
आपल्याला कल्पना आहेच की ब्राह्मण मराठा वैश्य या खोत सावकारांबरोबर लढून आम्ही आमच्या जमिनी मिळवल्या होत्या.आगरी कोळी कराडी या ओबीसी जातींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करूनच,खोती विरुद्ध जमीन हक्कांचे आंदोलन जिंकावे लागले.यातूनच आजचा “कसेल त्याची जमीन,राहील त्याचे घर” हा कुळ कायदा अस्तित्वात आला.या कायद्याने उच्चवर्णीय जमीनदारांच्या नावे असलेल्या,प्रत्यक्षातआम्ही कसत असलेल्या ताबा कब्जा वहीवाटीतल्या जमिनीवर,ओबीसी जातींची नावे लागली.
भारतीय संविधान निर्माण व्हायच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातली विषमता प्रत्यक्षात मागासवर्गीयांना समजावी म्हणून जे आंदोलन कोकणात केले. त्यामध्ये “कुळ कायद्याचे आंदोलन” हे अत्यंत महत्त्वाचे आंदोलन आहे.या आंदोलनामुळे प्रथमतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे शूद्र कोण आहेत? हे प्रत्यक्षात जमिनींच्या विषम वाटणीत आगरी कोळ्यांना समजावून सांगितलेले कटू सत्य अत्यंत आज महत्त्वाचे ठरले.यातून आगरी कोळ्यांना हजारो वर्ष त्यांची गुलामगिरी कशामुळे आहे? कोणामुळे आहे? हे समजले आहे.शिक्षण नसल्यामुळे? मनुस्मृती धर्माने नाकारल्याने, ही वेळ आमच्यावर आली.शूद्र ओबीसींवर आली.हिंदू धर्म ग्रंथात काय लिहिले आहे ? हे समजण्याचा कोणताच मार्ग शूद्र ओबीसीकडे उपलब्ध नव्हता.याच्यावर बोलायचे तरी कुणी ? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता.
शेतकरी श्रावण महिन्यामध्ये गावागावात मंदिरा मंदिरात रामायण महाभारताची पारायने करायचा.आजही करतो.परंतु या पवित्र धार्मिक ग्रंथांमध्ये आमचीच “गुलामगिरी” लिहिली आहे.हे कोकणातल्या आगरी कोळ्यांना समजण्याचा प्रश्न नव्हता.समजावण्या साठी कोणताच प्रवचनकार जन्माला आला नव्हता.वर्तमान हिंदू ब्राह्मणी प्रवचनकार यावर बोलू शकत नाहीत.कारण तेच आमचे शोषक आहेत.ओबीसी प्रबोधनाचे महाकठीण काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.त्या अर्थाने महात्मा फुले यांच्या प्रमाणेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हेही आमचे गुरूच आहेत.अर्थात आगरी कोळी कराडी हिंदू शूद्र लोक हे हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांची चिकित्सा कधीच करू शकला नसते.
हिंदू धर्माचा अत्यंत सखोल अभ्यास,तोही प्रत्यक्ष अनुभवानुसार घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने समजला होता.म्हणूनच हिंदू मनुस्मृतीला ऐतिहासिक पर्याय म्हणून भारतीय संविधान डॉ.बाबासाहेब आबेडकर यांनी लिहिले आहे.स्वतःला आलेल्या विषमतेच्या विकृत अनुभवामुळे खूप चांगल्या पद्धतीने हिंदू धर्म डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समजला होता.आजच्या ओबीसी हिंदू बांधवांना विषमतेचा अनुभव येऊन सुद्धा ती विषमता आपल्या भावंडांना कशी स्पष्ट करून सांगावी? हे समजलेले नाही.स्वतःला समजले तरच ते सत्य इतरांना समजावून सांगता येते.केवळ धर्मग्रंथ पाठांतर करून समजत नाहीत.याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन, हे समजावले की,पिढ्यानपिढ्या शेतामध्ये नांगर धरणे.बियाणे पेरणे, भाताची लावणी करणे,भाताची कापणी करणे,मळणी करणे.धान्य डोक्यावरून घरी आणणे.ही सारी कष्टाची कामे उन वारा पाऊस या सर्व ऋतुंमध्ये आपणच शूद्र ओबीसी करतो.मग यातले 70 ते 80 टक्के पेक्षा जास्त धान्य,शेतात कधीच न येणाऱ्या ब्राह्मण मराठा वर्ष वैश्य या “ऐतखाऊ” जमीनदाराकडे का द्यावे लागते ? परंपरेने ही विषमता आपल्या पूर्व जन्मातील पापांमुळे हिंदू धर्मातील शूद्रांच्या ओबीसींच्या वाट्याला आलेली आहे.असे हिंदू धर्मगुरु ब्राह्मण पुरोहित वर्ग सांगत होता.तर हिंदू धर्माप्रमाणे शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडून हे धान्य दंडुक्याच्या तलवारीच्या धाकाने कसे लुटायचे? हे राज्यकर्ता जमीनदार मराठा वर्ग सांगत असे.याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात एक रुपया कर्ज देऊन त्याचे हजारो रुपये व्याजासह कसे वसूल करायचे ? हे धार्मिक शोषण वैश्य सावकार करत असत.
मनुस्मृतीची ही विषमता कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःअनुभवली होती.जगाच्या इतिहासातील शोषण पद्धतींचा अभ्यास करून तिची मांडणी भारतात शास्त्रीय पद्धतीने धाडसी योद्ध्याप्रमाणे सर्वांसमोर केली होती.याचा अभ्यास आज ओबीसी तरुणांनी केला पाहिजे.म्हणूनच त्यांनी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या भूमिहीन शेतमजूर कु लांची,कोकणातल्या खोती विरुद्ध लढण्यासाठी जी मानसिक तयारी करून घेतली.ती एवढी मोठी होती की त्यामध्ये हिंदू धर्मातील विषमतेला आव्हान देण्याचे सामर्थ्य होते.आजच्या लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात ओबीसींचे उच्चवर्णीय शत्रू कोण ? हे न सांगितल्या मुळे एकूणच आंदोलन दिशाहीन झाले आहे.
हजारो वर्ष गुलामित जगलेल्या ओबीसी जातींना धार्मिक बंड करण्याची अजिबात कोणतीच प्रेरणा नसताना.जवळ कोणतीच आर्थिक राजकीय सामाजिक शक्ती नसताना.हे खोतीविरुद्ध बंड करण्याचे करण्याचे मोठे यश कुळ कायदा निर्मितीत आम्हा आगरी कोळी भंडारी कुणब्यांना मिळाले.याला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदृष्टीचे धर्मचिकित्सक नेतृत्व कारणी होते.आजच्या महाराष्ट्रात धर्मचिकित्सक विचारवंत नेतृत्व नसल्यामुळे आरक्षणात वर्गीकरण,क्रिमीलेअर आणले गेले आहे.हे सामाजिक विषमते विरुद्ध लढण्यासाठी मजबुत मागासवर्गीय तरुण घडू नयेत.ते कमजोर व्हावेत. दुर्बल व्हावेत.यासाठी चक्क उच्चवर्णीय ब्राह्मण, जरांगे सारखे अडाणी लोक यावर आम्हालाच मार्गदर्शन करू लागले आहेत.हे आरक्षणास समतेचा पाठिंबा पाया असलेल्या देशनिर्माणाच्या ८५ टक्के लोकसंख्येचा घोर अपमान आणि पराभव आहे.
आजचे मराठा हे कुणबी आहेत?.शूद्र आहेत? मागासवर्गीय आहेत. की जमीनदार उच्चवर्णीय शोषक आहेत?. हे समजवण्यात,पुरोगामी विद्वान महाराष्ट्राला ज्या अडचणी येत आहेत? त्या नीट तपासून पाहिल्या असता.नव्या पिढीला हे लक्षात येईल की.मराठा ब्राह्मण वैश्य हे उच्चवर्णीय शोषक आहेत.समताधिष्ठित आरक्षणाचे विरोधक आहेत.तर आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी हे शोषित आहेत.उच्चवर्णीय कोण? हे सांगण्याची हिंमत मानसिक गुलामगिरीमुळे ओबीसी जातींमध्ये राहिलेली नाही .
आमच्याकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचे लढवय्ये नेतृत्व नाही.अनेक अनेक ओबीसी राजकीय नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाची आज भीती वाटते.कारण त्यांचे पक्षप्रमुख हे उच्च वर्णीय जातींचे ब्राह्मण क्षत्रिय पुढारी आहेत. त्यामुळे वर्तमान ओबीसी आरक्षणाचे आंदोलन अजूनही ओबीसीनाच समजलेले आहे.असे दिसत नाही.ते समजावून सांगण्याची गरज एकत्रितपणे ओबीसी एससी एसटी या सर्वच मागासवर्गीय बांधवांची आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ओबीसींना आपल्या जमीन मालकीसाठी हिंदू धर्माच्या चिकित्सक अभ्यासाने घडविले होते.अशा प्रकारची धर्मचिकित्सा त्यांच्यानंतर करणारे ओबीसी नेते दिबा पाटील होते.एडवोकेट दत्ता पाटील होते,एडवोकेट जनार्दन पाटील होते,जनार्दन कोठेकर होते. असंख्य ओबीसी आणि आंबेडकरी नेते होते.
आगरी समाजातील दि बा पाटील दत्ता पाटील या नेतृत्वाने नारायण नागू पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पिढीचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले.आंबेडकरी चळवळीने लेखक साहित्यिक मंडळीने हा अभ्यास जगासमोर मांडावा अशी माझी नम्र विनंती आहे.ओबीसींकडे ते सामर्थ्य आज राहिलेले नाही.जुने खोत ब्राह्मण मराठा वैश्य हे संविधानानंतर आलेल्या लोकशाहीमध्ये पुन्हा मनुस्मृतीप्रमाणे राज्यकर्ते बनले.
हे सर्वच समता समर्थक साविधानिक कार्यकर्त्यांचे राजकीय अपयश आहे.कुळ कायद्याने मिळालेल्या दहा गुंठे,वीस गुंठे,एक एकर,दोन एकर या अल्पस्वरूपातल्या जमिनी पुन्हा आगरी कोळी कुळे यांच्याकडून घेण्यासाठी उच्चजातीय राज्यकर्त्यांनी नवनवीन शासकीय भूसंपादने आणली.
1 एप्रिल 1957 साळी आलेला कुळ कायदा लोकांना समजण्या अगोदरच प्रशासनामध्ये,पोलिसांमध्ये,मंत्रालयांमध्ये अधिकारी पदावर असलेला मराठा ब्राह्मण वर्ग ओबीसींवर तुटून पडला.एकीकडे कुळ कायद्याच्या बाबतीत निष्क्रिय शासकीय धोरण ? आणि दुसरीकडे सरकारी भूसंपादन.यातून ओबीसी शेतकऱ्यांना जमिनी मिळूच नये.यासाठी एक कुळ कायदा विरोधी अभियान महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवले गेले.
1960 साळी एमआयडीसी साठी कवडीमोल भावाने भूसंपादन करण्यात आले.शेतकऱ्याची जमीन कितीही घेतली? तरी म्हणजे, शंभर गुंठे जागा संपादित केली. तरी पुनर्वसन म्हणून एकच गुंठा जागा शेतकऱ्याला पुनर्वसन म्हणून द्यायची.ही पुनर्वसित जागा त्या शेतकऱ्याला मिळू नये.यासाठी अत्यंत बिकट अटी शर्ती टाकण्यात आल्या. त्याच पद्धतीने जरी अशा प्रकारचा भूखंड शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळाला.तरीही एक गुंठ्यामध्ये तो उद्योग उभारू शकत नाही.किंवा शेतीही करू शकत नाही.घर बांधू शकत नाही.हे कटू सत्य होते.आणि त्या भूखंडाचा विकास करण्यासाठी आवश्यक कर्ज सुविधा शेतकऱ्याला मिळू नये.अशा प्रकारची व्यवस्था या भूसंपादनामध्ये केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसी उद्योग नगरी विकसित झाली.परंतु एकही शेतकरी यामध्ये उद्योजक झाला नाही.हा सत्य इतिहास ठाणे रायगड मधल्या एमआयडीसीमध्ये आपण आजही पाहू शकता.स्वातंत्र्या नंतर उच्चजातीय शासकांनी ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यांचे केलेले शोषण हे महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासकांना खरोखरच मोठा अभ्यासाचा विषय आहे.
आपल्या लोकांची अशी फसवणूक भूसंपादनामध्ये आमच्याच शासनाकडून होते? हे समजायला वकील असलेल्या एडवोकेट दि बा पाटील यांना १९७० साल उजाडावे लागले.आणि मग १९७० साळी पुन्हा एकदा मराठा राज्यकर्ते वसंतदादा पाटील यांनी सक्तीचे म्हणजेच बंदुकीच्या गोळ्या घालून जे सिडको भूसंपादन धोरण राबविले.त्यात आगरी कोळी ओबीसी पूर्णपणे भूमिहीन झाले.कुळ कायद्याने मिळत असलेल्या जमिनी पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन उच्च जातीय शासक जातींनी प्रतिक्रांती करून पुन्हा ओबीसींना भूमिहीन गुलाम केले.त्यामध्ये पाच हुतात्मे देऊन हजारोंचे रक्त सांडून झालेले सिडकोचे भूसंपादन साऱ्या भारतात गाजले.या ओबीसी रक्तरंजित लढ्यातून सिडको “साडेबारा टक्के पुनर्वसन धोरण “तयार करण्यात आले.त्याचे शिल्पकार आजचे लोकप्रिय आगरी ओबीसी नेते दिवंगत दि बा पाटील हेच आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण संपादित जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित विकसित भूखंड देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला.याचबरोबर प्रकल्पग्रस्त दाखले देऊन सरकारी नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.काहींनी नवीन वाढीव भावाच्या केसेस कोर्टात करून पुन्हा एकदा आर्थिक पुनर्वसनाची मागणी केली.यामुळे सिडको क्षेत्रातील शेतकऱ्यांचे त्याच भागात पुनर्वसन झाले.आत्ता अलीकडे आलेल्या नवीन भूसंपादन कायद्याच्या पुनर्वसन धोरणाचा मसुदा,याची पायाभरणी लोकनेते दिबा पाटील यांच्या आंदोलनाने झाली. “हुतात्म्यांचे रक्त वाया जाऊ द्यायचे नाही.वाया जात नसते” हे नवे तत्वद्न्यान लढण्यासाठी आम्हास देऊन दिबा २०१३ साळी आमच्यातून निघून गेले.याच पद्धतीने 2005 ते 6 या काळात” रिलायन्स अदानी सेझ प्रकल्प” उरण पनवेल भागात पुन्हा एकदा आगरी कोळ्यांच्या जमिनी घेण्यासाठी लादण्यात आला. यामध्ये इथल्या कुळ कायद्याने जमीन मालक झालेल्या अल्पभूधारक आगरी कोळी ओबीसी यांना भूमीहीन करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाकडून राबवले गेले.ही आधुनिक मनुस्मृतीच आहे.
आजही नवी मुंबई विमानतळाच्या नावाने जे जमिनी फुकटात लाटण्याचे धोरण, सिडको नगरविकास विभागामध्ये म्हणजेच नयना क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सुरू आहे. त्याचे करते धरते वसंत दादा पाटील या जुन्या सावकारी मराठ्याप्रमाणे आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नवे मराठाच आहेत.त्यामध्ये नवा भूसंपादन कायदा धाब्यावर बसवून 60 टक्के जमिनी सिडकोच्या, 40% शेतकऱ्याच्या.अशी बेकायदेशीर मांडणी करून शेतकऱ्याला सातत्याने फसवले जात आहे.लाज आमच्याच मूर्खपणाची वाटते.लोकनेते दि बा पाटील आणि दत्ता पाटील ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी तयार झालेली तर्कनिष्ठ पिढी आता संपली आहे.याचा फायदा महाराष्ट्रातले उच्चवर्णीय राजकीय नेते घेत आहेत.त्याचे खरे कारण आमच्या ओबीसी नेत्यांचा जो धर्मचिकित्सक फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे तो संपवून टाकण्यात उच्चवर्णीय हिंदुत्ववादी सर्वपक्षीय नेते यशस्वी झाले आहेत.
आत्ता नव्या सावकारशाहीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.ज्या शेठजींच्या भटजींच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले.लोकनेते दिबा पाटील त्याच विचारांनी सिडको विरोधात लढले.तो विचार आता हद्दपार होत आहे.त्यामुळे ज्या भूमीतून कुळ कायद्याची लढाई आगरी कोळ्यांनी लढली.त्या भूमीतला ओबीसींचा शेतकरी कुळांचा भूमीहीन शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा ,खऱ्या अर्थाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा विचार संपविला जात आहे.लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे.असे आंदोलन इथल्या आगरी कोळी भूमिपुत्रांनी सुरू केले होते.परंतु आगरी कोळी कराडी समाजातील ठेकेदार बिल्डर राजकीय नेत्यांनी पैशाच्या जोरावर हे आंदोलन आपल्या राजकीय स्वार्थासाठी,उच्चजातींच्या गुलाम राजकारणासाठी उपयोगात आणले.लोकनेते दि बा पाटलांचा सिडको प्रकल्पग्रस्त, विमानतळ प्रकल्पग्रस्त ,मच्छिमार प्रकल्पग्रस्त,एससी एसटी प्रकल्पग्रस्त यांच्या पुनर्रचनाचा विचार बाजूला ठेवण्यासाठी नामकरण आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला गेला.आजही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आगरी कोळी ओबीसी लोक आमच्या रक्ताचे असूनही? लोकनेते दि बा पाटलांचा “विचार” सांगायला तयार नाहीत.यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत.
पहिला मुद्दा सिडकोमुळे उध्वस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होय.यासाठी दोन वेळा खासदार आणि पाच वेळा आमदार झालेल्या दि बा पाटलांनी आपले सारे आयुष्य देशातल्या ओबीसींसाठी खर्च केले.तो ओबीसी विचार सांगितला जात नाही.मंडल आयोगाने भारतात आणलेल्या मनुस्मृतीच्या विषमतेविरुद्धच्या क्रांतीमध्ये आपला “विवेकी समतेचा विचार” ही दी बा पाटलांची खरी ओळख होती.ती ओळख आज महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या आरक्षणाच्या आंदोलनात अत्यंत मार्गदर्शक आहे.तो विचार म्हणजेच ओबीसी आरक्षणामुळे आगरी कोळी कराडी यांना मिळालेले शिक्षण नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण होय.ओबीसी आरक्षण वाचवण्याची ती लढाई होती.
महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाचे समर्थक आंदोलन हिंदुत्ववाद्यांनी संपविल्यामुळे आता दि बा पाटलांचा विचारही त्यांच्या जातीच्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तां मधून ओबीसी मधून लुप्त होत आहे.म्हणूनच दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले आणि राज्यातले हिंदुत्ववादी सरकार देणारच नाही. हा सत्य विचार तर्कहीन ओबीसी नेतृत्वाला समजत नाही.म्हणूनच दी बा पाटील साहेबांच्या प्रकल्पग्रस्तांना,ओबीसींना जे सरकार प्रत्यक्षात “न्याय” देत नाही. ते आमच्या नेत्याच”नाव” देतील का? अदानीच्या नावाने 76 टक्के मालकी झालेल्या ?स्वतःच्या नावे असलेल्या विमानतळास “अदानी” मोदी शहा फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे” वैश्य ब्राह्मण क्षत्रिय मराठा “हे ओबीसींचे पारंपारिक शत्रू ओबीसी नेत्याचे नाव देतील का? हा प्रश्न समस्त ओबीसी आंदोलनात काम करणाऱ्या महाराष्ट्र आणि देशातील सर्वच मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी या नेतृत्वाने समजून घेण्याचा विषय आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण आंदोलनात शिवसेनाप्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव जो नगरविकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या मार्फत एकतर्फी घेतला होता.याबाबत पहिल्या धडकेच्या आगरी कोळ्यांच्या लाखोंच्या आंदोलनाने माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना माघार घ्यायला लावून लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव सरकारच्या शेवटच्या क्षणी घ्यावा लागला.सद्यस्थितीत आताच्या राज्यातील भाजपा सरकारला नामोहरण करण्यासाठी धर्मचिकित्सेचे आंदोलन समस्त ओबीसींनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर केले.तर ओबीसींचेच नाही.एससी एसटी चे आरक्षण धोक्यात आले आहे.ते आम्ही वाचवू शकतो.ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून सुरू आहे.या माध्यमातून आरक्षण विरोधी मोहीम सर्व स्तरावर मनुस्मृतीचे समर्थक चालवीत आहेत.या कारवायांना आंदोलनाच्या माध्यमातून रोखून धरण्यासाठी बलाढ्य भाजपाला सरकारमधून हद्दपार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय नेते,विरोधी पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांना सुद्धा या आंदोलनात उतरल्या शिवाय आता पर्याय राहिलेला नाही.रायगडच्या ठाण्याच्या आगरी कोळ्यांनी आपले मन मोठे करून ओबीसी एससी एसटी या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना नवी मुंबईच्या नामकरण आंदोलनात उतरण्यासाठी बंधुभावाने विनम्रपणे बोलावून घ्यावे.असे मला मनोमन वाटते.
दिबा पाटील यांचे नाव विषमतेचे समर्थन करणारा मनुवादी भाजपा देईल? यावर कोणताच फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता, नेता राजकीय पक्ष कधीच विश्वास ठेवणार नाही.जर असा विश्वास कुणाला असेल ? तर ती हिंदू मनुस्मृती धर्मावरील पारंपारिक अंधश्रद्धा ठरू शकते. आणि अशा प्रकारच्या चुकीच्या अंधश्रद्धा,देव देवकी, धर्म श्रद्धा नाकारणारे नेतृत्व म्हणजेच लोकनेते दि बा पाटील होते.त्यामुळे त्यांनी मांडलेले सिद्धांत कधीच चुकीचे ठरणार नाहीत.याची नोंद वर्तमान ओबीसी आरक्षणात काम करणाऱ्या नेत्यांना सिडको पुनर्वसनात काम करणाऱ्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तांना घ्यावी लागेल.म्हणूनच माझी सर्व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे.की लोकांचे प्रश्न सोडवणे म्हणजेच दि बा पाटलांचे नाव टिकवणे.आम्ही लोकांचे प्रश्न विसरून ठराविक प्रस्थापित नेतृत्वाचे अस्तित्व,व्यापार,ठेकेदारी टिकवण्यासाठी आमच्यावर पुन्हा एकदा गुलामगिरी लादण्याचा प्रयोग नवी मुंबई क्षेत्रात सुरू केला आहे.म्हणूनच लोकनेते दि बा पाटलांचे नाव विमानतळास लागत नाही.तर त्यांच्या कर्मभूमी उरण पनवेल च्या जमिनीवर पुन्हा एकदा उच्चवर्णीय वैश्य अदानीची अपवित्र पावले लागली आहेत.हे आमचे अपयश,आमचा सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक पराभव आहे.म्हणजेच आम्ही पुन्हा एकदा गुलाम झालो आहोत.हे या क्षणी तरी आम्हाला मान्य करावे लागेल.
जय ओबीसी,जय दिबा,
राजाराम पाटील.82 86031 463.उरण रायगड .

