भारतीय बौद्धांनो, आपली मानवतावादी नवी संस्कृती निर्माण करा.

बातमी शेअर करा.

आपल्याच ग्रूपवर नव्हे तर आपल्या अनेक ग्रूपवर दिवाळी बौद्धांचा सण आहे की नाही ? यावर चर्चा सुरू आहे. खरे तर आपण बाबासाहेबांना त्यांच्या साहित्यातून नीट समजून न घेतल्यामुळे आमच्यात हे सर्व प्रॉब्लेम दिसत आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून दिवाळी समजून घेऊया.
     सर्वात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास समजून घेऊ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बौद्ध धम्म विरुद्ध ब्राम्हणवाद, वैदिक संस्कृती विरुद्ध श्रमन (बौद्ध) संस्कृती, यांच्यातील संघर्षाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास होय. यावरून भारतात दोन संस्कृतीचा संघर्ष आहे हे स्पष्ट होते. याचा अर्थ दिवाळी जर बौद्धांचा सण असता तर तो हिंदूंनी साजरा केला नसता आणि दिवाळी जर हिंदूंचा सण असता तर बौद्धांनी साजरा केला नसता हे स्पष्ट होते.


       भारतात कोणालाही प्रश्न विचारला की दिवाळी सण कोणाचा आहे ? तर या देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी, लिंगायत सर्वजण एका सुरात सांगतील दिवाळी हा हिंदूंचा सण आहे. मग दिवाळी हा बौद्धांचा सण आहे असे सांगणारे कोण आहेत ? त्यांचा काय हेतू आहे ? यावर बौद्धांनी विचारणा केली पाहिजे.
         बाबासाहेब आंबेडकर १९३५ ला येवले येथे धर्मांतराची घोषणा करतात आणि लगेच १९३६ ला मुंबईत महार परिषद घेतात आणि त्या परिषदेत काही ठराव मंजूर करतात. त्यापैकी एक ठराव होता,आम्ही हिंदू धर्मातील देवीदेवतांची पूजा करणार नाही,कोणतेच सण साजरे करणार नाही. बाबासाहेबांनी हा ठराव का केला असेल ? कारण त्यांना भारताचा इतिहास माहिती होता. म्हणून त्यांना समजले होते की हिंदू धर्मातील देवी देवता, सण संस्कृती आपली नाही. मग जर त्यांनी हिंदू धर्माला सोडचिठ्ठी देऊन बौद्ध धम्म आम्हाला दिला असेल तर मग बौद्ध धम्माची वेगळी संस्कृती निर्माण करणे ही आपली जबाबदारी नाही काय ? का हिंदू धर्माचे म्हणून ज्याला मान्यता आहे त्यातच बौद्ध अस्तित्व शोधून बौद्धांची दिशाभूल करायची ? हा एक मोठा गंभीर प्रश्न असून तो निकाली काढणे काळाची गरज आहे.
        हा प्रश्न निकाली कसा निघेल ?


बांधवांनो, बाबासाहेबांच्या काळापर्यंत बौद्ध धम्म भारतातून लुप्त झाला होता. त्यामुळे बौद्ध धम्माची संस्कृती नेमकी कशी होती याबाबत आपणास काही माहीत नाही. परंतु बाबासाहेबांनी मोठा संघर्ष करून बौद्ध धम्माचे पुन्हा पुनर्जीवन केल्यामुळे त्यांच्या साहित्यातूनच आम्हाला बौद्धांचे नवे सण व त्याची संस्कृती निर्माण करावी लागेल. कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धांचाच धम्म दिला पण नव्या स्वरूपात दिला. त्यामुळे भारतीय बौद्धांची नवी संस्कृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. बौद्धांचे कोणते सण असावेत आणि ते कसे साजरे करायला हवेत हे बौद्ध समाजाने बसून एकमताने ठरवले पाहिजे. त्यामध्ये मला वाटते ते बौद्धांचे सण म्हणजे –
१)- बुद्ध जयंती, २)- बाबासाहेबांची जयंती, ३)- शाहू महाराज जयंती, ४)- अशोकाविजया दशमी,५)- १४ ऑक्टोबर, धम्मचक्र प्रवर्तन दिन.,६)- भीम-जोती जन्मोत्सव
( ११ एप्रिल ते १४ एप्रिल – दिवाळी सारखा ) हे दिवस बौद्धांनी आपले सण म्हणून साजरे करावे. यातून दोन संस्कृती स्पष्टपणे दिसून येतील.
      बौद्ध बांधवांनो, बाबासाहेब म्हणाले होते बौद्ध धम्माच्या प्रस्थापनेसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग धर्मांतरित माझा बौद्ध समाज करील. बाबासाहेबांचे हे शब्द फेल जाऊ देऊ नका. जातमुक्त व्हा कारण बौद्ध धम्मात जात नाही. आजचे हिंदूंचे सण हे वास्तविक ब्राह्मणी सण आहेत. आजचे हिंदू हे पूर्वीचे बौद्ध आहेत. ब्राम्हणवादाला बळी पडल्यामुळे ते ब्राह्मणी सण आणि संस्कृती पाळत आहेत. त्यांनाही आपल्याला जातीवादी ब्राह्मणी जोखडातून मुक्त करायचे आहे याची जाणीव ठेवा. कारण भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.शेवटी बौद्ध धम्म व त्याची संस्कृती ही वेगळी आहे. तिला निर्माण करून जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. यापुढे हिंदूंचे सण म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कोणत्याही सणात बौद्धांचे अस्तित्व शोधू नका.
क्रांतिकारी जयभीम l

राजाभाऊ कदम धम्म प्रचारक मो.९७६८८३३८११,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *