आंबेडकर…! आंबेडकर….!आंबेडकर…..!

बातमी शेअर करा.

आंबेडकर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, तर जगातील शोषितांच्या हृदयात धगधगत ठेवलेली ऊर्जा आहे. आंबेडकर हे नाव घेतले की, समाजाच्या विषमतेविरुद्ध लढणाऱ्या एका योद्ध्याची आठवण होते. त्यांनी फक्त भारतालाच नव्हे, तर जगभरातील अन्यायग्रस्त आणि शोषितांना प्रेरणा दिली आहे.

आजही आंबेडकर यांचा प्रभाव कोणत्याही भाषणात, चर्चेत किंवा चळवळीत अनुभवायला मिळतो. त्यांचे विचार म्हणजे सूर्याच्या किरणांसारखे आहेत, जे अंधकाराचा नाश करून उजेड पसरवतात. त्यांचं अस्तित्व गुलामांच्या बेड्या तोडणाऱ्या आवाजात ऐकायला मिळतं, तर त्यांचा इतिहास मनुवादाच्या छातीत धडधडत असतो.
आंबेडकरांच्या संघर्षातून शोषितांना जगण्यासाठी नवा विश्वास मिळाला. त्यांनी केवळ संविधान रचले नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांसाठी एक नवा मार्ग दाखवला.
आंबेडकर हे त्या प्रत्येकाला साथ देतात, जो अन्यायाविरुद्ध लढतो. ते केवळ एका कालखंडापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर जगभरातील शोषितांच्या मुठीत बंदिस्त असलेली शक्ती बनले आहेत.
त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेकांनी आपल्या बेड्या तोडल्या, शिक्षण घेतलं, स्वाभिमानाने उभं राहणं शिकलं. आंबेडकरांनी शिकवलं की, केवळ शिक्षणाचं बळच शोषण आणि विषमता संपवू शकतं. आज प्रत्येक तिरस्कृत नजरेत आणि भयग्रस्त प्रश्नांत आंबेडकरांचा इतिहास जिवंत आहे.
तुम्ही जिथे जिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता, जिथे जिथे क्रांतीचा शंख निनादतो, जिथे जिथे स्वातंत्र्याचा लढा सुरू असतो, तिथे आंबेडकर आहेत. त्यांच्या विचारांचं तेज कधीही मावळणार नाही; ते कायम शोषितांच्या जिवंत उर्जेचा स्त्रोत राहतील.
आंबेडकर म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे, तर एका युगाचं नाव आहे, जे प्रत्येक अन्यायग्रस्ताला त्याच्या स्वाभिमानाची आठवण करून देतं.!

रतनकुमार साळवे
९९२३५०२३२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *