परिवर्तनाच्या गप्पा आणि प्रत्यक्ष परिवर्तनाचा संघर्ष!

बातमी शेअर करा.

आज समाजात अनेकजण स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी, विवेकवादी आणि समाजसुधारक म्हणवून घेतात. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगतात. व्याख्याने देतात, परिसंवाद आयोजित करतात. सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची आवश्यकता मांडतात.
या सर्वांचे महत्त्व निश्चितच आहे. समाजप्रबोधन हेसुद्धा परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे कार्य आहे.मात्र एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो.परिवर्तनाचा विचार मांडणारे प्रत्यक्ष परिवर्तनाच्या संघर्षाशी किती जोडलेले आहेत?
   आज सफाई कामगार, बांधकाम मजूर, कंत्राटी कर्मचारी,असंघटित क्षेत्रातील महिला कामगार आणि इतर श्रमिक आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांना न्याय्य वेतन, सुरक्षित रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे.अशा वेळी काही मंडळी असा युक्तिवाद करतात की,”आर्थिक विषमता नष्ट झाली तरी सांस्कृतिक गुलामगिरीचे काय?” हा प्रश्न चुकीचा नाही. उलट तो अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण आर्थिक विषमता कमी झाली म्हणून जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, उच्च-नीचता आणि मानसिक गुलामगिरी आपोआप नष्ट होतील, असे मानणे चुकीचे ठरेल.पण मग दुसराही प्रश्न उपस्थित होतो.


   सांस्कृतिक गुलामगिरीविरोधात लढताना आर्थिक शोषण, कंत्राटी कामगारांची असुरक्षितता, अपुरे वेतन आणि श्रमिकांच्या हक्कांचा प्रश्न बाजूला ठेवून संपूर्ण सामाजिक परिवर्तन कसे घडणार? याच ठिकाणी मार्क्सवादी विचारवंत अँटोनियो ग्राम्शी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. ग्राम्शींनी ‘सांस्कृतिक वर्चस्व’ (Cultural Hegemony) ही संकल्पना स्पष्ट केली.सत्ताधारी वर्ग केवळ आर्थिक आणि राजकीय बळावर आपले वर्चस्व टिकवत नाही; तर शिक्षण, संस्कृती, परंपरा, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकांची संमती मिळवूनही आपले वर्चस्व टिकवतो, हे त्यांनी दाखवून दिले.मात्र ग्राम्शींचा विचार केवळ सांस्कृतिक प्रबोधनापुरता मर्यादित नव्हता. आर्थिक संबंध, राजकीय सत्ता, सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक वर्चस्व यांचा परस्परसंबंध समजून घेणे हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग होता.म्हणजेच सांस्कृतिक परिवर्तन आणि आर्थिक-सामाजिक संघर्ष यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे करता येत नाही.
  भारतीय समाजाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाची आणखी मूलगामी चिकित्सा केली.बाबासाहेबांनी ‘जातिभेदाचा उच्छेद’ या ग्रंथात स्पष्ट केले की,
“जातिव्यवस्था ही केवळ श्रमविभागणी नसून श्रमिकांची विभागणीदेखील आहे.” जातिव्यवस्था श्रमिकांमध्येच उच्च-नीचतेची उतरंड निर्माण करते. ती माणसांना जन्माच्या आधारावर व्यवसायाशी बांधून ठेवते आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते.म्हणूनच बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि आर्थिक परिवर्तन यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला.बाबासाहेबांचे स्वतःचे कार्य पाहिले तरी ही बाब स्पष्ट होते.
   ९ डिसेंबर १९४३ रोजी कामगार खात्याचे सदस्य असताना बाबासाहेबांनी धनबाद परिसरातील कोळसा खाणींची पाहणी केली. ते प्रत्यक्ष सुमारे ४०० फूट जमिनीखाली उतरले. त्यांनी कामगारांचे काम पाहिले, त्यांच्या वेतनाविषयी चौकशी केली आणि त्यांच्या राहणीमानाची माहिती घेतली.याचा अर्थ बाबासाहेबांना केवळ कामगारांच्या सामाजिक प्रतिष्ठेचीच नव्हे, तर त्यांच्या प्रत्यक्ष भौतिक जीवनातील प्रश्नांचीही जाणीव होती.त्यांचे परिवर्तनवादी कार्य केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित नव्हते; सामाजिक संघर्ष, संघटन, कायदे आणि संस्थात्मक बदलांशीही ते जोडलेले होते.
  आज सफाई कामगारांच्या बाबतीतही हाच प्रश्न उपस्थित होतो.आपण सफाई कामगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असे म्हणतो. ते अत्यंत आवश्यक आहे.पण त्याच कामगाराला किमान वेतन मिळते का? त्याची नोकरी सुरक्षित आहे का? त्याला भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी आणि इतर कायदेशीर लाभ मिळतात का? त्याच्या मुलांना चांगले शिक्षण मिळते का? या प्रश्नांची उत्तरे शोधणेही परिवर्तनाच्या कार्याचाच भाग नाही का?


  सफाई कामगाराच्या हातातील झाडूला प्रतिष्ठा मिळाली पाहिजेच; पण त्या झाडूच्या मागे असलेल्या माणसाला न्याय्य वेतन, सुरक्षित रोजगार आणि माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकारही मिळाला पाहिजे.केवळ आर्थिक परिवर्तनाने जातीय व सांस्कृतिक विषमता आपोआप संपणार नाही. तसेच केवळ सांस्कृतिक प्रबोधनाने आर्थिक शोषण आपोआप नष्ट होणार नाही.म्हणूनच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन हे परस्परपूरक संघर्ष आहेत.येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे.प्रत्येक शिक्षक, लेखक, विचारवंत किंवा अभ्यासकाने एकाच पद्धतीने संघर्षात उतरले पाहिजे, असे नाही. ज्ञाननिर्मिती, लेखन, शिक्षण, प्रबोधन, कायदेशीर लढाई आणि प्रत्यक्ष संघटन या सर्वांचे परिवर्तनाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे.मात्र सांस्कृतिक परिवर्तनाचा पुरस्कार करताना श्रमिकांच्या आर्थिक हक्कांच्या संघर्षालाच दुय्यम मानणे किंवा त्यापासून दूर राहण्यासाठी सांस्कृतिक परिवर्तनाचा मुद्दा पुढे करणे, ही भूमिका चिकित्सेची मागणी करते.कारण परिवर्तन हा केवळ चर्चेचा विषय नाही. तो माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याशी संबंधित आहे.
   महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजऱ्या करणे, त्यांच्या विचारांवर व्याख्याने देणे, त्यांच्या नावाने कार्यक्रम आयोजित करणे याबरोबरच त्या विचारांमधून निर्माण होणाऱ्या सामाजिक जबाबदारीचा ही विचार झाला पाहिजे.आज प्रश्न असा नाही की कोण स्वतःला किती मोठा परिवर्तनवादी म्हणवतो.प्रश्न असा आहे की, ज्यांच्या मुक्तीसाठी परिवर्तनाचा विचार मांडला जातो, त्या शोषित, वंचित आणि कष्टकरी माणसांच्या प्रत्यक्ष जीवनात बदल घडवण्यासाठी आपण कोणती भूमिका बजावतो?
ग्राम्शींचे सांस्कृतिक वर्चस्वाचे विश्लेषण आणि बाबासाहेबांचे जातिव्यवस्थेवरील मूलगामी चिंतन आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या विविध पैलूंचा एकत्रित विचार करण्यास प्रवृत्त करते.त्यामुळे सांस्कृतिक गुलामगिरीविरोधातील लढा आणि आर्थिक शोषणाविरोधातील लढा यांची एकमेकांविरुद्ध मांडणी करण्याऐवजी त्यांचा परस्परसंबंध समजून घेण्याची आवश्यकता आहे.आणि म्हणूनच “महापुरुषांचे विचार सांगणे म्हणजे परिवर्तन नव्हे; त्या विचारांच्या कसोटीवर स्वतःची कृती तपासणे, हेच खरे परिवर्तनवादाचे लक्षण आहे.”

कॉ.संदीप तुकाराम पवार- 99301 04103, चिपळूण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *