“जीवनाचं खरं यश म्हणजे ते पूर्णत्वाने जगणं..!”

बातमी शेअर करा.

 क्षणभंगुर जीवनाच्या प्रवासात माणूस धावत असतो – कधी पैशामागे,कधी नात्यांच्या ओढाताणीमध्ये,तर कधी प्रतिष्ठेच्या शोधात. पण या साऱ्या धावपळीत आयुष्य जगायचं राहूनच जातं.आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला स्वतःसाठी थांबण्याची सवयच उरलेली नाही.आणि हाच आपल्या जीवनशैलीतील सगळ्यात मोठा विरोधाभास आहे.आपण दिवसेंदिवस नात्यांपासून दूर जात आहोत.एकमेकांशी संवाद कमी झालाय, पण अहंकार वाढलाय. ‘तो आधी बोलावा’, ‘त्यानेच माफी मागावी’ या अशा अपेक्षा आपण मनात साठवत ठेवतो आणि नात्यांची मुळं हळूहळू सडत जातात.एखादी गोष्ट स्पष्ट बोलून प्रश्न सुटू शकतो,पण आपण अबोला धरतो.रुसवे-फुगवे इतके वाढतात की वर्षं उलटून जातात आणि शेवटी उरतं ते फक्त अपराधीपणाचं ओझं.

आयुष्य म्हणजे फक्त पगाराची चेकबुक,बँक बॅलन्स,किंवा चार लोकांनी ‘यशस्वी’ म्हणावं एवढंच नाही.हे सर्व असू शकतं,पण स्वतःचं समाधान नसेल,तर यशाचं मोलच शून्य ठरतं.आपण आपले छंद गमावतो,स्वतःची ओळख विसरतो,आणि जे खरं ‘आपलं’ आहे तेच हातातून निसटतं.खरं म्हणजे प्रत्येक माणसाने ‘आता’ जगायला हवं. कोण किती काळ आहे..? कोणाची ‘विकेट कधी पडेल?? हे आपल्याला माहीत नाही. मग का उगाच एकमेकांशी दुरावा? का स्वतःला नाकारत जगायचं.?

समाज,जात,धर्म,प्रतिष्ठा – या सगळ्या चौकटी ओलांडून माणूस म्हणून जगता आलं पाहिजे.आयुष्यात नाचायचं असेल तर नाचा,हसायचं असेल तर हसा,रडायचं वाटलं तर रडा – पण हे सगळं जगून घ्या.कारण शेवटी फोटोंमध्ये आपली हसलेली किंवा हरवलेली चेहरेच राहतात.आपण नेहमी पुढच्या पिढीसाठी काहीतरी कमवण्याच्या मागे लागतो. हे निश्चितच महत्त्वाचं आहे. पण त्यांनी तुमचं जगणं पाहिलं पाहिजे – फक्त तुमचं झुरणं नाही. मुलांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी तुम्ही समाधानी, आनंदी, व मनस्वी जगलात, हे त्यांना जाणवलं पाहिजे. ‘मन मारून जगणं’ ही वृत्ती खूप मोठ्या मानसिक थकव्याला जन्म देते. म्हणूनच, स्वतःच्या इच्छा जपणं, आपल्या वेळेची किंमत ओळखणं आणि स्वतःवर प्रेम करणं – हे शिकायला हवं.हे संपादकीय यासाठी आहे, फक्त आठवण म्हणून नाही, तर एक प्रश्न उपस्थित करण्यासाठी आहे – आपण खरोखर जगतोय का, की फक्त वेळ काढतोय?म्हणूनच,जगायचं राहून जाऊ नये, असं जगा.स्वतःसाठी,आपल्या लोकांसाठी,आणि खरंखुरं आयुष्य अनुभवण्यासाठी.

रतनकुमार साळवे:- ९९२३५०२३२०,

छत्रपती संभाजीनगर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *