“झुंज दे आता ” हा नागसेन टी. गोडसे या कवी मित्राचा कवितासंग्रह हातात पडला .आणि संपूर्ण कवितासंग्रह वाचून काढला नागसेन माझा 30/ 32 वर्षांपासूनचा मित्र आहे. मी अनेक क्षण त्याच्यासोबत घालविले आहेत .कुरळे केस, सावळा रंग आणि पाणीदार बोलके डोळे इतकं त्याचं वर्णन पुरेस आहे. त्याहून काही बोलायचं, सांगायचं झाल्यास तर तो हरहुन्नरी कलाकार आहे. तसे प्रत्येक माणसात नानाविध रंग असतात .पण बरेचदा अनेकांना आपल्यातील रंग कळत नाहीत .आणि कळलेत तर ते आयुष्यात रंग भरत नाहीत. नागसेन त्यामुळेच वेगळा आहे .इतर अनेकांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याने त्याच्यातील अनेक रंगांचा वापर केलाय .त्याने त्याच्या आयुष्यात रंग भरलेत. तो मूर्तिकार आहे .तो उत्तम चित्रकार आहे. तो लेखक आहे. तो गायक आहे .आणि तो उत्तम नट ही आहे .त्याच्या अभिनयाची आठवण आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याच्याकडे हजरजबाबीपण आहे. जीवनाकडे विनोद बुद्धीने पाहण्याची त्याच्याकडे दृष्टी आहे.” झुंज दे आता ” हा कवितासंग्रह आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण द्यायला तो माझ्याकडे आला त्यावेळी माझ्यासोबत माझे एक मित्र होते मी ओळख करून देताना म्हटलं, हे माझे मित्र नागसेन गोडसे. त्यावर नागसेन लगेच म्हणाला,’ मी नथुराम गोडसे चा नातेवाईक नाही. आणि गांधीच्या खुणाशी माझा संबंध नाही. आणि मग एकच हसा पिकला. नागसेन हळव्या मनाचा माणूस आहे .त्याचे भाव विश्व प्रचंड व्यापक आहे. त्याच्या भाव विश्वाच्या व्यापकतेचे प्रतिक म्हणजे त्याचा “झुंज दे आता ” हा कवितासंग्रह आहे .
“झुंज दे आता ” हा कवितासंग्रह म्हणजे दलित, पीडित, शोषित ,शेतकरी, शेतमजूर कामगार आणि बेकार इत्यादी च्या समस्यांचं प्रतिनिधित्व आहे. दुःख, दारिद्र्य, उपासमार हे सार काही नागसेन गोडसेच्या कवी मनाने अचूक टिपलेलं आहे . त्यामुळे त्या कविता अनेकदा आपल्या जगण्याचं प्रतिबिंब त्यात दाखवतात. त्यामुळेच कवी नागसेन गोडसे आपला आणि आपल्यातील वाटतो. त्याच्या कविता आपल्या वाटतात . त्याच्या कविता संग्रहात त्याच्या पुरत्या न राहता आपल्याशी नातं सांगणाऱ्या वाटतात. त्याची काही उदाहरणं पाहू,. ‘ पुन्हा उगवेल, कवितेत कवीने शेतकऱ्याचे दुःख अगदीच विदारकपणे मांडलं आहे. आपल्याला जे धान्य मिळतं ते मिळवायला शेतकऱ्याला किती अग्नी दिव्यातून जावं लागतं ते कवीने ने अचूक टिपलेलं आहे .कधी ओल्या कधी सुक्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. धान्य असो की भाजीपाला निसर्गाच्या लहरीपणाने ही पिके अनेकदा संकटात येतात. कधी खूप पावसाने पिके सडतात तर कधी पाऊस पडतच नाही. तेव्हा पिके करपतात आणि शेतकरी अनेकदा दुबार पेरणीच्या संकटात सापडतो .तेव्हा नागसेनचं कवी मन त्या वेदना शब्दबद्ध केल्याशिवाय कसा राहील ? कारण हे कधीतरी त्यांनं भोगलेलं असतं. त्याच्या कुटुंबांनं त्याच्या जवळच्या माणसांनं भोगलेलं असतं. मग तो लिहितो ,’ ढगांनी दाटलेला आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळतो कष्टातून सजवला वावर बांधा बांधातून वाहतो अगा नाही केली आशा ढगफुटी पावसाची धाण सडला पाण्याखाली गाठ भिजली आशेची ‘इतकं सगळं घडून गेल्यानंतरही शेतकरी राजा खचत नाही. त्याचा आशावाद संपत नाही. तो दुबार पेरणीच्या कामाला लागतो .’ म्हणे गेले तिथे पुन्हा उगवेल जोडीने नांगरतो …’या ओळीतून तो परत उभा राहतो.
कवी नागसेनच्या मनात देशप्रेम काठोकाट जाणवतो. देश एकसंघ ठेवण्यासाठी आपल्यातील भेदभाव संपला पाहिजे असं त्याला वाटतं. जात ,धर्मात अडकून देश सेवा करता येत नाही असाच संदेश तो ‘जय हो ‘ या कवितेत देतो . तो लिहितो ,’चल तोडून टाकू बंधने भेदाची सारे एकची रंग असतो अवघ्या डोळ्यातील आसवांना..’हे वास्तव कवी सहज शब्दात मांडतो. धर्मवाद ‘जातीवाद आज प्रचंड पाहायला मिळतो .त्यात माणसं मनाने दुभंगलेली आहेत. माणूस म्हणून सुसंवाद संपत चाललाय. अशावेळी ,जय हो ‘ ही कविता अखंड देशाचे स्वप्न पेरते .हा देश दिन दुबळ्यांचा ,भुके कंगालांचा आहे का? असा मला नेहमीच प्रश्न पडतो. तोच प्रश्न कवी नागसेनलाही पडलेला आहे. भांडवलदारांचे शोषण काही केल्यात थांबत नाही. संपत नाही. त्यामुळेच बालकामगारांना कामाला जुंपलं जातं. ती समस्या तुमच्या माझ्या डोळ्यांनी टिपली असली तरी आपण सवयीचे गुलाम झालो आहोत.पण कवीने त्याच्या दृष्टीतून सुटू दिले नाही .कवी हे बघून अस्वस्थ होतो. आणि बालकामगार ही कविता जन्माला येते. कारण ते सारं काही कवीने भोगलेलं असतं म्हणून तो लिहितो ,’चला मित्रांनो …आता ही प्रथा मोडलीच पाहिजे या भांडवलशाही शहरापासून दूर आपले गाव वसवू ते श्रमिकांचे गाव असेल पण तेथे बालकामगार नसेल…’ बदलत्या जीवनशैलीत काय बदलले आणि त्याचा कुटुंब व्यवस्थेवर, समाज व्यवस्थेवर काय परिणाम झाला ते जुनी घर आणि नवी घर यात एक फरक प्रकर्षाने जाणवतो. जुन्या घरांच्या भिंतींना खिळे ठोकलेले असायचे. त्या खिळ्यांत आप्तांचे किंवा आपल्या महापुरुषांचे फोटो टांगलेले असायचे. त्यातून त्यांच्या आठवणी, त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे उभा ठाकायचा .पण आता ते दिसत नाही. अगदी कवीच्या भाषेत सांगायचे तर ते असे आहे .तो लिहितो ,,’गाव घरातून बाहेर पडणारी हवेली रंग नेसून थाटात शहरी मिरवणारी तिच्या आतून कोकलं ते कुणीतरी खिळे फोटो नको ग बाई घर कसे म्हणावे त्याला आणि कसल्या त्या भिंती नुसत्याच पितात आठव अंगी महागडा रंग आणि मूक जशा उभ्या एकमेकी संगमला त्यांची भाषा समजत नाही.
‘नागसेन गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथे नोकरी निमित्त राहिला आहे हा भाग जंगलव्याप्त आहे बाकी कामधंद्यांना कुलूप असतो. पण उन्हाळ्याची चाहूल लागली की मोह फुल वेचने ,विडीवळायची पाने तोडण्याचा व्यवसाय करणे.ही कामं असतात. अगदी दुरपासून मजूर येतात. टेंभरूंची पानं तोडायची. त्यांचे पुढे तयार करायचे. आणि ते विकायचे. या कामासाठी काम तेवढा दाम हीच मजुरी असते. त्यामुळे अगदी पहाटेपासून कुटुंबचे कुटुंब जंगल पालथा घालतात. काट्याकुट्यांची पर्वा कुणालाच नसते. पोटाचा प्रश्न सर्वांनाच असतो .पण ज्यांना हातावर आणून पोटाला देण्याची रोजचीच कसरत करावी लागते तिथे भूक मोठाच प्रश्न बनते. हा व्यवसाय एकाच्या पोटाची आग विझवणारा असला तरी दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंतचा प्रवास असतो .हे माणसं नागसेन बघत आलाय .तो भूक कवितेत लिहितो ,’काही नाकातून धुंगा निघेपर्यंत उडतात फुफ्फुसाला सेक लागून खोकला येईपर्यंत नसतेच चिंता भुकेच्या आगीला विडी ओढणाऱ्यांच्या मरणाची चिंता असते भुकेची…,ही कविता वाचताना नारायण सुर्वेंच्या दोन दिवस कवितेची सहजच आठवण होते. कविता वेगळ्या असल्या तरी प्रश्न भुकेचा असतो. सुर्वे लिहितात, दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.
नागसेन बाबासाहेबांच्या विचारांनी भारून निघालेला आहे .साहित्य हे आंबेडकर वादा शिवाय अपूर्ण आहे. म्हणून अनेक ठिकाणी त्याच्या छटा दिसून येतात .आंबेडकरवाद समस्यांपासून पळ काढायला नाही तर समस्यांपासून मुक्ती मिळवायला शिकवतो . कवी नागसेनचा निसर्गाशी बराच संबंध आला आहे .त्यामुळे त्याने विसंगती, विकृती अलगद टिपलेल्या दिसतात . गिधाडांचे काय झाले? हा सवाल तो त्यामुळेच करू शकला आहे. नागसेनीची होऱ्या ही कविता पूर्व विदर्भातील माणसाला अधिक जवळची वाटेल. ती मला ही फार जवळची वाटली. ही कविता मला थेट बालवयाकडे घेऊन गेली. ज्वारी बाजरी गहू इत्यादी पिकावरील पाखरं उडविण्यासाठी व पिकांची राखण करण्यासाठी कडकडत्या थंडीत अगदी पहाटे आम्ही शेताकडे रवाना व्हायचो.शेत 100 ,200 फुटावर असायचं .आणि आम्ही होऱ्या होऱ्या म्हणत मोठ्याने शेताच्या दिशेने दगड भिरकवायचो.आणि आवाजाच्या भीतीने पाखरं उडून जायचे .ही पाखरं उडविण्यासाठी कवीने शेतात गस्त घातली .आणि पाखरांना उडविण्यासाठी गोफन फिरविली .ही कल्पना अतिशय वास्तववादी आहे. ती मातीतील माणसांसाठी आहे . नागसेनच्या कविता विचार करायला लावणाऱ्या आहेत .त्या प्रत्येक कवितांची कलमवर चर्चा इथे शक्य नाही. त्या कविता वाचून अनुभवण्यासाठी आहेत . जसे ‘ दगड, कोल्ह्यांचे काय झाले ? , मोर्चा ,हिरवे आंदोलन ….इत्यादी कविता फारच लक्षवेधी आहेत.
अनेक कवितांना झाडीबोलीचा स्पर्श जसे होऱ्या, धुंगा, रपरप, धुंगा , ढासला, बुरणे …इत्यादी हे शब्द अस्सल झाडीबोलीची ओळख सांगतात. एकूणच प्राप्त परिस्थितीशी दोन हात करून लढायला शिकवणाऱ्या त्याच्या कविता आहेत. त्यामुळेच “झुंज दे आता..” कविता संग्रहाचा हा शीर्षक समर्पक वाटतो. कविता संग्रहाला आकर्षक असं मुखपृष्ठ आहे. आणि संग्रहाच्या प्रत्येक पानावर जगण्यास बळ देणाऱ्या ,समस्यांशी भांडायला बळ देणाऱ्या झुंज देण्यास समर्थ करणाऱ्या कवितांची मेजवानी आहे. वाचक म्हणून” झुंज दे आता .. ” हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या संग्रही नक्कीच ठेवावा ईतका सुंदर आहे .झुंज दे कविता संग्रहास माझ्या आभाळभर शुभेच्छा ..!
- राजू बोरकर मु.पो.ता. लाखांदूर जिल्हा भंडारा ७५०७०२५४६७