
बौध्द सभा चेंबूर या संस्थेच्या वतीने दिनांक 26/09/2026 रोजी सुप्पारक बुद्ध विहार, पी.एल.लोखंडे मार्ग,चेंबूर येथे भाद्रपद पौर्णिमा निम्मित वर्षावास कार्यक्रम अंतर्गत,प्रसिद्ध विचारवंत मा.राजाभाऊ कदम साहेब यांचे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीची 70 वर्ष,वास्तव आणि परिणाम या विषयावर फार सूंदर असे व्याख्यान झाले.दिड तास चाललेल्या या व्याख्यानात राजाभाऊ यांनी भारतातील तीन टप्प्यातील धम्म चळवळ मांडली.पहिल्या टप्प्यात बुद्ध काळातील धम्म चळवळ, दुसऱ्या टप्प्यात बुद्धांच्या महापरिनिर्वाण नंतरची धम्म चळवळ आणि तिसऱ्या टप्प्यात बाबासाहेबांना अपेक्षित धम्म चळवळ.पहिल्या टप्प्यात स्वतः बुद्ध असल्याने ती शुद्ध स्वरूपात होती, ती चळवळ पुढे नेण्यासाठी आदर्श भिक्खू संघ होता,म्हणून ती चळवळ गतिमान झाली,वैदिक व्यवस्था समाप्त झाली,अनेक राजांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि राज्य चालवण्यासाठी बौद्ध धम्माला राजधर्म म्हणून स्वीकारले. इथे क्रांती होते.
दुसऱ्या टप्प्यात धम्म चळवळीत अनेक घडामोडी झाल्या.बुद्धांच्या भिक्खू संघात फूट पडली. १८ पंथाची निर्मिती झाली.त्रिपिटिकाची निर्मिती झाली.आदर्श बौद्ध राजा सम्राट अशोक उदयास आला. याच काळात भारताला सोनेकी चिडिया म्हणून विदेशी पर्यटकांनी गौरवले. याच टप्प्यात ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शुंग याने बौद्धांचा शेवटचा सम्राट राजा बृहद्रथ याचा कपटाने खून केला.राजपाट आपल्या हातात घेतला.भिक्खूच्या मुंडकीला १०० मोहरांचे बक्षीस लावले.भिखुंच्या कत्तली झाल्या काही भिक्खू विदेशात पळून गेले. सुमती भार्गव नावाच्या ऋषीकडून मनुस्मृतीची निर्मिती केली.आणि मनुस्मृतीनुसार राज्य चालवले. इथे प्रतिक्रांती होते.

तिसऱ्या टप्प्यात,१९२७ ला मनुस्मृतीचे जाहीर दहन केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली बौद्ध धम्माच्या नीतिमूल्यांवर आधारित भारताचे संविधान निर्माण केले. देशाचा कारभार संविधानानुसार सुरू झाला.इथे क्रांती होते. भारताचा इतिहास म्हणजे ब्राम्हणवाद विरुद्ध बौद्ध धम्म,वैदिक संस्कृती विरुद्ध श्रमन संस्कृती यांच्या मधील संघर्षाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास होय,यालाच बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांतीचा लढा असे म्हटले होते.हा लढा आजही सुरू आहे. पुढे बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.धम्म चळवळ चालवण्यासाठी ४ डिसेंबर १९५४ ला “दि बुद्धिस्ट मूव्हमेंट इन इंडिया” ए ब्ल्यू प्रिंट ही ब्लू प्रिंट दिली. तसेच १९५५ ला “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया” ही संस्था आणि १९५६ ला धम्म दीक्षेच्या वेळी ‘२२ प्रतिज्ञा’ आणि ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ हा धम्मग्रंथ दिला.
बाबासाहेबांचा बुद्धांचा धम्म स्वीकारण्यामागचा उद्देश भारतातील अमानूष जातीचे उच्चाटन करून भारताला बौद्धमय बनवणे हा होता परंतु ७० वर्षात बाबासाहेबांना अपेक्षित धम्माची चळवळ गतिमान न झाल्यामुळे आज अनुसूचित जाती तून धर्मांतरित व्यक्तीला बौद्ध बनूनही आपल्या पूर्वाश्रमीची जात लावण्याची वेळ आली.यासाठी १९९० चा अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांसाठी केलेला कायदा व धम्म चळवळ चालवणारे लोक याला जबाबदार आहेत असे राजाभाऊ यांनी सांगितले. या कायद्याने अनुसूचित जातीतून धर्मांतर करून बौद्ध झालेल्या व्यक्तीस अनुसूचित जातीचा दर्जा कायम ठेवला आणि बौद्ध धम्मात जाती नसताना या कायद्याने हिंदू व शीख धर्माप्रमाणे बौद्ध धम्मातही अनुसूचित जातीचे लोक असतात असा सरकारने शोध लावला. याला फक्त बी सी कांबळे साहेबांनी विरोध असे राजाभाऊ यांनी सांगितले.
पुढे १९९२ ला बौद्धांसाठी दुसरा कायदा झाला.या कायद्यात बौद्धांना धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून दर्जा प्राप्त झाला.या कायद्यात कोणत्याही जातीतून धर्मांतर करून बौद्ध झालेला व्यक्ती जातीमुक्त झाला.बौद्ध धम्म स्वीकारण्यामागचा बाबासाहेबांचा उद्देश भारताला बौद्धमय बनवणे हा होता.याचा दुसरा अर्थ या देशातील जातींचे समूळ उच्चाटन करणे हा होता. कारण संविधानात बाबासाहेबांनी जातीवर आधारित अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली पण जाती नष्ट करता आल्या नाहीत, कारण जात हे वास्तव होते. म्हणूनच जातीच्या समूळ उच्चाटनासाठी बौद्ध धम्माचे नियोजन बाबासाहेबांचे होते.
आज बौद्धांचे नेतृत्व करणारे नेते, संघटना २०२६ च्या जनगणनेत धर्म बौद्ध व जात पूर्वाश्रमीची लिहा,असे जाहीर सांगत आहेत.ही भूमिका बाबासाहेबांच्या धम्म स्वीकारण्या मागच्या उद्देशाला छेद देणारी ठरेल असेही राजाभाऊ यांनी सांगितले.बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा उद्देश सफल करायचा असेल तर प्रथम धम्म स्वीकारणाऱ्यांनी जातीतून मुक्त व्हावे आणि जातीविरहीत समाज निर्माण करून जातीत अडकलेल्या आपल्या SC,ST, NT,OBC मधील आपल्या पूर्वीच्या बौद्ध बांधवांना सन्मानाने बौद्ध धम्मात घेऊन भारताला जातीमुक्त करून बौद्धमय करण्याच्या दिशेने वाटचाल करावी असे अवाहन शेवटी राजाभाऊ कदम यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.किसन माने साहेब यांनी भूषविले,ओघवते सूत्रसंचालन बौध्द सभा चेंबूर या संस्थेचे सचिव मा.मिलिंद कांबळे साहेब यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात,मा.किसन माने साहेब,व्याख्याते मा.राजाभाऊ कदम,आयु.सीमाताई राजाभाऊ कदम, नवनिर्वाचित कोषाध्यक्ष मा.उत्तम झेंडे साहेब यांच्या हस्ते महापुरुष्यांच्या प्रतिमांना पुष्प हार अर्पण करण्यात आले तसेच अगरबत्ती आणि मोमबत्ती प्रज्वलीत करण्यात आली,आणि मा.जयकर मागाडे,सिद्धार्थ रणपिसे आणि मा.बापू चंदनशिवे यांच्या सोबत सामुदायिकरित्या पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रम चे अध्यक्ष मा.किसन माने साहेब यांच्या वतीने व्याख्याते राजाभाऊ कदम यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद,पदाधिकारी आणि बरीच थोर मंडळी विशेषतः महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रम साठी उपस्थिती.सीमाताई राजाभाऊ कदम,डॉ.महेंद्र गायकवाड,सुमेध जाधव,धम्मचारिणी तेजप्रभा,राजू पडवळ (पनवेल),सुहास जाधव (वाशी) जयश्री ताई उपशाम आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ, भारतीय बौद्ध महासभा चे उपासक, उपासिका उपस्थित होते.या कार्यक्रम साठी खीरदान आयु.रुक्मिणी सुखदेव कोल्हे यांच्या मार्फत करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. व्याख्याना नंतर अध्यशीय भाषण झाले,सूत्रसंचालक मिलिंद कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. आणि शरनेतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जय भीम नमो बुध्दाय.
राजाभाऊ कदम-९७६८८३३८११,चेंबूर,मुंबई.

