
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या जागतिक ग्रंथप्रेमी महामानवाने मनुस्मृती नामक ग्रंथ जाळणे.ही घटना सर्व जगाने समजून घेतली पाहिजे.कोणते विष या ग्रंथात आहे? की महाराष्ट्र सरकारला आणि देशाच्या सरकारला आंतरवळी सराटी या छोट्याशा गावात गुडघे टेकायला लावत आहे?. दस्तुरखुद्द जरांगे पाटील यांनाही त्यांच्या मनात घुसलेल्या “मराठा आरक्षण” या मानसिक विषमतेची,मनाच्या आजाराची ओळख कुणी करून देईल? असा मनुस्मृतीचे विश्लेषण करणारा एकही आयएस अधिकारी किंवा भारतीय राजनीतील दोष, विकृती जाहीरपणे,सांगणारा एकही नेता भारतात नसावा?
मनुस्मृती आणि रामायण महाभारत तसेच अनेक पुराण ग्रंथ,वेद, उपनिषदे यांच्या हजारो वर्षांच्या धर्म संस्कारातून निट शाळेत न पोहचलेले जरांगे पाटील यांच्यासारखे अशिक्षित मराठा नेते,जागतिक विद्वान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या,भारताच्या संविधान सभेने मान्यता दिलेल्या.राज्यघटने समोर संविधान विरोधी, “विषमता समर्थक” मराठा आरक्षणाची मागणी,उभी करून ?.देशात अराजकता उभी करीत आहेत?
जरांगे पाटील या “क्षत्रिय” मराठा आरक्षण मागणीस, देशातील उच्चवर्णीय वैश्य क्षत्रिय युती म्हणजे शरद पवार आणि अदानी अंबानी हे गुप्त पाठिंबा देत आहेत.तर पेशवाईतील विषमतेच्या प्रेरणेतून निर्माण झालेले फडणवीस सरकार मराठा आरक्षण आंदोलनाची भीती घालून,महाराष्ट्रातील ओबीसी जातींनी पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने धर्मांतर करावे? अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा का निर्माण करीत आहेत.?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही मनुस्मृतीची विषमता संपवून, देशात संविधानाची समता सर्वार्थाने निमार्ण करण्यात अपयशी ठरलो आहोत.त्यामुळे देशात पुन्हा एकदा ब्राह्मण क्षत्रिय (मराठा) वैश्य यांच्या मनात जन्मतःच श्रेष्ठ असल्याचा नवा अभिमान,अहंकार फुलविण्यात येत आहे.या अहंकारामुळे अगोदर देशाचा पराभव होऊन.देश मोगल,इंग्रज,पोर्तुगीज, फ्रेंच यांचा राजकीय गुलाम झाला होता.हे ऐतिहासिक सत्य सर्व लोक मान्य करतात.तरीही मराठ्यांना वाटते? महाराष्ट्रात सर्वात शूर लोक हे क्षत्रिय मराठेच आहेत.किंवा स्वराज्यासाठी ते एकमेव लढलेले शूर लोक आहेत.
छत्रपती शिवरायांच्या सागरी आरमाराचे पहिले नौदल प्रमुख मायनाक भंडारी होते.सागरपुत्र,कोकण पुत्र शूद्र ओबीसी जात समूहातील कुणबी, आगरी,कोळी,गावित,गोव्यातील खारवी,कराडी,एससी,एसटी यांच्या आरमाराने जगज्जेत्या इंग्रजांचा,रत्नागिरीच्या समुद्रात पराभव केला होता.हेही आरमारी मराठा आरमार होते ? असे सांगणारे क्षत्रिय मराठे?
हे छत्रपती शिवराय या “रयतेच्या राजावर” आज मनुस्मृतीचे संस्कार करून, नवी विषमता महाराष्ट्रावर लादत आहेत.
मनुस्मृतीच्या माध्यमातून हजारो वर्षे वाचन,लेखन, भाषण स्वातंत्र्य यावर अधिराज्य गाजविणारे ब्राह्मण,छत्रपती शिवराय यांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून आपली एकाधिकारशाही सांगत आले.प्रत्यक्षात मात्र भारतात कोणताही राजा ५० टक्के लोकसंख्येच्या स्त्रिया ८५ टक्के ओबीसी एससी एसटी यांची लोकसंमती किंवा मानसिक गुलामी लादल्याशिवाय सत्ता स्थापन करू शकत नव्हता.हेच निसर्ग सत्य तथागत गौतम बुद्ध महावीर,चार्वाक यांनी सागितले होते.पुढे स्त्री शूद्र अतिशूद्र यांचे गुलामी आणि स्वातंत्र्य महात्मा जोतिबा फुले आणि माता सावित्री यांनी शिक्षण क्रांती करून सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून देशातील रानटी उच्चवर्णीय लोकांना लोकशाहीस अनुकूल,साक्षर करण्यासाठीच,मनुस्मृती जाळली.

जमीन शेती पाणी जंगल शिक्षण आरक्षण मंदिर प्रवेशाची आंदोलने करून ओबीसी एससी एसटी यांना सावध करून लोकशाहीचे शिक्षण दिले.हा सारा इतिहास या साठी सांगावा लागतोय.जन्मतःच ब्राह्मण हुशार असतात.हा मनोविकार आहे.ही सत्य गोष्ट असती ?.तर इग्रज व्यापारी लोकांनी देशावर गुलामी लादली नसती.क्षत्रिय जाती या जन्मतःच शूर असतात ? हे ही सत्य असते? तर देशाचा पराभव परकीय इंग्रज मुघल पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी केलाच नसता? या देशातील वैश्य व्यापारी हुशार श्रीमंत असते? तर देश भिकेला लागलाच नसता.तरीही ओबीसी एससी एसटी आरक्षणाच्या बाजूने लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकांवर आज प्रचंड शिव्या शाप देणारे लोक उच्चजातींचे आहेत. ते किती मूर्ख आहेत? हे माझ्या फेसबुक अकाउंटवर तुम्ही पाहू शकता.
फुले शाहू आंबेडकर यांच्या तील गुणांची,नेतृत्वाची,सहन सहन शिलतेतील त्यांच्या पायाच्या नखांची सर माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यात नाही.हे मी जाणतो.परंतु त्यांनी समतेसाठी, आमच्या आरक्षणासाठी, शिक्षणासाठी जो संघर्ष केला त्याला ऐतिहासिक शिव्या देणारे लोक कोण होते.? यांचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत आहे.त्यामुळे सत्ताधारी ब्राह्मण मराठा राजकीय जाती मला “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देणार नाहीत.उच्चवर्णीय भाजपा,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना ही राजकीय मंडळी त्यांचे गुलाम झालेले माझे ओबीसी बांधव खुल्या मनाने माझे कौतुक करणार नाहीत.देशात समतावादी भूमिका घेणारे संविधानवादी हीच माझी प्रेरणा आहे.
मनुस्मृतीची विकृती मनातून घालवणे. हा आम्हा सर्व भारतीय लोकांचा, सार्वजनिक जीवनातला हेतू असला पाहिजे.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी वैदिक हिंदू धर्म सोडून,मानवता वादी, समतावादी बौद्ध धम्म स्वीकारला.या देशात आजही आर्थिक,राजकीय, सामाजिक विषमता आहे.त्यामुळेच देशासह महाराष्ट्रात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची राजकीय सत्ता आहे.समतेसाठी आम्ही जमीन,जागा,घरे, गावठाण कोळीवाडे,शेती,उद्योग,पाणी, जंगल,शिक्षण, आरक्षण यांची आंदोलन चालविली पाहिजेत.मागासवर्गीय ८५ टक्के भारताला देशाच्या एकूण साधन संपत्तीतील ८५ टक्के वाटा मिळालाच पाहिजे.अन्यथा माजलेली मनुस्मृती देशाचा, स्वातंत्र्याचा सर्व नाश केल्या शिवाय थांबणार नाही.ओबीसी आरक्षण हे साविधानिक समता निर्माण करून मनुस्मृतीचा प्रभाव संपविणार औषध भारताला “डॉक्टर” बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे.या औषधात EWS आरक्षण ही भेसळ आहे.त्याचप्रमाणे “मराठा आरक्षण” हीसुद्धा भेसळ आहे.या देशातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे कधी शोषित नव्हते.तर शोषक होते.ते गरीब असण्याचा प्रश्नच नव्हता.कुणी असले? तरीही, ओबीसी एससी एसटी यांच्या पेक्षा श्रीमंतच होते.

भारताची ही आर्थिक, सामाजिक,राजकीय वर्चस्वाची स्थिती समजण्यासाठी,फार मोठ्या शिक्षणाची गरज नाही.शूद्र ओबीसी एससी एसटी कितीही श्रीमंत झाला? तरीही त्याला आपली मुलगी सुन म्हणून सन्मानाने,देणारा “नेता” महाराष्ट्र आणि देशात अजून झालेला नाही.ओबीसीसाठी सामाजिक प्रतिष्ठा काय असते? हे सन्माननीय शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना उत्तम रित्या माहीत आहे.अन्यथा आज भाजपा सरकार मधील ओबीसी माळी नेते महाराष्ट्राचे मंत्रीमहोदय छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते?.त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणाबद्दल शब्दही न काढणारे ईमानदार एकनिष्ठ आगरी नेते वनमंत्री गणेश नाईक किमान “नगरविकास मंत्री” झाले असते?. त्यांची योग्यता सारा महाराष्ट्र जाणतो.तीही मुख्यमंत्री पदासाठी योग्यच आहे.त्यांच्यासमोर साताऱ्यातून आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ “मराठा” आहेत. म्हणूनच मुंबईच्या आगरी कोळी कराडी ओबीसींच्या डोक्यावर बसवले ना?
सत्तेशिवाय “मराठा” ? ही कल्पना महाराष्ट्रात करता येत नाही.म्हणूनच पेशवाईचा अंत झाल्यानंतर ही ब्राह्मण सत्ताधीशांनी डझनभर मुख्यमंत्री, गृहमंत्री,महसूल मंत्री,मंत्री मराठ्यांचे होऊनही कधी परशुरामाची कुऱ्हाड बाहेर काढून त्रासदायक क्षत्रिय सत्तेचा अंत केला नाही.ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय हे ऐतिहासिक युद्ध थांबवून ब्राह्मण मराठा क्षत्रिय महायुतीचे हे राजकारण आहे.त्यांचा हेतू ओबीसी एससी एसटी यांना गुलाम ठेवणे.सत्तेपासून दूर ठेवणे.असाच आहे आज मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे लाड सरकार करत आहे.
दुसरीकडे धनगर ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्याकडे,ओबीसी बचाव आंदोलनाकडे ढुंकूनही पाहत नाही.ही विषमता आहे ना? जरांगे यांचे आणि प्रा हाके यांचे सामाजिक शास्त्रांचे शिक्षण तरी तपासा. “मराठे” सामाजिक मागास नाहीत.हे सुप्रीम कोर्ट,मागासवर्ग आयोग,मंडल आयोग यांनी सागितले.त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण नाकारले गेले.
तरीही संविधान विरोधी EWS आरक्षणाचा ८० टक्के फायदा मराठ्यांनी घेतला.बोगस आयोग स्थापन करून इसीबीसी मराठा आरक्षण दिले. त्याचा ही फायदा मराठ्यांनी घेतला.ओबीसी इतक्याच सवलती सरकारने दिल्या.अण्णासाहेब पाटील मंडळ दिले,कर्ज दिली.अर्थात फडणवीसांनी मराठ्यांवर देखरेख करण्यासाठी परशुधारी महामंडल ब्राह्मण जातीसाठी काढले.त्यामुळे क्षत्रिय ब्राह्मण खुश झाले.मराठा ब्राह्मणाचे खरे दुःख हे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणामुळे ओबीसी ग्रामपंचायत मधून निवडून येतो.यातूनच पुढचा महापुरुष महात्मा फुले.सावित्री माई फुले,आणि महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर जन्मास येईल.म्हणून खासदार,आमदार,मुख्यमंत्री आमचा मराठा ब्राह्मणच हवा.यासाठी कुणबी दाखले?.किंवा थेट मराठ्यांचे ओबीसीकरण करा.किंवा ओबीसी आरक्षणात घुसखोरी करा.मुख्य आकर्षण ओबीसी राजकीय आरक्षण हवे.राजकीय आरक्षणातून ओबीसींना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा मराठ्यांना आणि ब्राह्मणांना डोळ्यात खुपते.पोटात दुखते.मेंदूत चावते.अंगावर खाजवते.अर्थात राजा ययाती आपल्याच अमर्याद वासनेत स्वतःच जळाला.त्याच प्रमाणे अमर्याद सत्ता हिटलर,मुसोलिनी, सिकंदर यांना मानसिक सुख समाधान कधीच देऊ शकली नाही.आकाशात मुक्त उडणारे पक्षी,पाण्यात पोहणारे मासे,हवा,पाणी, आकाश, झाडे हे ग्राम सभेतील सत्तेने गुलाम होऊ शकत नाहीत.ओबीसींची राजकीय सत्ता हे मराठा आरक्षणातील मागणी मागचे सत्य ? तुम्ही जाणले असेलच.महाराष्ट्रात ऐतिहासिक पेशवाई, मराठेशाही ही काळाच्या परिवर्तनाच्या निसर्ग नियमाने संपली आहे.
राजसत्ता सोडून मानवी दुःखाचे मूळ शोधणारे दोन राजे एक भगवान महावीर दुसरे तथागत गौतम बुद्ध देशाने पाहिले आहेत.कुणीतरी शरद पवार, देवेंद्र फडणवीस,जरांगे पाटील यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ऐतिहासिक ग्रंथ भेट द्यावा.जपान मधील क्षत्रिय सामुराई योद्ध्यांनी लोकशाही साठी तलवार खाली ठेवली.तशीच ती क्षत्रिय मराठ्यांनी ठेऊन मन मोठे करावे.सागरासारखे विशाल करावे.तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये.महानगर पालिकांमध्ये, आमच्या मुंबई,ठाणे,कल्याण,डोंबिवली,पनवेल मध्ये ग्रामपंचायत सत्ता आगरी कोळी कराडी भंडारी एससी एसटी यांना ओबीसी एससी एसटी आरक्षणामुळे मिळते.ती मराठा आंदोलकांनी ती ओबीसींसाठी जपावी, राखावी.ही संविधानिक विनंती आहे.छत्रपतींच्या आरमारात जे आगरी कोळी भंडारी गावित कारवी कराडी इंग्रज आरमार बुडवू शकतात.ते लोकसभा,राज्यसभा,विधानसभा, विधानपरिषद येथे जाण्यापासून ओबीसी एससी एसटी यांना फार काळ कुणी मराठे ब्राह्मण रोखू शकणार नाहीत.
जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री, जयभिम, जय दि.बा.
राजाराम पाटील-८२८६०३१४६३.उरण जिल्हा -रायगड.

