
विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते.बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.बाबासाहेबांनी या देशांमधली वर्णजातीव्यवस्थाचे चटके सहन केले.त्या विरोधात त्यांनी ते नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. हे या जातीव्यवस्थेचे जे तोटे आहेत,ज्या ज्या नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत.त्या इतरांना सांगण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.जातिव्यवस्थेने या देशातल्या एससी,एसटी,ओबीसी आणि महिलांचा जो छळ केला आहे,आज ही करत आहेत. यापासून या सर्वांना सावध करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.बाबासाहेबांनी जो त्याग केला,संघर्ष केला आणि त्यागातून,संघर्षातून जे संविधान या देशाला दिले त्या संविधानातील प्रत्येक कलमांची माहिती सांगण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था आणि देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी,या विचारधारेचे समर्थक तयार करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.आणि हे सर्व काम त्याच लोकांनी करायचे असते जे या विचारधारेचे खंबीर समर्थक असतात. डी जे लाऊन धूमधडाक्यात जयंती साजरी केली,म्हणून तुम्ही किंवा तुमची संघटना मोठी झाली आहे.असे गेल्या १३४ वर्षात झाले नाही. “संघटनेची ताकद ही केवळ संभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून संभासदांच्या प्रामाणिकपणावर संघटनेशी एकनिष्ठेवर आणि शिस्तपालनवर अवलंबून असते.” हे आम्ही कधीच समजून घेतले नाही. म्हणून घराघरात नेते आणि संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष निर्माण होत आहेत.
फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या देशांमध्ये ब्राह्मण, कॉम्युनिटी,मारवाडी,बनिया,उच्च वर्णीय वर्गीय करतील का?. त्यांची जबाबदारी आहे का या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याची?.बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भाने ज्या काही चुकीच्या बाबींचे पांयडे पडलेले आहेत ते नष्ट करणे हे सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीचा एक उद्देश असला पाहिजे.लोकशाही शासन व्यवस्थेला व्यक्तिपूजा ही घातक असते हे बाबासाहेबांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.आज या देशामध्ये लोकशाही पेक्षा मोदी लोकांना जवळचा वाटतो,आर एस एस प्रणित भाजपा म्हणजे मोदी सरकार झाले आहे.भारत सरकार लिहल्या बोलल्या जात नाही. हा लोकशाहीला व्यक्ती पूजेचा सर्वात मोठा धोका असल्याचे उदाहरण आहे. बाबासाहेबांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास जयंतीच्या माध्यमातून आम्ही,लोकांना बाबासाहेबांच्या जीवन संघर्ष आणि कार्यापासून व विचारापासून दूर नेऊन व्यक्ती पूजेमध्ये गुंतवत असल्याचे प्रकार जयंतीच्या निमित्ताने घडत आहेत. जे आंबेडकरवादी चळवळीसाठी आणि त्याच्या भवितव्यासाठी धोकादायक आहेत.365 दिवसांपैकी फक्त एक दिवस आणि तो ही बाबासाहेबांच्या विचारासाठी नसेल,डी जे आणि बँड लावून नाचण्यासाठी असेल तर आंबेडकरवादी चळवळीला भविष्य नसल्याचे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही.

आज या देशातील आंबेडकरवादी विचारधारा आणि भारतीय संविधान प्रचंड धोक्यामध्ये अडकलेले आहे.याला वाचवण्याची जबाबदारी ही आंबेडकरवादी चळवळीच्या बुद्धिजीवी विचारवंताची,फ्रंट लाईन लीडर आणि विचारधारेचे फायदे आरक्षण घेणाऱ्या समाजाची आहे. सुशिक्षित आणि समजदार लोकांनी समाजाच्या कलाप्रमाणे वागायचं नसते.अशा भोळ्या भावड्या समाजाला बाबासाहेबांच्या विचाराकडे घेऊन जाण्याची जबाबदारी बुद्धिजीवी लोकांची असते ती भूमिका त्यांनी इमानदारी ने पार पडली पाहिजे.मनुवादी लोक बाबासाहेबांच्या विचारधारेपासून देशाला आणि समाजाला दूर नेत आहेत. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला?.आर एस एस वाल्यांनी प्रबोधन शिबिराच्या माध्यमातून या देशांमध्ये आरक्षणाच्या विरोधात वातावरण तयार करून ठेवलं आहे. आज या लोकांना आरक्षणापेक्षा धर्म मोठा वाटतो, जो धर्म यांना काहीही देत नाही.आर एस एस ची प्रबोधन शिबिरं चालू आहेत.आम्ही मात्र प्रबोधन शिबिर घेण्या पासून शेकडो मैल दूर आहोत.आम्ही फक्त डी जे,डॉल्बी,गाणे,गायक,बँड बाजा,जेवण आणि जयंती मधून इतर लोकांना शिव्या देणे याच्यामध्ये प्रचंडपणे गुंतलो आहोत.
क्रांतिकारी विचारांची आंबेडकरवादी चळवळ उभी राहणार नाही,कारण गेल्या 70 वर्षांमध्ये आम्ही जयंती अशाच पद्धतीने केली,त्याचा कोणालाही फायदा झाला नाही. फक्त आम्ही जयंती केली एवढे एक समाधान मनात घेऊन आम्ही वर्षभर फिरत असतो.परंतु आमच्या आजूबाजूला असणाऱ्या आरक्षण धारक लोकांना आम्ही जोडण्यामध्ये अयशस्वी झालेलो आहोत.हा आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा पराभव आहे हे आमच्या अजूनही लक्षात येत नाही.लोकशाही जनाधार मागते,संविधान सत्ता मागते,व सत्ता बहुमताची असते.जनाधार असल्याशिवाय बहुमत नसते,आणि बहुमत नसते म्हणून सत्ता नसते, सत्ता नसते म्हणून कायदे करण्याचे अधिकार आपल्या हातात नसतात आणि म्हणून भारताच्या संसदेमध्ये खाजगीकरणाचे कायदे होतात.देशाच्या मालकीचे नफ्यात चालणारे उद्योग विकणारे कायदे होतात,धर्मांतर बंदी विधेयकं येतात,आरक्षण नष्ट करण्याचे कायदे होतात,ॲट्रॉसिटी कायद्याला दुबळे करण्यात येते. सगळे धोके बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 च्या भाषणामध्ये सांगितलेले असताना सुद्धा आम्ही याकडे दुर्लक्ष केले.त्याचे परिणाम आम्ही आज भोगत आहोत.यामधून सावरण्यासाठी लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिति निवडणुका ह्या सुवर्ण संध्या असतात. निवडणुकीमध्ये आम्ही जर पराभूत झालो, तर बाबासाहेबांनी कमावलेलं सगळं आम्हाला गमवावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे.लोकशाहीच्या निवडून मार्गाने साम,दाम,दंड,भेद नीती वापरुन निवडणुक जिंकली पाहिजे.आणि जिंकल्या नंतर शासन प्रशासनावर कब्जा करता आला पाहिजे. आज मोदी दिसतात पण प्रशासनावर आर एस एस प्रणित भारतीय मजदूर संघाची किती मोठी पकड आहे हे आपण समजून घेत नाही.
बाबासाहेबांनी सांगितले होते “शासन कर्ती जमात बना.” म्हणजे काय हे आज ही आम्हाला समजले नाही. देशात असंघटित कष्टकरी कामगारांची संख्या ९३ टक्के आहे त्यात सर्वात जास्त मागासवर्गीय समाजाचे कामगार आहेत. त्यातील ३० टक्के कामगारांना आम्ही संघटित केले. तर सत्ता परिवर्तन करू शकतो. आणि सत्ताधारी नाही झालो, तरी विरोधी पक्ष म्हणून कायम सत्ताधाऱ्यावर शासन,प्रशासनावर कायम दबाव निर्माण करू शकतो.इतिहास सांगतो जगात जी काही क्रांती झाली ती कामगारांनी केली आहे.म्हणून यापुढे आम्ही समदुखी आणि आरक्षण धारक जातीच्या असंघटित कष्टकरी कामगारांना नागरिकांना मतदारांना म्हणून जोडण्याचे काम करावे लागेल.तेच होत नाही,निवडणूक आली आणि जयंती आली की बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांची आठवण होते. बाकी दिवस आम्ही कसे जगतो,कोणाचे काम करून जगतो,कोणत्या विचारधारेच्या ट्रेड युनियन,संघटनेचे सभासद बनून वार्षिक वर्गणी देऊन त्यांना आर्थिक दुष्टया मजबूत बनवतो याचा विचार करत नाही. म्हणूनच जातिव्यवस्थेने या देशातल्या एससी,एसटी,ओबीसी आणि महिलांचा जो छळ केला आहे,करत आहेत यापासून या सर्वांना सावध करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करतांना आपण त्यांचा कोणता आदर्श घेतला आणि त्यांचे काय आचरण करतो,यांचे आत्मचिंतन अपेक्षित आहे.पण ते कोणी करावे?. आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जागते. आणि आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते. यावरूनच आपला प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे हे चित्र स्पष्ट होते.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
