
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारुन जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती.ती घेतांना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या.त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आण्यात समाज खुप कमी पडतो.म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकार यांची १३४ वी जयंती असो या बुद्धाची (ई स.पूर्व ५६३ वी/ २५६९ वी ) जयंती असो,आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झालाच नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो. कारण प्रत्येक धर्माचे सण त्या त्या धर्माच्या माणसांना नवसंजीवनी देतात.उत्स्पुर्तपणे ते सणाचा आनंद घेतात. दरवर्षी त्याचा उत्साह वाढत जातो. तिथे विचारांशी काही घेणे देणे नसते.वडिलोपार्जित परंपरा आणि धर्माचा समाजाचा रीतीरिवाज पाळला जातो.त्यात विचार आणि त्यानुसार आचरण बिलकुल नसते.त्याप्रमाणेचं महापुरुषांची जयंती,भिम जयंती, बुद्ध जयंती होत चालली की काय असा प्रश्न उभा राहतो.ग्रामीण भागातील खेड्या पड्यात,आणि शहरी भागातील झोपडपट्टीत राहणार असंघटित कष्टकरी मजूर,शेतमजूर ज्या तळमळीने जिद्धीने एकत्र येऊन जयंती साजरी करतो. त्यामानाने आरक्षणाचा लाभार्थी कर्मचारी अधिकारी त्यांचे कुटुंब घरात इमारती, बंगला, प्लॉट मध्ये कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करतांना दिसत नाही. मात्र तो या असंघटित कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूरांचे नेतृत्व करणाऱ्या असंघटित कंत्राटी कामगार असलेल्या कार्यकर्त्या वर टिकात्मक बोलण्याचे तोंड सुख हमखास घेत असतो.त्याला जयंती मधील समाजाची एकजूट,जोश,जिद्ध,तळमळ आणि त्यासाठी पोलिस प्रशासनाशी केलेल्या संघर्ष दिसत नाही.हे अधिकारी त्यांचे कुटुंब देवधर्माच्या कार्यात हिरीरीने भाग घेतांना दिसतात त्यांना कधी बुद्ध विहारात जावे असे वाटत नाही. त्यांच्या आचारणाचा प्रभाव सध्या असंघटित कष्टकरी कामगारांवर होतांना दिसत आहे.
बुद्ध विहारे कशा साठी बांधली जातात?.मंदिरात पूजा अर्चा कर्मकांड केली जातात. पण बुद्ध विहार हे विचारांचे प्रबोधन करणारे केंद्र असतात.त्यातूनच समाजात वैचारिक परिवर्तन होत असते.म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.तिथे हे अधिकारी वर्गातील लोक फिरकत नाही. वेळ बुद्धी खर्च करत नाही. पण टीका टिपणी करण्यात व दोष शोधण्यात पुढे असतात.त्यांचे समाजाच्या कोणत्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा यात योगदान असते?. ज्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना शिक्षणात,नोकरीत आरक्षण मिळते त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. ते त्यांना या असंघटित कष्टकरी लोकांनी जनआंदोलनात भाग घेतला म्हणून मिळाले आहे हे ते विसरतात.तो कुठे संघटित असतो?. तो कोणत्या विचारधारेच्या ट्रेड युनियन,संघटनेचा सभासद असतो. ते त्याला जरूर विचारा म्हणजे त्याचा खरा चेहरा व मुखवटा उघड होईल.
भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.तोच खरा धम्मोधर असतो.धम्म उपासक उपासिका बनण्या करीता स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.त्यामुले आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही.बुद्ध पोर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्वपूर्ण सण,उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नांवाने ओळखला जातो.त्यांची बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असातात.वर्षभर ते उपासक, उपासिकांनी आणि भिक्खू संघाने गजबजलेली असतात.तिथे लक्षवेधी उपक्रम राबविले जातात.आपले काय ?. हा प्रश्न आम्हाला पडत नाही. म्हणून आम्ही किती पटीने मागे आहोत याचा विचार योग्य वेळी झाला पाहिजे. म्हणूनच माझ्या हा लेखप्रपंच दरवर्षी असतो.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला.याच दिवशी सात वर्ष कठोर तपचार्या करून गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते.आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उतर प्रदेश येथे महापरीनिर्वान झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते,अंत दिप भव,स्वयं, प्रकाशीत व्हा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “शासन करती जमात व्हा!.” या दोन महान संदेशाचा अर्थच आम्ही समजुन घेतला नाही.कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यत आठवत नाही.जो पर्यंत अन्याय,अत्याचार होत नाही.शोषण होत नाही.

धर्मांतरीत आंबेडकारी समाज,संघ,संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही.म्हणुन इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.पण हे समाजाला कोण सांगेल?. आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्व प्राप्त होते.युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेऊन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील.तुम्हाला समता,स्वत्रंत,बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेउन सातत्य ठेवावे लागेल.केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर एकत्र जयंती साजरी करण्याचा अर्थ काय?.यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत.
माणसाच्या संघाने संघटने पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नये,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल?. बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.त्यात सर्वोचस्थानी आपन पोचु शकतो. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे.संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.म्हणुनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद असायला पाहिजे होती.पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात.त्यामुळेच खऱ्या अर्थाने वैचारिक चर्चा होते,पण परिवर्तन होत नाही.व्यक्तिगत आर्थिक परिवर्तन होतांना दिसते पण सामाजिकदृष्ट्या ते दिसत नाही.
श्रीलंका,थायलंड,बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे ही शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात.तिथे शील,समाधी आणि शिस्तबद्धता आचरणात सर्व व्यवहार आणली जातात.एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवु शकत नाही.जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धानी मानव कल्याणासाठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जाती साठी खुप उपयोगी आहे.व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल.जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो.समाज एकत्र आला तर संघ,संघटना आणि पक्ष तयार होतो.मग तो मानव कल्याणा करीता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.
आज देशात भिख्खु संघ संघटित नाही.त्यामुले देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही.डॉ बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपन कुठे तरी कमी पडतो.म्हणुन तमाम आंबेडकरी चळवळी बौद्ध बांधवास १३४ भिम जयंती व बुद्ध जयंती निमित्याने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जा आणि संघ शक्ति बनवा. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आणा. त्यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद असायला पाहिजेत. हिच सर्वाना नम्र विनंती, आणि सर्वांना हार्दिक मंगल कामना!!!.सबका मंगल हो !!!.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
(विपश्यना साधक 8 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2025)
