दैनिक सम्राटचे लोकप्रिय संपादक दिवंगत बबन कांबळे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्य
कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्रांची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमान पत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा लाख मोलाचा संदेश दैनिक सम्राटचे लोकप्रिय संपादक दिवंगत बबन कांबळे यांनी पकडला आणि समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविले.जे आंबेडकरी चळवळीतील उच्चशिक्षित पदवीधरांना राजकीय नेत्यांना जमले नाही.ते कोणत्या ही विद्यापीठाची पदवी नसणाऱ्या झुंझार अनुभवी पत्रकाराने करून दाखविले.दैनिक वृत्तरत्न सम्राट वृत्तपत्रांच्या माध्यमातून फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचे दैनिक घराघरात केवळ पोचविले नाही,तर लढणारा,बोलणारा आणि लिहणारा कार्यकर्ता पत्रकार घडविला.ज्यांची दखल राजकीय जात दांडगे,धन दांडगे आणि पोलीस यंत्रणा घेत नव्हती. त्यांना दैनिक सम्राटने मोठे बळ दिले.जे क्रांतिकारी विचारांशी प्रामाणिक राहून आचरण करीत होते ते मोठे झाले.जे तोडपाणी करून पोट भरत होते.ते चारीबाजूने चीत झाले.त्यांचे अस्तित्व समाजात चळवळीत नगण्य झाले. दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक,मालक,मुद्रक,प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे.दिवंगत बबन कांबळे यांनी यापूर्वी दैनिक नवाकाळ मध्ये वृत्त संपादक या पदावर काम पाहिले होते.अनेक समस्यानी ग्रस्त असलेल्या समाजातील असंतोष बाहेर काढण्याचे कला कौशल्य बबन कांबळे यांच्या पत्रकारितेमध्ये होते. दोन बलाढ्य राजकीय पक्षनेत्याच्या कार्यकर्त्यातील असंतोष समाजात जनजागृती करून सुरुंग लावण्याचे शब्द सामर्थ नवाकाळ मधून शिकून घेतले होते.त्यांच्या अनुभवामुळेच त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट 2003 साली काढून राज्यातील आंबेडकरी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून राजकीय जात दांडग्यांच्या व धन दांडग्यांच्या पोलीस यंत्रणेवर असलेल्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम दैनिक सम्राटने केले.त्यातूनच असंघटित कामगार कार्यकर्ता व पत्रकार म्हणून पुढे उभा राहिला. दैनिक सम्राटच्या पहिल्या पानांवरील आठ कॉलमची हेड लाईन वाचकांचे लक्षवेधीन घेत होती.त्याचं बरोबर संपादकीय व संपादकीय पानांवरील विचारपीठ वाचकांची वैचारिक भूक भागवत होती,त्यामुळेच वाचक अंक मिळवण्यासाठी अनेक स्टोलवर पायपीट करीत असत.अनेक वाचकांच्या मागणी मुळे स्टोलवाले अंक प्रती वाढवून मागवत होते.प्रमुख वितरक व प्रतिनिधी यांना अनेक वाचकांचे कॉल येत होते व कार्यालयात पत्र जात होती.कुठून किती मागणी आहे,त्या विभागातील कार्यकर्ते पत्रकार प्रतिनिधी कोण आहेत.यांची नोंद घेतली जात होती,त्याविभागातील बातमीला विशेष प्राधान्य दिले जात होते,त्यात ग्रामीण भागातील अन्याय अत्याचार आणि अपघातानां दैनिक सम्राट या वृत्तपत्रात ठळकपणे प्रसिद्धी दिली जात होती.नंतरच्या काळात अनेक वैचारिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय लढ्यांना दैनिक वृत्तरत्न सम्राटने मोठी प्रसिद्धी दिली त्यामुळेच खेड्यापाड्यातील समाज बांधव आंदोलनासाठी एकत्र येऊन संघ शक्ती दाखवत होते. त्यामुळेच समाजाच्या मालकीचा पेपर ही भावना समाजात मोठ्या प्रमाणात बिंबविल्या जात होती.लोक सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढे येत होते. “ज्या चळवळीला स्वतःचे वृत्तपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्षासारखी असते” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक विचारामुळे समाज नव्हे तर हजारो कार्यकर्ते व संपादक बबन कांबळे यांनी सुरू केलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट कडे अगदी सहजपणे आकर्षित झाले होते. सम्राट हे एक वृत्तपत्र न राहता एक चळवळ होऊन गेली होती.
आंबेडकरी चळवळीमध्ये जिल्हा पातळीवर अनेक वृतपत्रे साप्ताहिक,पाक्षिक, मासिक झाली.परंतु राज्य भरात प्रकाशित होऊन प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक वृत्तरत्न सम्राट हे होते.आंबेडकरी चळवळीमध्ये विसाव्या शतकातील पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान बबन कांबळे यांना जातो.सम्राटमुळे समाजात वैचारिक जनजागृती झाली.प्रस्थापित व्यवस्थेवरील राजकीय जात दांडगे,धन दांडगे आणि पोलिस प्रशासनावर एक दबाव निर्माण करण्यात दैनिक सम्राट यशस्वी झाला. त्याचे श्रेय समाजातील असंख्य असंघटीत कार्यकर्ते आणि पत्रकारांना जाते.विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना घडविण्याचे काम अर्थातच संपादक म्हणून बबन कांबळे यांना जाते.माझा प्रवास दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या माध्यमातून पत्र लेखक, पत्रकार स्तंभ लेखक म्हणून सोबत राहीला.नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणारी सत्यशोधक कामगार संघटना दैनिक सम्राटमुळे खेड्या पाड्यात पोचली असंघटित कामगार संघटित झाले. त्यातील अनेक कार्यकर्ते,पत्रकार झाले. नंतरच्या विश्व सम्राटच्या पहिल्या दिवसापासून नवीन प्रवास सुरु झाला.समाजाचा पेपर रातोरात व्यक्तीचा झाला.आणि अनेक आर्थिक घडामोडी घडल्या त्यामुळे अनेक कार्यकर्ते पत्रकार आणि समाज सम्राट पासून दूर झाला.त्या विषयी लिहिण्याची ही वेळ नाही व जागाही नाही.आंबेडकरी वृत्तपत्र चळवळीमध्ये दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक म्हणून बबन कांबळे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहल्या गेले यात काही शंका नाही.दिवंगत बबन कांबळे यांचे असे निघून जाणे मनाला एक हूरहूर लावणारी दुःखद घटना असली तरी ते शारीरिक मानसिक सामाजिक दुखातून दुख मुक्त झाले.म्हणून त्यांच्या कुशल कार्याची नोंद घेऊन त्यांनादिवंगत बबन कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.