मोबाईलच्या कॅमेऱ्यापासून कमाई पर्यंत… सोशल मीडिया म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर उत्पन्नाचेही एक खुले व्यासपीठ आहे..!

बातमी शेअर करा.

एक काळ असा होता की छंद जोपासायचा असेल तर त्यासाठी पैसा खर्च करावा लागायचा. फोटोग्राफीची आवड असेल तर महागडा कॅमेरा हवा, व्हिडिओ बनवायचा असेल तर कॅमेरा, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि तांत्रिक कौशल्य हवे. लेखनाची आवड असेल तर प्रकाशकाचे उंबरठे झिजवावे लागायचे. पण आता काळ बदलला आहे. आपल्या खिशात असलेला स्मार्टफोन हेच एक छोटेसे स्टुडिओ, प्रकाशन संस्था आणि व्यवसायाचे साधन बनले आहे.विशेष म्हणजे, सोशल मीडियावर पैसे कमावण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःचे व्हिडिओ शूट करणे किंवा महागडी ॲप्लिकेशन्स वापरून व्हिडिओ तयार करणे आवश्यकच आहे, असे नाही. त्यासाठी काही वेगळे आणि तुलनेने सोपे मार्गही उपलब्ध आहेत.
१. रेडिमेड व्हिडिओ डाउनलोड करून कमाई!

इंटरनेटवर अनेक वेबसाईट्स आहेत, जिथे निसर्ग, समुद्रकिनारे, पर्वत, प्राणी, पक्षी, शहरांचे सौंदर्य, सूर्यास्त अशा असंख्य विषयांवरील तयार व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही व्हिडिओ विनामूल्य तर काही विशिष्ट परवान्यासह वापरता येतात.Pexels, Pixabay यांसारख्या वेबसाईट्सवरून योग्य परवानगीच्या अटी तपासून व्हिडिओ मिळवता येतात. हे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरणे शक्य आहे.मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. व्हिडिओ कॉपीराईटमुक्त किंवा वापरण्याची परवानगी असलेला आहे, एवढ्याने तो मॉनिटायझेशनसाठी पात्र ठरतोच असे नाही. उदाहरणार्थ, YouTube च्या Reused Content धोरणानुसार केवळ दुसऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करून जशाच्या तसा अपलोड करणे, परवानगी असली तरी, कमाईसाठी अपात्र ठरू शकते. स्वतःचे भाष्य, माहिती, कथन किंवा लक्षणीय सर्जनशील मूल्य जोडणे महत्त्वाचे आहे.म्हणजेच, दुसऱ्याच्या दृश्यांचा वापर करता येतो; पण त्यातून स्वतःचा आशय निर्माण करणे ही खरी कला आहे.
२. आपल्या मोबाईलमधील फोटोंनाही बाजारपेठ आहे!
हा आणखी एक रंजक आणि अनेकांना माहीत नसलेला पर्याय आहे.आपण फिरायला जातो, एखादे सुंदर झाड पाहतो, फुलपाखरू दिसते, पावसाचे थेंब पानांवर विसावलेले असतात, एखाद्या जुन्या वास्तूचे सौंदर्य नजरेत भरते किंवा रस्त्यावरील एखादे वेगळे दृश्य मनाला भावते. आपण सहज मोबाईलने फोटो काढतो आणि सोशल मीडियावर टाकतो.पण हाच फोटो व्यावसायिक उपयोगासाठी विकला जाऊ शकतो, याची अनेकांना कल्पनाच नसते!
Adobe Stock मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले दर्जेदार फोटो स्वीकारते. फोटो विकला किंवा परवान्याने वापरला गेल्यास योगदानकर्त्याला रॉयल्टी मिळते.
Contributor वेबसाइट : Shutterstock फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून जागतिक ग्राहकांसाठी उपलब्ध करून देता येतात. मोबाईल ॲपद्वारेही फोटो अपलोड करण्याची सुविधा आहे.Contributor वेबसाइट: iStock / Getty Images दर्जेदार छायाचित्रांसाठी आणखी एक जागतिक व्यासपीठ. योगदानकर्त्यांसाठी निवड आणि परवाना प्रक्रिया असते.यातील Adobe Stock स्पष्टपणे सांगते की मोबाईलने काढलेले फोटोही स्वीकारले जातात. मात्र फोटो तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार असणे, योग्य प्रकाश, स्पष्टता आणि रचना असणे आवश्यक आहे.
३. फोटोग्राफी म्हणजे फक्त बटण दाबणे नव्हे!
मोबाईल कॅमेरा प्रत्येकाकडे आहे; पण प्रत्येकजण छायाचित्रकार नसतो. एखाद्या साध्या फुलाचे छायाचित्रही विलक्षण सुंदर दिसू शकते, तर महागड्या कॅमेऱ्याने टिपलेले दृश्यही सामान्य वाटू शकते.त्यासाठी प्रकाशाची दिशा, फ्रेमिंग, पार्श्वभूमी, विषयाची निवड, क्लासिकल अँगल, तृतीयांश नियम (Rule of Thirds), फोकस आणि योग्य क्षण यांचे भान असावे लागते.  फोटोग्राफी ही केवळ तंत्रज्ञानाची गोष्ट नाही, तर पाहण्याची दृष्टी आहे. इतरांना जे सामान्य दिसते, त्यात छायाचित्रकाराला काहीतरी असामान्य दिसते.


४. व्हिडिओ आणि फोटो विकण्याव्यतिरिक्तही कमाईचे मार्ग!
सोशल मीडियावर उत्पन्न मिळविण्याचे आणखी काही पर्याय आहेत.
१) YouTube: स्वतःचे माहितीपूर्ण, मनोरंजक आणि मौलिक व्हिडिओ तयार करून जाहिराती, सदस्यत्व आणि इतर माध्यमांतून उत्पन्न.
२) Facebook: पात्र प्रोफाइल किंवा पेजवर मूळ Reels, व्हिडिओ आणि इतर पात्र कंटेंटद्वारे कमाई.
३) Instagram: ब्रँड सहकार्य, प्रायोजित पोस्ट, उत्पादनांचे प्रमोशन आणि Affiliate Marketing.
४) Stock Video: स्वतः शूट केलेले दर्जेदार व्हिडिओ Adobe Stock, Shutterstock यांसारख्या बाजारपेठांवर परवान्यासाठी उपलब्ध करून देणे.
५) Digital Products: स्वतः तयार केलेले फोटो कलेक्शन, ग्राफिक्स, टेम्प्लेट्स, ई-बुक्स आणि डिजिटल कलाकृती विकणे.प्रत्येक माध्यमाचे पात्रता निकष, उपलब्धता आणि कमाईचे नियम वेगवेगळे आहेत. केवळ खाते उघडल्याने किंवा पोस्ट केल्याने पैसे मिळू लागतात असे नाही.
६) एक महत्त्वाची दक्षता!
इंटरनेटवर उपलब्ध असलेला प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ मुक्तपणे वापरता येतो असे नाही. Creative Commons, Public Domain आणि Royalty Free या संज्ञांचा अर्थही एकसारखा नाही. प्रत्येक वेबसाईटचे License Agreement वाचणे, व्यावसायिक वापराची परवानगी तपासणे आणि आवश्यक तेथे व्यक्तींचे Model Release किंवा मालमत्तेचे Property Release घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या फोटोंमध्येही दुसऱ्याचे ट्रेडमार्क, कलाकृती किंवा ओळखता येणाऱ्या व्यक्ती असतील तर त्यासंबंधी नियम लागू होऊ शकतात.
शेवटी एकच…
आजच्या काळात आपल्याकडे साधने नाहीत, संधी नाहीत किंवा पैसा कमावण्याचे मार्ग नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रश्न आहे तो आपल्याला उपलब्ध साधनांचा उपयोग किती कल्पकतेने करता येतो याचा!
एखाद्याला झाडावरचे फूल दिसते, दुसऱ्याला त्यात छायाचित्र दिसते, तिसऱ्याला त्यावर कविता सुचते, तर चौथ्याला त्यातून व्यवसायाची संधी दिसते.
फरक फक्त नजरेचा आहे!
आपल्या मोबाईलमध्ये असलेला कॅमेरा हा केवळ आठवणी जतन करण्यासाठी नाही, तर आपल्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही उपयोगी पडू शकतो. आपल्या छंदाला उत्पन्नाचे साधन बनविण्याची ही एक नवी संधी आहे.
कारण आता केवळ नोकरी शोधणाऱ्यांचाच काळ नाही; आपल्या कौशल्यातून स्वतःसाठी काम निर्माण करणाऱ्यांचाही काळ आहे!
टीप : वरील वेबसाईट्सची धोरणे, कमिशन आणि पात्रतेचे निकष वेळोवेळी बदलू शकतात. उत्पन्नाची कोणतीही हमी नाही. सुरुवात करण्यापूर्वी संबंधित व्यासपीठाच्या अधिकृत अटी तपासाव्यात.
अशोक वानखडे – ९६१९४१३१९३,कल्याण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *