन लोखंडे यांनी दिलेल्या माहिती नुसार नारायण मेघाजी लोखंडे यांना जन्म ठाण्याच्या तलावपाळी समोरच्या एका पारशाच्या चाळीत १३ आॕगष्ट १८४८ रोजी झाला होता.त्यांना लहानपणापासून कष्टाची व सहकार्याची आवड होती.तसेच वडीलांच्या गावाकडून व इतर ठिकाणाहून आलेले कष्टकरी पोटाच्या खळगीसाठी व मुंबई ठाण्याच्या विकासासाठी कसे रक्ताचे पाणी करताहेत ते हे पहात होते व त्या वेदना ते मनात साठवत होते.पुढे या महान नेत्याने आपल्या आयुष्याची सुरवात जी.पी.ओ.त पोस्टाच्या नोकरीतून केली होती.परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही.ती नोकरी सोडून त्यांनी रेल्वेत लोकोमोटीव्ह विभागात नोकरी केली.तेथेही त्यांचे मन रमले नाही.ते सतत कामगारांच्या दुःख मुक्तीचा विचार करीत.त्यामुळे त्यांनी ही नोकरीही सोडून प्रत्यक्ष कामगारांमध्ये राहता वावरता यावे म्हणून गिरणीत स्टोअरकिपरची नोकरी पत्कारली होती.तेथे राहून,कामगारांचे दुःख व अमानवीय कष्ट पाहून त्यांचे मन तीळ तीळ तुटत असे.या कामगारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी व गिरणी मालकवर्गाच्या अनिर्बंध शोषणाविरुध्द संघटित आवाज उठवण्यासाठी त्यांनी गिरणी कामगारांची संघटना बांधली होती वा तेवढ्याच पोपतिडकीने त्यांचे प्रश्न सोडवले होते.कामगार कष्करी व शेतकऱ्यांच्या चळवळी चालवता चालवता त्यांनी सत्यशोधकांचे प्रथम मुखपत्र “दीनबंधु” सुरु करुन या क्षेत्रातही उल्लेखनीय कामगीरी केली होती.

रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.कामगार-शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांचे प्रबोधन करणे हे सुद्धा त्यांच्या कार्याचे एक महत्वाचे सुत्र होते.वर म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागातील हजारो हात मुंबईसाठी झटत होते.राबत होते.पहाटे तीन वाजेपासुन त्यांचा दिवस सूरु होत असे.व सायंकाळी सूर्य मावळल्यावर त्यांचे काम थांबत असे.या कष्टकऱ्यांचा श्रमाचा व घामाचा पैसा इतरत्र वाया जाऊ नये म्हणून या कामगार-कष्टकऱ्यांना नैतिक जीवनाचे धडे शिकवावे म्हणून रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेनी “निती शिक्षा वर्ग” ही सुरु केले होते. 

      मुंबईतील ही कष्टकरी जनता कुठे रहाते,काय खाते याचे सोयरसुतक मालकवर्गाला नव्हते.त्यांची दशा व व्यथा यांची जाणीव फक्त रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे होती.म्हणून रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे हे पोटच्या मुलासारखे या कामगार-शेतकरी-कष्टकऱ्यांना जपत असत.त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असत. त्यासाठी ते “निती शिक्षा -वर्गाच्या बरोबर ” सुशिक्षण गृह” ही चालवत असत त्यात स्वतःसह, कृष्णराव भालेकर,विठ्ठलराव वंडेकर,अय्यावारु,केळुस्कर गुरुजी, माधवराव रोकडे गुरुजी व महात्मा फुले मुंबईत आल्यावर त्यांची ही व्याख्याने येथे ते आयोजित करत असत.

      “थोडे दिन तरी मद्य व्यर्ज करा ! 

        तो च पैसा वाचवा मुलांच्या शिक्षणासाठी !!

 असे महात्मा फुलेंचे अखंड याच सुशिक्षण वर्ग व निती शिक्षा वर्गातुन मांडून त्यावर उपदेशपर,प्रबोधनपर व्याख्यान दिले जात असत !

     नारायण मेघाजी लोखंडे जे “दीनबंधु” नावाचे वृत्तपत्र मुंबईतून ९ मे १८८० पासून चालवत होते,त्याच्या मुखापृष्टावर लोखंडेंनी पुढिल आशयाचे घोषवाक्य मोठ्या जाड अक्षरात छापले होते–‘ journal devoted to the interest of working class’. व त्यानंतर संपादकीय पानावर पुढिल श्लोक छापला जात असे —

  “अज्ञानाने महिमाजी दीन आवघे सर्वांपरि गांजले !

   विद्याधर्म तया न सेव्य म्हणुनि स्वार्थी बाहू माजले !!

    धुर्तहि मनी मत्सरास धरुनी केली अशी दुर्दशा !!

     जागोमी बहुमान योग्य करुनी विद्येप्रति व्हा वंशा !!

   अशाप्रकारे कामगार कष्टकऱ्यांचे हित व बहुजन समाजासाठीचा शिक्षणाचा वसा नारायणा मेघाजी लोखंडेंनी प्रत्यक्ष तर उचलला होताच,त्याशिवाय दीनबंधु च्या माध्यमातूनही कसा लावून धरला होता,हे आपणास त्यांच्या वृत्तपत्राच्या मुखपृष्टावरुन व संपादकिय पानावरच्या मुद्रेवरुन लक्षात यायला वेळ लागत नाही.

     जोतिराव फुले ज्या उपाधीने जगप्रसिध्द झाले ती महात्मा ही उपाधीसुध्दा नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्या मुंबईच्या सत्यशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात दिली होती.त्यामुळे आज जोतिराव फुलेंना जे आपण “महात्मा “म्हणून ओळखतो ते केवळ ना,मे.लोखंडेंमुळे !! किती मोठी गुणग्राहता त्यांच्यामध्ये होती हे एकाच उदाहरणावरुन आपणास कळून येते.

     वृत्तपत्र व्यवसायाशी लोखंडे हे अल्पावधीतच कामगारांच्या प्रश्नांइतकेच एकरुप झाले होते.त्या वासाहातिक कालखंडात भारतातील वेगावेगळ्या सामाजिक, व्यावसायिक व राजकिय गट आपापले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी वृत्तपत्र माध्यमांचा वापर करीत असत.तेव्हा वृत्तपत्रांच्या विरोधात जेव्हा गव्हर्नर जनरल लाॕर्ड लिंटन याने दडपशाहीचे धोरण अंमलात आणले होते तेव्हा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधु तुन वृत्तपत्र स्वायतत्तेसाठी जोरदार आवाज उठवला होता.

 आपल्या व्यापार व औद्योगीकरणाला पुरक असा नोकरवर्ग तयार करणे आणि आपल्या वखारी व कंपनीच्या नोकरांच्या सेवा रक्षणासाठी सर्वसामान्य शेतकरी व कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सोयी सुविधा पुरवाणे यासाठी ब्रिटिश सरकार व इस्ट इंडिया कंपनी दक्ष होती व महात्मा फुले,रावजी पाटिल व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे सारख्या नेत्यांच्या वचकाला घाबरुन होती.परंतु त्यांच्यातला लाॕर्ड लिंटन सारख्या काही उतावीळ घमंडी प्रकाशक जेव्हा स्वतःला राणीचे शासक समजुन हिंदी जनतेवर जुलूम करीत असत तेव्हा जनतेतील असंतोषाची दखल घेऊन,त्या जुलमी नोकरशाला बदलून,जनतेचा असंतोष अधिक भडकू नये यासाठी एक चांगला मानवी चेहरा असलेला प्रशासक त्याजागी राणी सरकार बसवत असत.यावेळी ही राणी सरकारने लाॕर्ड लिंटन यांना बदलून लार्ड रिपन यांची हिंदुस्थानचे गव्हर्नल जनरलपदी नेमणूक केली होती.लाॕर्ड रिपन साहेबांनी कंपनी सरकारची सुत्रे हाती घेताच दोन महत्वाच्या गोष्टी केल्या होत्या.१ -वृत्तपत्रस्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा रद्द केला व,२- स्थानिक स्वराजस्ंस्थांमध्ये स्थानिक जनतेला प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा कायदा केला होता.

लाॕर्ड रिपन साहेबांचे मन ऐलफिस्टन साहेबांसारखे दयाळू व मानवतावादी होते.त्यांमुळे त्यांची न ना.मे.लोखंडेंची मैत्री व्हायला वेळ लागला नाही.तेव्हा लाॕर्ड रिपनसाहेबांच्या जनहिताच्या दृष्टीने चांगल्या निर्णयांना पाठिंबा देऊन त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना अधिक रस निर्माण व्हावा,यश यावे तसेच त्यांचा उत्साह वाढावा या हेतुने रिपन साहेबांनी प्रशासनाची सुत्रे हाती घेताच काही दिवसात भायखळा येथे नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८१ साली मोठा सत्कार करुन त्यांचा ऊत्साह वाढवला होता.या सत्कारामुळे लार्ड रिपन खुप भाराऊन जाऊन त्यांची नारायण मेघाजी लोखंडेंशी चांगली मैत्री जमून आली होती.त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी जनतेच्या,कामगार कष्टखऱ्यांच्या,शेतकऱ्यांचा हिताचे निर्णाय घेऊन आपली कारकिर्द संस्मरणिय केली होती.त्यांचा कार्यकाळ १८८४ साली संपला होता.तेव्हा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईकर कष्टकरी व त्यांचे मित्र एल्लाप्पा बाळाराम यांच्या हिंदी शेतकरी सभा ” या संघटनेच्या वतीने त्यांचा निरोपाचा जाहिर कार्यक्रम  आयोजित केला होता.

माझे जिज्ञासू आणि अभ्यासू मित्र श्री.सुधीर जाधव यांनी मला पुरवलेल्या एका महत्वपुर्ण माहिती नुसार या निरोप समारंभात मुंबईतील तत्कालिन सर्व नेते मंडळी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.नाना शंकरशेठ,फक्रुद्दीन तय्यबजी,सावळाराम मेहेर , एल्लाप्पा बाराराम,डॉ.संतुजी लाड,रावजी राणू आरु,आदी..यासर्व मंडळीसह मुंबईकर कष्टकरी जनतेच्या वतीने रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेंनी हा रिपनसाहेबांना निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.या कार्यक्रमात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्याकाळी ७५ हजारांची थैली देऊन त्यांचा भव्य सत्कार केला होता.हा भव्य सत्कार व ही भली मोठी थैली जी मुंबईकर प्रतिष्ठित नागरीक,नेते व जनतेच्यावतीने त्यांना देण्यात आली होती,त्याने रिपनसाहेब भावनावश झाले व म्हणाले तुम्ही पोटचा पैसा वाचवून मला ही भली मोठी थैली दिली आहे, याची मला जाणीव असून माझ्याप्रती तुमच्या मनात किती आस्था आहे व होती ही गोष्ट मला,मोठे त्यागी व सन्माननिय सत्यशोधक नेते नारायण मेघाजी लोखंडे नेहमी मला सांगत असत,ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे,हे आजच्या माझ्या निरोप समारंभावरून मला लक्षात आले आहे. लोखंडे सर मला नेहमी अजून एक खंत बोलून दाखवत ती ही की, आमच्या कष्टकऱ्यांतून कुशल कारागीर तयार झाले पाहिजेत,जेणे करुन येणाऱ्या औद्योगीकरणाच्या रेट्यात ते मागे पडणार नाही व त्यांचे जीवन मान सुधारण्यातही मदत होईल. म्हणून मी येथे जाहिर करतो की या ७५ हजार रुपयांमध्ये मी माझ्या पाकिटातले पाच हजार रुपये टाकून एकुण ८० हजार रुपये मी मा आयोजकांच्या हवाली करातो व या रकमेतून त्यांनी या कामगार-कष्टकरी जनतेच्या मुलांना कुशल कामगार,तंत्रज्ञ बनवणारी भली मोठी टेक्निकल इंन्स्टिट्युट स्थापण करावी .! जेणे करुन या पैसाचा सदुपयोग होईल.या निरोप समारंभानंतर लगेच झालेल्या आयोजकांच्या बैठकीत एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला व तेथल्या तेथे “लाॕर्ड रिपन मेमोरियल ट्रस्ट” ची स्थापना करण्यात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेंनी पुढाकार घेतला व तसा ट्रस्ट स्थापन केला.

1. १८८७ हे वर्ष व्हिक्टोरिया राणीचे ज्युबिली वर्ष होते.या ट्रस्टद्वारे व त्या पैसातून भायखळ्याला जेथे आज रेल्वे हास्पिटल आहे,तेथे एक टेक्निकल शिक्षण देणारी संस्था राणीच्या स्मरणार्थ “व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इंन्स्टिट्युट” या नावाने स्थापण करण्यात आली.१८८७ ते १९२३ पर्यंत ही इंस्न्टिट्युट तेथे व्यवस्थित सुरु होती.१८९२ च्या दंग्याच्यावेळी दंगाप्रभावित जनतेला तेथे आश्रय देण्यात आला.

2. पुढे विद्यार्थी संख्या वाढु लागली. वर्ग व जागा कमी पडू लागली म्हणून मांटुंग्याला एका पारशाकडून १६ एकर जागा विकत घेऊन तेथे ही इंस्न्टिट्युट १९२३साली शिफ्ट करण्यात आली. ती जागा भौगोलिकदृष्ट्र्या वडाळा रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे.व तिचा खरा पत्ता माटुंगा पुर्व,मुंबई -१९.असा आहे.उपरोक्त जागा एका पारशाकडून, अर्थात महंमद अली जीना यांच्या पारशी सासऱ्याकडून ट्रस्टने ती जागा विकत घेतली होती.रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रिपनसाहेबांचा मैत्रीचा हा एक अनोखा भेट ‘नजराना’ म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राला उपलब्ध झाला आहे. 

भायखळा च्या त्या रिकाम्या झालेल्या जागेत त्याचवर्षी म्हणजे १९२३ साली सेंन्ट्रल रेल्वेचे हाॕस्पिटल सुरु आले आहे.नंतर त्या हाॕस्पिटलचे नाव “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हाॕस्पिटल” असे नामकरण करुन त्यालाही अजरामर करण्यात आले आहे.

१८८७ साली स्थापण झालेल्या लोखंडे-रिपन मैत्रीचा अजरामर नजराना ठरलेल्या “व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इंन्स्टिट्युट” या संस्थेचे पुढे नाव बदलून त्याचे नाव “वीर जिजाबाई टेक्नाॕलाॕजिकल इंन्स्टिट्युट” असे देशी नामकरण करण्याचे श्रेय माझे बहुआयामी व हरहुन्नरी अभ्यासू मित्र श्री सुधीर जाधव यांच्याकडे जाते.त्याकरीता त्यांनी १९८७ ते १९९७ अशी सतत दहा वर्षे एकट्याने पाठपुरावा करुन हे नामकरण घडवून आणले आहे.त्याबाबतचा सविस्तर वृतांत त्यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात एका पुस्तिकेच्या रुपाने प्रसिध्द करुन एक ऐतिहासिक दस्ताऐवज तयार केला आहे.अशाप्रकारचे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडेच्या कार्यांची गाथा लिहावी व गावी तेवढी थोडी आहे.आपल्यातला एक सामान्य माणूस सत्यशोधक विचारसरणीच्या बळावर किती मोठी मजल मारु शकतो याचे नारायण मेघाजी लोखंडे हे उत्तम ऊदाहरण आहे.

  मी त्यांचे विस्तृत असे ३५० पानी चरित्र लिहून “सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र” या नावाने मावळाई प्रकाशनामार्फत २०१६ साली प्रसिध्द केले आहे.जिज्ञासूंनी ते मुळात वाचण्यासारखे आहे.आज नारायण मेघाजी लोखंडेंच्या १२८व्या स्मृतीदिनानिमित्ताने हि शब्दसुमनांची श्रध्दांजली वाहतांना मन खुप भरुन आले आहे. 

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीच्या इतिहासात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे जीवन-कार्य हे एक सोनेरी पान आहे. त्यांना जाणून घेतल्याशिवाय महात्मा फुलेंची चळवळ व मुंबईची जडण-घडण आपल्याला उमगणार नाही.इतका या चळवळीचा,मुंबईचा व नारायण मेघाजी लोखंडे यांचा हाडा-मांसाचा संबंध आहे.

शेवटी नारायण मेघाजी लोखंडेंना त्यांंच्या १२३ व्या स्मृतिप्रित्यर्थ विनम्र अभिवादन करुन हा लांबलेला लेख प्रपंच संपवतो.जय ज्योती-जय क्रांती !!

राजाराम सूर्यवंशी. 9503867602,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *