लुंबिनी बुद्ध विहारात २३ व २४ नोव्हेंबरला वर्षावास समापन व कठीण चिवरदान महोत्सव

बातमी शेअर करा.

नवीन भिक्खू निवासाचे २३ नोव्हेंबरला उद्घाटन; महापरित्राण पाठ, धम्मदेसना व संघदानासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती : तपोवन परिसरातील लुंबिनी कॉलनी येथील लुंबिनी बुद्ध विहारात पूज्य भिक्खू अमरावती सीलवंसलंकार यांच्या तिसऱ्या वर्षावास समापनानिमित्त २३ व २४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय वर्षावास समापन व कठीण चिवरदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने २३ नोव्हेंबर रोजी नवनिर्मित भिक्खू निवासाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. विहाराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच भिक्खू संघाच्या निवास व्यवस्थेसाठी ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
  या महोत्सवात कठीण चिवरदान, महापरित्राण पाठ, धम्मदेसना, भिक्खू संघाला भोजनदान, संघदान आणि सार्वजनिक भोजनदान असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार,२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धम्मरॅली काढण्यात येणार असून, त्यानंतर नवनिर्मित भिक्खू निवासाचे उद्घाटन होईल. रात्री ८ वाजता महापरित्राण पाठाला प्रारंभ होणार आहे.


   मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता महापरित्राण पाठाचे समापन व मंगल मैत्री होईल. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सामुदायिक नाश्ता व चहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत धम्मदेसना, ११ वाजता भिक्खू संघाचे भोजनदान, त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत धम्मदेसना व संघसंवर्धनाचा कार्यक्रम होईल, तर दुपारी २ वाजता सार्वजनिक भोजनदान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भिक्खू निर्मल पुत्र आनंद महाथेरो राहणार असून, उद्घाटक म्हणून पूज्य भिक्खू डॉ. एच. सत्यनंद महाथेरो उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पूज्य भिक्खू प्रज्ञानंद महाथेरो, पूज्य भिक्खू हर्षदीप थेरो, पूज्य भिक्खू गुणानंद थेरो, पूज्य भिक्खू बुद्धप्रिय, पूज्य भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू सुगतानंद, पूज्य भिक्खू विरियो पंडितो, पूज्य भन्ते गिरिमानंद यांच्यासह विविध ठिकाणांहून भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.


   बौद्ध परंपरेत वर्षावास समापन आणि कठीण चिवरदानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दान, शील, समाधी, प्रज्ञा आणि संघाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मंगलमय प्रसंग आहे. नवनिर्मित भिक्खू निवासाचे उद्घाटन ही लुंबिनी बुद्ध विहाराच्या धार्मिक, सामाजिक व संस्थात्मक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या सुविधेमुळे भिक्खू संघाच्या निवासाची व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.या महोत्सवाचे आयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर महिला संघाच्या वतीने करण्यात आले असून, नवयुवक पंचशील मंडळ संयोजन करीत आहे. या मंगलमय सोहळ्यास अमरावती शहरासह परिसरातील सर्व बौद्ध उपासक-उपासिका, माता-भगिनी, युवक-युवती आणि धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : लुंबिनी बुद्ध विहार, पंचशील चौक, लुंबिनी कॉलनी, तपोवन परिसर, अमरावती.

भिक्खू अमरावती सीलवंसलंकार- ७५०७८९४२०३,अमरावती.यांस कडून 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *