त्यागमूर्ती स्फूर्तीज्योती रमाई भीमराव आंबेडकर!!
त्यागाची ती मूर्ती
नवकोटीची माता
स्फूर्तिदायीनी बाबासाहेबांची होती ती प्रेरणा
दुधावरची साय होती
दीनदुबळ्या लोकांची माय होती
बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातील पडद्याआडची व्यक्तिरेखा
रमाईच्या आयुष्याकडे पाहिले तर त्याग शब्दाचा कळतो अर्थ
वस्तीगृहातील मुलं उपाशी राहू नयेत म्हणून माय मावलीने काढून दिल्या हातातील सोन्याच्या बांगड्या
आपल्याच हाताने भरवला मुलांना घास
तेव्हा खऱ्या अर्थाने रमाबाई रमाई झाल्या!!
रमाबाई भिमराव आंबेडकर..माता रमाई यांची आज जयंती..जयंती निमित्त माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम!!
रमा भिकू धुत्रे वलंगकर जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली दापोली तालुक्यातील वनंदगावी झाला. आईचे नाव रुक्मिणी. आई-वडिलांकडून कष्टाचे स्वाभिमानाचे धडे लहानपणीच रमाने घेतले.कष्ट सोसत एक दिवशी रमाच्या आईचे निधन झाले. रमाचे वडील म्हणजे भिकू धुत्रे दापोली बंदरात मासोळीच्या टोपल्या वाहण्याचे काम करत. आईचे निधन झाल्यावर चिमुकल्या रमावर घराची भावंडाची सर्व जबाबदारी पडली. एके दिवशी रमाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. रमावर दुःखाचा डोंगर कोसळला. वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा रमा व तिच्या भावंडांना घेऊन मुंबईला आले. आपली व आपल्या भावंडाची सर्व जबाबदारी काकांवर पडू नये म्हणून रमाईची नेहमी धडपड सुरू असायची. घरातील सर्व काम रमाई जबाबदारीने करत. आई-वडिलांच्या जाण्याचे दुःख मनात घेऊन त्या जगत होत्या.
सुभेदार रामजी आंबेडकर आपला मुलगा भीमराव यांच्या साठी स्थळ पाहत होते. तेव्हा त्यांनी सून म्हणून रमाईची निवड केली. सण 1906 मध्ये रमाईचा भीमरावांशी विवाह झाला. एका युगप्रवर्तकाच्या त्या पत्नी झाल्या. आता रमाई..रमाई भिमराव आंबेडकर झाल्या.
गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी समता निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा होता. बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय होते.रंजल्या-गांजल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब शिक्षण घेत होते.त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये याची दक्षता रमाई पदोपदी घेत.1913ते 1916 या तीन वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले. जुलै 1916ते 1917 या कालावधीत बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेले तेव्हा संपूर्ण संसाराचा गाडा रमाईने सांभाळला.
सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या मृत्युनंतर मात्र रमाई खूप खचल्या होत्या. एक भक्कम आधार त्यांच्या जीवनातून निघून गेला होता. तेव्हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. तेव्हा रमाई खचल्या नाही परत नव्या उमेदीने उभ्या राहिल्या. शेण थापून गोवऱ्या वेचून त्या सर्व कुटुंबाचा आधार बनल्या. बॅरिस्टरची पत्नी शेण गवऱ्या गोळा करते म्हणून कोणी नाव ठेवू नये यासाठी त्या पहाटेच उठून शेण गवऱ्या गोळा करत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत.एवढे कष्ट या महापुरुषाच्या पत्नीच्या वाट्याला आले होते. म्हणूनच म्हणावसं वाटतं की रमाईच्या त्यागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान साकारले. स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हणत रामू तुला माहेरीही दुःख सासरीही दुःखच वाट्याला आले.
एकामागोमाग एक दुःखद घटना रमाईच्या जीवनात घडत होत्या. बाबासाहेबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचेही निधन झाले. लाडका मुलगा रमेश, मुलगी इंदू तिचाही मृत्यू झाला. मृत्यूचा हा भयानक प्रवास बघून रमाई जगत होत्या का रोज मरत होत्या हेच त्यांना कळत नसावे.लहानपणी आई-वडील पोरके करून गेले विवाहानंतर सासू-सासरे त्याचबरोबर त्यांचा मुलगा रमेश आणि नंतर मुलगी इंदू हिचा मृत्यू त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. किती दुःख सोसत जगत होत्या रमाई! या देशात समता निर्माण व्हावी. सर्वांना स्वाभिमानाचे जीवन मिळावे. यासाठी बाबासाहेबांच्या कार्यात रमाईचा वाटा किती मोलाचा होता याची आपल्याला जाणीव होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून परतले तेव्हा सर्व जण त्यांना भेटण्यासाठी आतुर होत. असेच एकदा जेव्हा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून परतले त्यांच्या स्वागतासाठी लोक तिथे हजर होते. बाबासाहेब आंबेडकर येताच सर्व लोकांनी त्यांना गराडा घातला. तेव्हा तेथे उपस्थित सहस्त्रबुद्धे यांच्या लक्षात आलं की रमाई सर्वात मागे उभ्या होत्या. त्यांनी रमाईंना विचारले तेव्हा रमाई म्हणाल्या की,मानव उद्धाराचे कार्य करणारे बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांचा समाज आतुरला. मला ते कधीही भेटतील कारण मी त्यांची पत्नीच आहे. हाही रंजल्या-गांजल्या लोकांसाठी रमाईचा त्यागच होता.
एकदा रमाई धारवाडला गेल्या होत्या.
धारवाडला वराळे काका वस्तीगृह चालवत. लहान मुलं मैदानावर खेळायला येत. एक दोन दिवसा पासून मुलं मैदानावर खेळायला आलेली दिसली नाही म्हणून रमाईने विचारणा केली असता त्यांना कळाले की, वस्तीगृहातील किराणा सामान संपले होते. मुलं उपाशी होती म्हणून रमाईनी लगेच आपल्या हातातील बांगड्या काढून वराळे काकांना दिल्या व त्यांना सांगितलं की मुलांसाठी जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊन या. मुलांना उपाशी ठेवू नका. वस्तीगृहातील किराणा सामान खरेदी करण्यासाठी आपल्या सोन्याच्या बांगड्या काढून देणाऱ्या रमाई.. त्यागाची मूर्ती होत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत असलेले मानव उद्धाराचे कार्य प्रचंड जोखमीचे होते. बाबासाहेबांची रमाईला नेहमी काळजी लागून राहत असे. एकदा त्या आजारी पडल्या. आणि त्यांचा आजार बळावला. त्यांनी खानपिणं सोडून दिलं.27मे 1935रोजी सकाळी नऊ वाजता रमाई चे निधन झाले.दादरच्या राजगृहा समोर लाखो लोक जमले होते. सर्व परिसर आकांतात बुडाला. नव कोटीची माता रमाई सर्वांना सोडून पोरक करून गेली. बाबासाहेब आंबेडकरांवर खूप मोठा आघात झाला. बाबासाहेब आंबेडकर रमाई च्या जाण्याने ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्ष संसारात भक्कम सोबत देणाऱ्या रमाई कायमच्या दूर निघून गेल्या.
वयाच्या 35व्या वर्षी रमाईचे निधन झाले.
आयुष्यभर कष्ट सोसत दुःख उरात घेऊन जगणाऱ्या रमाई..बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा स्फूर्तीदायीनी होत्या.
मानव मुक्ती, मानवाचा उद्धार,मानवाचे कल्याण प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान,प्रत्येक व्यक्तीचा सन्मान,स्वातंत्र्य, समता,न्याय, बंधुता निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. आणि त्यांच्या कार्यात पडद्याआडची भूमिका निभावणाऱ्या रमाई आंबेडकर खरंच त्यागमूर्ती होत्या.. त्यागमूर्ती होत्या! म्हणूनच म्हणावसं वाटतं की,
त्यागाची ती मूर्ती होती
नवकोटीची माता होती
बाबासाहेबांची प्रेरणा होती
दीनदुबळ्यांची माता होती
माता रमाई आंबेडकर!!
मनिषा अनंता अंतरकर (जाधव )
Saiantarkar@gmail.com
7822828708
