चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू महार म्हणून नोंद केलेल्या लोकांची संख्या शून्य आहे.

बातमी शेअर करा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील धम्म दिक्षेनंतर चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 1956 रोजी हजारो अनुयायांना धम्मदीक्षा दिली.यानंतर पुढील वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये धम्मदिक्षेचे कार्यक्रम आयोजित करुन तत्कालीन महारांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म घेतला.महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याशी तुलना केल्यास तत्कालीन चंद्रपूर (गडचिरोली सह) जिल्ह्यात बौद्धांची लोकसंख्या त्या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दिसते.2011 च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातींची एकूण संख्या ३,४८,३६५ आहे. यापैकी महार २,६६,७६० आहेत. यामध्ये उल्लेखनीय बाब अशी की, बौद्ध धर्मीय लोकांची संख्या महार जातीपेक्षा जवळपास २० हजाराने अधिक म्हणजेच २,८६,८५८ इतकी आहे.(२० हजार बौद्धांनी महार जात नोंदविली नाही) त्याहून महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात हिंदू महार म्हणून नोंद केलेल्या लोकांची संख्या शून्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धम्म प्रसार याचा विचार करता असे दिसून येते की चंद्रपूर जिल्ह्यातील महार महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याचा विचार करता आर्थिक दृष्टीने अधिक स्वतंत्र आणि सधन होते हे असावे.
    चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळात आर्थिकदृष्ट्या सधन महार व्यावसायिक उद्योजक, सधन शेतकरी यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या सधन व्यावसायिक उद्योजक,सधन शेतकरी महारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मोठ्या प्रमाणात खेडोपाडी पोहोचविले.आंबेडकरी चळवळीशी निष्ठा असणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यातील महार उद्योजकांचा व व्यवसायिकांचा ईतिहास महाराष्ट्रातील सम्पुर्ण महार समाजाला प्रेरणादायी ठरावा असा आहे.
    चंद्रपूर जिल्ह्यातील महार समाजाच्या पहिल्या व्यापारी म्हणजे  पैकाबाई खोबरागडे होत.त्यांनी फळबागांची ठेकेदारी आणि घाऊक फळ विक्री व्यवसाय यातून आर्थिक संपन्नता प्राप्त केली.पैकाबाईचे सुपुत्र देवाजीबापू आणि पत्रूजी खोबरागडे यांनी विणकामसाठी लागणरे सूत विक्री व्यवसाय, सोन्याचांदीचे दागिने विक्री व्यवसाय असे कितीतरी उद्योग उभे केले.त्यांचा इमारती लाकूड आणी चारकोलचा व्यवसाय देशभरात प्रसिद्ध होता.१९३० साली स्वत:च्या मालकीची फोर्ड कार असणारे आणि स्वत:च्या मालकीचे सॉ मिल असणारे देवाजीबापू आणि पत्रूजी खोबरागडे हे महार समाजातील पहिले उद्योजक होत.  सरकारने खास देवाजीबापुंच्या व्यवसायासाठी चंद्रपुर येथे बाबुपेठ नावाचे नवीन रेल्वे स्टेशन निर्माण केले जेथून फक्त लाकूड व कोळशाने भरलेल्या मालगाडया सुटत असत. देवाजीबापूमुळे चंद्रपूर जिल्ह्यात त्यांना पूरक व्यवसाय करणारे आणखी कितितरी महार व्यवसायिक प्रतिष्ठा पावले होते. यामध्ये लाकुड व चारकोल व्यवसाय करणारे  बल्हारपुर येथील लटकुजी साव,संभाजी रंगारी (पुढे हे बल्हारपुर शहराचे नगराध्यक्ष झाले), चंद्रपुर येथील कोळसुजी रत्नपारखी इत्यादी अनेक महार व्यवसायिकांनी लाकूड व कोळसा उद्योगात नाव मिळविले.
    चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विचार करता सोमनपल्ली ता.गोंडपिपरी येथील राजु सावकार डोंगरे हे एक मोठे नाव होते.ते कच्चे लाकूड व लोणारी कोळसा देवाजीबापू खोबरागडे याना सप्लाय करायचे. त्यासोबतच सरकारी लायसन्सवर दारूची ३ दुकाने ते चालवीत. त्यांच्याकडे १९३० सालात स्वत:च्या मालकीच्या लॉरी (ट्रक) होत्या.गोवर्धन ता.मूल येथील खोबरागडे परिवार हा असाच एक मातब्बर व सधन परिवार होता.या परिवाराने देवेंद्र फडणवीस यांचे खापरपणजोबा बळवंतराव देशपांडे (पोंभुर्णा) यांच्याकडून पिपरी देशपांडे गावच्या जमीनदारीचे सर्व हक्क विकत घेतले होते. गोवर्धन येथील खोबरागडे कुटुंब हे कदाचित भारतातील अस्पृश्य जातीतील पहिले जमीनदार कुटुंब असावे. देवाजीबापू खोबरागडे व बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचे खंदे सहकारी चंद्रपूर येथील दीक्षा समारंभाचे स्वागत समिति उपाध्यक्ष पत्रूजी लहुजी खोबरागडे हे याच गावातील होत.
    बोरगाव येथील सुदाम सावकार फुलझेले हे कापडाचे एक प्रमुख व्यापारी होते.त्यांचा व्यवसाय थेट आंध्र प्रदेश तेलंगणा पर्यन्त पसरला होता.त्यांनी या व्यापारातून पैसा कमावून चंद्रपूर येथील ब्राह्मण जमीनदार श्री.हस्तक यांचे कडून ४०० एकर जमिन खरेदी केली होती.त्याच गावातील मेंगाजी चुनारकर हे सावकारी आणि शेतकऱ्यांना देढीने धान्य कर्ज देण्याचा व्यवसाय करायचे.गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील पैकुजी उराडे आणि त्याचा मुलगा लुलाराम उराडे हे सुद्धा सधन शेतकरी होते. ते मिरचीचे प्रसिद्ध व्यापारी होते.
    बोरगाव येथील दुधे कुटुंबीय,गडीसुरला येथील वाळ्के कुटुंबीय, बेंबाळ येथील रघुनाथ वाळ्के,ब्रह्मपुरी येथील मारोतराव कांबळे,लाडबोरी ता.सिंदेवाही येथील नागदेवते कुटुंबीय, सावली येथिल गेडाम कुटुंबीय अशी शेकडो मातब्बर महार घराणी त्या काळात विविध व्यापार व्यवसायात होती.त्यांच्याप्रमाणेच जिल्ह्यातील अनेक गावात डिंक व बिडीपत्ता,वनोपज,कापूस खरेदी विक्री, तंबाखू व्यापार  इत्यादी व्यवसाय करणारे श्रीमंत महार अनेक गावात होते. कापड विणणे व विकणे हा महारांचा प्रमुख व्यवसाय होता. खास महार जातींच्या विणकरांनी विणलेले जमलमडगू लुगडे हा कापडाचा ब्रॅंड तेलंगणपर्यंत लोकप्रिय होता.  
   चंद्रपूर जिल्ह्यातील महार लोकांच्या आर्थिक संपन्नतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात देवाजी बापू खोबरागडे व त्यांचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तळागाळात  रूजली. यामुळे या जिल्ह्यात बौद्धांच्या शिक्षणाचे प्रमाण फार मोठे आहे.या जिल्ह्यातून मोठमोठ्या पदावर जाणाऱ्या बौद्ध लोकांची संख्या लक्षणीय आहे.
सुनिल खोबरागडे 9594057373,चंद्रपूर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *