दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक !    

बातमी शेअर करा.

स्वतंत्र्योत्तर काळापासून जातीय भेद अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि संपूर्ण भारतीय समाजात बंधुभाव समानता प्रस्थापित करण्यासाठी संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी,महाराज, गाडगे महाराज ,शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अशा महान थोर संत महापुरुषांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजात प्रबोधन केले जनजागृती केली. मात्र देशाला लागलेली जातीयतेची अस्पृश्यतेची कीड अजूनही नष्ट झालेली नाही .तर ही कीड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असे दिसून येते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशमुक्त झाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले.आता भारतीय समाजात खूप काही बदल झाला. विज्ञानाचे युग आलं तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती झाली. हे खरे पण जातिवाद कमी झाला अशा फुसक्या थापा मारल्या जातात. लोक चंद्रावर गेली पण जातीयवादी मानसिकतेमुळे त्यांचे पाय अजूनही जात रूपी घाणीच्या गटारातच आहे.

आजही देशभरात मंदिर प्रवेश, घोड्यावर बसून नवरदेवाची वरात काढल्या प्रकरणी, आंतरजातीय प्रेम, राजकीय , सामाजिक आणि कला उद्योग अशा अनेक क्षेत्रात मागासवर्गीय दलितांचा वाढलेला प्रभाव इथल्या जातीवादी विषमतावादी सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला पहावत नाही. हे महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या दलित अत्याचाराच्या घटनेवरून दिसून येते. 31 ऑक्टोबर रोजी  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर या गावात किरकोळ कारणावरून रोहित पठारे या विवाहित दलित युवकाला गावातीलच वीस ते पंचवीस जातीयवादी तरुणांनी रोहित पठारेला त्याच्या घरातून ओढून गावाबाहेर झाडाला बांधून अमानुषपणे सामूहिक बेदम मारहाण मारहाण केली. यात दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीचा आणि तलवारीचा वापर केला गेला. अत्यंत स्कूर पणे रोहितला मारण्यात आले. शेवटी त्याच्या परिवाराने उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले मात्र 3 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा उपचारा दरम्यान रोहित ने आपला प्राण सोडला. रोहित पठारेच्या हत्ते प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर  जातीयवादी मानसिकतेविरुद्ध दलित समाजात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या अगोदर ही महाराष्ट्रात देशाला हादरवणाऱ्या  दलित अत्याचाराच्या घटना मनस्ताप आणणारी आहेत. जसे की मुंबई- घाटकोपर येथे 11 जुलै 1997 रोजी रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मोर्चावर झालेल्या गोळीबारात 10 दलित लोकांचा मृत्यू झाला तर वीस पेक्षा अनेक लोक गंभीर जखमी झाले होते .

खैरलांजी हत्याकांड एकाच घरातील चार लोकांचा मृत्यू( 29 सप्टेंबर 2006 )-भंडारा, सोनई आणि खर्डा दलित हत्या प्रकरण – अहिल्यानगर, 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला खून नांदेड-डिसेंबर 2025 मध्ये सक्षम ताटे या दलित तरुणाला आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून अमानुषपणे मारहाण करून खून करण्यात आला.अशा प्रकारे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती एस सी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपशील खूप मोठा आहे. 2014 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात राजकीय सत्ता बदल झाली तेव्हापासून सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहे. सन 2015 मध्ये 1,736 असलेली दलित अत्याचार या गुन्हेची संख्या ही 2024 मध्ये 3,219 पर्यंत पोहोचलेली आहे. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटनेत 85% हून अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स मध्ये म्हटले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही शिल्लक कारणावरून दलितांवर जीव घेणे हल्ले होतात. महिलांवर अत्याचार होतात,लैंगिक छळ होतो अनेक दलित अत्याचाराच्या घटनेत शासकीय कर्मचाऱ्यांची जातीय उदासीनता आणि आरोपीशी असलेले जातीय, कौटुंबिक राजकीय हितसंबंध तसेच प्रशासनातील जातीयवादी राजकीय पुढार्‍यांच्या दबावामुळे अनेक जातीवादीआरोपी ॲट्रॉसिटी ची केस दाखल केल्यावरही निर्दोष सुटले आहेत आणि सुटत आहेत. त्यामुळे जनतेला कायद्याचा धाक न राहता अत्याचार करण्यास बळ मिळते. हे मात्र खरे वरील वाढत्या दलित अत्याचाराच्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आणि चिंताजनक आहे.            
सिद्धार्थ अशोक तायडे.- 9309767388,नांदूरा,जिल्हा .बुलढाणा. 

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20261121-WA0043.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *