
वैशाख शुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरेची एक तारीख नाही, तर ती मानवी इतिहासातील एका महान “प्रकाशयुगाची” आठवण आहे.याच दिवशी कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला,याच दिवशी बोधगयेच्या पिंपळवृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्ती झाली आणि याच दिवशी कुशीनगर येथे त्यांनी निर्वाण प्राप्त केलं. म्हणूनच ही पौर्णिमा ‘त्रिसंधी’ म्हणून ओळखली जाते – जन्म,बोध आणि निर्वाणाचा संगम.पण या ऐतिहासिक घटनांच्या पलीकडे,बुद्धाचा जीवनप्रवास आणि त्यांचा धम्म म्हणजे मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारा शाश्वत विचार आहे.
आजचा आधुनिक माणूस जेव्हा विज्ञान,तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता,संपत्ती आणि यशाच्या शिखरांवर पोहोचतो,तेव्हा त्याला बाह्य साधनांची प्रचंड भरभराट दिसते,पण त्याचवेळी अंतर्मनात एक खोल अस्वस्थता घर करून बसलेली असते.मानसिक ताण, नातेसंबंधातील तुटणं,सामाजिक असहिष्णुता,जात-धर्माधारित द्वेष,आणि राजकीय फायद्यासाठी फोडले जाणारे समाज हे आजच्या युगाचं वेदनादायी वास्तव आहे. अशा अस्वस्थ काळात बुद्धांच्या करुणामय आणि विवेकनिष्ठ तत्त्वज्ञानाची नितांत आवश्यकता भासते.
“मन सर्व गोष्टींचा पाया आहे. मनानेच माणूस चांगला किंवा वाईट होतो.” “Mano pubbaṅgamā dhammā, mano setṭhā manomayā…” – धम्मपद 1) बुद्धांनी माणसाला आत्मशोधाचा मार्ग दिला. त्यांनी कोणत्याही दैवी सत्तेचा अवलंब केला नाही, उलट ‘अप्प दीपो भव’ म्हणजे स्वतःच स्वतःसाठी दीप बना,असा संदेश दिला.हा संदेश आजच्या अंधश्रद्धा, अंधानुकरण आणि नेतेधार्जिण्या मानसिकतेसमोर अत्यंत क्रांतिकारी वाटतो.त्यांनी सांगितले की दुःख हे जीवनाचं सत्य आहे, पण त्यातून मुक्तीही शक्य आहे आणि ती मुक्ती कोणत्याही ईश्वरी कृपेने नाही,तर सम्यक विचार, वाणी,कृती आणि जीवनशैलीने मिळवता येते. त्यांनी मांडलेली चार आर्यसत्ये दुःख, दुःखाचं कारण,दुःखाचा अंत आणि दुःख निवारणाचा मार्ग – ही आजच्या मनोवैज्ञानिक,सामाजिक आणि नैतिक विवंचनांसाठी अतिशय उपयुक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी आहेत.
“तृष्णा म्हणजे दुःखाचा मूळ स्त्रोत आहे.”
“Taṇhāya jāyatī soko…” – धम्मपद 212) बुद्धांनी मांडलेला अष्टांगिक मार्ग म्हणजे माणसाच्या जीवनातील सर्वच पैलूंना दिशा देणारा व्यापक आराखडा आहे. सम्यक दृष्टिकोन,सम्यक संकल्प,सम्यक वाणी, सम्यक कृती,सम्यक आजीविका,सम्यक प्रयत्न,सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी – हे केवळ आध्यात्मिक अभ्यासाचे घटक नाहीत,तर एका सुसंस्कृत,विवेकी आणि शांतीप्रिय समाजाची उभारणी करणारे मूल्य आहेत.
आज समाज जात,धर्म,भाषा,प्रांत,राजकारण या आधारांवर इतका विभागला गेला आहे की ‘समता’ ही संकल्पना केवळ घोषणांमध्ये उरली आहे.द्वेष,हिंसा आणि आपमतलबीपणा यांचा धूर इतका दाट झालाय की करुणा,संयम आणि मैत्री यांचे प्रकाशकिरणच दिसेनासे झाले आहेत.अशा वेळेस बुद्धांचा धम्म हे केवळ बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान नाही,तर ते सर्व मानवजातीसाठी एक मार्गदर्शक तत्व आहे.
“द्वेष द्वेषाने नाही, फक्त प्रेमाने शमतो.” “Na hi verena verāni, sammantīdha kudācanaṃ…”– धम्मपद 5) बुद्धपौर्णिमा साजरी करताना आपण केवळ विहारांमध्ये दीप लावतो, ध्यान करतो; पण आज खरी गरज आहे ती मनात प्रकाश लावण्याची.आपल्या अंतर्मनातील लोभ, द्वेष, मोह आणि अहंकार या अंधकाराचा नाश करण्याची बुद्धांनी देव होण्याचा मार्ग दाखवला नाही,तर माणूस म्हणून उन्नत होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी धर्म म्हणजे मानवतेचा उत्थान समजला – जिथे कोणतीही जात श्रेष्ठ नाही,कोणीही नीच नाही, सर्वजण फक्त माणूस म्हणून समान आहेत.
“सर्व प्राणी सुखी असोत,भयमुक्त असोत, शांत असोत.” “Sabbe sattā bhavantu sukhitattā…” – करुणा सूत्र : आज बुद्धांना पूजा करण्याची नाही,तर त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. बुद्ध हे विहारात बसवलेली मूर्ती नाहीत – ते एक जिवंत मूल्य आहेत, ज्यांनी हजारो वर्षांपूर्वी दाखवलेला मार्ग आजही तितकाच प्रकाशमान आहे.त्यांच्या विचारांनी आपल्याला स्वतःत परिवर्तन घडवायचं आहे.कारण शेवटी बुद्धत्व म्हणजे काय? – तर स्वतःला ओळखून,दुसऱ्याला समजून घेणं,आणि या जगात शांती,समता आणि करुणेचा दीप उजळत राहणं.समस्त मानवी समाजाला बुद्धाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा..! आपले व सर्वांचे मंगल होवो हिच मंगलकामना..!
लेखन – किरण रामी बाबुराव मोहिते.मो.9561883549,नाशिक.
