बौद्धाची (महाराची) पोर पुन्हा वाचण्याकडून नाचण्याकडे.

बातमी शेअर करा.

इतिहास वाचाल तर इतिहास घडविता येतो. आम्ही महार घरी गाणं आणि ब्राम्हणा घरी लिहणं वाचले होते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ जून १९५० रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे केली होती. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स,मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स,असा तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचा गट आहे.५४ एकर परिसरामध्ये म्हणजेच नागसेन वनात हे महाविद्यालय पसरलेले आहे.हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान आली खान यांच्या कडून  सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली. हा इतिहास किती लोकांना माहिती आहे. हे सांगता येत नाही १९५० नंतर किती मूलमुली पदवीधर होऊन बाहेर गेले,ते कुठे किती मोठे प्रशासकीय अधिकारी झाले,त्यांचे या शिक्षण क्षेत्रातील चळवळीत आज काय योगदान आहे.हा संशोधनाचा सत्य शोधनाचा विषय आहे.समाजातील मुलामुलीने शिकावे,संघटीत व्हावे आणि नंतर संघर्ष करावा यासाठी शिक्षणसत्ता केंद्र निर्माण केले होते.ते कोणत्याही एका जाती धर्मापुरते नसून पिपल्स म्हणजे (लोक जनता) लोकशाही प्रणीत तमाम बहूजन समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी आणि मनुस्मृतीचे जळमटं नष्ट करुन आत्मनिर्भर आणि शोषण, भयमुक्त समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांनी उचललेल ते क्रांतिकारी पाऊल होते.त्यांचा आदर्श किती विद्यार्थ्यांनी घेतला हा पण एक संशोधन करण्याचा विषय आहे. 

    शिक्षणात नोकरीत पदोन्नतीत आरक्षणाची सवलत घेणारे अनेक विद्यार्थी आहेत,पण त्यातील किती गर्वाने मी  मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे सांगणारे आहेत?. ज्ञानाची ज्योत व जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवण्यासाठी यांनी काय काय केले. हे गर्वाने सांगू शकत नाही.म्हणूनच नाचण्यामुळे आपल्या अनेक पिढ्या बदनाम झाल्या,बर्बाद झाल्या. व्यवस्थेच्या बळी ठरल्या.नाच तमासे उभे करून चार पैसे कामावले असतील पण त्या चार पैशाने केलेले शोषण अत्यंत अमानवी होते.हे सत्य परिस्थिती सांगणारी त्यासाठी निर्भयपणे बोलणारी पिढी आज मला कुठे दिसत नाही.सेवानिवृत्ती नंतर समाजात मिसळणारे लग्न कार्यात पुढे पुढे करणारे आम्ही मिलींद महाविद्यालयात शिकून मोठे अधिकारी झालो,आम्ही हे केले आम्ही ते केले.हे सांगतांना मुलामुलींचे शिक्षण,गाडी बंगला,हे मोठ्या अभिमानाने सांगतात.पण आंबेडकरी विचारांच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा आणि कामगार संघटनेत आपले योगदान काय हे कधीच सांगत नाही.सरकारी नोकरी होती म्हणून राजकीय चळवळीत सहभागी होऊ शकत नव्हता. पण यात का सहभागी होऊ शकले नाही. यांचे ही उत्तर त्यांच्या कडे असते,मुलामुलींचे शिक्षण होते, नंतर नोकरी, लग्न कार्य यातून वेळच मिळाला नाही,आता सेवानिवृत्ती नंतर प्रत्येक ठिकाणी सहभागी होण्यासाठी वेळ मिळतो. पण हेच सांगितल्या जाते मी मोठा अधिकारी होतो,मला सर्व कसे घाबरत होते.मला कसा मान सन्मान मिळत होता.आताची तरुण पिढी मला ओळखत नाही. त्यांना दहावी,बारावी नपास कार्यकर्ता मोठा वाटतो. ही खंत अनेक अधिकारी व्यक्त करतांना मी पाहिले.

    मिलिंद महाविद्यालयच्या उभारणीच्या वेळी पट्टे बापूराव यांच्याकडून देऊ केलेली पैशाची थैली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारली. आणि म्हणाले, “आमच्याच आई बहिणी नाचवून कामाविलेला पैसा माझ्या महाविद्यालयासाठी नको” भगवान बुद्ध सुद्धा नाचणे आणि नाच पाहणे वर्ज्य करण्यास सांगतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाचणाऱ्या समूहाला वाचण्याकडे वळविले.मुलं वाचू लागली,शिकू लागली. मोक्याच्या जागा काबीज करू लागली.चार पैसे गाठीला बांधू लागली.झोपडीतून बंगल्यात आली एक सजग सशक्त समाज उभा राहू लागला होता.अलीकडे स्थिरवत चाललेली आर्थिक सुबत्तता आम्हाला प्रसिद्ध मंदिराकडे खेचू लागलीय,मोठी मोठी माणसे आपल्या संपन्नतेचे प्रदर्शन करून इंपोर्टेड कारने फिरू लागली.आपले वैभव दाखविण्यासाठी घरात गणपती उत्सव साजरा करायला लागले. लग्न पत्रिकेवर कचरू महाराज प्रसन्न,वित्तू बाबा प्रसन्न लिहायला लागले. त्यांना तीन प्रकारच्या लग्न पत्रिका छापाव्या लागतात.तरी कुटुंबातील सदस्य मेल्यावर काहीच लपवता होत नाही.माणसं घडविणारा कारखाना आणि अश्वगतीने काम करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी याकडे सोयीसकर पणे दुर्लक्ष करतात. त्याच लोकांनी 14 एप्रिल हा आमच्या बाबाचा जन्मदिन मोठ्या थाटमाटतात साजरा केलेला पाहिला.आणि एक प्रश्न पडला आम्ही नेमके कुणीकडचे?.

   आता महापुरुषांची संयुक्त जयंती ही मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते.लाखो रुपये खर्च करून सभागृहात सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन केले जाते, एकापेक्षा एक भारदस्त गायक आपली गायकी सादर करून लोकांना मदहोश मंत्रमुग्ध होऊन नाचायला भाग पडतात.रमाईचा त्याग,संस्कार,कुटुंबवत्सलता,जिद्द,चिकाटी, करुणा या गुणांचा वसा,वारसा घेतांना महिला दिसत नाही.पण नांदन नांदन होत रमाचं नांदन या गाण्यांवर महिला बेधुंद होऊन जेव्हा ठेका धरतात तेव्हा त्यांना काय म्हणावे समजत नाही.त्या रमाईचा कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवतात हा मोठा प्रश्न आहे.

    कधीकळी नाच आमच्या भाकरीचे साधन होते पण आम्ही तो नाद सोडला तो आता परत धरायला नको.सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबातील महिला लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात सिरियल सिनेमा सारखे हळदीच्या गाण्यावर नाचण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत.म्हणजेच सर्व काही वाचण्याकडून नाचण्याकडेच वाहणे चालू आहे.असे लिहावे लागत आहे. लग्नात,जयंतीत दारू पिऊन नाचणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यांना रोखण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्यामुळेच एक पंधराचे लग्न तीन तासाने उशिरा लागते. लोकं हताश होऊन जातात.पर्याय नसतो. १३४ व्या भिम जयंतीत डिजे लावण्यावर मंडळाचा मोठा भर आहे तर स्थानिक पोलिस अधिकारी त्यांना डी जे लावण्यावर सुप्रीम कोर्टाची मनाई आहे असे सांगत आहेत. तरी कार्यकर्ते ते समजून घेण्यास तयार नाही. डी जे शिवाय नाचण्याला काहीच मज्जा नाही. म्हणजेच आमच्यासाठी भिम जयंतीत नाचणे खूप महत्वाचे झाले आहे. क्रांतिकारी विचारांचे काय?.हा प्रश्न उभा राहणार आहे.बाबासाहेब सांगत होते चळवळ हे तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन समजू नका,ते व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहे. आज चळवळ कोणत्या विचाराने कोणत्या दिशेला चालली यावर चर्चा होत नाही. माझ्या सारखा बोलायला लिहायला लागला तर तो एक नंबर शत्रू ठरत आहे. म्हणूनच मी बौद्धाची (महाराची) पोर पुन्हा वाचण्याकडून नाचण्याकडे वळत आहेत हे लिहत आहे.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करतांना आपण त्यांचा कोणता आदर्श घेतला आणि त्यांचे काय आचरण करतो,यांचे आत्मचिंतन अपेक्षित आहे.पण ते कोणी करावे?. आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जागते. आणि आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते. यावरूनच आपला प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे हे चित्र स्पष्ट होते. 

सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *