इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व विद्धवान विचारवंताला जे कधी सुचले नाही ते सत्य भारतीय संविधानात लिहून जागा समोर मांडण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर इतिहास पुरुषाला जन्म देणारी माता किती महान असेल,याबद्दल सामान्य वाचकाला जिज्ञासा असते.त्यामुळेच आज आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या आई वडिलांचा जीवन संघर्ष वाचून प्रेरणा घेऊ शकतो. भारतात अशा खूप माता,देवी,संत,बाबा,महाराज आहेत.ज्याचा जन्म कुठे झाला?. गांव, तालुका, जिल्हा,राज्य कोणते होते?. आई वडील कोण होते?. त्यांचे शिक्षण कुठे झाले? लग्न झाले होते काय? बायको, मुलगा,मुलगी होती काय?. यांचा कोणता ही थांग पत्ता नसतो. तरी त्या लोकांचा खूप जय जय कार होत असतो.त्यांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया,सिरियल वाहिन्या खूप प्रसिद्धी देत असतात.त्यांचा प्रगट दिन साजरा करतांना उच्च शिक्षित पदवीधर,डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक, वकील,वैज्ञानिक शास्त्रज्ञ स्वतःला थोर विचारवंत म्हणून घेणाऱ्यांना कोणतेच प्रश्न पडत नाही.त्यांची श्रद्धा, ज्ञान,विश्वास पाहून इतरांना कोणते ही प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही. कोणीच बोलत आणि लिहत नाही.पण ज्यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी आहे.तो प्रासंगिक प्रसंगी सांगितला व लिहला पाहिजे. म्हणून मी महामानवांची माता भीमाबाई रामजी आंबेडकर यांचा जीवन संघर्ष लिहत आहे.

,

भीमाबाई रामजी सकपाळ म्हणजेच भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १८५४ रोजी आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे झाला होता.श्रीमंत पित्याच्या पोटी भीमाबाईचा जन्म झाला.त्यांचे वडील धर्मा पंडित (मुरबाडकर) हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स अँड मायनर्समध्ये सुभेदार होते. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला होता. १८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले.भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा,रमा,मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम,आमंदराव व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला होता.भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४ वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे ते होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले.१८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. भीमाबाईंचे २० डिसेंबर १८९६ रोजी मस्तकशूळ या आजाराने दुखंद निधन झाले, त्यावेळी भीमराव आंबेडकर फक्त ५ वर्षाचे होते.

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य,कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स.१९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो.५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. विश्वरत्न डॉ.भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकरांसारख्या थोर विश्व वंदनीय युगपुरुषाला जन्म देणाऱ्या धन्य त्या मातोश्री भिमाई वाचकांना प्रेरणदायी व लक्षवेधी एका कर्तबगार,निर्मळ आईला न्याय देणारी ठरणार आहे.
धर्मा पंडित (मुरबाडकर) आंबेटेंभे या ठिकाणी राहत होते.त्या ठिकाणी आज ही पंडित,गायकवाड,भालेराव,रोकडे, रातांबे हे नातू पंतु परिवारातील लोक बोटावर मोजता येतील असे कुटुंबं राहत आहेत. भिमाई ज्या घरात राहत होती ते घर आज ही आहे. त्या ठिकाणी बुद्ध विहार आहे. त्या पावन भूमीला पाहण्यासाठी लोक मोठया संख्येने येत असतात. पूर्व दळण वळणाची साधने उपलब्ध नव्हती म्हणून लोक भेट देत नव्हते. आता लोकांना भिमाई ची जन्मभूमी आंबेटेंबे बाबत जसजशी माहिती मिळते तसतशी लोक मोठया संख्येने आंबेटेंबेला आवर्जून भेट देत असतात. रमाई साहित्य घराघरात अभियान अंतर्गत भिमाई भूमीत सुनेचा सन्मान,रमाई साहित्य महोत्सव मुरबाड येथे संपन्न होत असतो.आणि भिमाई भूमी सामाजिक संस्था (रजि) आंबेटेंबे,मुरबाड तालुक्याच्या वतीने भिमाईची जन्मभूमी आंबेटेंबे येथे दरवर्षी मोठ्या उत्सवाहात भिमाई जयंती महोत्सव साजरा केला जाते.भिमाई जन्मभूमीची जागा कमी असल्यामुळे शासनाकडून राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी जमीन मिळाली आहे. त्या ठिकाणी भव्य देखणे प्रेरणादायी स्मारक होणार आहे.त्या ठिकाणी भिमाई जयंती महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी माता भिमाई च्या १७२ व्या जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे मान.आयु.आनंदराज आंबेडकर साहेब सभापती बौद्धजन पंचायत समिति,राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आयु.शिवरामजी धनगर मा.श्रामणेर, स्वागताध्यक्ष मा.आयु.भाऊसाहेब रातांबे अध्यक्ष भिमाई भूमी सामाजिक संस्था,मा.आयु.गुरुनाथ पवार सरचिटणीस भिमाई भूमी सामाजिक संस्था,हे आहेत. तर सूत्र संचालन मा.आयु.प्रकाश गायकवाड,गौतम दाजी रातांबे करणार आहेत.मुंबई व ठाणे जिल्ह्यात अनेक मान्यवर या जयंती महोत्सवात सहभागी होणार आहेत.आंबेडकर चळवळीतील अभ्यासक,संशोधक,अनुयायी,तसेच फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना महामानवांची माता भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या (१४ फेब्रुवारी १८५४) १७२ व्या जयंती निमित्याने भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि माता भिमाईच्या विचाराला प्रतिमेला त्रिवार विनम्र अभिवादन…
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
