प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस’चे औरंगाबादमध्ये थाटात उद्घाटन; चळवळीचे मुखपत्र अधिक गतिमान करण्याचा मान्यवरांचा निर्धार

संभाजी नगर (औरंगाबाद) प्रतिनिधी: ‘प्रबुद्ध भारत’ हा केवळ एक अंक नसून तो फुले-आंबेडकरी चळवळीचा एक जिवंत आणि धगधगता दस्ताऐवज आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा वैचारिक वारसा घराघरात पोहोचविण्याची आणि तो अधिक सक्षम करण्याची मुख्य जबाबदारी प्रत्येक फुले-आंबेडकरी कार्यकर्त्याची आहे,असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी केले.त्या रामनगर,मुकुंदवाडी,औरंगाबाद येथे ‘प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस’च्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक अमितभाऊ भुईगळ,प्राचार्य डॉ.संजय मुन,प्रा. भारत शिरसाट,वंचितचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे,नगरसेविका करूणा जाधव,वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिशभाऊ गायकवाड, वंचितचे शहराध्यक्ष ॲड.पंकज बनसोडे,ईश्वर भातपुडे, मुख्याध्यापक शंकर मेश्राम,रतनकुमार साळवे,देवराज वीर, राजेश मेश्राम,मेघानंद जाधव,धम्माप्रचारक आसाराम गायकवाड,डॉ.रेखा मेश्राम,बेबीनंदा पवार,मंगल मून डॉ. धनराज गोंडाने, राजेश शेगावकर,गजानन लांडगे,सूरज मेश्राम,बाबुराव गवई,मोहित मेश्राम आदी उपस्थित होते.
डॉ.संजय मून यांनी ‘प्रबुद्ध भारत’च्या प्रवासावर प्रकाश टाकला.ते म्हणाले, “मुंबई, औरंगाबाद आणि आता पुणे असा ‘प्रबुद्ध भारत’चा प्रवास आपण सर्वांनी पाहिला आहे. या खडतर प्रवासात अनेक चढ-उतार आणि अडचणी आल्या. मात्र,आज आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून या मीडिया हाऊसची नव्याने सुरुवात होणे,ही संपूर्ण चळवळीसाठी भूषणावह आणि ऐतिहासिक बाब आहे.” वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नगरसेवक अमित भुईगड बोलतांना म्हणाले की, “नव्या पिढीला चळवळीचा खरा इतिहास,संघर्ष आणि विचार समजावून सांगण्यासाठी ‘प्रबुद्ध भारत’ हे एक प्रभावी माध्यम आहे.या पाक्षिकाचा जास्तीत जास्त वापर करून तरुणांना चळवळीशी जोडण्याची सुवर्णसंधी आज औरंगाबाद शहरात उपलब्ध झाली आहे,”वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश गायकवाड बोलतांना म्हणाले की,औरंगाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या पाक्षिकाचे वाचक आणि वर्गणीदार वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,युवा आघाडी, महिला आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन तन-मन-धनाने प्रा.भारत सिरसाट आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील,अशी ग्वाही त्यांनी दिली.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे,या मीडिया हाऊसच्या कार्यालयासाठी डॉ.रेखा मेश्राम यांचे मोठे बंधू मुख्याध्यापक शंकर मेश्राम यांनी आपला फ्लॅट विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तायडे यांनी ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाला रु. ५,०००/- ची देणगी जाहीर केली. तसेच भविष्यात जास्तीत जास्त वाचक आणि वर्गणीदार तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविक करताना प्रा.भारत सिरसाट यांनी कार्यालयाच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि फुले-आंबेडकरी चळवळ जनमानसात अधिक खोलवर रुजावी, तसेच सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला गती मिळावी, याच मुख्य हेतूने ‘प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस’च्या औरंगाबाद कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.आगामी काळात या वृत्तपत्राच्या माध्यमातून चळवळीच्या सामाजिक आणि राजकीय भूमिका समाजासमोर स्पष्टपणे मांडण्यास मोठी मदत होईल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुद्ध भारत सिरसाट यांनी केले, तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.या उद्घाटन सोहळ्याला औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,महिला पदाधिकारी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगल खिवंसरा बोलतांना म्हणाल्या की,आपली वृत्तपत्रे, मासिके,पाक्षिके पोस्टाने पाठवली जातात परंतु,ती वेळेवर पोहचतच नाही किंवा अनेकदा ती मिळत सुद्धा नाही. त्यावरील नाव पाहुन आपले साहित्य मिळू नये यासाठी पोस्ट ऑफिसला शासनाकडुन काही सूचना आल्या आहेत का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास समजून घेण्यासाठी जुन्या पिढीला बोलते करावे लागेल. ‘प्रबुद्ध भारत’ मीडिया हाउसने प्रकाशित केलेली पुस्तके सर्व कार्यकर्त्यांनी वाचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यामध्ये माझा फायदा काय? हा आजचा काळ आहे या काळात प्रा. भारत सिरसाट व डॉ.रेखा मेश्राम हे ‘प्रबुद्ध भारत’ साठी पुढे येणे ही बाब नव्या पिढीसाठी आदर्शवत ठरणार आहे.
प्रा. भारत शिरसाट संभाजी नगर यांस कडून
