पंढरपूर पंचायत समितीने माहिती अधिकाराच्या पत्राला केराची टोपली दाखवली; मोनेश्वर सुतार यांच्या पाठपुराव्यातून धक्कादायक बाब उघड

बातमी शेअर करा.

पंढरपूर / गोपाळपूर: माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत पंचायत समिती पंढरपूरकडे मागवलेली कलम ४(१) (ख) (१ ते १७ मुद्दे) ची माहिती अद्ययावत नसल्याचा, सन २००५ ते २०२६ पर्यंतची माहिती मागितली असताना निर्णयात केवळ सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील माहिती देण्यापुरता मर्यादित ठेवण्याचा, तसेच प्रथम अपील सुनावणी व स्मरणपत्र देऊनही प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा प्रकार मोनेश्वर आप्पासाहेब सुतार (रा. शिवाजीनगर, गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकाराविरोधात मोनेश्वर सुतार यांनी सविस्तर पाठपुरावा करून सर्व माहिती व कागदपत्रे गोळा केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडे ई-मेलद्वारे लेखी तक्रार दाखल करून प्रशासकीय चौकशी व कलम २० अन्वये दंडात्मक/शिस्तभंगात्मक कारवाईची मागणी केली आहे.  
मोनेश्वर सुतार यांनी कसा आणला विषय उघडकीस?
मोनेश्वर सुतार यांनी दिनांक ०६/१०/२०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये पंचायत समिती पंढरपूरकडे कायदा लागू झाल्यापासून (सन २००५ ते २०२६ पर्यंत) वार्षिक इंडेक्स तयार करून कलम ४(१)(ख) मधील १ ते १७ मुद्द्यांची माहिती आणि कलम ४ च्या खुले प्रकटणाबाबत (Voluntary Disclosure) अर्ज केला होता. तसेच माहिती प्रकटन न केल्यास स्पष्ट व प्रामाणिकपणे लेखी कळवण्याबाबत त्यांनी अर्जात ठाम भूमिका मांडली होती.  
सुनावणी, निर्णय आणि प्रशासनाची चालढकल
अर्जातील मुद्द्यांवर आणि अपेक्षित माहिती न मिळाल्यामुळे दाखल केलेल्या प्रथम अपीलावर ०८/०९/२०२६ रोजी सुनावणी झाली आणि ०९/०९/२०२६ रोजी प्रथम अपील सुनावणीचा निर्णय (जा.क्र. पंसपं/कप्रअ/१४/९२३/८५१३/२०२६) पारित करण्यात आला. सुनावणीत सन २००५ ते २०२६ पर्यंतची माहिती मागितली असताना, निर्णयामध्ये केवळ सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील माहिती देण्याबाबत नमूद करण्यात आले. त्यानंतरही पूर्ण व अपेक्षित माहिती न मिळाल्याने २३/०९/२०२६ रोजी स्मरणपत्र अर्ज देण्यात आला; मात्र त्यानंतरही माहिती अद्ययावत नसणे आणि आदेशाची पूर्ण अंमलबजावणी न होणे यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र असमाधान व्यक्त होत आहे.  
लढ्याचा निर्धार आणि कारवाईची मागणी.


योग्य पाठपुरावा करून आवश्यक माहिती व कागदपत्रे गोळा केल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार दिल्याचे मोनेश्वर सुतार यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा व लढ्याच्या वारसा जपत, अन्याय किंवा कसूर झाल्यास कायदेशीर व संघटित लढा देऊन तो जिंकण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. माहिती देण्यास कसूर/दिरंगाई व आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे कायद्याच्या कलम २० अन्वये शास्ती (दंड) आकारणे तसेच जबाबदार अधिकारी व कार्यालयांवर प्रशासकीय/शिस्तभंगात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी तक्रारीत केली आहे. चौकशीसाठी बोलावल्यास सर्व मूळ कागदपत्रे व पुरावे प्रत्यक्ष सादर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. सार्वजनिक कारभारात पारदर्शकता आणि कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.  

मोनेश्वर आप्पासाहेब सुतार
शिवाजीनगर, गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर – ४१३३०४
मो. ९३०९७१२८९६ | ई-मेल: moneshwars806@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *