समाज प्रबोधनाची ज्योत सतत तेवत ठेवणारे स्तंभ लेखक,निर्भीड पत्रकार सागर तायडे!

बातमी शेअर करा.

मोठे माणस छोट्या माणसासाठी लिहीत नाहीत.छोटे माणसं मोठ्या माणसासाठी नेहमीच आदर्श ठेऊन लिहितात .म्हणूनच मी सागर तायडे यांच्या साठी हे लिहितो. असंघटित कष्टकरी कामगार नाका कामगार,मजूर, शेतमजूर मोठ्या संख्येने असतांना ही त्यांच्या मूलभूत समस्या वर राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते कधीच गांभीर्याने बोलत किंवा लिहत नाही.जातीचे जागृत कार्यकर्ता,बुद्धिजीवी साहित्यिक जाती पेक्षा कामगार मजूर म्हणून गांभीर्याने दखल घेत नाही.परंतु असंघटित कष्टकरी नाका कामगार,घर  कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते सागर तायडे असंघटित कामगारांच्या समस्या वर नियमित पणे लिहतांना लढतांना मी पाहत आलो आहे. ते माझ्या मातृभूमी बुलढाणा जिल्ह्याचे भूमीपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६१ रोजी जळगांव जमोद तालुक्यातील गाडेगांव खुर्द येथे झालेला होता. त्यामुळेच ही तारीख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांशी जनसंघर्षाशी खूप जुळणारी आहे.कारण ३ ऑक्टोबर १९५७ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली होती.त्यावेळी ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात त्याची विशेष चर्चा जनजागृती होती.

   सागर तायडे यांचे प्राथमिक शिक्षण गाडेगाव खुर्द,माध्यमिक शिक्षण सुनगाव, तालुका जळगाव (जामोद) जिल्हा बुलडाणा या ठिकाणी झाले आहे.पुढे त्यांनी मुंबई या ठिकाणी शिक्षण घेतले.असंघटित कष्टकरी नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी १९८२ ला सत्यशोधक बिगारी कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याचे काम त्यांनी सुरू केले.त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन विजय सातपुते आणि शरद पाटील यांनी दिले,त्यामुळे त्यांनी अनेक समस्यांवर लिहायला सुरुवात केली.ती आज ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

    सागर तायडे हे टाटा पॉवर कंपनीत नोकरी करीत होते पण,ते ग्रामीण भागातील असल्याने त्यांना असंघटित कष्टकरी कामगारां बद्दल आस्था होती.त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चालत असलेल्या घडामोडींचा, समस्यांचा जवळून अभ्यास केला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली.मग त्यांच्या लिखाणात गरीबांच्या व्यथा,सामाजिक प्रश्न, समस्या आणि राजकीय परिस्थिती या संदर्भात विश्लेषण करणारे लेख,बातम्या प्रसिद्ध होत होत्या.धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याबाबत सातत्याने लिहायला सुरुवात केली ते सत्य परिस्थितीवर पोटतिडकीने लिहीत असल्याने आणि वास्तवदर्शी असल्याने त्यांचे लेख साप्ताहिक,पाक्षिक, दैनिक वर्तमान पत्रात नियमितपणे प्रसिद्ध होत होते आणि आजही ६० पेक्षा जास्त वृत्तपत्रांत त्यांचे लेख,बातम्या प्रसिद्ध होत असतात.त्यांच्या मुळे माझ्या सारख्या ग्रामीण भागातील ओबीसी कार्यकर्त्याचे लेख राज्यातील अनेक पेपर मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.माझी एक पत्रकार लेखक म्हणून ओळख त्यांनी निर्माण करून दिली ही मी विसरू शकत नाही.

आपल्याला जी गोष्ट पटली त्याबद्दल लिहीत राहावे त्याला प्रसिद्धी मिळेलच हि अपेक्षा करु नये असे मला सागर तायडे साहेब नेहमीच सांगतात.ओबीसी समाजात  जनजागृती प्रबोधन करण्याचे लेख मी त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सतत लिहत राहिलो. मलाच नव्हे तर अनेकांना प्रेरणा देणारे त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १) क्रांतिकारी विचारांच्या सागर लाटा २) आरक्षण लाभार्थ्यांना शासनकर्ती जमात बनावे. आणि पुढील काळात त्यांची दोन तीन पुस्तके निघतील एवढे प्रचंड प्रमाणात त्यांचे लिखाण आहे.मी माझ्या अनेक समाज बांधवांना पुस्तके विकत घेऊन मोफत वाटलेली आहेत.

   सागर तायडे साहेबांचा वाढदिवस हा तीन ऑक्टोबर आहे.वयाची ६४ वर्षे पूर्ण होऊन ६५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यांचा अनुभव खूप प्रेरणादायी आणि लक्षवेधी आहे.नियमितपणे विविध वृत्तपत्रात ते लिहितात आणि माझ्या सारख्या खेड्यातील सर्वसामान्य बांधवाचे लेख नियमितपणे विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध करतात. त्यामुळेच त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे.ओबीसी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना, शिक्षकांना त्यांनी लेखक म्हणून ओळख निर्माण करून दिली त्यात मी एक ओबीसी सुतार समाजाचा एक सर्वसामान्य समाज बांधव प्रमोद सूर्यवंशी आहे. त्यांचे मित्र अविनाश टिपले पत्रकार चंद्रपूर यांनी सागर तायडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने लिहिलेला लेख मी संग्रही करून ठेवला होता.त्याचा आधार घेऊन कामगार नेते स्तंभ लेखक सागर तायडे यांचा जीवन संघर्ष हा लेख तयार केलेला आहे.आणि सागर तायडे साहेबांचा जनसंपर्क मी मुंबई ते नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,नांदेड़,कोल्हापुर,सोलापुर, पुणे,नाशिक,धुळे,नंदुरबार येथील वाचक,पत्रकार आणि कार्यकर्त्यां कडून स्वतः अनुभवला आहे.कोणत्या तालुक्यात जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांच्याबाबत विचारणा केली कि,ते त्यांच्या बद्दल खूप सामाजिक बांधिलकी ठेऊन मैत्री भावना वाढवणारे चांगले मित्र आहेत ही वाचक कार्यकर्ते गर्वाने सांगतात.

    मार्शल सुतार या व्हॉट्सअप ग्रुपवरील माझ्या समाज लिखाणाची दखल घेऊन खऱ्या अर्थाने बाग फुलविणारे आणि राज्यातील अनेक वृत्तपत्रात माझे लेख प्रसिद्ध होतात त्याबद्दल मी सागर तायडे साहेब आणि मालक,संपादक, संपादकीय मंडळाचे मी जाहीरपणे मनःपूर्वक आभार मानतो.सोशल मीडिया वरील सुतार समाजाच्या अनेक ग्रुपवर माझ्या लिखाणा बाबत सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत असते.सागर तायडे साहेबां सारखा वैचारिक मैत्री जपणारा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. त्यांनी जे मैत्री भावनेने नातं जुळविले ते जातीच्या व नात्यापेक्षा मोठे ठरत आहे.यांचा मला अभिमान आहे.त्यांच्यावर स्तुती सुमने वाहण्या एवढा मी मोठा साहित्यिक विचारवंत नाही पण मोठ्या साहित्यिक विचारवंत माणसापेक्षा माझ्यासाठी सागर तायडे साहेब निश्चितच मोठे वाटतात.माझ्या सारख्याचे लेख कॉम्प्युटर वर काना,मात्रा,विलांटी,अनुस्वार सर्व चेक करण्यासाठी वेळ काढून कष्ट करणारे आणि अनेक वर्तमान पत्रासाठी पाठविण्याची दक्षता घेणारे शोधून सापडणार नाहीत.म्हणूनच मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे चार शब्द लिहले आहेत.माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी मंगल कामना करतो.

  प्रमोद सूर्यवंशी – ८६०५५६९५२१,चिखली,मातृतीर्थ बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *