दिक्षाभूमीवर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?

बातमी शेअर करा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ७० व्या धम्म विजयी दिना निमित्ताने विशेष आत्मचिंतन परीक्षण करणारा लेख 

सम्राट अशोक धम्म विजया दिन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जगाच्या नकाशावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षा सोहळयाचा ऐतिहासिक इतिहास नोंदविला गेला आहे.तो दरवषी विजया दशमीला नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो.तथागत गौतम बुध्द्धांनी स्थापना केलेला तो धम्म दिवस आहे. सम्राट अशोकाने त्यांचा “धम्म विजयी दिन” म्हणून साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं सम्राट अशोक विजयी दिनाला धम्म दिक्षा घेतली म्हणून तो ही धम्म विजयी दिनच आहे. लोकं त्याला धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणतात. धम्म चक्र कधी बंद झालेच नव्हते, तर त्याला पुन्हा धम्म चक्र प्रवर्तन दिन किंवा परिवर्तन दिन का म्हटले जाते व लिहिले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना धम्मदीक्षा पद्मविभूषण महास्थवीर भदंत चंद्रमणी यांच्याकडून घेतली.पूज्य भंतेजी यांच्या हस्ते घेतली तेव्हा ते कुठून आले होते. ते ज्या अर्थी भारतातून आले तर भारतात त्यांचा भिख्खू संघ आणि धम्म उपासक संघ होता. म्हणजेच भारतामध्ये काही प्रदेशात पूर्वीपासून बुद्ध धम्म संघ होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणणे चुकीचे आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन न म्हणता धम्म विजय दीन म्हटलं पाहिजे. असो… याच दीक्षाभूमीवर लाखो लोकांनी त्रिसरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा घेतल्या, पण त्याचा अर्थ समजून घेतला नाही. त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणूनच दरवर्षी लाखों लाखों लोक येऊन क्रांतिकारी विचाराची हत्या करतात असं म्हटलं तर काही लोकांना वाईट वाटेल. कारण….

     देशात असा कोणताही नेता व संघटना,पक्ष नाही की त्याला हजार दोन हजार लोक गोळा करण्यासाठी हंड्बील,पोस्टर,जाहिराती देऊन मिटींगा घ्याव्या लागतात तेव्हा मोठ्या मुश्किलीने लोक गोळा होतात. त्यांना वाहनाची,चहा,पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. देशात नव्हे तर जगात एकच व्यक्ती अशी आहे कि त्याच्या प्रतिमेला त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी,सलामी देऊन नतमस्तक होण्यासाठी नागपुरात गेली ७० वर्ष लाखोच्या संख्येने लोक येतात. त्यासाठी त्यांना कोणताच नेता हंड्बील पोस्टर काढून येण्याचे आमंत्रण निमंत्रण देणारे आवाहन करीत नाही तरी लोक लाखोच्या संख्येने येतात.त्या लाखो लोकांचे नेतृत्व कोणीच करीत नाही. सर्वच स्व्यमघोषित नेते, कार्यकर्ते असतात.लाखों लाखों लोकांची गर्दी दिसते,पण त्यात धम्म दीक्षा व 22 प्रतिज्ञाचे गांभीर्य दिसत नाही. संघ आहे,पण त्याच्याकडे धम्म नाही. म्हणूनच बुद्धाचा जीवन मुक्तीचा मार्ग सांगणारा बुद्ध नाही. वेगवेगळे येतात गर्दी करतात आणि वेगवेगळे निघून जातात. त्यात गेली ७० कोणताही संकल्प दिसत नाही. 
     १ जानेवारी शौर्य दिन भिमा कोरेगांव,विजया दशमी नागपूर आणि ६ डिसेंबर चैत्यभूमी दादर,मुंबई येथे येणारी गर्दी कोणाच्याही नियंत्रणात नसल्यामुळे सरकारला खूप काळजी पूर्वक परिस्थिती हाताळावी लागते.त्यामुळेच प्रशासन अधिकारी दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल यांचेच नियोजन करीत असतात.रोड बंद, पार्किंग बंद,जाणूनबुजून या असंघटीत समाजाला त्रास देण्यासाठी किंवा जातीय दंगल घडविण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जातात. त्यातच ‘घरका मुदयी लंका ढाये,’ कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बारा. मान्यताप्राप्त नेत्यांच्या विरोधात समाजात असंतोष निर्माण करून शॉटकट नेते बनणारे काही कमी नाहीत.सम्राट अशोक धम्म विजय दिनाच्या पूर्व संध्येला कट कारस्थान करणारे राजकीय नेते समाजातील काही कार्यकर्त्यांना नेत्यांना उभे करतात. ऍड.गुणवंत सदावर्दे याने आर एस एस च्या संघ व बुध्दाचा संघ यांची तुलना करून अकलेचे तारे तोडले होते.
त्यांनतर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदाफुले यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी नको ते शब्द व्यक्त करून दुसरा शब्द स्पोट घडविण्याचा प्रयत्न केला.आणि रामाच्या दासने वेगळाच शोध लावला. त्यामुळे नेहमी सारखा नागपुरांच्या दिक्षाभूमी वर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?. होणारीच असते.गेल्या वर्षी अंडर ग्राउंड पार्किंग होती यावर्षी त्यांचे शोभीकरण आणि दीक्षाभूमी समिती यातील न मिटणारे वाद आहेतच.

       मागासवर्गीय समाजातील भक्त मंडळी महापुरुषांचे जन्मदिन आणि स्मृतीदिन आल्यावर भरभरुन अभिवादन करायला लागतात. मी पण १९८२ पासून १९९४ पर्यत नागपूर,दादर चैत्यभूमी, भिमाकोरेगाव येथे बुक स्टॉल लावून पुस्तके विकत होतो.दादरच्या शिवाजी पार्क मध्ये चष्मा तपासणी शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,जनजागृती साठी पत्रक वाटप असे काम दरवर्षी करत होतो.कालकथीत विजय गोविंद सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर खरी परीस्थिती आणि मूळ समस्या व त्या समस्यांचे मूळ कारण लक्षात येऊन त्या दृष्टीकोणातून फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी विचारांची खरी ओळख पटू लागली. मग हे एक दिवसाचे भावनिकदृष्ट्या दाखवल्या जाणारे प्रेम, अभिवादन, त्रिवार वंदन ह्या गोष्टी बनावटी वाटून चीड निर्माण करु लागल्या.कारण त्यामुळे महापुरुषांना अपेक्षित बदल होणं तर दूर उलट त्यांच्या विचारधारेचा पराभव होऊन त्यांच्याच समतावादी विचारांची हत्या होऊन विषमतावादी विचारधारेचा विजय होतांना दिसत आहे.नागपूरच्या दिक्षाभूमी वर होणाऱ्या प्रत्येक कार्यकमात आर एस एस प्रणित नेत्यांचे उपस्थिती आणि आदरतित्य त्यातून राज्यात देशात जाणारा संदेश हा भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या? करणारा आहे.कारण

आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जागते.

दीक्षा भूमीवर येणारी लाखोंची गर्दी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते.


      “मेरा जीवन ही मेरा संदेश है!” हे शंभर टक्के सत्य असतांना त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून माझे अपूर्ण कार्य पूर्ण करा. “जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.” असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या आयुष्याचा खराखूरा अभ्यास केलात तर जाणवते,त्यांनी त्यांच्या जीवनात मानलेले तीन गुरु बुद्ध-कबीर- फुले यांचा जयजयकार न करता त्यांच्या विचारांचे आयुष्यभर अनुकरण करत त्यांचे सामाजिक कार्य पूर्णत्वास नेले.ही कोणत्या ही अनुयायाने आपल्या महापुरुषाला दिलेली खरी व प्रामाणिक प्रेरणादायी मान वंदना,श्रद्धांजली किंवा आदरांजली असते. बाकी सगळं प्रचंड ढोंग असते व स्वताचा स्वार्थ संबाळत केलेली तडजोड असते.खरे प्रबोधन व अनुकरण समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक गुरुच्या आयुष्यातले अनेक महत्वपूर्ण प्रसंग वाचले तर प्रेरणा देतात. बाबासाहेबांनी आम्हा पाच्यांशी टक्के बहुजनांना संख्यावार प्रतिनिधीत्व व मानवी हक्क-अधिकार देण्यासाठी मनुस्मृती विरोधात “लोकशाही व संविधान” भारतात आणण्यासाठी वेळप्रसंगी स्वताची पत्नी व मुले,सुखसोई त्यागून आयुष्यभर जनजागृती,समाजप्रबोधन,संघटीत जात दांडगे धनदाग्यांच्या विरोधात असंघटीतांना संघटीत करून अभ्यास करून संघर्ष केला. आज दिसणारा साधन-संपन्न एस सी,एस टी,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज निर्माण केला.अन्यता शुद्र, अतिशूद्र आणि अस्पृश समाज माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा सुद्धा नव्हता. तो समाज आता लोकशाही व संविधान कमकूवत करत असलेल्या ब्राम्हणशाहीची वाढती “गर्वसे कहो हम हिंदू है” ही गुलामी पत्कारून बहुजन समाजातील महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना पराभूत करून भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?. करीत आहेत. याचं दीक्षाभूमी वर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा विसरून काही लोकं घरात गौरी गणपती,नवरात्र साजरा करतांना दिसत आहेत.
    महापरिनिर्वाण दिनाला,शौर्य दिनाला,धम्म विजया दशमी दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी निवडणूकीत कोणत्या ही मतदारसंघात संख्येच्या बळावर खरी का उतरत नाही.यांचे चिंतन कोणता ही नेता कार्यकर्ता करतांना का दिसत नाही. समाजातील सर्वोच्च उच्च पदावरील न्यायमूर्ती आणि बुद्धिजीवी वर्ग त्याचे आत्मचिंतन परीक्षण करून सत्य मांडण्याचे धाडस का करत नाही. की तो ही संधी साधू झाला आहे.म्हणजेच ही वेगवेगळ्या दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.करणारी आहे.हे सिद्ध होते.यावर वैचारिक विचारमंथन झाले पाहिजे. चर्चा,संवाद परिसंवाद होऊन योग्य मार्ग काढला पाहिजे.अन्यता असे दिन येत राहतील आणि गर्दी वाढत जाईल. ७० व्या धम्म विजयी दिना निमित्ताने सर्व धम्म उपासक धम्म उपासिका यांना हार्दिक मंगल कामना, सर्वांचे मंगल हो!!!.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४४०३८५९,भांडूप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *