क्रांतीला स्वर देणारी गीते भारतीय जनआंदोलनांच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा

बातमी शेअर करा.

“घोषणा संघर्षाची सुरुवात करतात. गीते संघर्षाला पिढ्यान्पिढ्या जिवंत ठेवतात.”

एखादे गीत माणसाला निर्भय करू शकते का? पोलिसांच्या लाठीसमोर, अटकेच्या भीतीसमोर किंवा सत्तेच्या दडपशाहीसमोर ताठ उभे राहण्याचे बळ एखादे गीत देऊ शकते का? इतिहासात याचे उत्तर निश्चितच होकारार्थी मिळेल. भारतातील जनआंदोलनांचा इतिहास हा केवळ घोषणांचा इतिहास नाही; तो गीतांचा इतिहास आहे.सध्या देशात सुरू असलेल्या झेन झी च्या आंदोलनातील संघर्षाच्या आघाडीवर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतानाचा एक व्हिडियो समाज माध्यमावर पहिला. तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील संत जनाबाईंचा अभंग उद्धृत करून पोस्टकर्ती म्हणते “मी त्या गीतांचा विचार करत आहे, जी शांतपणे क्रांतींना ऊर्जा देतात; जी पिढ्यान्पिढ्या लोकांना संघर्षाच्या आघाडीवर खंबीरपणे उभे राहण्याचे आणि दडपशाहीचा सामना करण्याचे बळ देतात.”
“आता भीत नाही देवा
 आदी अंत तुझा ठावा।
 ज्ञान वैराग्य विवेक बळे,
 ते तंव आम्हासवे खेळे॥”
व्हिडिओतील जनाबाईंच्या ओळी ऐकताना क्षणभर वाटले, सातशे वर्षाचा इतिहास वर्तमानात येऊन उभा ठाकला आहे. महाराष्ट्रातील एका संतकवयित्रीचा स्वर आजच्या तरुणांच्या आंदोलनाच्या निमित्ताने का आठवतोय? हा केवळ योगायोग नाही. भारतातील प्रतिकाराच्या सांस्कृतिक परंपरेचा तो एक जिवंत धागा आहे.
इतिहासाचे ही दोन प्रवाह असतात. एक प्रवाह दस्तऐवजांचा. त्यात तारखा,मोर्चे,सत्याग्रह,अटक, तुरुंगवास आणि कायद्यांच्या नोंदी असतात. तर दुसरा प्रवाह लोकस्मृतीचा. तो अभंगांत, दोह्यात, ओव्यांत, कव्वालीत,शाहिरीत आणि लोकगीतांतून वाहत राहतो. पहिला इतिहास ग्रंथालयात सापडतो; दुसरा लोकांच्या कंठात जिवंत राहतो.आपण जनआंदोलनांचा राजकीय इतिहास लिहिताना त्यांच्या सांस्कृतिक इतिहासाकडे फारसे लक्ष दिले नाही. संघर्षाचा अभ्यास करताना आपण नेतृत्व, संघटना, रणनीती, मागण्या आणि दडपशाही यांवर चर्चा करतो. खरेतर लाठीमार सहन करणाऱ्या सत्याग्रहींच्या ओठांवर कोणते गीत होते, तुरुंगात जाताना त्यांनी काय गुणगुणले, दीर्घ पदयात्रेत थकलेल्या पावलांना कोणत्या स्वरांनी आधार दिला या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत. कारण आंदोलनांची खरी शक्ती केवळ घोषणांत नसते; ती त्यांच्या सांस्कृतिक स्मृतीत असते.


    जनाबाईंच्या अभंगाचा अर्थ याच ठिकाणी अधिक स्पष्ट होतो. या अभंगात राजकीय घोषणा नाही, विद्रोहाची भाषा नाही. पण अन्यायासमोर न झुकण्याची एक विलक्षण नैतिक ताकद आहे. “आता भीत नाही” हा उच्चार म्हणजे भीतीवर मिळवलेला विजय. इतिहासातील प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात या क्षणापासूनच होते, जेव्हा माणूस भीतीच्या समोर उभा ठाकतो. प्रतिकार म्हणजे केवळ सत्तेविरुद्ध उभे राहणे नव्हे. तर भीतीविरुद्ध, अपमानाविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि माणसाला माणूस म्हणून नाकारणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेविरुद्ध उभे राहणे आहे. म्हणूनच प्रतिकाराची भाषा अनेकदा घोषणा पूर्वी गीतांत जन्माला येते.
याच कारणामुळे भक्ती चळवळीकडे केवळ धार्मिक चळवळ म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ती राजकीय सत्ता उलथवण्याची चळवळ नव्हती; पण ती जातिभेद, कर्मकांड, विषमता आणि मानवी अपमानाविरुद्धची नैतिक क्रांती होती. या संतांनी राजसत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला नाही; त्यांनी माणसाच्या अंतःकरणात समतेची बीजे पेरली.
   ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली. नामदेवांनी भक्तीला सीमाच्या पलीकडे नेले. जनाबाईने दासीच्या आयुष्यातून स्वाभिमानाचा स्वर दिला. चोखामेळ्याची अस्पृश्यतेच्या जखमा अभंगांतून मांडल्या. एकनाथांनी सामाजिक भेदभाव यावर प्रहार केला.आणि या सर्वांवर कळस चढवत तुकोबांनी “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले…” असे म्हणत वाचिंताना जवळ घेतले. ही केवळ भक्ती नव्हती. ही समाजातील सर्वात वंचित माणसाशी एकात्मता होती. अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहण्याची नैतिक भूमिका होती. म्हणूनच तुकारामांचे अभंग पुढील अनेक सामाजिक चळवळींना प्रेरणा देत राहिले.हा प्रवाह महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. उत्तर भारतात कबीर धर्माच्या नावाने उभ्या राहिलेल्या भिंतींना प्रश्न विचारत होते. “जात न पूछो साधु की…” या एका ओळीत कबीरांनी जन्माधिष्ठित श्रेष्ठत्वालाच आव्हान दिले. त्यांच्या दोह्यांत धर्मापेक्षा माणूस मोठा आहे, कर्मकांडापेक्षा सत्य मोठे आहे आणि द्वेषापेक्षा प्रेम मोठे आहे, हा संदेश होता. म्हणूनच कबीरांचे शब्द आजही सांप्रदायिकतेविरुद्ध उभ्या राहणाऱ्या प्रत्येक संघर्षात नव्याने ऐकू येतात.
   पंजाबमध्ये बुल्ले शाह प्रेमाला प्रतिकाराची भाषा देतात. कर्नाटकात बसवण्णा श्रमाला प्रतिष्ठा देतात. बंगालमध्ये लालन फकीर माणसाला माणूस म्हणून ओळखण्याची शिकवण देतात. माणसाला भीतीतून मुक्त करणे आणि समतेकडे नेणे या समान धाग्यातून विणलेल्या भक्ती आणि सुफी परंपरा म्हणूनच एकत्र नांदताना दिसतात.
भारतातील प्रतिकाराची भाषा अनेकदा राजकीय घोषणांपूर्वी सांस्कृतिक रूपात जन्माला आली. आधी अभंग आले, दोहे आले, ओव्या आल्या, कव्वाल्या आल्या; त्यातून मूल्ये निर्माण झाली आणि त्या मूल्यांतून संघर्षाची नैतिक शक्ती उभी राहिली.
   महात्मा गांधींना या सांस्कृतिक परंपरेचे सामर्थ्य चांगलेच उमगले होते. म्हणूनच त्यांच्या सत्याग्रहात भजनांना मध्यवर्ती स्थान होते. दांडी यात्रेपासून प्रार्थनासभांपर्यंत सामूहिक गायन हा सत्याग्रहाचा अविभाज्य भाग होता. “वैष्णव जन तो तेने कहिये…” हे भजन केवळ भक्ती व्यक्त करत नव्हते; ते दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचे दुःख मानण्याची नैतिक शिकवण देत होते. तर “रघुपती राघव राजाराम” मधील “ईश्वर अल्ला तेरो नाम” हा उच्चार धार्मिक सलोख्याचा सार्वजनिक स्वर बनला होता.
गांधीजींसाठी भजन हा कार्यक्रमाचा भाग नव्हता; ते सत्याग्रहींचे अंतर्बल होते. लाठीमाराच्या वेळी, तुरुंगात जाताना, दीर्घ पदयात्रेत चालताना सामूहिक गायन त्यांना हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचे धैर्य देत होते.याच ठिकाणी संत जनाबाई आणि महात्मा गांधी यांच्यातील अदृश्य दुवा स्पष्ट दिसू लागतो. जनाबाई म्हणतात—”आता भीत नाही.” गांधी म्हणतात—”निर्भय व्हा; सत्याच्या बाजूने उभे राहा.” शब्द वेगळे, संदर्भ वेगळे; पण नैतिक आशय एकच.
   महात्मा गांधींच्या सत्याग्रहात भजनांना मिळालेले स्थान हा भारतीय जनआंदोलनांच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पण या परंपरेचा प्रवास गांधींपाशी थांबला नाही. स्वातंत्र्यानंतर भारताचे प्रश्न बदलले. परकीय सत्तेविरुद्धचा लढा संपला; पण विषमता, जातीय अन्याय, श्रमाचे शोषण, विस्थापन, जंगल-जमिनीवरील हक्क, पर्यावरणाचा विनाश आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण यांसाठी नवे संघर्ष सुरू झाले. प्रत्येक नव्या संघर्षाने आपल्या अनुभवातून नवी गीते घडवली आणि भारतीय प्रतिकारपरंपरेत नवे स्वर मिसळले.


  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नसल्याचे सांगितले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही केवळ संविधानातील तत्त्वे नसून ती समाजाच्या संस्कृतीत रुजली पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच आंबेडकरी चळवळीत विचारा बरोबरच सांस्कृतिक चळवळीचा एक सशक्त प्रवाह निर्माण झाला. जलसे, शाहिरी, कवितावाचन आणि लोकगीते ही परिवर्तनाची प्रभावी साधने ठरली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या जीवनाला साहित्याचा केंद्रबिंदू बनवले. वामनदादा कर्डक यांनी स्वाभिमानाला कणखर स्वर दिला. अमर शेख यांनी कामगार, शेतकरी आणि कष्टकरी समाजाचे दुःख, संताप आणि स्वप्ने गीतांतून व्यक्त केली. पुढे संभाजी भगत, विलास घोगरे आणि असंख्य लोकशाहिरांनी संविधान, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेचा आवाज गावोगावी पोहोचवला.
या शाहिरीचे वैशिष्ट्य असे की ती रंगमंचापुरती मर्यादित राहिली नाही. तिचे खरे व्यासपीठ होते ते कारखान्यांचे फाटक, शेतातील बांध, झोपडपट्ट्यांचे चौक, विद्यापीठांचे परिसर आणि आंदोलनांची मैदाने. संविधान पुस्तकात राहिले नाही; ते गीतांतून लोकांच्या कंठात उतरले.याच काळात भारतीय जननाट्य संघ, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA)ने कला आणि जनआंदोलन यांचे नवे नाते निर्माण केले. नाटक, संगीत, कविता आणि लोककलांच्या माध्यमातून दुष्काळ, युद्ध, कामगारांचे शोषण आणि सामाजिक विषमता या प्रश्नांना लोकभाषा मिळाली. लोकगीत हे केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हते; ते लोकशिक्षणाचे, संघटनाचे आणि प्रतिकाराचे माध्यम बनले.


  भारतातील पर्यावरणवादी चळवळींकडे पाहिले, तरी हा सांस्कृतिक प्रवाह तितकाच समृद्ध दिसतो. हिमालयातील चिपको आंदोलनात झाडांना मिठी मारणाऱ्या स्त्रियांनी जंगलाला केवळ लाकूड म्हणून पाहिले नाही; त्यांनी त्याला जीवनाचा आधार मानला. त्यांच्या “क्या हैं जंगल के उपकार?” या प्रश्नाला उत्तर देणारी लोकगीते गावोगावी घुमली. त्या लोकगीतांनी पर्यावरणाचा प्रश्न तज्ज्ञांच्या चर्चेतून बाहेर काढून सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडला.नर्मदा बचाव आंदोलनात नदी ही केवळ जलस्रोत नव्हती. ती संस्कृती होती, स्मृती होती, उपजीविका होती आणि अस्मिताही होती. नर्मदेच्या काठावर गायली जाणारी गीते विस्थापनाच्या वेदना व्यक्त करत होती; पण त्याच वेळी विकासाच्या प्रचलित संकल्पनेलाही प्रश्न विचारत होती. ती गीते सांगत होती की विकास जर माणसालाच उखडून टाकत असेल, तर त्याच्या नैतिकतेची नव्याने चिकित्सा करावी लागेल.
  आदिवासी समाजाच्या गीतांत जंगल, नदी आणि डोंगर हे केवळ निसर्गघटक नसतात; ते कुटुंबातील सदस्य असतात. म्हणूनच जंगलावर होणारा हल्ला हा त्यांच्या संस्कृतीवरचा हल्ला ठरतो. “गाव छोडब नही, जंगल छोडब नही” हा हुंकार केवळ आंदोलनाची घोषणा नाही; तो अस्तित्वाचा घोष आहे.याच परंपरेचा प्रतिध्वनी आज कोकणातही ऐकू येतो. विनाशकारी विकास प्रकल्पांविरोधात उभे राहिलेले लोक जेव्हा “गावं सोडूचा नाय, जंगल सोडूचा नाय” असे म्हणतात, तेव्हा त्या गीतात केवळ भूमीवरील प्रेम नसते; त्यात अनेक पिढ्यांनी जपलेल्या सांस्कृतिक प्रतिकाराची स्मृती दडलेली असते. शब्द बदलतात, भाषा बदलते; पण प्रतिकाराचा आत्मा बदलत नाही.
अलीकडच्या शेतकरी आंदोलनानेही हेच दाखवून दिले. दिल्लीच्या सीमेवर उभ्या राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या तंबूंमध्ये केवळ राजकीय चर्चा नव्हता. तिथे कविता होत्या, पुस्तके होती, नाटके होती आणि गीतेही होती. पंजाबच्या लोकपरंपरेतील स्वर आणि नव्या आंदोलनगीतांनी त्या दीर्घ संघर्षाला आशा, धैर्य आणि ऐक्याची ऊर्जा दिली. त्यामुळे आंदोलन हे केवळ मागण्यांचे व्यासपीठ राहिले नाही; ते एका नव्या लोकसंस्कृतीचे रूप बनले.
   स्त्रियांच्या चळवळींची कथा तर ओव्यांशिवाय अपुरीच राहील. जात्यावर दळताना, शेतात काम करताना, पाणी भरताना स्त्रियांनी रचलेल्या ओव्यांत त्यांच्या श्रमांचे, दुःखाचे, आशेचे आणि प्रतिकाराचे दस्तऐवजीकरण झाले. इतिहासाने त्यांची नावे नोंदवली नसतील; पण त्यांच्या आवाजाने इतिहासाची दिशा बदलणाऱ्या चळवळींना आधार दिला.यातून एक मूलभूत सत्य समोर येते. कोणतीही चळवळ केवळ विचारांवर टिकत नाही. तिला भावना, स्मृती आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचीही गरज असते. विचार दिशा देतात; पण गीते माणसांना एकत्र आणतात. विचार पटवतात; पण स्वर बांधिलकी निर्माण करतात. म्हणूनच जनआंदोलनांची खरी ताकद त्यांच्या संघटनाइतकीच त्यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीतही दडलेली असते.
आज संवादाची साधने बदलली आहेत. समाजमाध्यमे, थेट प्रक्षेपण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल मोहिमा यामुळे आंदोलनांची भाषा बदलली आहे. तरीही जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात, तेव्हा ते अजूनही एकत्र गातात. कारण तंत्रज्ञान माहिती पोहोचवू शकते; पण समुदाय निर्माण करू शकत नाही. समुदाय अजूनही सामूहिक अनुभवांतून आणि सामूहिक स्वरांतूनच घडतो.कदाचित म्हणूनच सत्तेला लोकांच्या गीतांची भीती वाटते. सभा बंद करता येतात. मोर्चे मोडून काढता येतात. कार्यकर्त्यांना अटक करता येते. पण लोकांच्या स्मृतीत घर केलेल्या गीतांवर बंदी घालता येत नाही. ती एका कंठातून दुसऱ्या कंठात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत राहतात.
  जनाबाईंच्या अभंगापासून आजच्या तरुणांच्या आंदोलनांपर्यंत एक अखंड स्वर वाहत आला आहे. काळ बदलला, सत्ताधारी बदलले, संघर्षांचे विषय बदलले; पण अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या माणसाच्या कंठातील तो स्वर बदलला नाही.कदाचित म्हणूनच भारतातील जनआंदोलनांचा इतिहास हा केवळ संघर्षांचा इतिहास नाही; तो गीतांचा इतिहासही आहे. कारण इतिहासातील प्रत्येक मोठ्या परिवर्तनाचा पहिला स्वर रस्त्यावर उमटत नाही—तो आधी माणसाच्या कंठात, त्याच्या विवेकात आणि त्याच्या सांस्कृतिक स्मृतीत जन्म घेतो.

सिरत सातपुते
satputesirat@gmail.com
 आंदोलन शाश्वत विकासासाठी या मेधा पाटकर संपादित मासिकाच्या नोव्हेंबर 2026,  दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *