
सध्या आंबेडकरवादी,आंबेडकरी विचारधारा…वगैरे शब्द सर्वांच्या ओळखीचे झालेत.असे शब्द वापरणारे मग आपल्याच विचारसरणीचे आहेत असं वाटून जातं. कारण असे जड शब्द वापरणारे लोक आंबेडकरी विचारधारा असे नाव असलेला व्हाट्सअप गृप करतात.त्यावर अधून मधून,येथे कोणतीही गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग चे मेसेज तसेच विनोद टाकू नये अशा शिस्तबद्ध शब्दात सूचना देतात.मग ही शिस्त बघून गृपच्या ॲडमिन चं खूप कौतुक वाटतं.काही दिवसांनी लक्षात येतं,की अरे ही तर महाविकास आघाडीची पैदास आहे.पण ही पैदास शरद पवारांची उबठा,की इंदिरा काँग्रेसची हे निश्चित करायला मार्ग नाही.
ग्रुपचं नाव आंबेडकर विचारमंच,आंबेडकरवादी विचारधारा….वगैरे काही असलं तरी यांना महाविकास आघाडीच सत्तेत येण्याची स्वप्न पडतात.काही दिवसांपूर्वी मी आंबेडकरी चळवळीसाठी सर्वस्व अर्पण करा हा लेख लिहिला.त्यात अर्थातच आंबेडकरी राजकीय चळवळीतून बाहेर पडून जे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षात गेलेत त्या फळपुट्या रिपब्लिकन नेत्यावर संताप व्यक्त केला.आणि लगेच रिपब्लिकन नेत्यांवर आगपाखड करू नये असं मला सांगण्यात आलं.काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांना नावे ठेवू नका अशी ही प्रेमळ सूचना केली.माझ्यावर बसपा समर्थक कांशीराम चेला वगैरे सिक्का मारला गेला.मी त्यांना विचारलं तुमचा राजकीय पक्ष कोणता? मागील निवडणुकीत तुम्ही कोणाला मते दिलीत? यापैकी दुसऱ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं. पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलं ते अतिशय चिड आणनारं होतं. सध्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात काम करत नाही असं ते उत्तर होतं जी लोकं असे उत्तरं देतात ती लोकं स्वतःला आंबेडकरवादी,आंबेडकरी विचारधारेचे…मानतात. हे ढोंगी माणसं असतात.असं उत्तर देणारी माणसं ही आंबेडकरवादी विचारधारेची नसतात.ही माणसं या विचारधारेला लागलेली कीड असते.ही माणसं आंबेडकरी विचारधारा जोपासणारी नसतात तर या विचारधारेच्या विरोधी असतात.
माझ्यामते आंबेडकरी चळवळीचे सांप्रत स्थितीत चार भाग पडायला हवेत.धार्मिक चळवळ,सामाजिक चळवळ,आर्थिक चळवळ आणि राजकीय चळवळ.बाबासाहेबांनी सत्ता ही सर्व समस्यांची चाबी आहे असं सांगितलं आहे.त्यामुळे त्यांनी राजकीय पक्षाची संकल्पना मांडली.कृषक मजदूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाने राजकारणही केलं.सत्तेचं महत्त्व पटलं तरी ते घाईघाईने काँग्रेसमध्ये गेले नाही.सत्तेत आपला समाज म्हणजे 59 जाती स्थिर व्हाव्या म्हणून स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली.राजकीय आरक्षण दिले.स्वतः दोन वेळा निवडणूक हरले तरी काँग्रेसमध्ये गेले नाही.आज आंबेडकरी विचारधारा सांगणारे लोक,आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही म्हणणारे लोक कुणासाठी काम करतात? या प्रश्नाचे वेगळे उत्तर देण्याची आवश्यकता नसावी.दलितांवरील अन्याय अत्याचार संपवायचा असेल तर सर्व आंबेडकर वाद्यांनी आणि आंबेडकरवादी जनतेने खोकेवाले सरकार खाली खेचले पाहिजे,राज्यात MVA चे सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा आहे असे विचार आंबेडकरी विचारधारा सांगणारे सांगतात.त्यामुळे हे आंबेडकरवादी नाही तर हे काँग्रेस,उबाठा आणि शरद पवार वाले आहेत.अशा संधीसाधू लोकांनी आंबेडकरी राजकीय चळवळ संपविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
आंबेडकरी राजकीय चळवळ अस्तित्वात आल्यापासूनच अशा बेईमानांची एक मोठी फळी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाली.आपल्यावरील अन्याय अत्याचार संपविण्यासाठी बाबासाहेब काँग्रेसच्या दरबारात कधीही फिरकले नाही. मात्र स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारे आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर काँग्रेसकडे शोधतात. आणि तरीही स्वतःला आंबेडकरी विचारधारेचे मानतात. का ? कारण बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांना काळं कुत्रही विचारत नाही.महारांची मते मिळवून दिल्याशिवाय काँग्रेसही यांची बक्षीस देत नाही.त्यामुळे पूर्वी आपला पक्ष निवडून येऊ शकत नाही त्यामुळे भाजप सत्तेत येईल हे भय निवडणूक काळात पेरले जायचे.आता घटना वाचवायची असेल तर काँग्रेसला आणि उबाठा तसेच पवारांना म्हणजे शरद पवारांना एकूणच MVA ला मते दिल्याशिवाय पर्याय नाही असे भय आंबेडकरी जनतेत पेरले आहे.आणि पेरणी सुरूच आहे.पण संविधान वाचविण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन काँग्रेसचे ओझे वाहण्यापेक्षा या जबाबदारीतून आणि काँग्रेसच्या ओझ्यातून आंबेडकरी जनतेने मुक्त झाले पाहिजे.कारण संविधान हे सर्वांसाठी बनलेले आहे.त्याचे मोल राजकीय पुढार्यांना अधिक आहे.सततचा सत्तापालट आणि या पक्षातून त्या पक्षात नेत्यांची वर्दळ वाढलेली आहे.ती फक्त सत्तेसाठी आहे.या देशातील संविधान संपवून हुकूमशाही कडे वाटचाल सुरू आहे आणि जनमत तशाच दिशेने चालले आहे असं वाटण्याचं कारण नाही.तसं असतं तर शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपात जाऊन मुख्यमंत्री झाले नसते. अजित पवारांनी काकांशी दगाबाजी करून उपमुख्यमंत्री पद भोगले नसते.
भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशा कोलांट उड्या मारणारे लोक सत्ता मिळविण्यासाठीच ही कसरत करीत आहेत. ही शेवटची निवडणूक ती शेवटची निवडणूक आणि मग लोकशाही संपेल असा प्रचार कांग्रेसचं काम करणारे आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणारे लोक आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहेत.एक लक्षात ठेवा, या देशात जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया आहे तोपर्यंत लोकशाही आहे.आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नेतेही आहेत.सर्व हुकूमशाहीचे समर्थक असते तर मोदींच्या हातात सत्ता दिली असती आणि सारे निष्क्रिय झाले असते.पण सत्तेसाठी सगळ्यांचा आटापिटा चालला आहे.यात कोण पुढे गेला आणि कोण मागे राहिला या प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकरी जनतेने राहू नये.यात आपण कुठे आहोत? या प्रश्नाचा शोध घेतला पाहिजे.आपले स्थान हमालासारखे नको.आणि ते नको असेल तर आपला राजकीय पर्याय उभा केला पाहिजे.आपला समाज अजूनही गुंगीत आहे तो शुद्धीवर येऊन विचार करताना दिसत नाही.त्यामुळे त्याला भाजप सेनेच्या भयाने पछाडले होते.आता 2014 पासून तो संविधानाच्या भयाने पछाडला आहे.जादूच्या कांडीने संविधान बदलणार नाही.घटना खूप ताठर किंवा लवचिक नाही त्यात काळानुरूप काही बदल करायचे असल्यास अशी योग्य तरतूद केलेली आहे. त्या आधारावरच काँग्रेसने सर्वात जास्त दुरुस्त्या केल्या आहेत.आता सत्ता हातातून निसटतांना दिसते आहे आणि थोडा आंबेडकरी जनतेचा राजकीय पर्याय उभा राहताना दिसायला लागला तर यांना संविधान धोक्यात आल्याचे स्वप्न पडू लागले.त्यासाठी आंबेडकरी जनतेला हाक देऊन त्यांची मते मिळविण्याचा डाव काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उबाठा आणि मित्र पक्षांनी साधला आहे.
संविधानावर प्रेम करणारे हे पक्ष मात्र स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत . त्यासाठी त्यांना आंबेडकरी राजकीय चळवळ संपवायची आहे.आताशा शेकड्यावर आंबेडकरी राजकीय पक्ष आहेत.पण निवडणुकीच्या मैदानात कोणीही नाही.हे सारे पाठिंबाचे अधिकारी आहेत.नामांतराच्या लढ्यातील अनेक भीमसैनिक नामांतराचे राजकारण करीत मोठे झाले.समाजाने त्यांना भरभरून प्रेम दिले. सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय पुढारी असा त्यांचा प्रवास आंबेडकरी जनतेने बिन तक्रार मान्य केला.नामांतरासाठी लढणाऱ्या नेत्यांवर प्रेमाचा पाऊस पडला.आज ते सारे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना असा प्रवास करून भाजप सेनेच्या विजयासाठी दोन बोटे दाखवताना दिसतात.निवडणुकीत यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.काहींना उमेदवारच उभे करण्याची संधी भाजप शिंदे सरकारने दिली नाही.म्हणजे त्या पक्षात जाऊनही ते राजकीयदृष्ट्या बहिष्कृत आहेत. राजकारणात काहींचं पुनर्वसन झालं तर काही अजूनही अस्थिर आहेत.एकीकडे बाबासाहेबांचं नाव घेत आंबेडकरी जनतेशी धोकाबाजी करणारे हे नेते आहेत तर दुसरीकडे संविधान प्रेमी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा आहे. हे गणित जरा विचित्र वाटत असले तरी आपल्या अस्तित्वासाठीच सारे प्रयत्न करत आहेत.सध्या उबाठा,राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे.यातील अनेक नेते भाजप शिंदे कडे गेले आहेत,तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत.संख्याबळाच्या कारणावरून विधानसभेत अजून विरोधी पक्ष नेता निवडला गेला नाही.मग निवडणुकीत संविधान प्रेमाने पछाडलेले हे लोक सविधान प्रेमासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश का करीत नाही ? पण हे तसे करणार नाही.कारण यांचं संविधान प्रेम बेगडी आहे,असा त्याचा अर्थ होतो.त्यांचे मनसुबे कितीही जहरी असले तरी केवळ संविधानासाठी आपण आपल्या मतांची किंमत न समजता यांच्या बहकाव्यात जातो.
कोणतीही चळवळ उभी करायला साहित्यिकांची मोठी भूमिका असते.आंबेडकरी साहित्यात अनेक नावाने संमेलने होतात.त्यात मोठ्या प्रमाणावर चरित्र,आत्मचरित्र,कविता संग्रह,नाटक,कादंबरी,वैचारिक लेख.वगैरेंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली.या निर्मीतीचा आणि त्या साऱ्या साहित्यिकांचं मनापासून स्वागत आहे. कौतुक आहे.पण साहित्यिकांनी राजकीय चळवळीसाठी फार मोठे योगदान दिल्याचे दिसून येत नाही.2014 पासून आपले साहित्यिक बऱ्यापैकी धास्तावलेले आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मते देण्यासाठी विनंती करणारा मजकूर सोशल मीडियावर बराच फिरताना दिसून आला होता.त्या मजकुराखाली अनेक नामवंत साहित्यिकांची विनीत म्हणून नावे होती.आणि कुणीही या मजकुराशी माझा संबंध नाही असा खुलासा केला नाही.म्हणजे त्यांनी आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीला मत देण्याची विनंती केली होती,असा सरळ अर्थ होतो.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन आंबेडकरी राजकीय चळवळीला संपविण्याचा आणि त्या मतावर आपला हक्क सांगण्याचा कावा आपण समजू शकतो. पण आपल्या साहित्यिकांनी त्यांची पाठराखण करणे हे अनाकलनीय आहे.किंवा मागेपुढे आपला सत्कार आणि पुरस्कार देणारे हेच पक्ष आहेत असं ते समजून आहेत का? काही लेखकांनी प्रकाश आंबेडकरांची बाजू मांडली.त्यांना अंदभक्त वगैरे नाव ठेवण्यात आले.आंबेडकरांनी युती केली नाही असे अनेकांनी सांगितले.का केली नाही? हे कोणीही सांगितले नाही.
स्वतः प्रकाश आंबेडकरांनी त्यांची बाजू प्रसार माध्यमांकडे मांडली आहे.पण MVA च्या प्रेमात आंधळे झालेल्या कार्यकर्त्यांना आणि साहित्यिकांनाही ते बघता आले नाही.शेवटी मी बसपाचा कार्यकर्ता होतो.बसपावर ,बहन मायावती वर आणि मान्यवर कांशीरामजी यांच्यावरील टीका मला आजही आवडत नाही.पण महाराष्ट्रात बसपाचा म्हणावा तसा जोर नाही. आणि सध्या सर्व आंबेडकरवादी राजकीय पक्ष दुसऱ्यांच्या वळचणी खाली मजा मारतायत.अशात प्रकाश आंबेडकर हे आपली राजकीय चळवळ पुढे रेटत आहेत.आणि त्यांच्या मागे समाज आहे.ज्यांच्या मागे समाज आहे तेच आता ऐक्य आहे दुसऱ्या कोणत्याही ऐक्याच्या फालतू फाजील गोष्टी करीत बसण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.काळ वेळ परिस्थितीत आपण बदलू शकलो पाहिजे.सध्या तरी आपण लोकशाही मानत असलो तर समाजाचा अधिक कल प्रकाश आंबेडकरांच्या दिशेने जातो.त्यात बहुजन समाजही त्यांच्या पाठीशी बऱ्यापैकी उभा आहे.म्हणून समाजाचा नेता प्रकाश आंबेडकरच आहेत असं म्हणायला हरकत नाही. महाविकास आघाडीशी मैत्रीपूर्ण आणि सन्मानपूर्वक युती झाली तरच आंबेडकरी जनतेने महाविकास आघाडीला मते द्यावीत.अन्यथा आपली बहुमूल्य मते प्रकाश आंबेडकरांच्या पक्षालाच दिली पाहिजेत. कारण निवडणुकीच्या रणांगणात ते एकटेच शस्त्र घेऊन उभे आहेत. बाकीच्यांनी आपली शस्त्र टाकून दिलीत.आणि हुजरे म्हणून शिल्लक राहिले आहेत.त्याचबरोबर साहित्यिकांनी आपली लेखणी सतत झिजवत राहायला हवी.कारण परिवर्तनाच्या प्रक्रियेत साहित्यिकांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे.आंबेडकरी राजकीय चळवळ तग धरण्यासाठी साहित्यिकांचा मोठा वाटा अपेक्षित आहे.राजू बोरकर ७५०७०२५४७६मु.पो.ता.लाखांदूर,जि.भंडारा
