नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2024: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, एनईटीएफचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे, तसेच एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
51 केंद्रांवर एकाच वेळी सुरू झालेल्या या हॅकेथॉनमध्ये देशभरातील विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, आणि मार्गदर्शकांनी सहभाग घेतला. यंदाच्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आवृत्त्यांसाठी एकूण 2247 संस्था स्तरावरील हॅकेथॉनमध्ये 86,000 हून अधिक संघांनी भाग घेतला.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करताना, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहे. नवोन्मेष, सळसळता उत्साह आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता जगभरातील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता राखते,” असे सांगितले.
2024 च्या हॅकेथॉनसाठी 54 मंत्रालये, राज्य सरकारे आणि उद्योगांनी 250 हून अधिक समस्या विधाने सादर केली. या समस्यांमध्ये इस्रोचे ‘चंद्रावरील गडद प्रदेशांचा अभ्यास,’ गंगा जल गुणवत्ता निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, तसेच आयुष मंत्रालयाचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट योग मॅट’ असे महत्त्वाचे विषय समाविष्ट होते.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 पासून सुरु झाल्यानंतर, या कार्यक्रमाने देशभरातील तरुण नवोन्मेषकांना जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यंदाच्या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा, शाश्वतता, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि स्मार्ट तंत्रज्ञान यांसारख्या 17 प्राधान्य क्षेत्रांवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
कार्यक्रमाचा उद्देश युवा भारताच्या नवकल्पनांमुळे 21व्या शतकातील भारताला ज्ञान अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यास सक्षम बनवणे हा आहे.