भिम जयंती साजरी करतांना तरुणाई मध्ये प्रचंड स्पिरीट दिसले. 

बातमी शेअर करा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते जा आपल्या घराच्या भितीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन कर्ती जमात बनायचे आहे.हे आम्ही पूर्णपणे विसरलो असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.पण १३४ व्या भिम जयंती निमित्य चैत्यभूमी दादर परिसरात समाजकल्याण व महानगरपालिका यांनी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भिम अनुयायी भिमसैनिकांच्या साठी जी व्यवस्था केली होती ती कौतुकास्पद होती. भिमसैनिक सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करणारे अधिकारी म्हणजेच आयु हर्षदीप कांबळे साहेब मुख्य सचिव सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य.सामाजिक न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी,समान हक्क आणि समान वागणूक मिळवून देण्याची संकल्पना. या न्यायात,जात,धर्म,लिंग,आर्थिक स्थिती यांसारख्या कोणत्याही कारणांवर आधारित भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळतो. तो यावर्षी स्पष्टपणे दिसून आला.दुसरे हिंदू कॉलनी दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजग्रह येथे ही महानगरपालिका अधिकारी वर्गाने उत्तम व्यवस्था केली होती. कारण दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षवेधी असते. त्यांची दखल शासन प्रशासन मधील अधिकारी घेत नव्हते पण त्यांना भिमसैनिकांचे भिम जयंती बाबतचे स्पिरीट माहिती झाल्यामुळे आणि आता क्रांतिकारी विचारांची स्पिरीट अधिकाऱ्या मध्ये दिसत आहे.      राज्यात व केंद्रात सत्ताधारी वैचारिक शत्रू आपले शंभर वर्षाचे स्वप्न साकार करण्याचे उधिष्ट पूर्ण करण्याच्या अंतिम सीमेजवळ पोचण्याचा जोरदारपणे प्रयत्न करीत असतांना आम्ही मात्र जोश मध्ये होश गमावून भिम जयंतीचे स्पिरीट दाखवत असतो. 

      डॉ.बाबासाहेबांचे हे म्हणणं आम्ही कधीच मनावर घेतले नाही आणि मोठया उत्साहात दरवर्षी जयंती साजरी करत राहतो.या वर्षी कितवी जयंती आहे १३४ वी. विचार करा!.आज पर्यंत राजकीय परिवर्तन का नाही झाले. म्हणजेच आम्ही लायक बापाचे नालायक लेकर आहोत हे सिद्ध करून दाखविले की नाही.परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमानुसार बदलत राहतो.त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात. वेळ,काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही. म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात. उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठया उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही.म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल,सभागृह बांधण्यात आले आहेत.१९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हते.पण आता समाजाने बदलेलच पाहिजे.आम्ही खेडे सोडुन शहरात आलो,शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन,सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात घडला नाही.खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्यासाठी संघर्ष करून यशस्वी झाला. आता स्वतःच्या घरात राहत आहोत.तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्यासाठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता.सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता. आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता. क्रांतिकारी विचारांची स्पिरीट चबुतरा,बुद्ध विहारात दिसत नाही.त्याचे चिंतन आवशक्य आहे.ते १३४ वी भिम जयंती साजरी करतांना दिसले पाहिजे. 

झोपडपट्टी वाचविण्या साठी बुद्ध विहार होती.म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो.बसत होतो,चर्चा करून कार्यक्रम घेत होतो. आता त्यांची गरज वाटत नाही. कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर,लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.त्यामुळेच सर्व आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ला आज एस आर ए बिल्डिंग मध्ये गेले आहेत. म्हणुन एकत्र बसण्याची गरज राहली नाही.आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत. पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत.कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या बॅनरवर प्रमुख मार्गदर्शक,सल्लागार दादा,भाऊ,नाना,काका,साहेब असतोच शेवटी बाप बापच असतो.म्हणुन विहारात एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल. बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल.ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते,नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत.हे चित्र बदलणार की नाही.

    जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो. हीच एकजूट निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?.भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो,पण तो लायटिंग,डेकोरेशन,ब्रेक डांस,कव्वाली वर खर्च करतो.आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो. पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक,आमदार की राजकीय नेत्यांच्या पाया का पडतो.असा प्रश्न आम्हास कधी का पडत नाही. विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत.सातबारा कोणच्याच नावाचा नाही. संस्था नोंदणीकृत नाही.त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी,आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाही.मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी,गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवावी तीच खरी आंबेडकरी विचारांची चळवळ असेल.दुसरे समाजाची बाजारपेठ डी मार्ट,बिग बाजार सारखी स्वताची निर्माण झाली पाहिजे.डोक्याच्या तेला पासून पायातील चपल,बूट पर्यन्त सर्व जन्मा पासून मृत्यू पर्यन्त लागणाऱ्या वस्तु,पदार्थ, अन्नधान्य आपले माणसांनी आपलेच माणसाकडून खरेदी व विक्री केली तर.आपली आर्थिक परिस्थिति देणाऱ्या मध्ये बदललेली असेल.यासाठीच क्रांतिकारी विचारांची स्पिरीट भिम जयंती साजरी करतांना दिसले पाहिजे. 

   जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक,आमदार व खासदार आपला येऊ शकतो.जयंती समितीचा अध्यक्ष निवडण्याचे निकस काय असतात?. तेच निकस प्रत्येक निवडणुकीत असले पाहिजे.दरवर्षी माझा रोखठोक सवाल असतो,लायक बापाच्या नालायक लेकरांनो  किती वर्ष भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग कराल?. १४ एप्रिल १९९७ ला मी हे दैनिक वार्ताहर मध्ये लिहले होते.तेव्हा माझ्या नगरातील कार्यकर्ते माझे हातपाय तोडण्याची तयारी करीत होते.एका प्रामाणिक कार्यकर्त्यामुळे ते शक्य झाले नाही.यांची आठवण मला दरवर्षी येते.त्यावेळी मुंबईतील तीनच दैनिकात माझे लेख प्रसिद्ध होत होते.आता राज्यातील मान्यताप्राप्त ६० दैनिकात स्तंभ लेख प्रसिद्ध होतात. म्हणूनच आत्मचिंतन करतांना लिहतो की क्रांतिकारी विचारांची स्पिरीट भिम जयंती साजरी करतांना दिसले पाहिजे.

महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत.परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?. एकाही नेत्यांचा मतदारसंघ नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?. यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही. वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो,  केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला त्याची जागा दाखविली पाहिजे की नाही?. असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना काढून  राजकीय दलाली करतात. त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही. करीता बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की बहुजन समाजातील लोकांचे काय?. कार्यकर्ते, नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात,आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.त्यात क्रांतिकारी विचारांची स्पिरीट नसते.म्हणूनच भिम जयंती साजरी करतांना क्रांतिकारी विचारांची स्पिरीट भिम जयंती साजरी करतांना दिसले पाहिजे. 

   आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेले सर्व पक्ष युती,आघाडी करीत आहेत. केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था,संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो. म्हणूनच लायक बापाच्या नालायक लेकरांनो वैचारिक शत्रूच्या उमेदवारा कडून लाखो रुपये घेऊन जयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा. हे वाक्य मी दरवर्षी लिहतो.राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी वैचारिक विचारांची जयंती साजरी करण्यात यावी. नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे म्हणणार नाही. कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार,मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो. नेहमी तिरस्कार करणाऱ्या   लोकात आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून प्रचंड अस्वस्थता वाढते असते. क्रांतिकारी विचारांची स्पिरीट बाकीच्या शिक्षण,आरोग्य,रोजगारासाठी वापरले तर देशात सामाजिक न्याय देणाऱ्या कल्याणकारी योजनेचा निधी शंभर टक्के वापरून समाजाचा सर्वागीण विकास कोणीच रोखू शकत नाही.म्हणूनच क्रांतिकारी विचारांची स्पिरीट भिम जयंती साजरी करतांना दिसले पाहिजे. 

   क्रांतिकारी विचारांचा आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंत च्या जयंतीत आपण पाहिले आहे.आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणताही ठोस कृती कार्यक्रम,योजना नाही.व्यक्ती पूजा,मूर्ती पूजा करून आपण किती वर्ष जयंती साजरी करत राहिला. तर क्रांतिकारी विचारांचे काय?.तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग आहे की नाही?.यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करावे. हेच १३४ व्या भिमजयंती निमित्त स्वताला भिमसैनिक,अनुयायी,शिष्य किंवा भक्त समजणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून चिंतन करावे.  क्रांतिकारी विचारांची स्पिरीट भिम जयंती साजरी करतांना दिसले.आता पुढे काय???.महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपले योगदान काय?. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपली भूमिका काय?. शिक्षण,आरोग्य याचे खाजगीकरण आणि त्यात होणारा भ्रष्टाचार यावर आपली भूमिका काय?. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते क्षेत्र सोडले की त्यात त्यांनी संघर्ष केला नाही. बाबासाहेबांनी कामगारांना सांगितले होते शासन कर्ती जमात बना,आपले कामगार अधिकारी कोणत्या विचारधारेच्या ट्रेड युनियन संघटनेचे सभासद आहेत?. कंत्राटी कामगार कोणसोबत आहेत?.बहुसंख्य महानगरपालिका कामगार कोणाचे सभासद आहेत?.आपल्या किती मूलभूत समस्या सुटल्या आणि किती बाकी आहेत?.त्यासोडविण्यासाठी भिम जयंती साजरी करतांना तरुणाई मध्ये असलेल प्रचंड स्पिरीट दिसते पाहिजे.डॉ.हर्षदीप कांबळे,आर के गायकवाड,शुद्धोधन आहेर,शिरीन लोखंडे मॅडम सारखे अनेक प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. राजकीय नेत्यांची हुजरेगीरी करण्यापेक्षा यांच्या मार्ग दर्शनाखाली काम केलेल शंभर पटीने उत्तम राहील.भिम जयंती जगात एक नंबर असते यात वाद नाही. पण पुढची दिशा कोणती ?.. हा विचार आपण कधी करणार आहोत.

आयु.सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य. 

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिति.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *