
ईस्ट इंडियन समाज हा सागरपुत्र आगरी कोळी भंडारी आदिवासी समाजाचा सख्खा भाऊ आहे. २०१६/१७ साली मुंबईच्या गावठाण हक्कांचा लढा सुरू करताना, हा आमच्यातील बंधुत्वाचा अनुभव मी घेतला.आधुनिकता,शिक्षण,उच्च राहणीमान, साऱ्या जगाशी जोडलेला,अत्यंत सुसंकृत आणि प्रचंड मायाळू असा हा ईस्ट इंडियन भाऊ आहे.त्यांच्या गावात,घरात जाऊन प्रत्यक्ष अनुभवला पाहिजे.मुंबईचे माजी नगरसेवक आल्मेडा साहेब,ॲड.गॉडफ्री पेमेंटा,ॲड.विवियन डिसोझा,जॉन्सन मिस्किटा,डेनिस डिसुझा असे एक एक प्रेमळ भाऊ मुंबई गावठाण चळवळीचे आधारस्तंभ आहेत.ज्यांच्या सहवासात जमिनीवरचे स्वर्गसुख अनेक ईस्ट इंडियन सांस्कृतिक कार्यक्रमात मी अनुभवले आहे.
सांताक्रूझ मुंबई येथील डिसुझा बिल्डिंग मुंबई महानगर पालिकेने २०१४ साली धोकादायक ठरवली.अर्थात ती २०२४ पर्यंत पडली नाही.आजही ती पाडण्यासाठी जेसीबी मशीन लागतील.स्वतःच्या मालकीच्या जागेत असलेली ही इमारत आहे. शासकीय परवानगीने बांधली आहे.ती अतिक्रमित नाही की अनधिकृत नाही.१९७२ साली रहिवाशी लोकांनी स्वतः बांधली.मुंबईतील अनेक १०० वर्षे जुन्या इमारती धोकादायक नाहीत?.मग पन्नास वर्षे जुनी केवळ दोन मजली इमारत धोकादायक कशी? मुंबई महानगर पालिकेच्या पॅनल वरील मेहता नावाचा स्ट्रक्चरल ऑडिटर एकदा ही इमारत राहण्यास अयोग्य,धोकादायक ठरवतो.तोच मेहता ऑडिटर,डिसुझा बिल्डिंग रहिवाशी मंडळाच्या खर्चाने केलेल्या रिपोर्ट मध्ये, “इमारत दुरुस्त करून राहण्यास योग्य आहे” असे म्हणतो.धोकादायक नाही असे म्हणतो.लोकांनी स्वतः खर्च केला.आजपर्यंत राहिलेही.परंतु मुंबई महानगर पालिकेने,पोलिस घेऊन इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले.कायद्याचे लॉजिक काय असावे? ७०० कोटी रुपयांची जमीन चोरी? ७० ते ८० वयाच्या वयोवृद्ध महिला येथे राहतात.परीक्षा देणारे विद्यार्थी राहतात.वीज पाण्याविना त्यांची झालेली बिकट अवस्था सांगायला माझे शब्द अपुरे पडतील.लोकांनी इमारत सोडावी,असे मुंबई महानगर पालिका,पोलिस,न्यायालय यांना वाटते.परंतु ही इमारत तोडल्यानंतर,वन रूम किचनचे,चाळीस हजार रुपये भाडे असलेल्या या उच्चभ्रू वस्तीत घर कुणी द्यायचे? म्हातारी माणसे ,विद्यार्थी जाणार कुठे?
लोकांचे जीव वाचवायला सरकार निघाले? की आम्हाला मारायला निघालेय? आमचे लोक,आमची लोकशाही हा प्रश्न मुंबई महानगर पालिका प्रशासन,न्यायालय,पोलिस यांना विचारू शकते का? माझ्या पत्रकार बांधवानी मला सांगावे.आता मुंबई महानगर पालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत.नगरसेवक नाहीत.ओबीसी इम्पीरीकल डेटा नाही. म्हणून आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेतले ओबीसी राजकीय हक्क संपवून,उच्च जातीय हुकूमशाही,आम्हा स्त्री शूद्र अतिशूद्र यांना उध्वस्त करतेय? मुंबई हुकूमशाही कडे निघालीय का? सर्व राजकीय पक्षांनी,नेत्यांनी उत्तर द्यावे.ही माझी नम्र विनंती आहे.ख्रिश्चन मुस्लिम हिंदू सारे भारतीय येथे राहतात.परंतु संकटात मदत करणारा कोणताच धर्म,नरक यातना भोगणाऱ्या डिसुझा बिल्डिंग रहिवासी लोकांना,अजूनही सापडलेला नाही.मलाही दिसत नाही.आम्ही मुंबईचे भूमिपुत्र मानवता,माणुसकी विसरलोय का? “झाडाचे जोडलेले पान एकदा तोडले की पुन्हा जोडता येत नाही.” असे भगवान बुद्ध म्हणाले होते.लोकांची राहती घरे पोलिस बंदोबस्तात तोडणाऱ्या,शासनाच्या जबरदस्तीच्या बुलडोझर संस्कृतीला कुणी तरी बुद्ध काय म्हणाले? हे समजाऊन सांगेल का? मागासवर्गीय,ओबीस,एससी,एसटी,अल्पसंख्याक, ख्रिश्चन मुस्लिम ही माणसे आहेत.दगड विटांची घरे तुटतात तशी ही भारतीय माणसे कोणत्याही युद्धाशिवाय मनाने तोडली जात आहेत.इकडे जरा लक्ष द्याल? खऱ्या अर्थाने धोकादायक नसलेली ही इमारत धोकादायक का ठरवली गेली?. तिथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचा जीव प्यारा नाही का? मुंबई महानगर पालिका, न्यायालय,पोलिस हे मुंबईकर भूमिपुत्र ईस्ट समाजाच्या लोकांवर एवढे फिदा का झाले? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे.”बिल्डर जमात.”
मुंबईचा विकास करायला उतावीळ झालेले बिल्डर मागासवर्गीय वस्त्यांत जाऊन विकास करत आहेत.किती मोठी समरसता? ज्यांना पूर्वी अस्पृश्य ठरविले.प्यायचे पाणी नाकारले.असे सारे उच्चवर्णीय बिल्डर,राजकारणी,पोलिस,पालिका अधिकारी आमच्या “गलिच्छ” वस्त्या विकसित करायला निघाले?. केवढे हे सामाजिक परिवर्तन?. मुंबईतली सर्वात मोठी गलिच्छ झोपडपट्टी “धारावी” मोदी मित्र अदानी आपल्या पवित्र हस्ते विकसित करीत आहेत?.अयोध्या क्षत्रिय राम मंदिर निर्मिती पेक्षा, मागास शूद्र अतिशूद्र मुस्लिम ख्रिश्चन यांना घर देणे, पुण्याचे हे काम देव दुर्लभ असेल,नाही का? कितीहा वर्षे आरक्षण,घरे,रेशन दिले.तरी विकास मात्र उच्च वर्णियांचाच होतो.मागासवर्गीय मागेच का राहतात.असे का होते?.असाही प्रश्न ८५ टक्के स्त्री शूद्र अतिशूद्र या जन्माने मागास ठरवलेल्या लोकांच्या विरोधकांना पडत असेल? परंतु मनुस्मृतीचा काळ असो की भारतीय संविधानाच्या लोकशाहीचा,फसवले जातात मागासवर्गीय लोकच.अल्पसंख्यांक लोकच.अतिशय नियोजन पद्धतीने भारतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लॉबी काम करीत आहे.डिसुझा इमारत ही त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.दुसरीकडे महिलांच्या वारस नोंदी न करताच कल्याण डोबिवलीच्या पिकत्या शेतजमिनी बिनशेती दाखवून पोलिसांच्या मदतीने लोढा बिल्डर लुटतोय.
संविधानाने दिलेले अल्पसंख्यांक अधिकार गेले कुठे.केवळ ईस्ट इंडियन्स नाही तर आम्ही आगरी कोळी भंडारी आदिवासी या ठाणे रायगड पालघर नवी मुंबई येथे अल्पंख्यक झालोय.बहुसंख्या असलेला हिंदू मध्ये शूद्र ओबीसींच्या जमिनी लुटतोय उच्चवर्णीय हिंदू. ईस्ट इंडियन ख्रिस्ती प्रार्थना मंदिर जे हेरिटेज आहे.ते तोडणार का? मागे सायन कोळीवाड्याचा काही हेरिटेज किल्ला परिसर असाच महानगर पालिकेने बिल्डर साठी उध्वस्त केला होता.कुठे आहे पुरातत्व विभाग? ईस्ट इंडियन डिसुझा बांधवांची सांताक्रूझ परिसरात शेती होती.घरे आणि गावठाण होते.ते पूर्वीचे हिंदू आगरी कोळी भंडारी आदिवासी होते.वर्तमान काळात होणाऱ्या अशाच प्रकारच्या हिदू उच्चवर्णीय शोषणास वैतागून त्यांनी धर्मांतर केले.अलीकडे संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला.शोषक हिंदू धर्म नाकारला.अर्थात ईस्ट इंडियन समाजाने धर्मातर करून खूप प्रगती केली.जमीन मालकी हक्क मात्र तो विसरला आहे.सायन कोळीवाड्यातील आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन यांना हातोहात फसविणारे बिल्डर,पोलिस,मुंबई महानगर पालिका यांना मी स्वतः पाहिलेय.मी त्या सायन कोळीवाड्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष केलाय.मला माझी ताकद कमी पडली याचे कायम दुःख आहे.माझ्या मुंबईकर भावा बहिणी यांना धोका समजत नाही.शत्रू समजत नाही.जमिनीचे मालकी हक्क समजत नाहीत. त्यासाठी करण्याचा सत्याग्रह,संविधानिक संघर्ष,लोकनेते दि बा पाटील यांच्यासारखा सर्वस्वाचा त्याग,ओबीसी समाजाचे लोकशाही संघटन समजत नाही.
शासनाने पारंपरिक,वंशपरंपरेने वहिवाट जमीन मालकीची लेखी सनद डिसुझा रहिवाश्यांना दिली आहे.कारण आपले गाव,शेती व्यवसाय त्यांनी सांताक्रूझ मुंबईच्या विकासासाठी देऊन मोठे बलिदान दिले होते.जसे नवी मुंबईच्या आगरी कोळी कराड्यानी सिडको नवी मुंबई साठी दिले आहे.अर्थात ईस्ट इंडियन येथेही नवी मुंबईत होते.ओबीसी मागास वर्गीयांचा त्याग देश नेहमीच विसरतो.सरकारने दिलेली मालकीची सनद जिल्हाधिकारी बांद्रा यांच्या परवानगी शिवाय हस्तांतरित होत नाही.परंतु मृत ईस्ट इंडियन आजोबांच्या नावे असलेली जमीन मांलकी षड्यंत्र करून संपवण्यात आली.कायदेशीर वारस नोंद झालीच नाही.आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जिवंत सातबारा म्हणजे वारस नोंद योजना आहे कुठे? बिल्डरांनी ती जन्मन्या अगोदरच तिची वाट लावली आहे.मालकीच्या जागेत डिसुझा इमारत उभी असताना ती कागदोपत्री चोरीला गेली आहे. तीही दिवस रात्र जागी असणाऱ्या माया नगरी मातृसत्ताक मुंबईतून? बिल्डरांनी गोड बोलून भोळ्या ईस्ट इंडियन भूमी पुत्र समाजाचा काटा काढला.विकास करतो,असे सांगून स्वतःच्या नावे,बेकायदेशीर खरेदी खत नोंदविले आहे.हजारो कोटींचा हा भ्रष्टाचार मुंबई महानगर पालिकेच्या आवारात होत आहे.महानगर पालिकेत निवडणुका नाहीत.नगरसेवक लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक बिल्डर धार्जिणे निर्णय घेतात.न्यायालये प्रत्यक्ष परिस्थिती पाहत नाहीत.कागदी घोडे बिल्डर हलवितात.नोटांचा चारा घोड्यांना घालतात.बिचारी रयत छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याच्या आठवणी सांगत अशी रोज मरत आहे.मागील वीस वर्षे जमीन पोखरण्याच्या हालचाली सुरू होत्या.भूमी अभिलेख विभाग, जिल्हाधिकारी हे जमीन मालकी पाहतात.ही सत्य गोष्ट सांगूनही आमचे मुंबई कर तिकडे कधी जात नाहीत.डिसुझा बिल्डींचा घात असा झाला आहे.नव्हे ठरवून केला आहे.मुंबई पोलिस आयुक्तालयात,अल्पसंख्याक आयोगात तक्रार नोंदविली आहे.
इमारत आजही उभी आहे.परंतु जमीन मालकी, इमारत तुटल्यानंतर डिसुझा बांधवांची राहील.लढावे लागेल.त्यासाठी पैसा मनुष्यबळ लागेल.हेच सत्य माझ्या ईस्ट इंडियन बांधवांना समजत नाही.लोक घाबरून ही जागा सोडून गेले? तर बिल्डर ताबा घेईल.त्यासाठीच मुंबई महानगर पालिका पोलिस यांनी लाईट पाणी तोडले.ईस्ट इंडियन समाज,चर्च त्यांचे सर्व फादर,समाजसेवक यांना विनंती आहे.आपण तत्काळ मदत करून, “मनाने तुटणाऱ्या” डिसुझा बंधू भगिनींना मायेचा,मदतीचा हात द्या.जे मुंबईत घडतेय ते उद्या ठाणे पालघर रायगड,नवी मुंबईतही घडणार आहे.आगरी कोळी भंडारी आदिवासींनी मुंबई आमची आहे.हे समजून घ्यावे.त्याचे लिखित पुरावे जिल्हाधिकारी भूमिअभिलेख येथे आहेत.ते पहा.जगायचे असेल तर घर गावठाण जमीन हवी.आकाशातला देव,आकाशातला स्वर्ग काय कामाचा? बुद्ध,चार्वाक,महावीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दि बा पाटील म्हणाले.तेच आम्ही गावठाण चळवळीचे लोक ओरडून सांगतोय.मुंबई वाचवा,स्वतःला,आईला,बहिणीला,भावाला, मुलाना,मित्रांना वाचवा.उद्या या मुंबईत.डिसुझा बिल्डिंग सांताक्रूझ मुंबईला.सारे सांगेन.येथे लिहायला जागा कमी पडते.
राजाराम पाटील ८२८६९३१४६३.उरण जिल्हा रायगड.
