उच्चवर्णीय जमीनदारीला आव्हान! म्हणजे आगरी कोळी गावठाण चळवळ.- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

आपल्या देशात विषमता आहे.ही वास्तव स्थिती या देशातील सरंजामी मराठा ब्राह्मण वैश्य लोक आजही मान्य करीत नाहीत.अर्थात ही विकृती केवळ भारतातच नाही.आज जगात जे युद्ध अमेरिकेने पुकारलेले आहे.त्या युद्धाचा हेतू जगातील सर्व साधनं संपत्ती आमचीच असावी?.या साम्राज्यवादी धोरणातून इराण या राष्ट्रावर लादलेले युद्ध,असाच आहे.मानवी हव्यास हा राजा ययाती सारखा,दुसऱ्या माणसांचे अधिकार नाकारतो. तेव्हा जगाला युद्धासारख्या भयंकर संकटाना सामोरे जावे लागते.यात दोन राष्ट्रांचे सैनिकच,मारले जातात ?.असे नाही.तर निरागस मुले,आया बहिणी वृद्ध यांना अमानुष छळ,बलात्कार,कायमचे अपंगत्व,बेकारी,महागाई यांना सामोरे जावे लागते.
   भारतात धर्म,राष्ट्र या संकल्पना केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मालकीच्या आहेत. शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांचे स्थान अधिकारी तेथे नाकारले जातात.अशी वैचारिक मांडणी मनुस्मृतीच्या माध्यमातून झालेली आहे.देशातील ८५टक्के ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांचे शोषण,कायम उच्चवर्णीयांनी केले आहे.अर्थात देशाच्या समाजरचनेत उच्चवर्णीय विरुद्ध स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्यातील “शीतयुद्ध” कायम सुरू असते.भारताच्या धार्मिक विषमतेविरुद्ध २००० वर्षापासून बुद्ध महावीर चार्वाक यांनी आवाज उठविला आहे.अलीकडील काळात छत्रपती शिवराय,महात्मा फुले, सावित्रीमाई फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्याने शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांच्या अधिकारांचे म्हणजेच समतेचे युद्ध उच्चवर्णीय लोकांविरुद्ध नेहमीच पुकारले आहे.मागासवर्गीय लोकांवर अत्याचारांची प्रेरणा “मनुस्मृती” प्रणित वैदिक हिंदू धर्म देतो.यातून अनेक वेळा धर्मांतराची धार्मिक बंडखोरी झाली आहे.भारताच्या संविधानकारांना सुद्धा बौद्ध धर्मांतर करावे लागले.हा विषमतेच्या अत्याचारांचा त्यावरील ऐतिहासिक उपायांचा, अलीकडील जिवंत पुरावा आहे.
   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळी भंडारी कुणबी कराडी या ओबीसी शूद्र जातीना घेऊन जमीन कसणाऱ्या भूमिहीन कुळाचे बंड, कोकणात खोत सावकार या उच्चवर्णीय जातींविरोधात पुकारले.यातूनच शूद्र म्हणून धर्माने लादलेल्या गुलामी विरुद्ध स्वातंत्र्याचा अनुभव,देशाच्या इंग्रज सरकारच्या गुलामीतून मुक्त होण्याअगोदर आगरी कोळी ओबिसिनी घेतला आहे.आधी इंग्रजांपासून राजकीय स्वातंत्र्य? की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यापासून धार्मिक, सामाजिक स्वातंत्र्य? यात आमचे म्हणजे आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी यांचे “स्वातंत्र्यवीर” हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील भंडारी नेते सी के बोले हेच आहेत.ओबीसी आजही मानसिक दृष्ट्या उच्चवर्णीय गुलामीत जगत असल्यामुळे,आमचे स्वातंत्र्यवीर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.ब्राह्मण लोकांच्या हिंदू राष्ट्राचे स्वातंत्रवीर हे विनायक दामोदर सावरकर आहेत.ही वास्तव स्थिती समजून घेत नाहीत.हिंदू राष्ट्रात आगरी कोळी भंडारी लोकांना ते कसत असलेल्या शेतजमिनी राहत असलेली घरे मालकीने मिळावीत? असे क्षणभर सुद्धा ज्या उच्चवर्णीय नेतृत्वाच्या मनात आले असेल ?.तर लोकांनी त्या नेत्याचे नाव जाहीर करावे.
    हिंदुत्वाचा वैदिक ब्राह्मणाचा, क्षत्रिय सत्ताधारी वंश आणि दगलबाज शोषणाचा पुरस्कार करण्यात पुढे राहिलेल्या वैश्य अदानी अंबानी लोढा यांचा खरा परिचय आजच्या ओबीसी नेतृत्वाने नव्याने करून घ्यावा.आमच्या जमीन हक्कांचा कुळकायदा आम्हास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.परंतु यामागचा सामाजिक समतेचा लढा आम्हास आजही नव्या पिढीस समजावता आला नाही.ओबीसींना गुलाम करण्यासाठी ब्राह्मण बुवा,बापू,नाना,दादा या नव प्रवचनकारांना ब्राह्मणी लोकांनी पुढे आणले. त्यामुळे जमीनदारी विरोधात लढण्यास तयार झालेला.शिवराय भीमराय यांचा कोकणातला मावळा पुन्हा धार्मिक अंधतेने गुलाम झाला.कुळ कायद्याची अंमलबजावणी धार्मिक,राजकीय प्रशासकीय उच्चवर्णीय नेतृत्वाने संपविली. एमआयडीसी,सिडको,सेझ,एम एम आर डी, नैना विमानतळ दुसरी तिसरी मुंबई अशी विकासाची नावे घेऊन कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी पुन्हा उच्चवर्णीय लोकांनी सरकारी खाजगी भूसंपादनातून गिळून टाकल्या.आज आगरी कोळी ओबीसी राहतो ती घरे गावठाणे एस आर ए,क्लस्टर,सिडको या नावाने संपविण्याचा विडा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,लोढा,अदानी अंबानी यांनी उचलला आहे.लढाई हजारो वर्षे तीच आहे.उच्चवर्णीय विरुद्ध स्त्री शूद्र अतिशूद्र यांची आहे.आज कोळीवाडे गावठाणे भंडार वाडे आदिवासी पाडे,ईस्ट इंडियन गावठाणे वाचविण्याची लढाई मुंबई ठाणे रायगड पालघर इथे सुरू आहे.लोकांची साथ मिळाली?.तर जमीन घरे यांच्या वर लादलेली जमीनदारी म्हणजे आधुनिक भारताची गुलामी आपण झुगारून देऊ शकतो.
आपले सहकार्य,आणि मोलाची साथ हवी.

जय भीम.जय ओबीसी.जय संविधान.जय भारत.
राजाराम पाटील- ८२८६०४१४६३.
उरण जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *