
अभिनंदन वर्षाताई!
तुमचे त्रिवार अभिनंदन.
“आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे मुंबईचे आद्य नागरिक आहेत.” मुंबईच्या भूमिपुत्रांचा हा आवाज,आज दिल्लीत गरजला.काँग्रेसच्या महिला खासदार आदरणीय वर्षाताईंच्या बाणेदार वाणीतून.मुळात मुंबई ही महामाया एकवीरा मातृसत्ताक संस्कृतीची नगरी आहे.जिचा इतिहास २५०० वर्षांच्या तथागत गौतम,बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा आहे.लग्नात हुंडा न घेणे.अर्थ सत्ता,व्यापार हा महिलांच्या हाती देणारा मूळ मुंबईकर आहे.लग्न विधी विधवा महिला पुरोहित यांच्या कडून करून घेणारा,मनुस्मृती विरोधक,सर्वात जास्त सुसंस्कृत मानवी जीवन मूल्ये जगणारा असा हा ओबीसी समाज आहे.मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा,रामायण, महाभारत यातील पुरुषसत्ताक संस्कृतीच्या विषमतेला पर्याय देणारी समतेची ही आगरी कोळी संस्कृती आहे.ठाणे,पालघर,मुंबई,रायगड या ऐतिहासिक अपरान्त प्रदेशाची खरी ओळख आपल्याला विदेशी इतिहासकार पेरीप्लस टॉलेमी यांच्या लिखित पुरातत्वीय संशोधन साधनात मिळते.
भारताचे उच्चवर्णीय इतिहासकार,लेखक,साहित्यिक,विचारवंत,राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांनी सागरपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांना कायम नाकारले.आज खऱ्या अर्थाने मातृसत्ताक मुंबईची लाडकी लेक सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाड,संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या “कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर” या निसर्ग न्यायाने,कुळ कायद्याच्या तत्वावर,आमच्या पाठी उभी राहिली.त्याचा प्रचंड अभिमान इथल्या गावठाणाना कोळीवाड्याना आहे.महाराष्ट्राच्या विधान सभेने २०१६ / १७ मध्ये कोळीवाड्याना झोपडपट्ट्या म्हटले.गलिच्छ वस्त्या,SRA म्हटले.जुनी मनुनिर्मित शिवी आम्हास महाराष्ट्र सरकारने दिली.तत्कालीन सारे राजकीय पक्ष ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्च जातीय जमीनदार, सरंजामी स्वभावाचे होते.या विरोधात आम्ही आगरी कोळी भंडारी लोक सरकारच्या अन्याय करणाऱ्या धोरणा विरोधात,घरे गावठाणे हक्कांचे आंदोलन सुरू केले.भाजपच्या आमदार ऍड.आशिष शेलार यांनी त्याची दखल घेतली.विधान सभेत कोळीवाडा गावठाणे यांच्या सीमांकनाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला.मनुवादी चेहऱ्याचा भाजपा काही प्रमाणात बदलला.लोकसभेतल्या वर्षाताईंच्या वक्तव्याने राष्ट्रीय काँग्रेसही बदलतेय?. महाराष्ट्र मराठा काँग्रेस बदलेल काय? आगरी कोळी ओबीसींना गावठाण जमीन हक्क देईल काय?
मुंबईच्या आगरी कोळ्यांची जमीन पाच कोटी ते दहा कोटी गुठ्यांची आहे.या दरात भावात,एका गुंठ्यात,महाराष्ट्रात १००ते पन्नास एकर जमीन मिळते.म्हणूनच मौल्यवान मुंबईची लूट हेच सर्व पक्षीय राजकीय नेते आणि बिल्डर महायुतीचे शोषण आमच्या वाट्याला रोज येत आहे.सांताक्रूझ मुंबई येथील डेनिस डिसुझा यांच्या सरकारी सनद असलेल्या मालकी जागेत वारस नोंद न करता परप्रांतीय बिल्डर घुसले आहेत.
हजारो कोटींची ही जमिनचोरी,पोलिस,मुंबई महानगर पालिकेच्या युतीतून सुरू आहे.खासदार वर्षाताईंचा हा मतदार संघ आहे.कुर्ला,मरोळ,अंधेरी येथील सर्व ईस्ट इंडियन वस्त्या अल्पंख्यक ख्रिश्चन यांना गावठाण जमिनीतून हद्दपार केले जात आहे.आम्ही आगरी कोळी भंडारी एकत्र येऊन लढत आहोत.भंडारी नेते मनोजभाई माशेलकर, मार्शल कोळी यांचा पुढाकार महत्वाचा ठरतोय.
मुंबईच्या भूमिपुत्रांच्या शेती,मासेमारी,बागायत,रेती,विटा,जलवाहतूक,सागरी व्यापार या व्यवसायांचे पुरावे महसूल दफ्तरी सापडतात.परंतु जिल्हाधिकारी भूमिअभिलेख कार्यालयातील घाटावरचे अधिकारी मुंबई महानगर पालिका प्रशासन,हे सारे दुर्लक्षित करतात.“पैसा बोलता है?.” याच तत्वाने आम्ही उच्चजातीय लोकांकडून आजही लुटले जात आहोत.आम्ही ओबीसी आमच्या गावठाण हक्कांबाबत जागे होणार कधी? “जिवंत सातबारा” ही चंद्रशेखर बावनकुळे या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याची योजना मुंबई साठी नाही का?. डेनिस डिसुझा यांच्या परिवाराची वारस नोंद होईल का? की शर्मा कोठारी,लोढा,अदानी यांना मुंबई भाजपाने विकली आहे?
खासदार वर्षाताई यांनी मुंबईत १८९ गावठाणे तर ३६ कोळीवाडे आहेत.त्यातील फक्त ५२ गावठाणे आणि २२ कोळीवाडे मुंबई विकास आराखड्यात आहेत.असे म्हटले आहे.अर्थात “गावठाण “हा कायदा आहे.जो कोळीवाड्यानाही लागू होतो.तो भारतीय संविधानाच्या आर्टिकल ४० नुसार गावे,गावठाणे,ग्रामसभा संघटित करण्याचे दिशादर्शन करतो.स्वातंत्र्या नंतर आम्ही बकाल वाढणाऱ्या शहरांचे नियोजन करण्याचा प्रयत्न जरूर केला?. परंतु गावांचे नियोजन केले नाही.हे कटू सत्य स्वीकारावेच लागते.ग्राम पंचायतीला आजही नियोजन अधिकारी नाही.सरकारी नियोजन नसल्याने मुंबई ठाणे रायगड पालघर येथील आमची घरे,गावे अतिक्रमणे,अनधिकृत ठरवून ती एस आर ये,बिल्डर यांच्या घशात घालणारे नगर विकास खाते,ब्राह्मण मराठा वैश्य वृत्तीने आमच्या जमिनीचा बाजार मांडून बसले आहेत.त्यांचा जाहीर निषेध आम्ही केला पाहिजे.कोणत्या पक्षाकडे भारतीय राष्ट्रवाद आहे? जे ८५ टक्के स्त्रिया,ओबीसी,एससी, एसटी या भूमिहीन भारतीयांना जमीन मालकी द्यायला तयार आहेत?. इंग्रजांनी १९३०/३१ ला केलेला भारताचा जणगणना करून केलेला सर्व्हे नकाशा म्हणजे “मूळ गावठाण” हे आज एक एकराचे आहे.तर नैसर्गिक लोकसंख्या वाढीनुसार ते १००एकरापेक्षा अधिक वाढले आहे.जुन्या मूळ गावठाणा नंतर जिल्हाधिकारी,भूमी अभिलेख,यांनी विस्तारित गावठाण दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणने नुसार वाढविले नाही.महसूल विभाग झोपा काढत आहे.याचा सर्वात अधिक त्रास आगरी कोळी भंडारी मुंबईकर लोकांना होतोय.
मुंबई वर सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना भाजप या कडक हिंदुत्ववादी युतीने त्याच प्रमाणे सॉफ्ट हिंदुत्ववादी काँग्रेस राष्ट्रवादीने आगरी कोळी गावठाणे यांना झोपडपट्ट्या SRA समजून मोजली.हा अन्यायच आहे.ती आधुनिक मनुस्मृती आहे.मुंबईच्या गावठाण हक्कांची चळवळ ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर,आगरी नेते नारायण नागू पाटील,भंडारी नेते सी के बोले यांच्या प्रेरणेतून सुरू झाली.ती खोती,जमीनदारी नष्ट करणारी,संविधानिक समतेची चळवळ आहे.कोळीवाडे गावठाणे,अगदी आमच्या एससी एसटी भावांच्या झोपडपट्ट्यांचीही गुलामी संपून,त्यांना जमीन मालकी हक्क मिळून स्वयं विकास करता यावा हे या चळवळीचे ध्येय आहे.
अलीकडे मां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं पुनर्विकास योजना मुंबई येथे राबविण्याच्या योजना जाहीर केल्या.त्या आगरी कोळी सागरपुत्र समाजासाठी नाहीत का?म्हणूनच आम्ही आमच्या जमीन हक्कांचा मूळ सातबारा शोधला पाहिजे. लोकवर्गणी काढून गावकमिटी केली पाहिजे.मूळ गावठाण विस्तारित गावठाण, वापरातील मोकळ्या जागा,घरे,रस्ते यांचा नकाशा बनवून तो महसूल विभागास सादर केला पाहिजे.चळवळ उभारून लोकप्रतिनिधी,प्रशासन,न्यायालये जागवली पाहिजेत. पत्रकार बांधव जागृत समाजसेवक यांना घेऊन रस्त्यावरची लढाई उभी केली पाहिजे.मी २०१९ साली लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीतून याच गावठाण जमिनीसाठी लढलो.आदरणीय ऍड प्रकाशजी आंबेडकर,खासदार बॅरिस्टर असरुद्दीन ओवेसी यांची शिवाजी पार्क वर गावठाण हक्कासाठी झालेली ऐतिहासिक सभा माझ्या जीवनातला सर्वात मोठा सुवर्णक्षण होता.लोकसभेत खासदार वर्षाताई म्हणाल्या, “आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांच्या गावठाणांचे सीमांकन व्हावे.” त्यांची विकास आराखड्यात नोंद व्हावी. लोकसभेतली ही मागणी देशातील गावे जी एकूण शहरांपेक्षा अधिक आहेत.त्या गावठाण विस्तार चळवळीस चालना देणारी मागणी आहे.मुंबई ठाणे,रायगड पालघर कोकण,महाराष्ट्र आणि भारतात ही जागृती यावी.अशी इच्छा ठेऊन मी २०२४ ची मावळ लोकसभा बहुजन समाज पार्टीतून लढलो.गावठाण हा प्रश्न जरी खेड्यांच्या नियोजनाचा असला तरी तो राष्ट्रीय प्रश्न आहे.७३ वी घटना दुरुस्ती करणारे,लोकशाहीत सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा ठराव मांडणारे, माजी पंतप्रधान राजीवजी गांधी, ग्राम पंचायतींना संसदे इतके अधिकार देतात.आज खासदार वर्षाताई यांनी पंचायत राज म्हणजे गावठाणाचा अधिकार लोकसभेत मांडून त्या दुरदर्शी नेतृत्वाला खरी आदरांजली वाहिली.
स्वार्थासाठी स्मार्ट सिटी,धारावी कोळीवाडा,सायन कोळीवाडा यांचा एस आर ए करणाऱ्या व्यापारी बिल्डर लॉबीला,सिडको,नैना यांना गावठाण हक्कही समजावेत. आम्ही शहरांचे शिल्पकार हे बिरूद मिरवणारी सिडको सारखी संस्था ओबीसींच्या गावांना उध्वस्त करतेय.मग गाव गावठाणे यांचे नियोजन करणारी एखादी संस्था शासन निर्माण करील का? शासनाला शहाणपण येईल,अशी आशा मी नम्रपणे व्यक्त करतो.आमच्या सर्व आमदार खासदार,नगरसेवक,ग्राम पंचायत सदस्य,यांना दिल्लीतल्या या वर्षाताईंनी मांडलेल्या,गावठाण हक्कांच्या वेदना कळाव्यात,हीच प्रामाणिक इच्छा आहे.या गावठाण हक्कास विरोध करणाऱ्या माझ्या मुंबई कर लाडक्या बहिणी आणि नवी मुंबईकर लाडके भाऊ यांनी आतातरी समजून घ्यावे.मुंबई पुणे,नाशिक,नागपूर यांसारखी,नवी मुंबई,नवी दिल्ली ही शहरे कितीही वाढली तरी त्यांना जन्म इथल्या खेड्यांनी दिलाय.ती जपली पाहिजेत.त्यांचा क्लस्टर एस आर ये.करणारे राजकारणी बिल्डर ही जमात आधुनिक देशी शोषक,लुटारू आहेत.त्यांना भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांनी संविधानिक विरोध करणे म्हणजे छत्रपती शिवराय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला रयतेचा, शूद्र अतिशूद्र स्त्रिया याच्या घरे जमिनी गावठाणे यांची मालकी देणारा मागास वर्गीय राष्ट्रवाद आहे.चला लढू या आपल्या हक्कांच्या घरे गावठाणे यांच्या जमिंन हक्कासाठी.
मान.खासदार वर्षाताई आपले मनापासून आभार.
तुमचा छोटा भाऊ.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.
