
सध्या होत असलेल्या जनगणनेत अनेक बौध्द विद्वान बौध्दांना सांगत आहेत की, धर्माच्या रकान्यात ‘बौध्द’ लिहा आणि जातीच्या रकान्यात ‘महार’ लिहा. तसेही बहुसंख्याक बौध्द खरेच बौध्द झाले आहेत का? हा प्रश्नच आहे. त्यामुळेच या बौध्द विद्वानांचा हा सल्ला बौध्दांना मान्य करण्यास खुपच सुलभ जाणार आहे. या विषयावर जळजळीत भाष्य करणारी पात्रटिकाकार रमेश भवार यांची ही कविता,’अजून किती दिवस?’
अजून किती दिवस?
धम्माने मी बौध्द पण जातीने महार आहे,
माफ करा मित्रांनो…..,
आज मी काहिच खाणार नाही कारण…..
आज माझ्या खंडोबाचा वार आहे॥
सकाळीच उठून मी त्रिशरण म्हटले आणि…..
चवदार तळ्याच्या पाण्यात देवही धुतले!
घरभर येळकोट, येळकोट जयमल्हार आहे॥
कारण धम्माने मी बौध्द पण जातीने……
कालच मी मुलाचे लग्न बौध्द पध्दतीने केले,
आणि जेष्ठ मुलगा म्हणून जेजुरीला जाऊन बोकडही कापले!
प्रज्ञा,शील,करुणेचा मी वारसदार आहे॥
कारण धम्माने मी बौध्द पण जातीने…..
दिवाळी अन् दसर्याला माझ्या घराला असतो नवीन रंग,
नवीन कपड्याने झाकलेलं असतं माझं अंग नी अंग,
चौदा एप्रिलला मात्र बाबासाहेबांच्या फोटोला फक्त सव्वा रुपयाचा हार आहे॥
कारण धम्माने मी बौध्द पण जातीने…..
देव्हा-यात माझ्या गेठा आणि लंगर,
भिंतीवर मात्र बुध्द आणि आंबेडकर,
म्हणूनच माझं घरदार अजून गावकुसाबाहेर आहे॥
कारण धम्माने मी बौध्द पण जातीने…..
रमेश भवार-: संग्राहक- विवेक मोरे

