निळ्या आकाशातील चमकणार लाल तारा- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे.

बातमी शेअर करा.

भारतात मनुवादी विचाराचे सरकार आले तेव्हा पासून डाव्या विचारांच्या नेतृत्वाखाली संघटना,पक्ष आणि ट्रेड युनियनच्या केंद्रीय नेतृत्वानी आपली डावी विचार सारणी थोडी वेगळ्या पद्धतीने वापरायला सुरुवात केली. भांडवलशाही वर तुटून पडणारे तेव्हा ही ब्राम्हणशाही विरोधात,व जातीव्यवस्था शोषणाच्या विरोधात बोलत नव्हते.जगातील कामगारांनो एक व्हा.म्हणणारे पृथ्वी ही शेषनागच्या मस्तकावर तरली आहे हे मान्य करत असतांना अण्णा भाऊ साठे मात्र “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसुन ती कष्टकरी कामगारांच्या शोषितांच्या, पिढीताच्या कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे…!” असे छाती ठोकपणे अशा विज्ञानवादी दृष्टीकोनाचे पुरस्कर्ते म्हणून सांगत होते.आपल्या अभ्यासपुर्ण पोवाडे व शाहिरीच्या माध्यमातुन प्रबोधन ते कष्टकरी कामगारांचे करत होते.जगावर अधिराज्य गाजवणारे ‘फकिरा’कार लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे एक क्रांतीच्या शब्दांचे भांडार होते.आण्णाभाऊ साठे म्हणजे एक झंजावती विचार.आण्णाभाऊ साठेंच लिखाण म्हणजे उपेक्षीत-अपेक्षीतांचा एक आधार.अण्णाच्या हाती पेन आला तो एक तलवार होवुनच गोरगरीब-शोषित कामगार मजुराच्या खचलेल्या दबलेल्या लोकांचा आक्रोश,हळहळ,भुकेवर शब्द होवुन ही तलवार चालली.त्यांच्या लिखाणामुळे मुक्यांना वाचा आली.झोपलेल्यांना जाग आली.”माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतीया काहिली” हे कोण्या जाती धर्माला समोर ठेऊन लिहलेल काव्य नाही तर मुंबई पोट भरण्यासाठी आलेल्या तमाम चाकर मान्यची अंतकरणातील वेदना होती ती आज ही आहे.तेच लोक साहित्य सम्राट,लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्य वाचकाना हार्दिक शुभेच्छा देऊ शकत नाही?. मराठी माणूस म्हणुन आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन! करू शकत नाही?.ही कोणती पत्रकारिता आहे जी जात पाहून मी मराठी माणूस ठरविते?.बहुसंख्य वृतपत्र अण्णाभाऊच्या जयंतीची साधी दखल घेत नाही. मुंबईतील सर्वाधिक खपाच्या दैनिकानी एक सिंगल कॉलम बातमी दिली असती तर काय फरक पडला असता?.तेच भटमान्य लोकमान्य त्यांचा १ ऑगस्ट स्मृतिदिनानिमित्त हात दुखे पर्यंत आणि तोंडाला फेस येईस्तोवर गुणगान केले जाईल.याबदल वाईट वाटते म्हणूनच मी दरवर्षी हा पत्र प्रपंच करत असतो.

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे.हे एक मराठी समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते.यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मांग जातीत झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.अण्णाभाऊंनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या. त्यांना तीन अपत्ये होती.आज दि. १ ऑगस्ट लोकशाहीर, साहित्यरत्न तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांची जयंती ! अवघा दिड दिवस शाळेत जाऊन.ऐतिहासिक कथा, कांदबऱ्या,वगनाटय,पोवडेची रचना करून मराठी लोकसाहित्याची नवनिर्मिती करणारे.अण्णाभाऊ साठे महाराष्टातील मराठी माणूस नव्हते काय?.त्यांची दाखल कितपत घेतले जाते.हा संशोधांचा विषय आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत,तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले.एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या.अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची,विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या सोबत असत.लोकगायनातून लोकप्रबोधन करीत असताना त्यांनी त्यांच्या अनुभव लिहायला सुरुवात केली.आणि अजरामर साहित्य निर्माण झाले.लावण्या,पोवाडे,पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळत गेली. असंघटीत समाजाला आपल्या शाहिरीतून जागृत करणारा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील चमकता लाल तारा होता.असे का म्हटले व लिहले जाते.आकाशात सर्वच निळी तारे असतांना लाल तारा कसा?.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १९२७ ते १९५६ चा जमिनिवर आणि आकाशात निळी शक्ती म्हणून ओळखली जात असतांना.

   रशिया पाहण्याची त्यांची अण्णाभाऊ साठेची इच्छा प्रबळ झाली होती की 1948 मध्ये त्यांनी दोन वेळा पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी अण्णा भाऊंना बोलावून विश्वासात घेऊन सांगितले होते की, “बाबा तू आमचा वैरी आहेस, आम्ही चांगले लोक आहोत म्हणून तू बाहेर आहेस नाहीतर तुझी जागा तुरुंगात.” आहे. त्यानंतर अनेक वर्षं सरली पण रशिया प्रवासाचं स्वप्न अधुरं राहिलं ते राहिलंच.1961 मध्ये त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला पुरस्कार मिळाला आणि इंडो-रशियन कल्चरल सोसायटीकडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.त्यां नंतर निळ्या आकाशातील चमकणारा “लाल तारा” -लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही उपाधी डाव्या विचारांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनी लावली.हा सत्य इतिहास किती लोकांना माहिती आहे आणि मान्य आहे हा ही संशोधनाचा विषय आहे.   मुंबईत अण्णांच्या आयुष्याला १९४५ साली कलाटणी मिळाली.लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट,खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली.या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या.वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना लेखन करायला खूप मेहनत करण्याची गरज पडली नाही. अण्णांभाऊचे लिखाण नेहमी कष्टकरी कामगार मजूर डोळ्या समोर ठेऊन होत होते.त्यातील नायक हा अन्याय अत्याचारा विरोध लढणार आणि जातीव्यवस्थे विरोधी बंड करून उठनाराच होता.त्याच्या प्रत्येक कथा, कांदबरया,वगनाट्य चा नायक हा सर्व सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे लोकांच्या,वाचकांच्या गळ्यातील ताईत बनत होता. भारत देश स्वतंत्र  झाल्याच्या १९५० ते १९६२ साल म्हणजे अण्णभाऊच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत गेले. 

   मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. त्यामुळे तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागला.अण्णांभाऊनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला.तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता,माकडीचा माळ, चिखलातील कमळ,वारणेचा वाघ,फकिरा अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ३५ कांदंबऱ्या लिहल्या त्यात ८ कांदबरीवर चित्रपट निर्माण झाले ते तुफान लोकप्रिय झाले  १२ च्यावर कथासंग्रह लिहले त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा,महाराष्ट्राची परंपरा,मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले.निवडणुकीत घोटाळे,दुष्काळात तेरावे,अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.मराठीतील ग्रामीण,प्रादेशिक,दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी,गुजराती,उडीया,बंगाली,तमीळ,मल्याळी अनेक भारतीय भाषांबरोबर रशियन,झेक,पोलिश, इंग्रजी,फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी,विज्ञाननिष्ठ,स्त्रीवादी,लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. 

अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते,कार्यकर्ते आर.बी.मोरे, के.एम.साळवी,शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले.मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले.याच लेबर कॅम्पमध्ये अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख व शाहीर द.ना.गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला होता.
   अण्णाभाऊच्या क्रांतिकारी विचारा पासुन मातंग समाज आज लांब आहे.उभे आयुष्य त्यांनी कम्यूनिस्ट चळवळीत घातले पण उच्च वर्णीय,वर्गीय नेतृत्व करणाऱ्या या डाव्या कामगार चळवळीने त्यांना मनापासून कधीच स्वीकारले नाही.शेवटी शेवटी अण्णाभाऊ नी भिमराव (बाबासाहेब) सांगितला पण त्यांच्या समाजाने आजही तो स्वीकारला नाही. विधान परिषद वर पहिला मातंग आमदार कॉग्रेस कोल्हापूरचे दशरथ नरसिंगा कांबळे यांना निवडून पाठविला आणि आता 2024 ल भाजपने मातंग समाजाचा आमदार अमित गोरखे यांना निवडून पाठविले.म्हणजेच मातंग समाजाने  कॉग्रेस,राष्टवादी भाजपाचे नेतृत्व स्वीकारले पण आंबेडकरी विचारांचे नेतृत्व नाही. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या स्थापने पासुन इतिहास तपासला तर कोणाचा विकास झाला.हे दिसून येईल.महामंडळाच्या अध्यक्षाने जेलची हवा खाल्ली आहे.अनेक कार्यकर्ते त्याचं वाटेवर आहेत.ज्याने अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ उभी केली पाहिजे होती,त्याने समाजाचे शोषण करणारी फळी उभी केली. आणि समाजाला विकलांग बनविले.अण्णाभाऊच्या जयंती दिनी व स्मुर्ती दिनी पूर्ण पण जाहिराती देवून राष्टवादीला मोठे केले.आणि मातंग समाजाच्या तरुणांना आकर्षित केले.

   समाजाचा विकास व कल्याण करण्यासाठी असलेल्या महामंडळाचा राजकीय अड्डा बनविला.अण्णाभाऊ साठे चा वैचारिक वारसा सांगणारा तरुण घडविन्या ऐवजी राष्टवादीचा मातंग कार्यकर्त्ता घडविला.त्यामुळे आज सर्वच राजकीय पक्षात मातंग आघाडी निर्माण झाली.त्यामुळे काही आमदार मंत्री झाले.त्यांनीच मातंग समाजाला आंबेडकरी चळवळी पासुन चार हात लांब राहण्याचा सतत मार्ग दाखवितात.आणि स्वतःच्या जातीपुरते वेगळे आरक्षण मांगतात त्याकरिता आता आंदोलन तीव्र करून ते कोणा विरोधात कोणासाठी लढतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या व इतर समाजा समोर आहे. त्यामुळे खेड्या पाड्यातील मातंग समाज शोषण मुक्त झाला नाही.गावांत किंवा शहरातील आण्णाभाऊ साठे नगरातील तरुण शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या पासुन वंचित आहे.तो मोठ्या प्रमाणात देव देवी,मरीआईच्या चक्रात अडकलेला असुन अज्ञान अंधश्रद्धा यातून तो मुक्त नाही.

   पुथ्वीशेष नागाच्या फण्यावर नसुन असंघटीत कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरळी आहे.हे समाजच आज ही मान्य करीत नाही.आज ही असंघटीत क्षेत्रातील मांतग समाजाची संख्या लक्षवेधी आहे.पण ते स्वताला मजूर,शेतमजूर,कामगार म्हणून संघटीत होतांना दिसत नाही.ते जातीच्या सवलती मागण्यासाठी संघटीत होतात आणि राजकीय पक्षाचे लाचार गुलाम कार्यकर्ते नेते म्हणून घेण्यास धन्यता मानतात.त्यामुळेच त्यांना अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार तो समाज गमावुन बसला आहे. त्यांच्या विचारांची जयंती जो पर्यन्त होत नाही तो प्रयन्त मातंग समाजाचा शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास होणार नाही.कदाचित माझे माझे हे मत चुकीचे असू शकते.त्यावर मन मोकळेपणाने वैचारिक चर्चा करण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या किर्याशील कार्यकर्त्यांना,जागरूक वाचकांना नम्र विनंती आहे.त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करून संपर्क करावा त्यांचे हार्दिक स्वागत असेल.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्य असंघटीत कष्टकरी मजुराला कामगारंना संघर्षाचा धडाडीचा नायक  बनविलेल्या क्रांतिकारी साहित्याला,विचाराला व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम!.माझ्या लोकप्रिय दैनिकाच्या जागरूक वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे~भांडुप मुंबई,9920403859
.अध्यक्ष -महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *