
आपणास अभिवादन करण्याच्या निमित्ताने काही विषयावर संवाद व्हावा यासाठीच हा पत्र प्रपंच.
तुम्ही जे निर्माण करून ठेवलात त्यात आम्ही कोणती भर घातली? असा प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच येईल.गोऱ्यांच्या राजवटीखाली या देशाने आपली स्वतःची,अशी ओळख काही दशकापुरती गमावली होती.प्रथम हा देश बुद्धांचा नंतर गांधींचा म्हणून ओळखला जात होता. आता तो तुमच्या नावाने ओळखला जाऊ लागला.सध्या हा देश एका अरिष्टात अडकलेला आहे. ते अरिष्ट राजकीय,सामाजिक,आणि सांस्कृतिक गुंतागुंतीच आहे.स्वातंत्र्यानंतर समतेच, बंधुत्वाचं आणि लोकशहीच स्वप्न पाहणारा हा देश संक्रमण अवस्थेच्या वर्तमानात जगत आहे.
खरंतर विषम व्यवस्थेच्या छाताडावर पाय देऊन इथे समता भूमी निर्माण करण्याचं आमचं ध्येय पूर्णत्वास जाऊ शकले नाही.त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागून स्वतःला आत्मक्लेष करून घेण्याइतपत थोर नाही.तुम्ही उभ्या केलेल्या घराच्या भिंतीचा एक एक चिरा हळूहळू निखळत चाललाय.इथे धर्म श्रेष्ठत्वाच्या तत्त्वज्ञानामुळे समतेचे तत्त्वज्ञान समाजामध्ये रुजवायला आम्हीच कमी पडलो. त्याला आमच्यातलेच काही जबाबदार आहेत.विचारांची लढाई ही विचारानेच लढली पाहिजे. एवढेच नव्हे तर इथली राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक,सत्ता सुद्धा समतेच्या तत्त्वज्ञानाने लढून (धर्मांध शक्तीसी हात मिळवनी करून नव्हे) मिळवली पाहिजे.आजही या देशातील दीनदलितांच्या समस्या डोंगराएवढ्याच आहेत. त्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. मात्र हा समस्यांचा डोंगर उध्वस्त करण्यासाठी अजून पुढाकार घेतला जात नाही.
तुमचा विचार विधायक मार्गाने पुढे नेण्यासाठी सध्या तरी कुणी पुढाकार घेताना दिसत नाही. मात्र तुमच्या नावाचा उदो उदो करण्यासाठी सगळेजण आपली ५६ इंच छाती काढून पुढे सरसावतात. “जयभीम के नाम पे खून बहे तो बहेने दो” असा आवेश आणतात.अलीकडे मध्यमवर्गीय जाणीव आमच्यामध्ये हळूहळू शिरकाव करू लागली आहे. जगण्या मरण्याच्या हक्कासाठी संघर्ष करीत मेरिटमध्ये स्थान मिळवणाऱ्या समाजाच्या संवेदना जेव्हा बोथट होतात आणि तो समाज अहमभौतिक सुखाच्या मागे लागतो तेव्हा तो वैचारिक लढाईपासून अलिप्त होतो.आम्हीही त्याच मार्गावर आहोत हे वास्तव स्वीकारायला थोडा वेळ लागेल.
कोटी कोटी कुळांचा उद्धार करणारा तुमचा क्रांतिकारी विचार आज शतकानंतर विषमतेच्या गडद अंधारामध्ये माणूस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.मान्य आहे, शत्रूच्या रेटयापुढे आम्ही संख्येने,द्रव्याने,आणि गनिमी आखाड्याने टिकू शकणार नाही. “हम टिक नही सकते,लेकिन मिट भी नहीं सकते, या उक्तीप्रमाणे तुमचा विचार ज्वलंत ठेवण्यासाठी आम्ही स्वतःहाशी तह करू, आणि जाताना इथल्या मातीत समतेच्या विचारांची पाळेमुळे घट्ट राहतील याचा बंदोबस्त करू जेणेकरून तुम्ही उगवलेल्या लख्खउजेडात अंधाराची कुस पुन्हा जागा घेणारच नाही.हेच तुम्हाला अभिवादन ठरेल.
प्रदीप नाईक.8652565821
(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते व संपादक आहेत)
