बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०५ वर्षाचा झाला.

बातमी शेअर करा.

कालचे मुकनायक आज खूप बोलू लागले.

इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढत आहे.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते,तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली त्यांनी स्वतचे दुकान धंदा मांडला.त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते.तर स्वताच खूप मोठे थोर विचारवंत होऊन ते सिद्ध करण्याचा धंदा असण्याचा गर्व होता.म्हणूनच त्यांनी इतरांना चळवळीतील नेत्यांना कमी लेखले. त्यामुळेच बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मध्यम मार्ग जो तो स्वीकारत नाही.मग सर्वच विश्वरत्न सम्राट,बहुजन लोकनायक,जनतेचा महानायक बनण्याचे स्वप्न पाहता पाहता क्रांतिकारी विचारांच्या चळवळी पासून कधी वेगळे पडले कळलेच नाही.यांच्या जन्मा पासून शेवट पर्यंत मी पत्र लेखक,पत्रकार ते स्तंभ लेखक म्हणून राज्यात परिचित झालो.असलो तरी माझी ओळख असंघटीत कामगार नेता म्हणून ओळख आज ही कायम आहे.मी स्वत मासिक,पाक्षिक साप्ताहिक संपादित करून प्रकाशित केले आहेत.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकाराम महाराजाच्या खालील ओव्या छापल्या जात असत.

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१|| नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||

   पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली होती.

आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की,त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर,केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की,कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही.समाज ही नौकाच आहे.ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने,अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही.म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.

मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता. “हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की,या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही.ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे.खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.” असा हा हिंदू आणि त्याचा धर्म आहे.

   मूकनायक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.हे पाक्षिक मुंबईतून प्रसिद्ध होत असे.पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते.त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते.म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती.पहिल्या अंकातील ‘मनोगत’ नावाचा अग्रलेख डॉ.बाबासाहेब   आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता.पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले.मूकनायकासाठी कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांनी त्या काळी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. ज्या समाजाच्या समस्या वेदना बाबासाहेब मांडत होते.तो समाज आजच्या सारखा सुशिक्षित नव्हता तर मोठ्या प्रमाणत अक्षर ओळख नसलेला होता.आजच्या अशिक्षित माणसांना अक्षर ओळख आहे.तेव्हा ही हा समाज असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर होता.आज इमारत बांधकाम कामगार,वाहन चालक,सुरक्षा रक्षक,फेरीवाला,अनेक धंद्यातील कुशल कारागीर आहे.मुकनायक या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित,गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या.अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे,असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे होते.

   सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत.त्यांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक लेख आज ही प्रेरणादायी आहेत.मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली होती. ‘मूकनायक’ पत्रात विविध विचार,वर्तमानसार,निवडक पत्रातील उतारे,क्षेम,समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. ‘मूकनायक’ एप्रिल १९२३ मधे बंद पडले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक ३ एप्रिल १९२७ ला सुरु केले होते.ते स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या‍ अंकापासून ‘बहिष्कृत भारता’ वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या होत्या.

आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने। जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे। आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।
एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र राज्य होते आणि मराठी ही मातृभाषा लोकभाषा होती. सर्वांना माहिती आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड पंडित विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील अस्पृश जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र “हरिजन” इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी अस्पृश जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती सुद्धा नव्हती.

डॉ.बाबासाहेबांनी जनता हे पाक्षिक सुद्धा सुरू केले होते.या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाले होते.त्यांचे संपादक देवराव विष्णू नाईक होते.  त्यानंतर गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे हे पाक्षिक जनताचे संपादक झाले.पाक्षिक  जनताचे पुढे ३१ ऑक्टोबर १९३० ला जनता साप्ताहिक झाले. साप्ताहिक जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.१९५५ पर्यंत साप्ताहिक जनता सरू होते.या वृत्तपत्राचे संपादन वेळोवेळी बदलले. कमी त्यात अनियमितपणा निर्माण झाला परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी साप्ताहिक जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले होते.१४ ऑक्टोबर,१९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंत हे पाक्षिक बंद पडले. 

   ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय अस्पृश समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले होते. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच बहुजन समाजाच्या पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत.हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक संघटना,पक्षाने स्वताचे मुखपत्र असणे आवश्यक असते. असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या  पक्षाप्रमाणे होते.” आज आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र नाही तर प्रत्येक संघटना,पक्षाचे मुखपत्र आहे.सर्वांची विचारधारा एक असली तरी प्रत्येकाचे धेय्य उदिष्ट वेगवेगळे आहेत.त्यामुळेच हजारो पत्रकार,संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारधारा स्वीकारून एकत्र येऊन चळवळीला योग्य दिशा दाखवू शकत नाही.यांची खंत वाटते.इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे सांगणारा सर्वात जास्त जागृत समाज आज स्वताच इतिहासाच्या आठवणी आचरणाने मोडून काढतात असे लिहावे लागते.सांगा मग बाबासाहेबांचा ३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०५ वर्षाचा झाला.आमच्यात किती बदल झाला तर कालचे मुकनायक आज खूप बोलू लागले.३१ जानेवारी १९२० चा मूकनायक १०५ वर्षाचा झाला या शुभ प्रसंगी सर्व सामाजिक बांधिलकीच्या वृतपत्रांना,त्यांच्या भागधारक,जाहिरातदार,वाचक वर्ग,हितचिंतक यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी  हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *